जागतिक वारशात उभ्या पृथ्वीवर अर्वाचीन, सुदृढ आणि काळाशी सुसंगत ठरलेल्या पहिल्या तीन सभ्यतांपैकी भारतीय सभ्यता गणली जाते. अर्थात आजची भूकमारी, कंगाली, विकसिततेच्या रांगेतली भरारी घेण्यातली धडपड, गरीबी मागासलेपण या साऱ्या इतिहासाने लादलेल्या जखमा आहेत. या समृद्ध वारशाच्या संपूर्ण कालखंडात भारतातून या सभ्यतेने अक्षरश: सोन्याचा धूर पाहिला आहे. जेव्हा जगाला नीटसं बोलता येत नव्हतं, मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवासही पूर्ण झाला नव्हता, तेव्हा या देशाने शून्य, आयुर्वेद, व्याकरण शास्त्र, खगोल शास्त्र, विद्यापीठ अशा हजारो गोष्टींवरती संशोधन सिद्ध केली.
पायथागोरस काय, घनत्वाचा, जडत्वाचा, गुरुत्वाकर्षण शोध हा अलीकडचा आहे. अगदी विमानापासून अणूभट्टी पर्यंतचे शोध हे त्यानंतर हजारो वर्षानंतरचे आहेत. इतकं पुढारलेला ज्ञानाचा वारसा हा भारताच्या ठाई होता, आजही तो त्याच वेगात दौडत आहे. देशाच्या दाही दिशांनी दर 23 किलोमीटरला भाषा आणि पाण्याची चव बदलणारा हा देश एकाच वेळेस नागरी, सागरी आणि डोंगरी अशा तीन तीन भूगोलांच्या रंगसंगती मध्ये जगत असतानाही वारशाच्या बाबतीमध्ये मात्र जगातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा, कुठल्याही सभ्यतेपेक्षा आणि कोणत्याही विचारांपेक्षा श्रीमंत आणि समृद्ध आहे. नुकतीच रत्नागिरी जिल्ह्यातल्या सड्याच्या माळावर सापडलेली एकत्रित 42 कातळ शिल्प या सर्व जागतिक वारशांच्या समृद्ध प्रवासाचे साक्षीदार बनले आहेत.
साधारणपणे इसवी सन पूर्व तीन पर्यंतची अनेक लेणी, मंदिरं, शिल्प, स्मारकं, समाध्या, विरगळी, सतीस्मृती शिला, शिवलिंग, ताम्रपट, शिलालेख, दिशादर्शक स्तंभ अशा अनेक सांस्कृतिक खुणा, प्राचीन, अतिप्राचीन, अर्वाचीन ते थेट अश्मयुगापर्यंत पोहोचलेल्या या खुणा अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. कोकणाची किनारपट्टी या जागतिक वारसामध्ये इतिहासातल्या पानापानांवरती समृद्ध झालेली दिसते. अश्मयुग किंवा अश्मयुगाच्याही अगोदर कैक वर्ष जी माणसाची वस्ती होती किंवा माणसाचा वानर ते नर यांच्या मधला प्रवास अधोरेखित केला जात होता, त्यातल्या मोठ्या खुणा ह्या देखील कोकण किनारपट्टीत आहेत.
विशेषत: जव्हार ते गोव्याच्या बॉर्डर पर्यंत सापडणारा कोकणा, भोई, कातकरी, वारली, आदिवासी, भिल्ल यांसारख्या भटक्या जाती आणि विमुक्त जमाती मधला वंश जो गुहांमध्ये राहत होता. संगमेश्वर, गुहागर, भिवंडी, दापोली अशा अनेक ठिकाणच्या गुहांमधले त्यांचे वावर आज बारा हजार वर्षानंतर सुद्धा ताजेतवाने दिसत आहेत. हे जागतिक वारसे अमूल्य आहेत ते पुढच्या अनेक पिढ्यांना जेव्हा भारत नव्याने मांडण्याची इच्छा होईल तेव्हा एखाद्या दीपस्तंभासारखं काम करतील. आधुनिकीकरणाच्या लाटेत देश बनतात, उध्वस्त होतात. पुन्हा नव्याने बनायला सुरुवात होते, ते बनवता येतातही.
जळून खाक झालेले युरोपातले अनेक देश आज जगभरात श्रीमंतीचा डंका पिटत आहेत. राखेतूनही अनेक देश उभे राहतात, फक्त गाठीशी राहत नाही ती गतकाळातली वारशाची संपत्ती. ती वस्तू असेल, वास्तू असेल, चित्र असेल, भाषा, विचार त्या जपणं अति महत्त्वाचं. त्या हातातून निसटल्या की धनुष्यातून निघालेला बाण जसा परत येत नाही तसे हे वारसे नष्ट झाले की संस्कृतीचाही तुकडा पडतो, म्हणून हे जागतिक वारसे या पुढच्या पिढ्यांना आरशासारखे ठरायला हवेत.

महाराष्ट्राचा जागतिक वारसा अधिक संपन्न आहे. तो एकाच वेळेस समुद्र, नद्या जागतिक नामांकन मिळतील अशा विहिरी, किल्ले, डोंगर, थंड हवेची ठिकाणं आणि अनेक अर्वाचीन प्राचीन काळातील स्मारकं यासाठी प्रसिद्ध आहेत. निसर्गाच्या बाबतीतही अतिप्राचीन जैविक विविधता, पाण्याचे प्रवाह, जलचर पक्षी, उभयचर अगदी सापांच्याही जागतिक दर्जांच्या जाती, हळदीसारखं जागतिक दर्जाचं उत्पन्न, जगाच्या पाठीवरती फक्त भारतातच मिळतील अशा हजारो वनऔषधी, दुर्मिळ पुस्तके, शास्त्र, पुराणे शेकडो गोष्टीने हे जागतिक वारसा संपन्न आहे.
त्यात पश्चिम घाटाचा कोकणापर्यंत पसरलेला परिसर, साताऱ्याच्या पर्वतरांगांमध्ये कोकणाच्या दिशेने सरकलेल्या कासचे पुष्प पठार हे सारे जागतिक दर्जाचे वारसे आणि प्रकल्प आहेत. त्यात मुकुटमणी ठरावा असा एक वारसा नजीकच्या पाच-पन्नास वर्षात जसे कबरेतून हात बाहेर यावेत तसे हा ठेवा जमिनीनेच आपल्या पोटातून बाहेर काढून दिला आहे, तो ओळखण्यात माणूस कमी पडत असावा. मात्र ज्ञानाच्या वाटा आणि ओळखी जशा जशा प्रगल्भ होत गेल्या, जाणिवा जशा समृद्ध होत गेल्या, तस तशा या जागतिक वारसांचे महत्त्वही जगाला कळायला लागलं.
कोणी विदेशातल्या व्यक्ती या माळरानावरती येतात, तिथे तंबू टाकून राहतात, अन्न पाण्याची फिकर न करता कातळावरती पसरलेल्या काहीतरी खोदलेल्या, काहीतरी खरवडलेल्या चित्रांचा अभ्यास करतात, हे पाहिल्यावर स्थानिकांना आश्चर्य वाटण निश्चित. त्यातूनच सड्यावरच्या तीन ते अठरा फूट लांबीच्या कातळावरती रेखाटलेल्या काही चित्रांचा उलगडा झाला.
अर्थात ही कातळ शिल्प काही शे दोनशे पाचशे वर्षांची नव्हे तर ती इसवीसन पूर्व किमान दहा ते बारा हजार वर्षांपूर्वीचे आहेत. कोकण किनारपट्टीवरती चालुक्य, शिलाहार, भीम शालीवाहन काळातील म्हणजे हजार वर्षाच्या अंतरातील शेकडो मंदिरात वाड्या, घाट अनेक अनेक गोष्टी बघायला मिळतात. कोकण किनारपट्टीला असला इतिहासाचा वारसा नित्य परिचयाचा आहे. मात्र ही कातळ शिल्प त्यापुढे जाऊन गतकाळाशी म्हणजे इसवीसन पूर्व अश्मयुगाच्याही आधीच्या काळाशी थेट संवाद साधणारी आहेत.
साधारणतः अश्मयुगातला काळ माणसाच्या उत्क्रांतीच्या मध्यावरचा काळ मानला जातो. माणूस बऱ्याच अर्थाने, बऱ्याच मार्गांनी त्याचं पुढारलेलेपण समज आलेल्याचे अनेक पुरावे सोडताना दिसतो. या कातळ शिल्पात ते काठोकाठ संपत्ती सारखे भरलेले आहेत. आपल्या अवतीभोवतीचे प्राणी, त्यांच्या रचना, चौकोनी आकृत्या इतक्यावरती ही चित्रं थांबलेली नाहीत तर पुढे पुढे जसे कवितेमध्ये माणूस स्वतः संपूर्ण झिरपलेला दिसतो, तो त्यात स्वतःचे प्रतिबिंब बिंबवतो, स्वतःची गोष्ट सांगतो, काही संकेत देतो इथपर्यंतचा बौद्धिक प्रवास आणि तोही चित्रांच्या मार्फत तेही चित्र साधं सुद्धा नव्हे तीन ते अठरा फुटांपर्यंत भलं मोठं, तेही कोकणातील जांभ्या दगडाच्या उघड्यावरील काष्टावर रेखाटलेले. त्यासाठीची अविकसित असलेली अवजारं घेऊन चित्राच्या रूपाने माणसाने बऱ्याचशा गोष्टी त्यात उतरवल्या आहेत. पुढे पुढे ही चित्र फक्त फूट मीटर किंवा मैलांचा नव्हे तर काळांचा प्रवास करताना दिसतात. त्यात अनेक गोष्टी आपसूक प्रवेश करतात.

निसर्ग, माणसाची जडणघडण, त्याचे स्वारस्य, त्याच्या जीवन पद्धतीशी संबंधित असलेल्या गोष्टी या चित्रांमध्ये येत जातात. आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यात खूप कष्ट न करता जवळजवळ 2200 पेक्षा जास्त कातळ शिल्प नजरेत आली आहेत. त्यातली आड्रे आणि सड्यावरची चित्रं तर आपसूक नजरेत आली आहेत. मात्र काळाच्या ओघात अजाणतेपणे, बेफिकिरीमुळे अनेक कातळ शिल्प दगडाच्या खाणींमध्ये सुद्धा विरघळून गेलेली आहेत. मात्र जी आहेत ती पदरात पाडून पवित्र व्हायला हवीत.
120 गावांमध्ये 190 ठिकाणी 2200 च्या संख्येमध्ये असलेली ही कातळ शिल्प जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने स्वीकारलेली आहेत. युनोस्को च्या ताज्या यादीमध्ये यातील सात चित्रांची नामांकन झालेली आहेत. त्यातील एक चित्र हे गोव्यातले आहे, तर बाकीचे सहा शिल्प ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहेत. गणपतीपुळ्याच्या रस्त्याला लागून असलेलं पहिलं सर्वात मोठं कातळ शिल्प 25 वर्षांपूर्वी जगाच्या कानाकोपऱ्यात शिरलं आणि तिथूनच संशोधकांच्या तर काहींच्या कुतूहलापोटी भेटी वाढल्या.
युनेस्कोच्या नामांकनानंतर आता केंद्र आणि राज्य या कातळ शिल्पांची काही अंश की ना होईना देखभाल करतय, ते सुरक्षित रहावीत यासाठी खरा खटाटोप हा स्थानिक पातळीवर व्हायला हवा. तो होणार नाही, त्याचे कारण तुमच्या शिल्पा पेक्षा, तुमच्या वारशा पेक्षा जमिनीवरची मालकी ही स्थानिकाला जास्त महत्त्वाची वाटते. म्हणून ही सर्वच्या सर्व कातळ शिल्प शासनाने रस्त्यांसाठी जमिनी जशा संपादित केल्या जातात त्याच पद्धतीने ती संपादित करून एका टेंडरवर या कातळ शिल्पांना भक्कम असे कुंपण करून ठेवणे शक्य आहे. त्यासाठी लागणारा खर्च फारसा मोठा नाही.
50 – 100 किमी च्या रस्त्यापेक्षा तर निश्चित तो कमी असेल. मात्र त्यासाठीची खूप दूरपर्यंत पाहणारी नजर राज्यकर्त्यांमध्ये, प्रशासनामध्ये हवी. एव्हरेस्टवर जाणाऱ्या सर्व वाटांना नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने जसे चाप लावले, शिस्त लावली आणि उद्याची संकट ओळखली, एव्हरेस्ट मूल्य ओळखलं, त्याच धर्तीवर न्यायव्यवस्थेने देखील या कातळ शिल्पांसाठी पेनातली शाई खर्च करायला हवी. कारण अनेक ठिकाणी केवळ तीच भाषा उपयोगाची ठरते.

वारसांच्या इतिहासात थोडसं ढुंकून पाहिलं तर सर्वात ताजं उदाहरण अनेक प्राचीन अर्वाचीन मंदिरांचे अवशेष होय. हे अवशेष चोरीला गेले आहेत. पुरातत्त्व नावाच्या असून अडचण नसून खोळंबा विभागाच्या प्रचंड जाचामुळे उरलीसुरली नादुरुस्त वारशे देखील जमीनदोस्त होऊ लागले, दगड चोरीला गेले, मुर्त्या चोरीला गेल्या, उरलेला राडारोड्याचा ढीग अनेक ठिकाणी भरणीसाठी वापरण्यात आला, अनेक आखीव रेखीव दगड बघता बघता गायब झाले.
कायदे आहेत, शास्त्र आहे मात्र ते कागदावरच. आजही कोकण किनारपट्टीतल्या अनेक रानावनात, रस्त्यांच्या जवळ सती शिळा, वीरगळी आणि भग्न मुर्त्या ओसाड माळरानावरती विखुरलेल्या दिसतात. सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा असलेलं कास पठार हे पुष्प पठार देखील याच पद्धतीने नष्ट होत गेले. तेथील माणसाचा वावर, त्याचे वेस्टेड इंटरेस्ट, हस्तक्षेप यामुळे हे पुष्प पठार अलीकडच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या समोर नष्ट होत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नावाजलेला हापूस आंब्याचा पॅटर्न, केशर, हळद यांसारखे पॅटर्न देखील नामशेष होत चालले.
कोणी एकेकाळी भारतातून जाणार बांबू , चंदन, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, अतिशय दुर्मिळ अशा जडीबुटी या साऱ्या साऱ्या गोष्टींचा कडेलोट होत चाललेला आहे. जोवर स्थानिकाला हा वारसा किती श्रीमंत आहे, भविष्यातल्या पिढ्यांमध्ये आपली ती ओळख ठरतील, त्यांच्या नावाने आपण ओळखले जाऊ, पर्यटन वाढेल आणि ज्या माळरानावरती कोण फिरकला नाही तिथेच पोटापाण्याची दारंही उघडतील. मात्र त्याची मांडणी व्यवस्थित करून निष्ठेने हा वारसा जपायला हवा, हा वारसा आरसा व्हावा एवढच.






