दक्षिण भारतात चित्रपटांची वेगळीच क्रेझ आहे. लोक केवळ फिल्म स्टार्सवर प्रेमच करत नाहीत, तर अनेकजण त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात. या अनेकांपैकीच एक म्हणजे रेणुका स्वामी… चित्रदुर्ग येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये सेल्समन असलेला रेणुका स्वामी हा कन्नड फिल्मस्टार दर्शन तुगुडेपाचा कट्टर फॅन होता, इतका की त्याच्यासाठी दर्शन देव होता.
‘तू दर्शनचा किती मोठा फॅन आहेस हे त्याला कळलं असून त्याने तुला भेटायला बोलावलयं’ हा मेसेज घेऊन जेव्हा फिल्मस्टार दर्शनच्या टीममधील काही लोकं रेणुकाकडे आले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. देवानेच आपली इच्छा पूर्ण केल्याची त्याची भावना होती. चित्रदुर्गातील अपोलो फार्मसीमध्ये काम करणाऱ्या रेणुका स्वामीला फिल्मस्टार दर्शनची आवड वेड्यासारखी होती. दर्शनाचा प्रत्येक चित्रपट तो ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहायचा. पण जेव्हा त्याला दर्शनने भेटण्यासाठी बोलावलं तेव्हा ज्याला तो देव समजत होता, तोच त्याचा सैतान आहे हे त्याला माहीत नव्हतं…

कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री पवित्रा गौडा हिने जेव्हा दर्शनच्या वैवाहिक जीवनात प्रवेश केला, तेव्हा रेणुकाला पवित्राचा राग येऊ लागला; मात्र दर्शन किंवा पवित्रा यांना ते माहीत नव्हते. दोघांच्याही आयुष्यात रेणुकाची स्थिती एका सामान्य चाहत्यापेक्षा जास्त काही नव्हती. दर्शन आणि पवित्रा रेणुकाला ओळखतही नव्हते. रेणुका झोपडीत राहायचा. रागाच्या भरात त्याने पवित्रा गौडाला ‘सोशल मीडिया’वर अनेकदा गलिच्छ मेसेज पाठवायला सुरूवात केली. पवित्राला ‘सोशल मीडिया’वर घाणेरडे मेसेज पाठवणे, दर्शनच्या आयुष्यातून दूर जाण्यास सांगणे हे आपल्या जीवावर बेतेल, हे त्याला माहीत नव्हते. त्याच्या या सवयीमुळे त्याचाच नायक त्याच्यावर इतका चिडला, की त्याने रेणुकाला मारण्याची सुपारी त्याच्याच फॅन क्लबला दिली.
पवित्रा गौडा दर्शनच्या आयुष्यात आली अन्…
8 जून रोजी चित्रदुर्गात दर्शन नावाचा फॅन्स क्लब चालवणाऱ्या राघवेंद्रने रेणुकाला फोन करून त्याला दर्शनची भेट घेण्याची संधी आहे, असे सांगितले, तेव्हा रेणुका स्वामीने आनंदाने उड्याच मारल्या. त्याच क्षणी तो त्याच्या आवडत्या फिल्म स्टारला भेटण्यासाठी त्याच्यासोबत जायला तयार झाला. गेल्या अनेक दिवसांपासून दर्शनचे फॅन रेणुकाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. दर्शनला भेटण्याच्या आमिषाने तो अलगद जाळ्यात अडकला. राघवेंद्रच्या सूचनेनुसार, तो स्वत: त्याच्या स्कूटरवरून चित्रदुर्गातील चल्लाकेरे भागात पोहोचला.
राघवेंद्र याची त्याने भेट घेतली आणि दर्शनच्या भेटीसाठी त्याच्यासोबत बेंगळुरूला जाण्याचे मान्य केले. त्याने कॅब बुक केली. रेणुका त्याच्या काही मित्रांसह बेंगळुरूला रवाना झाला. वाटेत त्याला इतर फॅन्सही भेटले. त्यांनी रेणुकाला थेट बेंगळुरूच्या पट्टनाग्रे भागातील शेडमध्ये नेले. तिथे त्याचा काही तास छळ केला आणि नंतर ठार मारले.
रेणुकाच्या हत्येच्या तपासात आता या कटाबद्दल जे तथ्य समोर येत आहे, ते धक्कादायक आहे. राघवेंद्र आणि अन्य फॅन्सनी चित्रदुर्गातून रेणुकास्वामीचे अपहरण केले. नंतर त्याचा खून केला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले. त्यात राघवेंद्र आणि रेणुका दोघे दिसत आहेत. चित्रदुर्गातून रेणुकाचे अपहरण करण्यात राघवेंद्रला मदत करणाऱ्या अशा आणखी काही जणांचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत.
ज्याची देवासारखी पूजा केली, त्याचे समर्थकच या भक्ताला बेदम मारहाण करीत होते. त्याचा स्वतःपेक्षा दर्शनवर जास्त विश्वास होता; पण इथे दर्शनच्या सांगण्यावरून त्याच्याच गुंडांनी त्याला मारण्याचा बेत केला होता. त्याला बेंगळुरूमधील एका निर्जन ठिकाणी मारहाण, गरम लोखंडी रॉडने डाग देणे, आणि इतर प्रकारची क्रूरता करवण्यात आली.

रेणुकाचे नाक आणि जीभ कापली
दर्शन हा रेणुका संदर्भात सतत त्याच्या फॅनक्लब सदस्यांच्या संपर्कात होता. रेणुकाला बेंगळुरूला आणल्याची बातमी मिळाल्यावर तो स्वत: त्याला ओलिस ठेवलेल्या ठिकाणी लपून बसला. येथे पोहोचल्यानंतर त्याने प्रथम रेणुकाला बेल्टने मारहाण केली. आता शवविच्छेदन अहवालातील गौप्यस्फोटांनी या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली. इथे त्याचा देव स्वतः त्याला शिक्षा करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत होता. रेणुकाला बेदम मारहाण केल्यावर जेव्हा दर्शनाचे समाधान झाले, तेव्हा तो तिथून परत गेला आणि आपल्या सेवकांना त्याला मारण्याचा आदेश दिला. यानंतरही बराच काळ त्याच्यावर अत्याचार सुरूच राहिले आणि शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागला.
रेणुकाचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने जाळल्याच्या खुणा आढळल्या. त्याचे नाक, जीभ कापण्यात आली असून जबडाही तुटून वेगळा करण्यात आला. यासोबतच शरीरातील असंख्य हाडे तुटली होती. तो एखाद्या भिंतीवर आदळल्यासारखा वाटत होता. त्याच्या कवटीवर फ्रॅक्चरच्या खुणा आढळल्या. रेणुकाच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हे प्रकरण उघड केले, अन्यथा बेंगळुरू पोलिस सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण मानत होते.
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न दर्शन आणि त्याच्या टोळ्यांकडून सुरू झाला. रेणुका स्वामीच्या मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या एका टीमला त्याचा मृत्यू सामान्य घोषित करण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. यासोबतच रेणुका याचा मृत्यू हत्येऐवजी नैसर्गिक मृत्यू असल्याचे जाहीर करावे, असेही सांगण्यात आले. डॉक्टरांनी लाच न घेता काम केले. या डॉक्टरच्या तक्रारीने कर्नाटकात आता नवा भूकंप झाला आहे. पोलिसांनी डॉक्टरांना या प्रकरणी तक्रार देण्यास सांगितले आहे.

पोलिस तपासात एक गौप्यस्फोट झाला आहे. रेणुका स्वामीची हत्या केल्यानंतर खुद्द खुन्याने त्याच्या ओळखीच्या पोलिस उपनिरीक्षकाला फोन करून रेणुकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना विचारली होती. ही कल्पना त्या पोलिस उपनिरीक्षकाची होती. त्यानंतर नराधमांनी रेणुकाचा मृतदेह कामाक्षिपाल्य येथील गलिच्छ नाल्यात फेकून दिला. कारण पावसानंतर गलिच्छ नाल्यात फेकलेला रेणुकाचा मृतदेह वाहून जाईल आणि कोणाला कळणार नाही, असे त्यांना वाटत होते; मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ जून रोजी त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांना दिसला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरला लाच देण्याचा प्रयत्न, पोलिस उपनिरीक्षकाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विचारणा या गोष्टी कमी होत्या, की काय म्हणून कर्नाटकच्या एका राज्यमंत्र्यानेच दर्शनला वाचवण्याचा प्रयत्न केला. रेणुका हत्येप्रकरणी पोलिसांनी दर्शनला म्हैसूरमधील हॉटेलमधून ताब्यात घेतले, तेव्हा या मंत्र्याने बेंगळुरूच्या उच्च पोलिस अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर गृहमंत्र्यांनाही फोन केला आणि मुख्यमंत्री कार्यालयाशीही संपर्क साधला. हे मंत्री स्वतः गृहमंत्री परमेश्वरा यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेल्याने हद्द झाली; मात्र या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी याप्रकरणी आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले.

दर्शनला अटक होताच सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे नेते या प्रकरणी सक्रिय झाले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. या लोकांमध्ये भाजपच्या एका आमदाराचे नावही समोर आले आहे. त्याने दर्शनला अटक केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून प्रकरण शांत करण्यासाठी दबाव टाकला होता; परंतु सततच्या मीडिया रिपोर्ट्सच्या पार्श्वभूमीवर कोणाच्याही दबावाखाली पोलिसांनी काम केले नाही. पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील चालू तपासातील सर्व तपशील शेअर केलेले नाहीत; परंतु त्यांनी दर्शनला आरोपी क्रमांक एक नाही तर आरोपी क्रमांक दोन बनवले आहे, तर आरोपी क्रमांक एक ही त्याची दुसरी पत्नी पवित्रा गौडा आहे, जिच्याशी हे संपूर्ण प्रकरण आहे.
कर्नाटकातील रेणुका स्वामी हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा आहे. कारण कन्नड अभिनेता दर्शनचे त्याच्याशी जोडलेले आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अभिनेता आणि त्याच्या सहकलाकार मैत्रिणीसह सुमारे 15 जणांना अटक केली आहे. घटनेच्या तारखेला लोकेशन तपासले असता आरोपी आणि दर्शनचे लोकेशन एकच असल्याचे निष्पन्न झाले. दर्शन हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले.
या कामासाठी दर्शनने त्या लोकांना 30 लाख रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ३० लाख रुपयांच्या व्यवहारांचा तपशील काढला आहे. दर्शनने 2002 मध्ये ‘मॅजेस्टिक’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. ‘कारिया’, ‘क्रांतीवीर सांगोली रायण्णा’, ‘कलासिपल्य’, ‘गजा’, ‘नवग्रह’, ‘सारथी’, ‘बुलबुल’, ‘यजमना’, ‘रॉबर्ट’ आणि ‘कटेरा’ यासह अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.






