कोणालाही कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना आपल्या उत्पादनात कोणते गुण आहेत, ते इतरांपेक्षा कसे चांगले आहेत, हे सांगण्याचा अधिकार आहे; परंतु असे करताना अन्य उत्पादनांची नावे घेऊन त्यांना बदनाम करण्याचा अधिकार नाही. दुसरी मोठी रेषा ओढून मोठेपण दाखवता येते, दुसऱ्यांनी काढलेली रेषा पुसून नव्हे; परंतु पतंजलीसारख्या आता हजारो कोटी रुपयांचा ब्रँड झालेल्यांना हे कोण सांगणार? त्यातही बाजार केवळ जाहिरातीवर चालत नाही.
यापूर्वी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याच उत्पादनबाबत अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या. शासकीय प्रयोगशाळेतील तपासणीत त्यांची उत्पादने निकषानुसार नाहीत, असे आढळले होते. खरेतर सरकारने त्यावर कारवाई करायला हवी होती; परंतु बाबा रामदेव यांना या सरकारचा वरदहस्त असल्याने सरकार काहीच कारवाई करीत नाही.‘फेमा’सारख्या कायद्याचा भंग करूनही सरकारने पतंजलीकडे दुर्लक्ष केले. नंतर तर विज्ञानाला आव्हान देण्याची भाषा सुरू झाली. विज्ञान आणि अध्यात्म हे वेगवेगळे आहेत.
विज्ञान कार्यकारणभावाला महत्त्व देते, तर अध्यात्म मानवी भावभावनांना स्थान देते. विशेषतः आरोग्याचा आणि या दोघांचा संबंध येत असला, तरी आरोग्याच्या बाबतीत वैद्यकीय चिकित्सा महत्त्वाची असते. ॲलोपथी, युनानी, होमिओपथी, निसर्गोपचार, आयुर्वेद आदी उपचार पद्धती असल्या, तरी त्यातील कोणतीही एक परिपूर्ण आहे, असा दावा करता येत नाही, तसेच एखादी उपचारपद्धती टाकावू आहे, असेही म्हणता येत नाही. अन्य उत्पादनाच्या जाहिरातीत केल्या जात असल्या आणि त्यातील काही दावे चुकीचे असले, तरी लोकांच्या जीविताशी तो खेळ होत नाही. अर्थात कोणतीही चुकीची जाहिरात करता येणार नाही, असे आता ठणकावण्यात आले आहे.

बाबा रामदेव यांना पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेच फटकारले आहे. गेल्या दोन सुनावण्यात सर्वोच्च न्यायालयाचा संकेत बाबा रामदेवबाबांना पुरेसा इशारा देणारा होता. त्यांना समन्स काढण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज योगगुरू बाबा रामदेव न्यायालयात हजर होते. एखादे चांगले काम केले म्हणजे अन्य कामे चुकीची करायला परवानगी मिळते, असे नाही. बाबा रामदेव यांचे योगातील कार्य सलाम करावे असेच आहे; परंतु याचा अर्थ त्यांच्या पतंजली आश्रमाला काहीही करायला परवानगी मिळते असे नाही. त्याची समज न आल्यानेच बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयापुढे बिनशर्त माफी मागावी लागली.
पतंजलीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना दिशाभूल करणारी जाहिरात प्रकरणाशी संबंधित अवमानाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणावर पतंजली आश्रमाचे कार्यकारी संचालक बाळकृष्ण यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते; परंतु आता बाबा रामदेव यांनाही वैयक्तिकरित्या प्रतिज्ञापत्र द्यावे लागले.
बाबा रामदेव यांच्या वकिलाने सांगितले, की रामदेव यांना वैयक्तिकरित्या हजर राहून माफी मागायची आहे. त्यावर प्रतिज्ञापत्र आधी यायला हवे होते. न्यायालयाला विचारून प्रतिज्ञापत्र लिहिणार का? अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. 21 नोव्हेंबर रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊनही पतंजलीने दिशाभूल करणारी जाहिरात दिली यावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. रामदेव यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदही घेतली. त्यानंतर न्यायालय संतप्त झाले. अवमानाची कारवाई झाल्यानंतरच धडा घेतला जाईल का, अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने हस्तक्षेप करत वकिलांशी बोलून योग्य प्रतिज्ञापत्र दाखल करून घेणार असल्याचे सांगितले.
ॲलोपॅथीवर टीका करता येत नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही मेहता यांनी सांगितले; परंतु याचिकाकर्त्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने असा दावा करू नये. त्यावर न्यायालयाने सांगितले, की प्रत्येक औषध प्रणालीवर टीका केली जाऊ शकते; पण कायद्याच्या विरोधात अशा जाहिराती देता येणार नाहीत.
30 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पतंजलीने न्यायालयात खोटा दावा केला, की ते भ्रामक जाहिराती करीत नाहीत; परंतु त्यानंतरही त्यांच्या जाहिराती सुरूच होत्या. औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास केंद्राला सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सांगितले, की न्यायालयाला दिलेले वचन पाळावे लागेल. तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे. आयुर्वेदिक कंपनी पतंजलीने सतत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल जारी केलेल्या अवमान नोटीसला उत्तर दिलेले नाही.
पतंजलीने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते, की ते त्यांच्या उत्पादनांच्या औषधी परिणामकारकतेचा दावा करणारे कोणतेही विधान करणार नाही किंवा कायद्याचे उल्लंघन करून त्यांची जाहिरात किंवा ब्रँड करणार नाही. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकाशनाबाबत याचिका दाखल केली असून, पतंजलीवर औषध आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 चे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कोविड-19 च्या ॲलोपॅथी उपचाराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते, पतंजली आयुर्वेद आणि त्यांची उत्पादने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. 2022 मध्ये पतंजलीच्या गाईच्या तुपात भेसळ उघडकीस आली होती. उत्तराखंडमधील अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या चाचणीत ‘शुद्ध गाय तूप’ अन्न सुरक्षा मानकांची पूर्तता करत नाही, असे आढळले होते. पतंजलीच्या ‘शुद्ध गाईच्या तूप’चा नमुना उत्तराखंडमधील टिहरी येथील एका दुकानातून घेण्यात आला होता. हे तूप भेसळयुक्त आणि आरोग्यास हानीकारक असल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीनंतर आढळून आले.
बाबा रामदेव यांनी या चाचणीला त्यांची कंपनी आणि पतंजलीच्या देशी तूपाची बदनामी करण्याचे षड्यंत्र म्हटले होते. पतंजली नूडल्सबाबतही वाद झाला होता. डिसेंबर 2022 मध्ये भाजप नेते आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी बाबा रामदेव यांचे ‘भेसळखोरांचा राजा’ असे वर्णन केले होते. उत्तराखंडच्या आयुर्वेदिक आणि युनानी सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोव्हेंबर 2022 पर्यंत पाच औषधांचे उत्पादन थांबवण्यास आणि मीडियामधील जाहिराती काढून टाकण्यास सांगितले होते.

राज्य प्राधिकरणाने पतंजली समूहाच्या बीपीग्रीट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडॉम आणि इग्रिट गोल्ड या औषधांच्या उत्पादनावर बंदी घातली. नंतर दिव्या फार्मसी या कंपनीने सुधारित फॉर्म्युलेशनची माहिती दिली. त्यानंतर या औषधांच्या निर्मितीला पुन्हा हिरवा कंदील देण्यात आला. बाबा रामदेव कोरोनिल औषधाबाबत वाद झाला होता 2021 मध्ये, पतंजलीने हरिद्वार येथे विकसित केलेला ‘कोरोनिल’ टॅबलेट लॉन्च केली.
पतंजलीने असा दावा केला होता की ते सात दिवसांत कोरोना बरे करते. त्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने तीव्र आक्षेप घेतला होता. पतंजली आयुर्वेदाने दावा केला होता, की या टॅब्लेटला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार कोविडच्या उपचारात उपयुक्त औषध म्हणून आयुष मंत्रालयाने प्रमाणित केले आहे. वाद वाढल्यानंतर पतंजलीला याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले. प्रमाणन केंद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोणत्याही औषधाला मान्यता देत नाहीत किंवा नामंजूर करत नाहीत, असे सांगण्यात आले. आयुष विभागाच्या कठोरतेनंतर हे औषध ‘इम्युनिटी बूस्टर’ म्हणून विकले जाऊ लागले.
बाबा रामदेव यांनी मे 2021 मध्ये ॲलोपॅथी हे ‘मूर्ख विज्ञान’ असल्याचा आरोप केला होता. रेमडेसिव्हिर, फेविफ्लू आणि ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने मंजूर केलेली इतर औषधे कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत, असा आरोप केला. ॲलोपॅथी सर्व शक्तीशाली आणि ‘सर्वगुण संपन्ना’असेल तर डॉक्टरांनी आजारी पडू नये. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांच्यावर कडक टीका केली होती.
रामदेव यांनी इतर आधुनिक औषधे आणि उपचार पद्धतींवर टीका करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. 30 मे 2018 रोजी पतंजलीने व्हॉट्सॲपशी स्पर्धा करण्यासाठी स्वदेशी मेसेजिंग ॲप किंभो सादर केले होते; मात्र काही तासांनंतर हे ॲप मागे घेण्यात आले. या ॲपमधील खासगी माहितीच्या सुरक्षिततेबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. फ्रान्समधील एथिकल हॅकर इलियट एल्डरसनने दावा केला होता, की अमेरिकन कंपनीचे बंद केलेले मेसेजिंग ॲप ‘बोलो’ किंभो म्हणून सादर केले गेले आहे. पतंजली प्रॉडक्ट्सचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी हे दावे फेटाळले होते.
2016 मध्ये पतंजलीच्या मोहरीच्या तेलाच्या जाहिरातीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पतंजलीच्या कच्छी घनी मोहरीच्या तेलाच्या जाहिराती खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा आरोप खाद्यतेल उद्योग संस्थेच्या ‘सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने केला होता. 2022 मध्येही पतंजलीचे मोहरीचे तेल राजस्थानमधील गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करत नसल्याचे आढळले.
त्याअगोदर 2006 मध्ये मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी रामदेव यांच्यावर पतंजलीच्या औषधांमध्ये मानव आणि प्राण्यांची हाडे मिसळल्याचा आरोप केला होता. पतंजलीने नंतर हे आरोप फेटाळून लावले. जवळपास एक दशकानंतर, पश्चिम बंगालमधील प्रयोगशाळेत दर्जेदार चाचण्यांमध्ये अयशस्वी झाल्यानंतर लष्कराने पतंजली आवळा रस त्यांच्या कॅन्टीनमधून काढून घेतला होता.






