सुकल्पः प्रतिक पुरींची ही सहावी कादंबरी. प्रतिक, सर्वांत आधी हे पुस्तक हाती घेताना लक्षात येतं ते या पुस्तकाचं वेगळं मुखपृष्ठ, याचं नाव, ‘पाखंडखंडण’ आणि तिरकं स्वस्तिक यावरती दिसते, ज्याच्या मागे भगव्या रंगाची पार्श्वभूमी आहे. या शीर्षकामागे व मुखपृष्ठामागे नक्की काय विचार आहे?
प्रतिकः हे मुखपृष्ठ प्रदीप खेतमर यांचं आहे. यावर खाकी रंग आहे, त्यांत मध्ये तिरकं स्वस्तिक चिन्ह आहे जे कापलेलं आहे. स्वस्तिक हे हिंदू धर्मातील चिन्ह आहे. सध्याचा काळ हा भाजपचा आहे, संघाचा आहे. संघाने हिंदूंची जी प्रतीकं वापरली आहेत त्यातून मला असं दाखवायचं आहे की त्यांचं स्वस्तिक हे भारतीयांना, हिंदूंना मान्य असलेलं सर्वधर्मसमभावी स्वस्तिक नसून, ते हिटलरनं वापरलेलं स्वस्तिक आहे. जे फॅसिझमचं चिन्ह आहे. म्हणून त्यामागे भगवा रंग आहे. ‘पाखंडखंडण’ हे नाव तुकोबांच्या एका अभंगातून घेतलेलं आहे. माझे सारे विचार त्यावर आधारीत आहेत. पाखंड हा शब्द संस्कृत पाषंढ या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ होतो वितंडवाद. म्हणजे खोटा वादविवाद करणे. हट्टाने आपला खोटा पक्ष स्थापने. आपल्या खोट्या गोष्टी रेटून सांगणे, त्याच खऱ्या आहेत असं लोकांना सांगणे. आता हे कोण करत आहे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पाखंड हा शब्द, धर्माच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यासाठी वापरला जातो. माझ्या दृष्टीनं सध्याचा जो भाजपचा किंवा संघाचा विचार आहे, जे स्वतःला हिंदूत्त्ववादी समजतात, हिंदू धर्म फक्त आम्हालाच समजला आहे असं ज्यांना वाटतं, मला असं वाटतं की, ते स्वतःच धर्मद्रोही आहेत, ते स्वतः पाखंडी आहेत, ते स्वतः पाखंड करत आहेत आणि या पुस्तकातून त्या पाखंडाचं खंडण करण्यात आलं आहे.
सुकल्पः या पुस्तकाची शैलीदेखील वेगळी आहे. ती पोथीकाव्याची आहे. यामागे काय विचार होता तुझा?
प्रतिकः एक लेखक म्हणून मी सातत्यानं प्रयोग करत असतो. कादंबरीमध्ये निवेदन हा भाग असतो, त्यांत वेगवेगळ्या शैली कशा येतील हे लेखक बघत असतो. जो विषय मी मांडू इच्छित होतो त्यासाठी मला वाटलं की आपण एखादा देशी फॉर्म वापरूया. आपल्या देशात साहित्याची मोठी परंपरा आहे त्यातील एखादा फॉर्म मला वापरण्याची इच्छा होती. पोथीकाव्य, अभंग हा आपला लोकप्रिय फॉर्म आहे. सत्यनारायणाची पूजा आपण सर्वांनीच ऐकली आहे. भटजी ती कथा कशी वाचतात ते आपल्याला माहिती आहे. मला तो फॉर्म अतिशय आवडला आणि मी मांडलेल्या विषयासाठी मला तो योग्य वाटला. त्याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. जेणेकरून वाचकांना याची कल्पना येईल.

भीमा तुझेच होते म्हणणे खरे। कायद्याने जरी अधिकार दिले बरे। समाज जोवर न त्यांस वापरे। निरुपयोगी निरुद्देश राहतील ते।।
घटना असो कितीही छान। पण राज्यकर्तेच असेल नादान। आणि जनतेस नसेल भान। तर घटना दूर्घटनाच ठरेल।।
अधिकार सर्वांस हवे। कर्तव्यांस पाठ दाखवे। घटनेचे कोरडे गोडवे। गाण्याचीच सर्वांची चढाओढ।।
घटनेचे घेऊनी नाव। मांडती हे शकुनीचे डाव। करण्या पांडवांचा पाडाव। कौरव सारे एकवटले।।
भीमस्मृति नको यांना। मनुस्मृतिची आवड त्यांना। रामराज्याची करुनी स्थापना। धोब्यांनाच मिळणार भाव पुन्हा।।
विसरले तुझे उपकार। बहुजन कृतघ्न फार। दिवसाढवळ्या सुचे अविचार। काय यांचे करावे।।
तुझे घेतात लोक नाव। कारण असतो त्यांच्यावर दबाव। म्हणून करतात चांगुलपणाचा बनाव। बाकी तुझाही तिरस्कारच करतात सारे।।
तुलाही ते बुद्ध म्हणतील। किंवा गांधी तुझा करतील। कामापुरता वापरतील। ठेवतील मग फोटोत लटकवून।।
सुकल्पः मला वाटतं तू आता कथानकाविषयीही थोडं सांगावं.
प्रतिकः पुस्तकाच्या जाहिरातीत मी सांगितलंय की ही 2014 नंतरच्या भारताची शोकांतिका आहे. जी पुस्तकात आहे तसेच वास्तवातही आहे. यात काही कॅरेक्टर्स आहेत ज्यांचा प्रवास सुरू होतो आणि त्या प्रवासाच्या माध्यमातून 2014 नंतर आत्तापर्यंत हा देश कसा बदलत गेला, इथल्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींना कसं सामोरं जावं लागलं, त्यावर आधारीत अनेक प्रसंग घेत ही कथा रचली आहे.
सुकल्पः तू 2014 चा उल्लेख केलास बोलताना. तर आपल्या देशात या काळात जे राजकारण होतं, भाजप व संघानं केलेलं, त्यावर याचा भर आहे का?
प्रतिकः भाजप-संघाच्या विरोधावर यात भर आहे पण, काही लोकांचा या वाक्यानं गैरसमज होऊ शकतो. मी व्यक्ती किंवा संस्थांच्या विरोधात कधीच नसतो. मी व्यक्ती व संस्थांच्या विचारांच्या विरोधात असतो. ते विचार चांगले असतील तर मी त्यांचं समर्थन करतो. ते वाईट असतील तर मी त्याचा विरोध करतो. गांधीजी म्हणायचे की, “तुम्हाला जर माझ्या कालच्या आणि आजच्या विधानामध्ये फरक जाणवत असेल, तर मी आज जे काही सांगतोय तुम्हाला त्यावर भरवसा ठेवा.” कारण या मधल्या काळात माझी विचारशक्ती वाढलेली आहे. माझ्या जाणीवा वाढलेल्या आहेत. तिच कसोटी मी माझ्या व्यक्तीगत आयुष्यात लावलेली आहे. लिखाणासाठी लावलेली आहे.
मी फक्त सत्याचा अनुयायी आहे. सत्याविषयी तुमची ही ठाम भूमिका असेल तर बाकीच्या गोष्टींचा तुमच्यावर प्रभाव पडत नाही. मग काल तुम्ही ज्या लोकांची चांगल्या कामासाठी स्तुती केली आहे, ते आज वाईट वागत असतील तर तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकता. पण सत्याचा आधार नसेल तुमच्यात तर मग तुमची गोची होईल. कारण मग तुम्हाला वाटेल की काल तो चांगला होता, आज तो वाईट वागतो तर मी त्याच्या विरोधात कसं बोलू आता? कालची वाईट माणसं जर आज चांगली वागू लागली तर मी त्याचं कौतुक कसं करू? मला हे प्रश्न नाही पडत. भाजप किंवा संघ या माझ्या दृष्टीने वाईट प्रवृत्ती आहेत. दुर्दैवानं त्यांनी ते स्वतः त्यांच्यावर ओढून घेतलं आहे. मला गरज नव्हती हे लिहिण्याची काही. पण त्यांची जी कृत्ये आहेत, विचार आहेत, ते देशासाठी घातक आहेत, धर्मासाठी घातक आहेत, व्यक्तींसाठी घातक आहेत म्हणून मी त्यांच्या विरोधात लिहिलंय. या कथेतील पात्रांमध्ये जर तुम्हाला काही ओळखीची माणसं दिसली, ओळखीचे प्रसंग आढळले तर त्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, माझ्यावर नाही.
सुकल्पः या पुस्तकात एका ठिकाणी दाभोलकरांच्या आश्रमाचा उल्लेख येतो. त्याविषयी तू काय सांगशील?
प्रतिकः नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत माझं जुनं कनेक्शन आहे. 2013मध्ये दाभोलकरांचा खून झाला. त्याच काळात मी ‘मोघपुरुस’ लिहित होतो. ते पुस्तक लिहित असताना मी अस्वस्थ होतो. माझ्या मनोगतात मी लिहिलं आहे की, दाभोलकरांचा खून झाल्यानंतर मला स्वतःला प्रचंड भीती वाटत होती की मी जर त्यांच्यासारखाच विचार करत असेन तर माझं काय होईल. या भीतीवर मात करण्यासाठी मी ‘मोघपुरुस’ लिहिली. दाभोलकर पुन्हा ‘पाखंडखंडण’ मध्ये येतात ते याच कारणासाठी. यात मी सोमीकारण्य नावाचा अध्याय लिहिला आहे. सोमीकारण्य म्हणजे सोशल मीडियाचं अरण्य. तर यातली पात्रं त्या सोमीकारण्यात जातात, तिथं त्यांना हमीद नावाचा एक तरुण भेटतो. तो दाभोलकरांविषयी त्यांना सांगतो, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्याविषयी सांगतो. आणि त्या सर्व लोकांविषयी बोलतो ज्यांची हत्या केवळ याच्यासाठी झाली कारण काही लोकांना त्यांचे विचार मान्य नव्हते. तर ही एक आदरांजली आहे माझी दाभोलकरांना आणि त्या सर्वांनाही.
सुकल्पः यातील नंदी नावाचं पात्र संघाच्या वातावरणातील आहे. धम्मवीर नावाचं एक दलित पात्र आहे. खंडेराव मराठा आहे, अल्ताफ़ मुस्लिम आहे आणि मुक्ती नावाची ब्राह्मण तरुणी आहे. हे थोडं स्टिरीओटिपीकल नाही वाटत का?
प्रतिकः आपल्या देशात जात आणि धर्म आपण काही केल्या सोडू शकत नाही. तुम्ही तो सोडण्याचा प्रयत्न केला तरी समोरचा माणूस तुम्हाला तो सोडू देत नाही. तुमच्या प्रत्येक गोष्टीत जात-धर्म येतच असतो. पूर्वी तो आडमार्गाने यायचा, आता तो उघडपणे येतो. त्याची जाणीव करून देऊन तुमच्यावर अत्याचार करणं आता सुरू झालं आहे. मी जी पात्र लिहिली ती स्टिरीओटीपीकल वाटली तरी ती तशी नाहीत. मराठा म्हणजे फक्त मराठा जात नाही तर हा क्षत्रिय आहे. नंदि ब्राह्मण वर्णाचा आहे. हे वर्णाचं आहे. धम्मवीर शूद्र वर्णीय आहे. मुक्ती ही स्त्री आहे. स्त्रियांविषयी आपल्या देशातच नव्हे तर जगभरातच अत्यंत घाणेरडे विचार आहेत. स्त्री ही पुरुषांना नकोच असते. ती देवी आहे हे फक्त बोलण्यापूरतं लिहिण्यापूरतं असतं. ब्राह्मणांमध्येही स्त्रियांविषयीचे विचार अत्यंत गलिच्छ आहेत. मनुस्मृति वाचली की तुम्हाला ते समजून येतील की वैदिकांचे, ब्राह्मणांचे स्त्रियांविषयी काय विचार आहेत. माझ्या पात्रांमध्ये मी फक्त त्यांचे गुण दाखवले नाहीत तर त्यांचे दोषही दाखवले आहेत. या वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांमध्ये कसे संबंध पूर्वापार होते आणि आज कसे आहेत त्याचं वर्णन आहे.
मला असं दाखवायचं आहे की आपला भारत देश हा वैविध्यपूर्ण आहे ते तुम्ही नाकारू शकत नाही. काही लोकांनी म्हटलं म्हणून ही विविधता जाणार नाही. त्यांनी कितीही म्हणू द्यात की आम्हाला एकच देश हवाय, एकच धर्म हवाय, एकच घटना हवीय जी मनुस्मृतिवर आधारीत असेल, एकच रंग हवाय, तर ते होऊ शकणार नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. हा विचार ही पात्रं मांडत आहेत. प्रत्येकजन स्वतःच्या जातीपूरता विचार करत नाहीये हाही भाग आहे यात. मी आदिवासींचा उल्लेख नाही केला यात. याचा अर्थ ते नाहीत का याच्यात? तर तसं नाहीये. ऑप्रेस्ड पर्सन, ज्याचं शोषण होतं, अत्याचार होतात तो जसा दलित असतो, तसाच आदिवासीही असतो. ती स्त्री देखील आहे. यात नंदिचा प्रवास आहे, जो संघातला आहे, पण मी संघाच्या विरोधातला नाही. भाजपवाले सतत सांगत असतात, त्यांचे प्रधानमंत्रीही सांगत असतात की आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. ठिक आहे त्यांना तसं वाटू शकतं. पण आम्हाला भाजपमुक्त, संघमुक्त भारत नको आहे. ही आमचीच माणसं आहेत. पण त्यांची डोकी बहकलेली आहेत. ती आम्हाला ताळ्यावर आणायची आहेत. त्यासाठी हे पाखंडखंडण केलं आहे.
सुकल्पः या कादंबरीत पत्रकारकाण्ड असा एक अध्याय आहे. त्याविषयी काय सांगशील?
प्रतिकः पत्रकार हा शब्द सध्या शिवी द्यावी असा झाला आहे. निवृत्त न्यायाधीश मार्केंड्य काटजू यांनी पत्रकारांसाठी प्रेस्टीट्यूट हा शब्द वापरला होता. आज तो शब्दही सौम्य वाटावा आणि वेश्यांचा अपमान करणारा वाटावा, असं मीडियाचं वागणं आहे. वेश्यांविषयी मला पूर्ण आदर आहे, पत्रकारांविषयी नाही. या मीडियाला गोदी मीडिया म्हणतात हे त्यांच्यावर लांच्छन आहे. आजचा इलेक्ट्रॉनिक मीडिया हा भारतावरचा कलंक आहे. काही अल्टन्यूज चॅनेल्स, स्वतंत्र यूट्युबर्स, मोजकी प्रिंट्स सोडली तर बाकी सर्व मीडिया विकला गेला आहे. त्यावर आधारीत हे पत्रकारकाण्ड आहे. मॉब लिंचिंग आपण पाहिलं आहे. आता मीडिया लिंचिंग सुरू आहे. तुम्ही कोणालातरी पिंजऱ्यात घेतात, तुम्हीच निकाल लावून मोकळे होता. तुम्हीच लोकांना, प्रेक्षकांना भडकावता की हे गुन्हेगार आहेत यांच्यावर खटले भरा म्हणून. पत्रकाराचं हे काम नाही. त्यांचं काम आहे तटस्थपणे गोष्टी दाखवणं, सांगणं. निर्णय लोकांना घेऊ द्या. आम्ही इकडच्या बाजूचे नाही, तिकडच्या बाजूचेही नाही. आम्ही सत्याच्या बाजूचे आहोत. आम्ही सत्य दाखवू. पण ही भूमिका अपवाद वगळता कोणीही घेतांना दिसत नाही, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये.
सुकल्पः तू लिहिलं आहेस की ज्यांनी जगण्याची, लढण्याची व बंडखोरीची प्रेरणा दिली त्या कवितांना ही कादंबरी अर्पण केली आहे. त्यामागचं काही खास कारण?
प्रतिकः कविता ही सूत्रबद्ध असते. सूत्र म्हणजे थोडक्या शब्दांत प्रचंड अर्थ असलेली गोष्ट. कविता हे व्यक्त होण्याचं सोपं पण ताकदीचं माध्यम आहे. जिथे कुठे अत्याचार, अन्याय घडला आहे त्याच्याविरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात कोणीतरी एक सशक्त कविता लिहिली आहे. ती कविता बाकीच्या हजारो लोकांना प्रेरणा देते. तो कवी माहिती नसतो पण कविता माहिती असते. आता ‘पाखंडखंडण’मध्ये ज्या कविता मी घेतल्या आहेत, त्यांचा काळ, संदर्भ वेगळा होता. मी आजच्या काळानुसार, आजचे संदर्भ देत त्या कवितांचं पुनर्लेखन केलं आहे. एक कविता मी सांगू इच्छितो. कारण सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की हा देश भयमुक्त आहे तर तुम्हाला भय कशाचं वाटतं? तुम्ही भय वाटून घ्यायचं नाही असं म्हणणं ही देखील एक दडपशाहीच असते. पण जनतेला काय वाटतं ते मी विंदा करंदीकर यांच्या ‘ती जनता अमर आहे’ या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जनतेच्या पोटामध्ये हाव आहे भय आहे
जनतेच्या डोळ्यांमध्ये धोब्याचा संशय आहे।।
जनतेच्या ऐक्यामध्ये फितुरीची गाठ आहे
जनतेच्या पायांमध्ये स्वार्थाची वाट आहे।।
जनतेच्या ह्रदयामध्ये अन्यायाचे खूळ आहे
जनतेच्या हातांमध्ये सूडाचे सूळ आहे।।
जनतेच्या इच्छेमध्ये विश्वासाची उणीव आहे
जनतेच्या स्वप्नांमध्ये अपयशाची जाणीव आहे।।
जनतेच्या नसांमध्ये उसळता विद्वेष आहे
जनतेच्या डोक्यांमध्ये अकारण त्वेष आहे।।
जनतेच्या मुक्तीसाठी जनतेतच निरुत्साह आहे
आणि जिचा आत्मा दुभंगलेला ती जनता मृतप्राय आहे।।

सुकल्पः इथं मला जिमी हेंड्रीक्सची आठवण होत आहे. विएतनाम युद्धाच्या काळात वुडस्टॉकमधील एका संगीत समारंभात जिमीने गिटारवर अमेरिकेचं राष्ट्रगीत वाजवलं. पण त्यानं ते साधं वाजवलं नाही. त्यानं स्वरांमध्ये चढउतार टाकले, काही कर्कष सूर वाजवले. तेव्हाच्या समाजाची जी युद्धविरोधी मानसिकता होती, अस्वस्थता होती त्याचं प्रतिबिंब त्या सुरांमधून त्यानं काढले होते. तसंच काहीसं तू या कवितांमधून केल्याचं जाणवतं. पण तू पुस्तकासाठी शोकांतिका हा शब्द वापरला आहेस. हा निराशेचा सूर कशासाठी?
प्रतिकः हा निराशेचा सूर नाही. हा आपल्या सध्याच्या वास्तविकतेचा सूर आहे. जे घडतंय त्याचा सूर आहे. जे वर्तमान आहे त्याचा सूर आहे. आपल्या इथं सारं आलबेल नाही. मी याला शोकांतिका म्हटलंय पण ही शोकांतिका कोणी निर्माण केली आहे हे मला लोकांना दाखवायचं आहे. ज्यांनी ती निर्माण केली आहे त्यांनाही दाखवायचं आहे. जनता मुकी असते, बहिरी असते असं आपण म्हणतो, पण तशी ती नसते. ती ऐकत असते, बघत असते, बोलत असते. विचार करते की नाही मला कल्पना नाही, पण त्यांनी तो करावा अशी माझी इच्छा आहे. जे घडतंय ते चुकीचं घडतंय आणि मी तुम्हाला ते दाखवतोय आणि ही शोकांतिका आहे, रामराज्य नाही. रामाचं एक मंदिर बांधून रामराज्य येत नाही. आपल्या देशात तर आधीच रामाची हजारो मंदिरं आहेत, हजारो मशिदी आहेत, गुरूद्वारे आहेत, चर्चेस् आहेत, मग आपला देश सुखी का झाला नाही आजवर? श्रद्धा हा भाग वेगळा, तो व्यवहार नसतो. तो मानसिकतेचा भाग आहे. तुमच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न पूर्णपणे वेगळे असतात. मी ते प्रश्न दाखवत आहेत. तुम्ही मरत आहात. तुम्ही जीवंत आहात असं तुम्हाला वाटतंय फक्त, पण तुम्ही मेलेले आहात, जर तुम्ही विचार करत नसाल तर. जर तुम्ही कृती करत नसाल तर. तुमच्या समोर उघडपणे अन्याय-अत्याचार होत आहेत, तुम्हाला माहिती आहे की ही गुंड माणसं आहेत, जी तुम्हाला भडकावत आहेत, एका धर्माविषयी तुमच्या मनात द्वेष पसरवत आहेत, इतकं सगळं माहिती असूनही जर तुम्ही शांत बसला असाल तर ही तुमच्या आयुष्याची शोकांतिका आहे. बैल प्रचंड ताकदीचा असतो, पण त्याला जोवर पराणी टोचली जात नाही तोवर तो काम करत नाही. आपला आजचा देश, आपली जनता त्या बैलासारखी झोपलेली आहे शांतपणे. मला त्यांना पराणी टोचून जागं करायचं आहे, की काहीतरी हालचार करा बाबांनो, डोळे उघडा, झापडं दूर करा, काय होतंय ते बघा आणि त्यावर विचार करा, कृती करा.
सुकल्पः या पुस्तकानं लोकांसाठी पराणीचं काम करावं, ते जास्तीतजास्त लोकांनी वाचावं अशी अपेक्षा आहेच. या पुस्तकाविषयी वाचकांचा अनुभव काय आहे?
प्रतिकः मी म्हटलंय की आपली जनता झोपली आहे, आळसावली आहे. त्यामुळे प्रतिसादाला वेळ लागतोय. एक तर पुस्तक अवघड आहे, वेगळं आहे, कव्हर बघितल्यावर काही जनांना ते अंगावर आल्यासारखं वाटतं, काहींना भीती वाटू शकते, संशय येऊ शकतो. त्यामुळे बोलायला लोक घाबरतात. लोक सध्या फार हेतुपूर्वक वागत-बोलत असतात. गांधीजी म्हणायचे की “तुमचं साध्य कसं आहे त्यापेक्षा त्यासाठी साधनं काय वापरता ते महत्वाचं आहे.” तुमचा मूळ हेतू शुद्ध पाहिजे. माझा मूळ हेतू शुद्ध आहे की मी हे कशासाठी लिहिलं आहे. वाचकांचा तसा आहे की नाही हे त्यांनी ठरवावं. ज्यांनी ते वाचलं आहे ते कदाचित वाट बघत असतील की कोणीतरी याविषयी तोंड फोडावं. एकदा ते झालं की बाकीचे लोकही बोलू लागतील. हा सर्व निर्भय बनोचा भाग आहे. लोक स्वतःहून काम करत नाहीत. त्यांना एक नेता हवा असतो. मग ते बोलू-करू लागतात. पण चांगल्या गोष्टींना तसाही उशीर लागतो. वातावरण असं आहे की लोकांच्या मनात भय आणि संशय दोन्ही आहेत, आपण ते समजून घ्यायला पाहिजे. गांधीजी म्हणायचे, “क्रांतिकारक स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचं सर्वस्व देतील हे मला मान्य आहे. पण ती मुठभरच माणसं असतील. प्रत्येकजन आपला जीव नाही देऊ शकत. त्यांचे प्रश्न वेगळे असतात. ते घाबरलेले असतात. मी त्यांच्याकडून फक्त एका मुठीची अपेक्षा करतो. पण त्याची ताकद प्रचंड असेल कारण त्या लाखो लोकांच्या मुठी असतील.” या लाखो मुठी एकत्र होण्यासाठी ‘पाखंडखंडण’ आहे. ते तुम्ही वाचा, त्यावर विचार करा, ते हळूहळू पसरत जाईल. हे होणारच आहे. चांगला विचार कधी दडपता येत नाही. सत्य तुम्ही लपवू शकता, दडपू शकता, मारूही शकता पण ते बदलवू शकत नाही. सत्य सत्यच राहणार, तुम्ही कितीही काहीही करा. तेच सत्य मी यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सुकल्पः रविंद्रनाथ म्हणायचे की जिथे मन भयमुक्त असेल तिथं मला जाग यावी. आपलं शासनही तेच म्हणत आहे की देश भयमुक्त आहे. ते तुला मान्य आहे का?
प्रतिकः नाही. शासन म्हणतेय की तुमच्यावर कुठं अत्याचार होतोय? माझ्यावर अत्याचार झाला नसेल, अटक झाली नसेल पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत ज्यांच्यावर हल्ले झाले आहेत, विरोधी नेत्यांवर ईडी लागला आहे. माझ्याबाबतीत या गोष्टी घडल्या नाहीत म्हणून मी सुखी आहे असं मानणारा मी माणूस नाही. देश भयमुक्त आहे याचा अर्थ असा नाही की मी वाट बघू की कधी माझं घर जळतंय, माझं डोकं कधी फुटतंय, माझ्यावर गोळ्या कधी झाडल्या जातील. मला मरायची इच्छा नाही. मला मारायची इच्छाही नाही. मी तुमच्या कारणासाठी का मरू? आणि मी त्याची वाट बघत जगायचं का? कारण तुम्ही ते वातावरण त्याच दिशेकडे नेत आहात. ती बेडकाची कथा तुला माहिती असेल. त्या बेडकाला पाण्यात टाकतात आणि ते पाणी हळूहळू तापवता. तुम्ही तसं वातावरण तापवता आहात. ज्या दिवशी बेडूक मरेल त्या दिवशी त्यालाही कळणार नाही की तो कधी मेलाय म्हणून. पण आम्ही माणसं आहोत. आम्हाला कळतंय की तुम्ही पाणी तापवत आहात. आमची कातडी जळतेय, आमचा जीव जातोय आणि आम्हाला ते मान्य नाही. आम्ही हे होऊ देणार नाही. त्या विरोधाचा हुंकार म्हणजे ‘पाखंडखंडण.’
सुकल्पः हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांनी वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.
प्रतिकः काय केल्यानं कुठला फायदा होईल, नुकसान होईल असा लोक विचार करत असण्याच्या या काळात, साधना परिवाराने मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही खूप आभार. आपण सारे समविचारी लोक आहोत. हे विचार निर्भयपणे मांडण्याचा हा काळ आहे. दाभोलकरांनी हेच केलं होतं. ते त्यासाठी मेले आहेत हे विसरता कामा नये आपण. आपण निदान लिहू तर शकतो, बोलू तर शकतो, विरोध तर करूच शकतो. ती शक्ती आपल्यामध्ये आहे, या लोकांचं पाठबळ आपल्याला आहे, त्यांचे विचार आपल्या सोबत आहेत. आपल्याला त्याचं केवळ अनुकरण करायचं आहे. ते करूयात आपण सारे एकत्रपणे. न्यवाद.
(सौजन्य – कर्तव्य साधना)
कादंबरी – पाखंडखंडण
लेखक – प्रतिक पुरी
प्रकाशक – गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे.
पृष्ठसंख्या – 152
किंमत – 250 रुपये






