पाण्याचा एक टँकर उभा आहे आणि शेकडो लोक त्याच्या अवतीभवती गर्दी करत आहेत. सगळे एकमेकांशी भांडत आहेत. आरडाओरड सुरू आहे. टँकरच्या पोटात शेकडो पाईप्स घुसत आहेत. प्रत्येकाला पाणी हवं आहे. काहीही करून एक बादली पाणी तरी मिळावं! अचानक टँकरचा चालक म्हणतो, आता पाणी नाही मिळणार. लोक त्याच्यावर ओरडतात. त्याला विनवतात. त्याला मारहाण करू लागतात. चालक टँकर घेऊन पळू लागतो आणि लोक त्याच्या पाठलाग करतात. मोठ्या शहरांत जिथे पाण्याची कमतरता आहे तिथं अशी दृश्यं आता नेहमीची झाली आहेत. पण हे दृश्य मात्र ‘फुकरे-3’ या चित्रपटातील आहे. लोकांना हसवण्याच्या उद्देशानं तयार केलेल्या या चित्रपटांत दिल्लीतील पाणी समस्येवरही बोट ठेवण्यात आलं होतं.

बॉलिवूडला होतेय हवामान बदलाची जाणीव
प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करणाऱ्या हिंदी चित्रपटांतील हा सध्याचा नवा ट्रेंड आहे. यात एक्शन, नाच-गाणं, रोमँटीक सिन्स, यांच्या सोबतीलाच पर्यावरणाशी संबंधित एखादा मुद्दाही उचलून धरला जातोय. मागच्या नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर ‘आर्चीज’ चित्रपट आला होता. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा अशी स्टार-किड्स यात होती. नेहमीच्या प्रेमाच्या कथानकासोबतच ही मुलं यात एक बाग वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दाखवलं गेलंय. 2013 मध्ये केदारनाथला जो भयंकर पूर आला होता त्यावर आधारीत ‘केदारनाथ’ चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.
यातच मागच्या जानेवारीतील ‘लकडबग्घा’ हा चित्रपटही ठेवता येऊ शकतो. या एक्शन फिल्ममध्ये तरसांना तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नायकाची कथा आहे. 2022 मध्ये आलेली ‘शेरदिलः द पिलीभीत सागा’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी एका मोबदल्याच्या बदल्यात जंगलात वाघाकडून मरण्यासाठी जातो. तर 2021 च्या ‘आखेट’ चित्रपटातील नायक वाघाची शिकार करून आपल्या पूर्वजांप्रमाणे प्रसिद्धी मिळवण्याची लालसा धरतो. हा चित्रपट कुणाल सिंहच्या कथेवर आधारीत होता.
या संदर्भात ‘फुकरे-3’ चे दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, “आमची इच्छा होती की दिल्लीत जे काही घडतंय त्याविषयी लोकांना मेसेज द्यावा. जे सर्वांसोबत घडतंय त्याला पुढे आणावं. करमणुकीसोबत मेसेज दिला तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.”
‘मदर इंडिया’, ‘पाथेर पांचाली’ पासून झाली सुरूवात
चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे की येत्या काळात हा ट्रेंड जास्त वाढेल कारण पर्यावरणाशी संबंधित मुद्दे आता मुख्य प्रवाहातील प्रश्न बनत आहेत. पण एका शोधनिबंधावरून असं दिसतंय की 1940 च्या दशकापासूनच भारतीय चित्रपटांनी पर्यावरण, हवामान यांच्याशी संबंधित गोष्टी पडद्यावर मांडल्या आहेत. ‘मदर इंडिया’, ‘पाथेर पांचाली’, ‘हाथी मेरे साथी’ आणि अन्य चित्रपट येतात. फरक इतकाच होता की तेव्हा यांना सामाजिक नजरेतून पाहिलं जायचं. मागील काही वर्षांपासून असे गंभीर चित्रपटही आले आहेत ज्यांनी बदलत्या पर्यावरणाची संकटमालिका पडद्यावर रंगवण्याचा गांभीर्यानं प्रयत्न केला.
यात दुष्काळावर आधारीत, ‘कडवी हवा’, पाण्याच्या समस्येवरील ‘कौन कितने पानी में’, कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर आधारीत ‘इरादा’, कच्छ येथील पाणी संकटावरील ‘जल’ आणि माणूस-वन्य प्राणी यांच्या संघर्षावरची विद्या बालन अभिनीत ‘शेरनी’ असे चित्रपट येतात. मागच्या डिसेंबरमध्ये मनोज बाजपेयीचा ‘जोरम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातही विकासाच्या नावावर पर्यावरणाचा होणारा विध्वंस दाखवण्यात आलाय. त्याला चांगले रिव्यू मिळाले पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट आपटला. ‘जोरम’ला आपला झालेला खर्चही वसूल करता आला नाही पण त्याच वेळी आलेल्या ‘एनिमल’ चित्रपटाने शेकडो कोटींचा व्यवसाय केला.
‘जोरम’चे दिग्दर्शक देवाशीष मखीजा यांनी असे चित्रपट तयार करण्यात येणाऱ्या अडचणींविषयी म्हटलं की, “ही तर नेहमीचीच गोष्ट आहे. असे चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकच नाहीत. पण आम्ही हे चित्रपट बनवतोय कारण आम्हाला हेच दाखवायचं आहे. ज्या गोष्टींविषयी मनात संताप आहे, बेचैनी आहे, त्या गोष्टींवर मी चित्रपट तयार केला नाही तर कदाचित मी आतून इतका आजारी पडेन की मरूनच जाईन.” मखीजांचं म्हणणं आहे की चित्रपट गंभीर असो वा मनोरंजक, ते पर्यावरणाशी संबंधित मुद्दे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात मोठी भूमिका खेळू शकतात.

ओटीटीवर क्लायमेट फिक्शनचा ट्रेंड
चांगली गोष्ट ही आहे की ओटीटीवर अशा चित्रपटांना पाठींबा मिळत आहे. मागील वर्षी माणसांवर आणि निसर्गावर खोदकामामुळे काय परिणाम होत आहे यावर आधारीत ‘जेंगाबुरू कर्स’ ही हिंदीतील पहिली क्लायमेट-एक्शन थ्रिलर सिरीज आली होती. या सिरीजचे दिग्दर्शक आणि पर्यावरण आणि सामाजिक विषयांवर ज्यांनी 70 हून जास्त चित्रपट, माहितीपट आणि लघुपट तयार केले आहेत, ते नील माधब पंडा म्हणाले की, “हवामान बदलाशी संबंधित गोष्टी आता पेपरमध्ये किंवा माहितीपटात येतात पण लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत. त्यांना वाटतं की हे आमच्यासोबत घडत नाहीये, इतरांसोबत घडतंय. त्यामुळे मला वाटलं की आपण जर यावर आधारीत क्लायमेट-फिक्शन केलं तर त्याचा प्रभाव जास्त पडेल.”
पण अशा चित्रपटांना बॉक्स-ऑफिसवर यश मिळत नाही याविषयी अजय ब्रह्मात्मज सांगतात, “सर्वांत मोठी गोष्ट बिजनेस आहे. क्लायमेट चेंजवर चित्रपट बनवून बिजनेस होणार नाही. जोरमचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. पण तुम्हाला क्लायमेट चेंजवरच एखादा चित्रपट तयार करायचा आहे तर त्यासाठी एखादा तगडा लेखक हवा जो मनोरंजक पद्धतीने हा मेसेज लोकांना देऊ शकेल. अजूनतरी अशी परिस्थिती आलेली नाही आणि त्यामुळे निर्माता यात पैसे गुंतवायला तयार नाहीत.”
असं असलं तरीही पर्यावरणावर काही सुंदर माहितीपटही झाले आहेत. यातीलच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने ऑस्कर जिंकून नवा इतिहास घडवला होता. पण हे माहितीपट फक्त फिल्म फेस्टिवल्स आणि आमंत्रित ठिकाणीच दाखवले जातात, लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. पांडा म्हणतात की माहितीपट केवळ एक टक्का लोक बघतात. लोक बघणारच नाहीत तर त्यांच्यावर प्रभाव कसा पडेल?
तीव्र हवामान बदलांसोबतच लोकांच्या अडचणीही वाढत चालल्या आहेत. 2023 मध्ये पहिल्या नऊ महिन्यात भारतात जवळपास रोजच कुठे ना कुठे निसर्गाचा रौद्रावतार दिसून आला. कधी कडाक्याची थंडी, कुठे प्रचंड तुफान, कधी मुसळधार पाऊस, कुठे डोंगर कोसळला तर कुठे जमीन खचली. यात तीन हजारांहून जास्त लोक मारले गेले आहेत. अशा परिस्थितीत या गोष्टींकडे दूर्लक्ष करणं कठीण होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे. अशात लोकांना जागृत करण्यासाठी चित्रपट हेच एक प्रभावी माध्यम ठरू शकतं. दिल्लीतील ‘भारतीय जनसंचार संस्थे’चे प्राध्यापक आनंद प्रधान म्हणतात, “जनमाध्यमांत चित्रपट सगळ्यात शक्तीशाली माध्यम आहे. तो कथेच्या माध्यमातून हसत-खेळत सरळ मनावर प्रभाव करतो. कठीण गोष्टीही यात सोप्या करून सांगितल्या जातात. कथेत खूप ताकद असते. लोक स्वतःला या कथांशी जोडून घेतात. फिल्म स्टार्स, आपल्या प्रभावी अभिनयाच्या जोरावर आणि लोकप्रियतेवर लोकांमध्ये हवामान बदलांविषयी, त्याच्या परिणामांविषयी जागरूकता निर्माण करू शकतात.”

पर्यावरणावर आधारीत चित्रपटांमुळे खरंच प्रभाव पडतो?
पण एक प्रश्न येतोच की पर्यावरणावर आधारीत चित्रपटांमुळे खरंच किती प्रभाव पडतो याचा. भारतीय संदर्भात याविषयी काही अभ्यास झालेला नाही. पण विदेशांत झाला आहे. पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांची माहिती, त्यांतून तयार होणाऱ्या अडचणी, त्याचा प्रभाव आणि व्यवहार यावर हा अभ्यास झाला आहे. 2010 मधील एका अभ्यासानुसार अल गोर यांच्या ‘एन इनकन्वेनियंट ट्रुथ’ या चित्रपटानंतर अमेरिकन प्रेक्षकांमध्ये पर्यावरणाविषयीची काळजी वाढू लागली आहे. 2020 मधील अभ्यासानुसार असं दिसून आलंय की ज्यांना हवामान बदलांवर विश्वास नसतो अशा लोकांमध्येही असे चित्रपट पाहिल्यानंतर बदल घडून येऊ शकतो. पण 2017 च्या ‘ब्लू प्लॅनेट’ या चित्रपटाशी संबंधित अभ्यासानंतर असं दिसून आलंय की लोकांच्या व्यवहारावर यामुळे कोणताही बदल घडून आला नाही.
2016 ते 2020 मधील 37,453 चित्रपट आणि कथानकांमध्ये फक्त 2.8 टक्के चित्रपटांमध्ये हवामान बदलांचा उल्लेख होता. या अभ्यासात असं म्हटलंय की जे चित्रपट पर्यावरणाला गांभीर्यानं घेत नाहीत त्यांच्यावर सत्याला नाकारण्याचा तसेच कालविसंगत होण्याचा दोषारोप केला जाऊ शकतो. जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठातील क्रियेटीव्ह रायटींगचे सहाय्यक प्राध्यापक मायकेल स्वोबोडो म्हणतात, “बहुतेक क्लायमेट-एक्शन चित्रपटांत नकारात्मक कथा असतात. यात महापूर, वादळ, हिमयुग, समुद्राच्या पाण्यात वाढ असे मुद्दे असतात. पण जीवाश्म-इंधनावर काही नसतं.
खरी गोष्ट ही आहे की लोकांना जग नष्ट होण्याच्या गोष्टींमध्ये काही रस नाही. ते कंटाळले आहेत त्याला. त्यातून त्यांना काही करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही.” काही लोकांना असंही वाटतंय की पर्यावरण बदल हा इतका मोठा, इतका गहन मुद्दा आहे की व्यक्तिगत प्रयत्नांमुळेच यात काही बदल होऊ शकतो. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनीही याचा विचार करून असे चित्रपट बनवायला हवे जे अशा व्यक्तिगत प्रयत्नांची माहिती व प्रोत्साहन देतील. तज्ञांचं म्हणणं आहे की भारतीय चित्रपटांची ताकद ही आहे की एक सॉफ्ट पॉवर म्हणून जगात त्याला मान्यता आहे. त्यामुळे पर्यावरण बदल, हवामान बदल यांना भारतीय चित्रपट उद्योग मुख्य प्रवाहात आणू शकला तर भारताची ही सॉफ्ट पॉवर अधिक वाढू शकते.
अनुवाद – प्रतिक पुरी
(साभार – mongabay.com)






