भारतीय समाजातील लैंगिक असमानतेची मूळं पितृव्यवस्थेत रुजलेली आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सिल्विया वाल्बे म्हणतात, “पितृसत्ताकता ही सामाजिक रचनेची अशी प्रक्रिया आणि व्यवस्था आहे ज्यात पुरुष, स्त्रियांवर अधिकार गाजवतो, तिचं शोषण करतो आणि तिला दाबात ठेवतो.” स्त्रियांसोबत होणारा अत्याचार हा कोण्या एका जाति-धर्माशी अथवा समाज समूहाशी मर्यादित नाही.
पुरुषवादी विचाराअंतर्गत स्त्रियांना कायमच दुबळं समजलं गेलंय आणि त्यांच्यासोबत नेहमीच दुय्यम दर्जाचा व्यवहार करण्यात आला आहे. बायकांना घरी आणि बाहेर समाजातही शोषण, अपमान आणि भेदभावाला नेहमीच सामोरं जावं लागतं.
जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक 2023 मध्ये भारत 146 देशांमध्ये 127 व्या स्थानावर आहे. यातून हेच स्पष्ट होतं की आपल्या देशातील लैंगिक भेदभावाची मूळं किती ताकदीनं किती खोलवर रुजलेली आहे. अशातच या महिला त्या समाजाशी जोडलेल्या असतील, ज्यांच्याविषयी सुरूवातीपासूनच धार्मिक, सामाजिक, राजकीय स्तरावर गैरसमजूती आहेत, तर त्यांचं जगणं अधिकच कठीण होऊन जातं. आपल्या देशात मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज आहेत.
त्यांना कायम ते वेगळे असल्याची जाणीव करून दिली जात आहे. धार्मिक व राजकीय कारणावरून होणारे मॉब लिंचिंग आणि हेट स्पिचचे प्रकार आता नित्याचे झाले आहेत. पण मुस्लिम महिलांच्या बाबतीत लिंग आणि धार्मिक ओळखीमुळे त्यांना याहून जास्त आव्हानांना आणि हिंसेला सामोरं जावं लागतं.

‘द गार्जियन’ मध्ये आलेल्या बातमीनुसार, इस्लामोफोबिक हल्ल्यांची झळ मुस्लिम पुरुषांपेक्षा, मुस्लिम महिलांना जास्त पोहोचत आहे. निकहत सांगते, “मी कॉलेजात असतानाही मला अनेक भेदभावाला सामोरं जावं लागायचं. कॉलेजात मी हिजाब घालून जायचे. एकदा माझ्या संगीताच्या प्राध्यापकांनी मला थांबवलं आणि इतर विद्यार्थ्यांसमोर माझी टिंगल केली आणि म्हटलं की हिजाब घालून संगीत शिकता येऊ शकत नाही.” याविषयी बोलताना रिसर्च स्कॉलर, निकहत पुढे सांगते, “धार्मिक भेदभावाचा मुद्दा बाजूला ठेवला तर हिजाब घातला म्हणून मला शिकतांना कधी अडचण आली नाही. हिजाब घालून मला अधिक ताकत मिळल्यासारखं वाटतं.” निकहत तेव्हा बी.एससी. करत होती आणि आज ती पीएच.डी. करत आहे.
आपल्या धार्मिक ओळखीमुळे मुस्लिम महिलांना वेगवेगळ्या पातळीवर भेदभावाला सामोरं जावं लागतं. लहानपणी शाळेतील वर्गात सुरू होणारा हा भेदभाव पुढे आयुष्यभर त्यांची सोबत करतो. एखादी महिला काम करतेय, विशेषतः ती राजकारणाचा किंवा मीडियाचा भाग असेल, आणि सध्याच्या काळात होणाऱ्या भेदभावाविरोधात, सत्तेच्या विरोधात आवाज उठवत असेल तर तिला इतरांपेक्षा जास्त भेदभावाला सामोरं जावं लागतं. शाळा-महाविद्यालयांत हिजाबबंदी लादल्यामुळे अनेक मुलींना शिक्षणाची वाट सोडावी लागत आहे.
कर्नाटकानंतर देशातही इतर काही ठिकाणी शाळेत हिजाब घालून जाणाऱ्या मुलींवरून वाद उठला आहे. राजस्थानात गणराज्य दिनाच्या समारंभात एका सत्ताधारी नेत्यानं हिजाब घातलेल्या मुलींचा अपमान केला होता. डी. डब्ल्यू.कॉम मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, जयपूर शहरातील गंगापोल भागात एका सरकारी शाळेतील कार्यक्रमांत भाजप आमदार बालमुकुंद उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि इतरांना विचारलं की काही मुली हिजाब घालून का आल्या आहेत.
आमदारानं यावर आक्षेप घेत हिजाबबंदी घालण्याची गोष्ट केली होती. कर्नाटकातील उडूपी जिल्ह्यात हिजाब घालून आलेल्या सहा मुलींवर कॉलेजात येण्यावर बंदी घालण्यात आली होती. घटनेत ‘कलम 25’ सांगतं की प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तरीही हिजाबवरून मुस्लिम महिलांना मुलींना सातत्यानं भेदभावाला, अपमानाला सामोरं जावं लागतंय.
मुस्लिम महिला शिक्षणाच्या बाबतीत अन्य समुदायांपेक्षा खूप मागे आहेत. नोकऱ्यांमध्येही त्यांची संख्या कमीच आहे. राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण 2009-10 अनुसार दर हजारी कामकरी महिलांमध्ये केवळ 101 बायका या मुस्लिम आहेत. 2005 मध्ये मुस्लिम समुदायाच्या परिस्थितीची तपासणी करण्यासाठी ‘सच्चर समिती’ स्थापित करण्यात आली. समितीला आढळलं की 70 टक्के मुस्लिम महिला या घरकामात गुंतलेल्या असतात. बाकी समुदायांत ही टक्केवारी 51 इतकी होती. मुस्लिम महिलांना नोकरी-व्यवसायात फारसं प्रतिनिधित्व नसल्यामुळे, एकूण मुस्लिम समुदाय देखिल व्यवसायामध्ये मागे पडला आहे.
2011 च्या जनगणनेनुसार भारतीय मजूरांमध्ये मुस्लिमांची संख्या 32.6 टक्के होती. मुस्लिम महिलांना नोकऱ्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व आहे हे आता अनेक अहवालातून सिद्ध झालं आहे. ‘लेड बाय फाउंडेशन’च्या अहवालानुसार, मुस्लिम महिलांसोबत नोकऱ्यांवरून 47 टक्के भेदभाव केला जातो. म्हणजे जेवढ्या मुस्लिम महिला नोकरीसाठी अर्ज करतात त्यांच्यापैकी जवळपास अर्ध्या जणींना मुस्लिम नसल्यामुळे नोकरी मिळत नाही. नोकरी-व्यवसायांमध्ये महिलांची संख्या तशीही पुरुषांच्या तुलनेत कमीच आहे आणि त्यातही मुस्लिम महिलांची संख्या तर फारच कमी आहे.

पुरुषसत्ताक समाजात महिलांसोबत जीवनभर भेदभाव केला जातो. घर, शाळा, नोकरी-व्यवसायाची जागा सगळीकडे त्यांना बाई आहे म्हणून भेदभावांना सामोरं जावं लागतं. परंपरेनं त्यांच्यावर लादलेल्या गोष्टी नाकारून नवीन वाट पकडली तर त्यांना शोषण आणि हिंसाचारही सोसावा लागतो. आधुनिक काळात हा भेदभाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे आणि अधिक भयंकरही होत आहे. आज तंत्रज्ञान हा जगण्याचा अभिन्न भाग झाला आहे. त्याचा उपयोग करणाऱ्या मुस्लिम महिलांसोबत ऑनलाईन भेदभाव, बहिष्कार, हिंसा, लैंगिक हिंसाचारही होत आहे. 2021 मध्ये ‘सुल्ली डिल्स’ आणि 2022 मध्ये ‘बुल्ली बाई’ असे ऐप्स तयार करून मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आलं होतं. ज्या मुस्लिम महिला उघडपणे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवतात त्यांचं सोशल मीडियावर ट्रोलिंग नेहमीच केलं जातं. इतकंच नाही तर मुस्लिम महिलांची ऑनलाईन विक्रीही केली गेली आहे.
देशातील वाढता धार्मिक उन्माद आणि राजकारणातील ध्रुवीकरणामुळे मुस्लिम महिलांवरील हिंसाचारातही वाढ झालेली आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या एका बातमीनुसार, 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद येथे एक साधू आणि हिंदुत्त्ववादी नेता बजरंग मुनि दास याने एका मशिदीसमोर उभं राहून आपल्या समर्थकांना उघडपणे मुस्लिम महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यास उचकवलं होतं. सत्ताधारी भाजपचे अनेक नेता, आमदार सार्वजनिक व्यासपीठांवरून मुस्लिम महिलांच्या विरोधात तिरस्काराची भाषणं देत असतात. मुस्लिम महिला, मुली ज्या धार्मिक गोष्टींचा वापर करतात त्यावरून त्यांना घाणेरड्या अपमानजनक शिव्याशाप देण्यात आले आहेत. न्यायालयातूनही त्यांना न्याय मिळत नाही आहे.
बिल्कीस बानो प्रकरणात आपण हे सारं घडताना पाहिलेलं आहे. या सर्व उदाहरणांवरून हेच दिसतं की मुस्लिम महिलांना त्या मुस्लिम असल्यामुळे त्रास दिला जात आहे. असे करणारे लोक एकतर स्त्रीद्वेष्टे असतातच पण धार्मिक भेदभावाला खतपाणी घालणारेही असतात आणि सध्याच्या बिघडलेल्या सामाजिक-राजकीय काळात तर त्यांची संख्या वेगानं वाढत आहे. पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की मुस्लिम महिलांनी शिकणं सोडून द्यावं, नोकरी-व्यवसायात पडू नये किंवा आपल्यावरील अत्याचाराविषयी काहीच बोलू नये. त्या तसं करत नाहीये ही समाधानाची गोष्ट आहे. पितृसत्ता आणि धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावाच्या विरोधातही त्या आपली प्रगती करत आहेत आणि आपल्या घटनात्मक अधिकारांविषयी जागरूक आहेत, त्यासाठी लढत आहेत.
अनुवाद – प्रतिक पुरी






