भलामोठा वटवृक्ष. वटवृक्षाभोवती चौकोनी पार. या पारावर डोईवरचे केस घट्ट बांधलेले, छातीवर रुळणारी दाढी राखून असलेले भगव्या वस्त्रांतले बाबा रामदेव पद्मासनाच्या मुद्रेत ध्यानस्थ बसलेले. मात्र या ध्यानस्थ बाबा रामदेवांच्या भोवती स्टेनगनधारी “सीआरपीएफ’चे जवान कोंडाळं करून उभे. विस्मयकारक विसंगती टिपणारे हे छायाचित्र. जगप्रसिद्ध ‘ओपन’ मासिकात प्रकाशित झालेले. अनेक अर्थाने प्रतीकात्मक म्हणता येईल असे. बरेच काही सुचवणारे आणि संकेतही देणारे.
एरवी, योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या बाबा रामदेवांभोवती झेड सिक्युरिटी कव्हर कशाला हवे? योगाच्या माध्यमातून मानवी मनाची शुद्धी घडवून आणणाऱ्या संन्याशाशी कोणाचे शत्रुत्व असेल, असे रास्त प्रश्नही एखाद्याला पडू शकतात. परंतु, योगगुरू बाबा रामदेवांपेक्षाही पाच हजार कोटीहून मोठ्या उद्योगाची मालकी असलेल्या उद्योजक बाबा रामदेवांसाठी सुरक्षा असते, हे उमजायला फारसा वेळ लागत नाही. त्यातूनच छायाचित्रातल्या विसंगतीचा अर्थ स्पष्ट होत जातो.
आजच्या घडीला बाबा रामदेव आणि वेगाने विस्तारत चाललेला त्यांचा ‘पतंजली’ उद्योग समूह भारतीय उद्योगविश्वातली लक्षवेधी घटना आहे. एकप्रकारे या घटनेचे सुतोवाच ‘ओपन’ मासिकातल्या छायाचित्रातून झालेले आहे. अलीकडच्या काळात फास्टेस्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच “एफएमसीजी’ क्षेत्रात बाबा रामदेवांच्या जोडीनेच श्री श्री रविशंकर, गुरुमित राम रहीम ‘इन्सान’ आदी लाखोंच्या संख्येने अनुयायी असलेले आध्यात्मिक गुरू सूत्रबद्धरीत्या पाय रोवत आहेत.
मात्र या सगळ्यांत आवाज आणि उदगार बाबा रामदेवांचा अधिक ठळक आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांशी असलेले त्यांचे संबंध अधिक जवळिकीचे असल्याचे प्रसंगोपात दिसून आलेले आहे. ते एकाच वेळी योगगुरू, राजकीय मार्गदर्शक, उद्योजक, ब्रंँड अम्बेसेडॉर अशा विविध रूपांत वावरताना दिसताहेत. जाहीरपणे हिंदू संस्कृतीचा, संस्कृतीत रुजलेल्या रूढी-परंपरांचा पुरस्कारही करत आहेत आणि जाहीरपणे कोलगेट, युनिलिव्हरसारख्या तगड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हानही देत आहेत. अलीकडच्या काळातला हा म्हटला तर जागतिकीकरणोत्तर नवा प्रवाह आहे. संन्यस्त वृत्तीच्या त्यातही धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रात वावर असलेल्या माणसाने व्यापार-उद्योगात पडावे का? असा प्रश्न विचारण्याचीही सर्वसामान्यांना उसंत मिळू नये, इतक्या वेगाने बाबा रामदेव आदी गुरू निर्विवादपणे बाजारपेठेवर आपली छाप सोडत आहेत.

कुठून झाली सुरुवात अन् कसे उभारले साम्राज्य?
आस्था चॅनेलच्या माध्यमातून कपालभातीची दीक्षा देणारे योगगुरू ही बाबा रामदेवांची सर्वसामान्यांना झालेली पहिली ओळख. केजरीवाल-अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात बाबा रामदेव आपल्या अनुयायांसह सहभागी झाले आणि ही ओळख अधिक पक्की बनली. भ्रष्टाचारविरोधाची भाषा करणारे रामदेव काँग्रेसच्या विरोधात आगही ओकू लागले आणि हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाची द्वाही देऊ लागले. तोवर त्यांच्या “पतंजली’ने अनुयायांमध्ये बऱ्यापैकी जम बसवायला सुरुवात केली होती. मात्र, वैचारिक जवळीक असलेल्या भाजपचे सरकार सत्तेत आले आणि त्या कालावधीत हजार-अकराशे कोटींचा व्याप असलेल्या रामदेवांच्या पतंजली उद्योग समूहाने पाच हजार कोंटीवर झेप घेतली. समूहाचे बालकृष्ण भारतातल्या पहिल्या दहा श्रीमंत सीईओंपैकी एक ठरले. म्हटला तर हा निव्वळ योगायोग, म्हटला तर सत्तेशी असलेल्या जवळिकीचा परिपाक.
एक लहान औषधाचे दुकान म्हणून 1997 मध्ये पतंजली आयुर्वेद लिमिटेडची स्थापना झाली. आजच्या घडीला फूड, हाेमकेअर, पर्सनल केअर सारख्या विभागात दंतकांती एडव्हान्स, शुगर-फ्री च्यवनप्राश, पाॅवर व्हिटा, हेअरडाय पावडर, स्वदेशी डेनिमसारखी काही नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात कंपनीने आणली आहेत. सुरुवातीला कंपनीने स्थानिक वर्तमानपत्र आणि काही प्रमाणात डिजिटल माध्यमातून जाहिरात केली. पण आता टीव्ही, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आक्रमक जाहिरात प्रचारासाठी तीन अब्ज रुपये खर्च करण्याची कंपनीची ताकद हे. जाहिरातींच्या वाढत्या प्रभावामुळे पतंजलीच्या अनुयायांच्या संख्येतही वाढ होत आहे.
ट्विटरवर 5 लाख, फेसबुकवर 60 लाख, एकूणच साेशल मीडियावर 7 कोटींपेक्षा अधिक पतंजलीचे फाॅलाेअर्स आहेत. नफा कमावण्याचे उद्दिष्ट नसतानाही कंपनीने गेल्या वर्षात 20.2 अब्ज रुपयांचा नफा कमावला. पतंजली आतापर्यंत पतंजली चिकित्सालय, पतंजली आरोग्य केंद्र आणि स्वदेशी केंद्राच्या मार्फत आपल्या उत्पादनांची विक्री करत हाेती. परंतु आता रामदेव बाबांची पाच हजार फ्रँचायझी दुकाने, तीन हजार हेल्थ सेंटर, आणि पाच हजार रिटेल आऊटलेट आहेत. जवळपास 700 वितरक आणि 80 सुपर डिस्ट्रिब्युटर आहेत. उत्पादनांच्या विक्रीसाठी लवकरच तीन हजार चाैरस फुटाचे मेगा स्टाेअर उभारण्याचा विचार पतंजली करत आहे.
त्यातही पुढचे पाऊल म्हणजे, पतंजलीने किशोर बियाणींच्या फ्युचर ग्रुपबराेबर उत्पादन विक्रीसाठी करार केला आहे. रिलायन्स, टेस्काे, डि-मार्ट, हायपर सिटी, स्पेन्सर्स या बड्या रिटेल दुकानांमध्येदेखील पतंजलीच्या उत्पादनांनी स्थान पटकावले आहे. छत्तीसगढसारख्या भाजपशासित राज्यात रेशन दुकानाच्या माध्यमातून पतंजलीने विक्रीची व्यवस्था उभारली आहे. यासोबतच “वाॅलमार्ट’देखील आपल्या 20 हाेलसेल कॅश अँड कॅरी दुकानांमधून उत्पादनांची विक्री करण्याचा विचार करत आहे.
“patanjaliayurved.net’ या संकेतस्थळावरून रिरलायन्स फ्रेश डायरेक्ट, बिगबास्केट, ग्राेफर्स, झाॅपनाऊ या पाेर्टलवरही पतंजलीच्या उत्पादनांची विक्री हाेऊ लागली आहे. स्मार्टफाेनच्या जमान्यात आपण कुठेही मागे नाही, असे सिद्ध करत पतंजलीने स्वत:चे ॲपही विकसित केले आहे. या घटकेला भारताच्या बाजारपेठेत डाबर (5750 कोटी), गोदरेज (4811 कोटी), कोलगेट-पामोलिव (4162 कोटी), इमामी (2391 कोटी), हिंदुस्थान युनिलिवर (31हजार 987 कोटी), ब्रिटानिया (7947 कोटी), नेस्ले (8175 कोटी) आदींचा प्रभाव आहे. यातल्या युनिलिवर, ब्रिटानिया आणि नेस्ले वगळता इतर सर्व कंपन्यांपुढे पतंजलीने (5000 कोटी) तगडे आव्हान उभे केले आहे. पतंजलीचे हरिद्वारमध्ये तीन उत्पादन प्रकल्प असून पंजाबसारख्या अन्य राज्यांतही राजकीय-लष्करी स्थिती पोषक असल्यास बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांतही उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.

आज धर्म आणि देशभावनेच्या बळावर बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशातून हुसकावून लावत बाजारपेठ काबीज करण्याचे स्वप्न पाहणारे बाबा रामदेव कॉर्पोरेट संस्कृतीला स्पष्ट नकार देत आहेत. सेलेब्रिटी ब्रँड अम्बेसेडॉर नेमणे त्यांना पसंत नाही. मार्केटिंग कन्सल्टंट नेमणूक ते महत्त्वाची मानत नाहीत. आत्म्याचा आवाज हाच त्यांचा मार्गदर्शक आहे. त्याच जोरावर ते “कोलगेट का गेट बंद होनेवाला है और युनिलिवर का लिव्हर बैठनेवाला है…’ अशी आक्रमक भाषाही करत आहेत.
भारतीय अर्थव्यवस्थेतले नवे वळण
बाबा रामदेव यांचा अनुयायीवर्ग तळागाळातला असेल तर श्री श्री रविशंकर आणि जग्गी वासुदेव या दोन आध्यात्मिक गुरुंचा अनुयायी वर्ग हा मुख्यत: उच्चभ्रू, उच्चकुलीन आहे. देश-विदेशांत पसरलेला आहे. श्री श्री रविशंकर गेली कित्येक वर्षे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून ध्यानधारणेची दीक्षा देत आहेत. तर जग्गी वासुदेव जगातल्या दहाहून अधिक देशांमध्ये (त्यात इग्लंड, अमेरिकेसोबतच लेबनॉन, युगांडा, चीन आदी देशांचा समावेश आहे.) इशा फाऊंडेशनच्या माध्यमातून योगक्रियांचे प्रशिक्षण देत आहेत. हे दोघेही तसे व्यक्तिमत्त्वाने मवाळ आहेत. त्यात श्री श्री रविशंकर यांची प्रतिमा शांतीदूत अशी बनली आहे, तर जग्गी वासुदेव “मिस्टिक गुरू’ अशी ओळख जपून आहेत.
रविशंकर यांनी श्री श्री आयुर्वेदा या ब्रँडनेम अंतर्गत ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, तर “इशा आरोग्य’ हा ब्रँड बाजारपेठेत जग्गी वासुदेव यांचे अस्तित्व दाखवून आहे. अर्थात, बाबा रामदेवांप्रमाणे खुल्या बाजारपेठेवर ताबा मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचणे, त्यांचे जगणे प्रभावित करणे इतपतच इतर गुरुंचा उद्देश मर्यादित असल्याचे दिसत आहे. अर्थात, कसेही असले तरीही साधारण एकाच काळात आध्यात्मिक क्षेत्रातील गुरुंनी बाजारपेठेवर आपापला प्रभाव राखण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. धर्म, अध्यात्म आणि व्यापार हे परस्परभिन्न नव्हे तर एकमेकांना पूरक असे घटक आहेत, अशी नवी मांडणी या निमित्ताने होताना दिसते आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतले हे वळण म्हणूनच सर्वार्थाने लक्षवेधी आहे…
1991 मध्ये जागतिक अर्थकारणाच्या परिघाबाहेर असलेली आपली अर्थव्यवस्था आता जागतिक अर्थकारणाचा महत्त्वाचा बिंदू बनली आहे. अर्थातच हे माेदी सरकारचे एकट्याचे यश नाही, तर 1991 सालापासून 2016 पर्यंत गेली सलग 25 वर्षे ज्या सातत्याने अर्थकारणाचा प्रवास आपल्या देशात सुरू आहे, त्याचाच हा एकत्रित परिणाम आहे. गेल्या 25 वर्षांतील केंद्र सरकारच्या सत्तारूढ राजकीय रंगसंगतीत जरी कधी बदल झाले असले तरी आपल्या देशाच्या अर्थकारणाने दिशा बदललेली नाही. वेळप्रसंगी सरकारच्या राजकीय रंगसंगतीनुसार काही धाेरणांचा प्राधान्यक्रम जरूर बदलला असेल, पण एकंदरीतच धाेरण म्हणून वादळी घुमजाव घडलेले नाही.
भारतीय अर्थव्यवस्था, तिचे स्वरूप आणि तिची संरचना याचा विचार करत असताना आणखी एक गाेष्ट लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे, केवळ आर्थिक निकषांवर जे एरवी वैगुण्य ठरले पािहजे ते आपले वैिशष्ट्य ठरत आहे. आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा सर्वसाधारण आकार पाहिला तर त्यात उत्पन्नाच्या बाजूला निर्यात आणि परदेशस्थ नागरिकांनी भारतात पाठवलेला पैसा यांचे प्रमाण लक्षणीय नाही. त्यामुळे 1996 किंवा 2008 ची मंदी असाे, किंवा अगदी ब्रेक्झिट असाे, याचा तत्कलीन परिणाम साेडला तर मध्यम ते दीर्घकालीन परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर हाेत नाही. झालेला नाही.
कारण मुळातच देशांतर्गत असलेली मागणी ही आपल्या देशांतर्गत उत्पादनापेक्षा जास्त असते आणि त्यामुळेच जागतिक अर्थकारणापेक्षा राष्ट्रीय घटकांना प्राधान्य देणारी किंवा किमानपक्षी प्रभावित हाेणारी अशीच भारताची अर्थव्यवस्था राहिली आहे. 25 वर्षांच्या सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणा कार्यक्रमानंतरही या चित्रात फारसा फरक पडलेला नाही.
याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या देशाच्या अर्थकारणामध्ये काहीच बदल हाेत नाही. एकूणच ग्राहकाेपयाेगी वस्तूंची मागणी आणि उत्पादन या क्षेत्रात हाेणारे बदल हा एकमेव घटक घेतला तरी याबाबत हाेणारे बदल या बाबतीत पुरेसे बाेलके आहेत. एरवीही बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांच्यासारखे आध्याित्मक गुरू स्वत:च्या आध्यात्मिक समूहाच्या नावाने ग्राहकाेपयाेगी वस्तू बाजारात आणण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. त्यातही इतर सर्व गटांच्या तुलनेत बाबा रामदेव यांच्याशी संबंधित कंपनीच्या माध्यमातून हाेणाऱ्या विक्रीचे प्रमाण वार्षिक पाच हजार काेटी रुपयांच्या पुढे गेल्याच्या चर्चा उद्योग विश्वात रंगत आहेत. अलीकडेच बाबा रामदेव यांच्या कंपनीचे सर्वेसर्वा आणि निकटचे सहकारी बालकृष्ण यांचा समावेश आपल्या देशातील जास्तीत जास्त पगारदार कार्याध्यक्षांच्या यादीत झाल्यापासून तर ही चर्चा वेगळ्या मार्गाने पुन्हा एकदा भरास आली आहे.
मुळातच बाबा रामदेव, श्री श्री रविशंकर यांची, किंवा त्यांंच्या समूहांची, यांच्याशीच संबंधित कंपन्यांच्या उत्पादनांची चर्चा करीत असताना जाे एक मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येताे ताे हा आहे की, आध्याित्मक क्षेत्रातील लाेकांनी व्यवसाय किंवा उद्याेग अशा आर्थिक क्षेत्रात यावे का? या संदर्भात एक नागरिक म्हणून सर्व राजकीय पूर्वग्रह बाजूला ठेवले तर पटकन मनात येणारा प्रश्न असा आहे की, हे किंवा यांच्यासारखे नवउद्याेजक जर हिंदू धर्माऐवजी इतर काेणत्या धर्माचे असते तर प्रिंट किंवा इलेक्ट्राॅिनक प्रसारमाध्यमांनी याची इतकी चर्चा केली असती का?

आजवरचा इतिहास बघता याचे उत्तर नकारार्थी आहे. येथे एक गाेष्ट स्पष्ट नमूद केली पाहिजे की, अशा पद्धतीने आध्याित्मक क्षेत्रातील मंडळींनी व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करण्यास ना धर्माने बंदी आहे, ना आपल्या देशातील कायद्याने बंदी आहे. कारण जसे वैयिक्तक पातळीवर आपल्यापैकी काेणाचेही वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य वेगवेगळे असू शकते, त्याप्रमाणे आध्याित्मक धुरीण ते उद्याेगपती असा प्रवास घडत असलेल्या आध्यात्मिक मंडळींबाबतही ते असू शकते. त्यामुळेच त्यांची आध्यात्मिक पार्श्वभूमी हा त्यांच्या परिचयपत्राचा (बायाेडेटा) एक महत्त्वाचा भाग असला तरी त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचे मूल्यमापन हे पूर्वग्रहदूषित किंवा पूर्वनिर्धारित राजकीय व सामािजक दृष्टिकाेनातून करण्यापेक्षा निखळ आर्थिक निकषांवर करणे जास्त सयुक्तिक ठरावे.
परंतु, असा विचार करत असताना एक गाेष्ट पटकन लक्षात येते ती म्हणजे, बाबा रामदेव हे अशा प्रकारची एकमेव व्यक्ती नाहीत. पण तरीही आजमितीला इतर सर्व उद्याेजकांपेक्षा बाबा रामदेव आणि त्यांच्याशी संबधित कंपन्यांची उत्पादने कितीतरी पटीने विक्री, उत्पादन, नफा-उत्पन्न, राेजगार, भौगोलिक प्रसार आणि ग्राहकांवरील प्रभाव अशा अनेक निकषांवर पुढे आहेत. यापैकी काही उत्पादक या क्षेत्रात बाबा रामदेव यांच्या आधी आले असूनही ही परिस्थिती आहे. त्यामुळे अशा उद्याेजकांच्या उत्पादनाविषयी विचार करताना त्यांच्या धार्मिक पार्श्वभूमीपेक्षा त्यांच्या व्यावसायिक गणितांचा अधिक प्राधान्याने विचार करणे गरजेचे आहे.
हे जर तत्त्व म्हणून मान्य असेल तर पुढचा विचार करत असताना पटकन जाणवणारी गाेष्ट ही आहे की, केवळ अशा धार्मिक पार्श्वभूमीचे धर्मगुरू म्हणून परिचित असलेले उत्पादक नव्याने उद्याेग क्षेत्रात येत आहेत असे नाही, तर अनेक नामांकित देशी-विदेशी कंपन्या आपली नवनवीन उत्पादने आपल्या देशातील बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत विक्रीस आणत आहेत. संगणकापासून माेटारगाड्यांपर्यंत आणि साबणापासून तुपापर्यंत, हे खरे आहे. त्यामुळेच घराच्या गॅरेजपासून आपल्या घरातील सर्व खाेल्यांपर्यंत या उत्पादनांचा प्रसार झाला आहे. याचे कारण इतकेच आहे की, आजच्या मितीला सात टक्क्यांच्या आसपास वार्षिक विकासाचा दर राखणारे जगात दाेनच देश आहेत.
त्यातला एक भारत आहे. दुसरा देश आहे, चीन. अर्थातच चीनच्या तुलनेत भारतात व्यवसाय सुरू करणे आणि वाढवणे साेपे आहे. एकंदरीतच भौगोलिक विस्तार, तरुणाईचे प्रमाण आणि वाढती बाजारपेठ या निकषांवर आपल्या देशात एकाच वेळेला एकाच क्षेत्रात अनेक उत्पादकांना वाव आहेे. खासगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खाउजा) याच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीनंतर प्राप्त झालेली ही स्थिती आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा फायदा इच्छुक व्यक्ती आपल्या आपल्या परीने घेत आहेत. त्यात जसे पारंपरिक उद्योजक आहेत, तसेच धर्म-अध्यात्माच्या क्षेत्रात प्रभाव असलेले बाबा रामदेव-श्री श्री रविशंकर यांसारखे आध्यात्मिक गुरूदेखील आहेत.
व्यापार-उद्योगातील या आध्यात्मिक गुरूंच्या कामगिरीचा विचार करताना एक गाेष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे, ग्राहकाेपयाेगी क्षेत्र हे असे आहे की, येथे मुळातच कोणत्याही उत्पादनाचा अस्तित्वकाळ (शेल्फलाईफ) मर्यादित आहे. कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी वेगाने बदलत असतात. शिवाय बदलते तंत्रज्ञान, बदलते उत्पादन मंत्र याचे स्वरूप दिवसागणिक वेगवेगळे रूप धारण करत असते. त्यामुळे असे ढाेबळमानाने म्हटले जाते की, अशा क्षेत्रात आधी एक व्यक्ती म्हणून किंवा उत्पादक संस्था म्हणून तुम्हाला मान्यता मिळवावी लागते आणि मगच तुमच्या उत्पादनाला बाजारपेठेत मान्यता मिळविता येते. अर्थात, एवढी उरस्फोड करूनही मान्यताप्राप्त उत्पादनसंस्थेचे प्रत्येक उत्पादन बाजारात चालेल, याचीही हमी नसते.
मारुती हा माेटारगाड्यांच्या क्षेत्रात अत्यंत नामांकित उत्पादक असला तरी बलेनाे, सुरुवातीला अल्टाे यांना अपेिक्षत मागणी गाठता आली नव्हती. हिंदुस्तान लिव्हर, गाेदरेज या नामांकित कंपन्यांना आपला प्रत्येक नवीन साबण बाजारात यशस्वीपणे विकता आला नव्हता. अगदी टाटा समूहासारख्या अत्यंत विश्वासार्ह उद्याेग समूहाला त्यांच्या प्रत्येकच क्षेत्रातील प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक उत्पादनाला व्यावसायिक यश कधीही मिळविता आलेले नाही. कारण, हे व्यावसायिक समीकरण नेहमीच अत्यंत कमी, स्थिर (फिक्स) स्वरूपाच्या घटकांवर अवलंबून असते. त्यातील चल (व्हेरिएबल) स्वरूपाचे प्रमाण आणि प्रभाव लक्षात घेता, काेणत्याही स्वरूपात का हाेईना, पण आपली बांधील बाजारपेठ असणारी व्यक्ती एका अर्थी आपले उत्पादन विकण्याच्या जास्त चांगल्या स्थितीत असते.
हे तत्त्व जर आपण इतर व्यावसायिक कंपन्यांबाबतीत सहजपणे एक नैसर्गिक गाेष्ट म्हणून मान्य करत असू, तर रामदेव रविशंकरांसारख्या आध्यात्मिक गुरुंनी वेगळ्या क्षेत्रातील आपली ‘पूर्वपुण्याई’ व्यापार-उद्योगात वापरली तर नैतिकतेचा बाऊ करण्यात काय अर्थ आहे? परंतु असा बाऊ जेव्हा केला जाताे, तेव्हा त्यामागे असणारे प्रवाह, अंत:प्रवाह, विराेधी प्रवाह (करंट, क्राॅस करंट, अंडर करंट) यांचा विचार माेकळेपणाने झाला पाहिजे.
राहता रािहला प्रश्न, रामदेव बाबांसारखे काही उद्याेजक आपली उत्पादने बांगलादेश, पाकिस्तान, अफगणिस्तान या मुस्लिमबहुल देशात कशी विकणार, याचा. या संदर्भात माझे म्हणणे असे आहे की, जी व्यक्ती किंवा संस्था अध्यात्म किंवा धर्मातून उद्याेगात पदार्पण करण्याचा विचार करू शकते, ती संबंधित संस्था इतर धर्माचे प्राबल्य असलेल्या देशांतही आपली उत्पादने विकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्या वेळी ती कंपनी केवळ धर्मभावनेचा अधार घेईल, किंवा इतर देश या कंपन्यांची उत्पादने स्वीकारणार नाहीत, असे मानत राहणे हे पूर्वग्रहाला शाेभेसे असले तरी शहाणपणाला धरून हाेणारे नाही.
कारण मुळातच बाजारपेठेत शिरकाव करण्याआधी संबंधित उत्पादक तेथील जनतेच्या गरजा आणि स्थािनक घटकांचा पूर्ततेबाबतचा अभाव या गाेष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करेल. याबाबत विचार करताना रामदेव-रविशंकर यांच्यासारखे उद्याेजक आणि इतर रुढार्थाने असणारे उद्याेजक यात भेदभाव करणे अयाेग्य ठरेल. मात्र जर असा भेदभाव स्वत: रामदेव-रविशंकर यांच्यासारखे उद्याेजक करणार असतील, तर त्यांची उत्पादने इतर देशांत चालणार नाहीत, हे सांगायला काेणत्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही.

हे केवळ इतर देशांत उत्पादने विकण्याबाबत खरे नसून, अगदी आल्या देशातही दीर्घकाळात सातत्याने उत्पादने विकण्याबाबतही खरे आहे. आजमितीला त्यांचे दिसणारे यश हे आधी उल्लेख केलेल्या कारणांप्रमाणे सध्याच्या भाजप सरकारच्या यशाशी निगडित नसून वाढत्या आणि बदलत्या ग्राहकपेठेशी अधिक निगडित आहे. त्या ग्राहकपेठेची या आध्यात्मिक गुरुंना उत्तम समज आहे. कारण मुळातच धार्मिक असाे की व्यावसायिक असाे, काेणतेही उत्पादन हेजितके संबंधित उत्पादकाच्या लाेकप्रियतेवर अवलंबून असते तितकेच ते ग्राहकाच्या मानसिकतेवरही अवलंबून असते.
झाकीर नाईकचा सीडी विकत घेणारा श्राेता असाे, चिन्मय मिशनसारख्या संस्थेच्या वतीने प्रकाशित भगवद्गीतेवरील पुस्तकांचा वाचक असाे, किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर तेथे उपलब्ध असलेल्या पुस्तके किंवा ध्वनिफितींची खरेदी करणारा श्राेता असाे, या सगळ्यांची पहिली खरेदी तत्कालिक प्रभावातून झाली तरी त्याची नंतरची सातत्यपूर्ण खरेदी ते उत्पादन खिशाला, मनाला रुचले-पटले तरच हाेत राहते आणि त्यामुळे काेणताही उद्याेजक याबाबतचे सातत्य त्याच्या उत्पादनामध्ये, वितरण यंत्रणेमध्ये, आणि मुख्य म्हणजे ग्राहकसेवेमध्ये राखू शकला नाही तर उद्योगधंद्याला मिळणारे यश फार काळ टिकत नाही.
चळवळ आणि उद्याेग यामधील मूलभूत फरकही या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. चळवळ मग ती सामािजक असो, सांस्कृतिक असो वा आध्यात्मिक; ती मूलत: तत्कालिक असते, तर उद्याेग हा सार्वकालिक असताे. उद्याेग या मराठी शब्दाला “इंडस्ट्री’ हा इंग्रजी प्रतिशब्द आहे. शब्दकाेशानुसार इंडस्ट्री या शब्दाचा एक अर्थ जसा उद्याेग असा आहे, तसाच आणि तितकाच “सातत्य’ असादेखील आहे. हा निव्वळ याेगायाेग मानणे तर्कविसंगत तर आहे, पण ते बाजार विसंगतही आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात संबंधित उद्याेजकाचा पूर्वानुभव किंवा पूर्वपीठिका हा घटक जरी चर्चेला आला तरी नंतरच्या काळात उद्याेजक म्हणून त्याचे मूल्यमापन करताना हे सर्वच घटक कालबाह्य ठरत जातात, हेही येथे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
राष्ट्रवाद-राष्ट्रप्रेम-राष्ट्रभावना हे घटक एखाद्याला कधी स्वदेशी म्हणून तर कधी बहिष्कार म्हणून व्यापार-उद्योग सुरू करण्यास वेळप्रसंगी जरूर उद्युक्त करतील; परंतु अशा काेणालाही त्या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी ही भावना पुरेशी ठरत नाही, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. पूर्वाश्रमीच्या कम्युिनस्ट राजवटीच्या किंवा चीन आणि जपानसारख्या एकेकाळच्या बंदिस्त बाजारपेठांचे काळाच्या ओघात बदललेले स्वरूप ही त्याचीच जागतिक पातळीवरील साक्ष आहे.
त्यामुळे एकंदरीतच अशा पद्धतीचा विचार करत असताना एकच गाेष्ट सातत्याने आपण ग्राहक म्हणून आणि संबंधितांनी नजरेआड करून चालणार नाही की, सातत्य आणि कालानुरूप बदल हेच काेणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक यशाचे गमक असते. “हॅवेल्स’सारखी कंपनी शून्यातून आपले विश्व निर्माण करत, जागतिक बाजारपेठेत ताेडीस ताेड ठरते, या पूर्वपीठिकेपेक्षा त्यांची वर्तमानातली कामगिरी अधिक महत्त्वाची असते.
या उपर ग्राहकाेपयाेगी वस्तू क्षेत्रात पर्सेप्शनला महत्त्व असतेच असते. याचा अर्थ असा नव्हे की, तेथे “परफाॅर्मन्स’ नसला तरीही भागते. कारण पर्सेप्शनमुळे सुरुवातीला ग्राहक जरूर एखाद्या वस्तूकडे खेचला जाऊ शकताे, पण असे सातत्य न राखल्याने आपण ग्राहकाचे ‘गिऱ्हाईक’ झालाे, हे त्याच्या लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळेच या क्षेत्रातील उद्याेजकाला तापल्या तव्यावर पाेळ्या भाजून घेणे कधीतरी जमले म्हणून सदैव जमेलच, असे निश्चितच नसते. रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर आदी आध्यात्मिक गुरू त्याला अपवाद नाहीत.






