सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळ आणि मार्क्सवादी चळवळ ह्या दोन चळवळी समतेच्या चळवळी म्हणून ओळखल्या जातात. पैकी आंबेडकरी चळवळीने केवळ जातीच्या प्रश्नालाच अग्रभागी ठेऊन आर्थिक प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सातत्याने होताना दिसतो. इतकेच नव्हे तर आंबेडकरी चळवळीतील एखाद्याने आर्थिक बाजूने विश्लेषण केले तर मार्क्सवादी असल्याचा त्याच्यावर शिक्का मारला जाऊन त्याला आंबेडकरी चळवळीतून बादच केले जात आलेले आहे आणि बुद्ध तत्वज्ञातील, आंबेडकरी विचारांतील आर्थिक बाजू कायमच दुर्लक्षित ठेवण्यात आलेली आहे.
आंबेडकरी चळवळीत सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नच महत्वाचे आहेत आणि आर्थिक प्रश्नांचा अभाव आहे असेच चित्र आजपर्यंत रंगवण्यात आलेले आहे. परंतु आज बुद्धाच्या अर्थशास्त्राची आणि डॉ. बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांची नव्याने मांडणी केली जात असल्याने आर्थिक अंगाने सुद्धा आता चळवळीच्या आयामांचा शोध घेतला जात आहे. त्यातूनच आंबेडकरवादी साहित्यातून सुद्धा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाजूंसह आर्थिक बाबी आणि घडामोडींचे चित्रण मोठ्याप्रमाणावर होताना दिसून येत आहे.
केवळ सामाजिक स्तरावरील अन्याय अत्याचाराच्या घटना किंवा समाजाच्या सामाजिक-सांस्कृतिक विकासालाच साहित्याच्या केंद्रस्थानी न ठेवता आर्थिक विकास किंवा आर्थिक शोषणाच्या घटना/प्रसंग सुद्धा समकाळात कथा/कविता/नाटक/कादंबरीच्या केंद्रस्थानी आल्याचे दिसते आहे. राहुल निकम यांचा नुकताच आलेला ‘संवर्ग’ हा कथासंग्रह हा अशा आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक सत्ता संघर्षाच्या आंबेडकरवादी दृष्टीकोनाचा प्रत्यय घडवून आणतो. ‘संवर्ग’ हा शब्दच मुळात बहुआयामी असा आहे. हा शब्द जसा संवैधानिक आहे तसा तो आर्थिक आणि सामाजिक सुद्धा आहे.
त्यामुळे राहुल निकम यांच्या या कथासंग्रहातील कथांकडे केवळ सामाजिक आशयाच्या कथा म्हणून बघणे हे एकांगीपणाचे ठरेल. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनाबरोबरच राजकीय अर्थशास्त्राच्या दृष्टीकोणातूनसुद्धा या कथांचे विश्लेषण केल्यास त्यातील आशयाचे वेगळेपण आणि महत्व लक्षात येते. केवळ सामाजिक अन्याय-अत्याचार हाच या कथांचा विषय नाही तर सर्वसामान्य माणसांचे विविध पातळ्यांवरून होणारे आर्थिक शोषण आणि त्याच्या आर्थिक विकासाचे, उत्थानचे मार्ग सुद्धा या कथांच्या केंद्रस्थानी आहेत. आणि हेच या कथांचे बलस्थान आहे. या कथांमधील पात्रांची लढाई ही केवळ जातीवर्चस्व लादणाऱ्या व्यवस्थेशीच नाही तर राजकीय अर्थव्यवस्था राबवणाऱ्या शासकीय यंत्रणेशी सुद्धा आहे. वस्ती पातळीवरील माणसांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, शेती यासंबंधाने भेडसावणाऱ्या समस्या या कथांच्या केंद्रस्थानी आहेत.

विविध प्रकारच्या सत्ता- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, आणि सांस्कृतिक यांतील संबंधांचा शोध साहित्यातून घेतला जातो. प्रस्तुत संग्रहातील कथांमधून सुद्धा राहुल निकम यांनी असा शोध घेण्याचा आणि त्यातून समोर येणाऱ्या निष्कर्षांना आपल्या कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना नायक होऊ शकणार नाही असा सामान्य माणूस त्यांच्या कथांच्या मुळाशी आहे हेही विशेषत्वाने लक्षात घेण्यासारखे आहे.
निकम हे स्वतः एका शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. या यंत्रणेत काम करताना त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या दांडग्या निरीक्षण शक्तीच्या आणि प्रज्ञेच्या जोरावर ते अभिव्यक्त करताना दिसतात. शासकीय यंत्रणेचा भाग असल्यामुळे समाजविकासाच्या अनेक योजनांची माहिती, त्या योजनांची होणारी भली-बुरी अंमलबाजवणी, त्या योजनांतील भ्रष्टाचार, त्या योजनांचे महत्व, त्या योजनांच्या अंमलबजावणीतील राजकारण, त्या योजनांच्या माध्यमातून मागास समूहाने साधलेला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास राहुल निकम अत्यंत दृश्य स्वरुपात चित्रित करतात.
या संग्रहातील अनेक कथांमध्ये ग्रामीण भागातील सामाजिक दुर्बल घटकांच्या सामाजिक-आर्थिक-कृषक उन्नतीसाठी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची जंत्री व कार्यप्रणाली समाविष्ट आहे. त्यामुळे वाचकांना या योजनांची माहिती होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदतच होणार आहे. तसेच या योजनांच्या अंमलबाजवणीतील वाटा-पळवाटा वाचकांच्या लक्षात आल्याने शासकीय योजनांबाबत वाचकाचे प्रबोधन तर होणारच आहे परंतु प्रबोधनाबरोबरच या कथा वाचकांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आकार सुद्धा देणाऱ्या ठरणार आहेत.
या संग्रहातील ‘आरक्षित कोठा’, ‘स्वाक्षरी’, ‘अनुदान’, ‘मछली जल की रानी है’, ‘महारी’, ‘घर’ अशा अनेक कथांची पार्श्वभूमी ही समाज विकास योजनांची राहिलेली आहे आणि ह्या शासकीय योजना घटनात्मक तरतुदी नुसार समाजाच्या उपेक्षित, वंचित, मागास घटकांच्या सामाजिक-आर्थिक उत्थानाच्या योजना आहेत. ह्या योजनांच्या अंमलबजावणीत कळीची भूमिका बाजवणाऱ्या यंत्रणांच्या कळसूत्री मानसिकतेचे चित्र या कथा रंगवतात.
लेखकाच्या मनातले अंतर्प्रवाह ओळखण्याइतकी संवेदना जागृत असलेला वाचकवर्ग अजूनही मराठी साहित्य विश्वात तयार झालेला नाही त्यामुळे लेखकाला आपल्या कथेत निव्वळ घटनाक्रम सांगण्याऐवजी त्यातून एका विचारप्रक्रियेचा नीट आलेख रेखाटण्याला आणि कथेत अंतर्भूत असलेल्या घटनांमागचा, पात्रांच्या कृतीमागचा कार्यकारणभाव स्पष्ट करण्याला प्राधान्य द्यावे लागते. राहुल निकम यांच्या कथांमधून असा कार्यकारणभाव स्पष्ट करण्याला प्राधान्य दिलेले दिसते.
कोणत्याही फिक्शन मध्ये निवेदक हा फार महत्वाचा घटक असतो, कारण तो घटना, घडामोडींकडे पाहण्याचा पॉइंट ऑफ व्हयू- दृष्टीकोण ठरवत असतो. लेखकाने निवेदक जसा घडवलेला असतो, तसाच तो त्याने निवडलेला सुद्धा असतो. ही निवड जितकी चपखल, योग्य तितकं ते फिक्शन चांगला आशय प्रसवतं असं प्रणव सखदेव ह्या लेखकाचं मत आहे. या मताचा प्रत्यय राहुल निकम यांच्या ‘संवर्ग’मधील कथा वाचताना येतो. त्यांच्या कथेतील निवेदक हा त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेला तर आहेच आहे पण तो जाणीवपूर्वक एका विशिष्ट दृष्टीकोनातून घडवलेला सुद्धा आहे आणि तो विशिष्ट दृष्टीकोन हा आंबेडकरवादाचा आहे.
जे दिसतं, जसं आहे तसं लिहिणं म्हणजे सृजन नव्हे. सृजन म्हणजे जन्म देणं. कोणतीही घटना, प्रसंग घडून, बघून, ऐकून, अवलोकन करून, निरीक्षण करून झाल्यानंतर बघणाऱ्या, ऐकणाऱ्या, अवलोकन करणाऱ्या व्यक्तीच्या मनात तो प्रसंग, घटना नव्याने जन्म घेत असेल, त्याला अस्वस्थ करत असेल, विचार करायला भाग पाडत असेल आणि त्यातून काही नवीन घडत असेल तर ते सृजन! असा सृजनाविष्कार चिरकाल टिकून राहतो. इतर आविष्कार तात्पुरतं मनोरंजन करून विरून जातात. कशासाठी लिहावं आणि काय लिहावं हे दोन प्रश्न लेखकासाठी महत्वाचे आहेत. समकालीन अस्पर्श, झाकलेली बाजू जो लेखक निडरपणे समोर आणतो ते लेखन काळाच्या कसोटीवर टिकून राहते.
म्हणून समकाळातील अस्पर्श बाजू, झाकलेली बाजू दाखवण्याचे काम लेखकाला करायचे असते. कबीर, तुकाराम, मंटो, ढाले-ढसाळ, भुजंग मेश्राम, अरुण काळे, दीपध्वज कोसोदे यांनी हे काम केलेलं आहे. राहुल निकम यांच्या कथा सुद्धा समकाळातील प्रशासनातील अस्पर्श, झाकलेली बाजू उघड करण्याचे काम करतात. मागास घटकांच्या आर्थिक-सामाजिक उत्थानाच्या योजनांचे मागील दाराने प्रत्यक्ष लाभार्थी हे बिगर मागासवर्गीयच कसे असतात आणि हे लाभ ते गैरमार्गाने कसे पदरात पडून घेतात याकडे या संग्रहातील ‘आरक्षित कोठा’ आणि ‘मछली जल की रानी है’ या सारख्या कथा अंगुलीनिर्देश करतात.
रचनातंत्राच्या दृष्टीने सुद्धा या संग्रहातील ‘स्वाक्षरी’ आणि ‘महारी’ सारख्या कथांचे वेगळेपण लक्षात येते. ‘स्वाक्षरी’ या कथेचा औपचारिकपणे संग्रहात शेवट झालेला असला तरी ती वाचकाच्या डोक्यात सुरूच असते. या कथेचा तार्किक शेवट काय असू शकतो याचे विचारचक्र वाचकाच्या डोक्यात अनंतकाळ सुरूच असते. आपापल्या वकुबानुसार त्या कथेचा शेवट करण्याचे स्वातंत्र्य लेखकाने वाचकाला बहाल केलेले आहे.
या संग्रहातील सगळ्याच कथांमधून लेखकाने मानवी मनातील जात-जाणिवांचा तर शोध घेतलेलाच आहे परंतु त्याच बरोबर ह्या जात-जाणिवांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक परिणामांचे सूचन सुद्धा या कथांच्या माध्यमातून केलेले आहे. जात-जाणिवांचे होणारे आर्थिक-सामाजिक-राजकीय परिणाम किती अस्वस्थ करणारे असू शकतात, भारतीय समाजाची जात-जाणीव किती खोलवर रुजलेली आहे, आर्थिक, सामाजिक समता प्रस्थापित करण्याची संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेणारी प्रशासनातील माणसं सुद्धा या जात-जाणिवेने कसे बरबटलेले आहेत याचा आरसा या कथा वाचकांसमोर धरतात व त्यांचा लख्ख चेहरा त्या कथा उघडा पाडतात.

साधारणतः या कथांच्या निर्मितीचा काळ हा मागील चार-पाच वर्षातील आहे आणि कथांमध्ये निर्दिष्ट काळ सुद्धा अगदी अलिकडचाच म्हणजे मागील दशकापासूनचा आहे. भारतीय संविधानाने भारताच्या सर्व नागरिकांना दिलेल्या ‘सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, दर्जाची आणि संधींची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्याची’ शपथ घेतलेले प्रशासकीय यंत्रणेतील घटकच संविधानाच्या अंमलबाजवणीच्या उण्या-पुऱ्या सत्तर-पंच्याहत्तर वर्षाच्या कलावधीतच कसा हरताळ फासतात याचे वेदनादायी चित्र या कथा रेखाटतात.
लोककल्याणकारी योजना आतून कशा पोखरून टाकायच्या, त्यात ट्रोजन हॉर्स कसे घुसवायचे, ह्या लोककल्याणकारी योजनांची आर्थिक तरतूद बजेट दर बजेट कशी कमी करत न्यायची, या योजनांचा लाभ समाजातील दुर्बल घटकांना मिळणार नाहीत किंवा तेच या योजनांबद्दल उदासीन होतील असे धोरण कसे राबवायचे अशा अनेक षड्यंत्रांचा राजकीय अर्थव्यवस्थेच्या, पोलिटिकल इकॉनॉमीच्या दृष्टीकोनातून अधिक खोलात जाऊन अन्वयार्थ लावण्याच्या अनेक शक्यता या कथांमध्ये दडलेल्या आहेत. लेखकाचे आतापर्यंतच्या कथांचे विषय बघता पुढील कथांमधून या लोककल्याणकारी योजनांमागे असलेला राजकीय अर्थव्यवस्थेचा अन्वयार्थ अधिक खोलात उलगडवून दाखवल्यास आंबेडकरी कथेत आर्थिक शोषणाच्या कथांचे नवे दालन उघडले जाऊ शकते.
राहुल निकम हे ग्रासरूट पातळीवरील एका प्रशासकीय यंत्रणेचा भाग असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनातील, अनुभवातील अनेक प्रसंग त्यांच्या कथांचे विषय म्हणून चित्रित झालेले आहेत. लेखकाला एका व्यापक अनुभवविश्वाचा लाभ आपल्या अभिव्यक्तीसाठी होणे ही लेखकाच्या दृष्टीने कथाशयसाठी जमेची बाजू असली तरी ते अनुभवविश्व तपशीलाने पूर्णतः कथांमध्ये उतरताना दिसत नाही. घटना, प्रसंग यांचे बहुमितीय, बहुकोनीय चित्रण कथांमधून आले असते तर ह्या कथा ग्रामीण भारतातील जात वास्तवाचे आणि त्या जात वास्तवाच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय परिणामांचा उत्कट कोलाज म्हणून लक्षणीय ठरल्या असत्या. परंतु याचा अर्थ असाही नाही की, सविस्तर तपशील मांडणे म्हणजे कलाकृती मोठी असते.
प्रत्येक कथन हे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला आकार देत असतं आणि ज्याच्या हातात यंत्रणा असते तो जे म्हणेल ते नॅरेटीव रुजत असतं. तेव्हा आता काही प्रमाणात का होईना यंत्रणा आपल्या हातात आलेली आहे ती आपल्या हातून निसटून जाण्यापूर्वी आपल्याला आपले नॅरेटीव सेट करायचे आहे ते आपण तपशिलात जाऊन तकातीनिशी एकवटुन सेट करायला हवे. राहुल निकम यांची या संग्रहातील कथा हे नॅरेटीव सेट करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहेत. ‘ही कथा केवळ शोषणसत्ताकाने केलेली माणसांच्या डोक्यांची गोठवणूकच मांडत नाही, तर या गोठवणुकीचा पराभव करणारी आबा गुरुजींची पहाटही चितारते...
या प्रकारे शोषणसत्ताकाने लोकप्रिय केलेल्या विद्रूपीकरणाला ही कथा सममूल्यतेचा विधायक विकल्पही देते’ हे डॉ. यशवंत मनोहर यांनी वेगळ्या अर्थाने राहुल निकम यांच्या कथेच्या संदर्भात केलेले प्रतिपादन हे नॅरेटीव सेट होत असल्याची साक्ष ठरते.
संवर्ग (कथासंग्रह)
लेखक- राहुल निकम
प्रकाशक- पद्मगंधा प्रकाशन, पुणे






