आईनं बाळ कडेवर घेऊन ढोल वाजवला. नुकतीच व्हायरल झालेली बातमी नव्हे घटना. मुळात आईनं असं करण्यामागं एक वलय कारणीभूत आहे. जेव्हा अनेक स्त्रिया (अधिकारी वगैरे) आपल्या लहान बाळाला घेऊन ड्युटीवर असतात तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल होतात आणि त्यांच्या मातृत्वाचे गुणगान होते. त्यांना सगळीकडून प्रचंड सहानुभूती, प्रेम(?) मिळते. किंवा मजूर स्त्रिया लेकरांना पाठीशी घेऊन, वीटभट्टीवर किंवा ऊसाच्या फडात टाकून काम करत असतील तर त्यांचे कोण कौतुक केले जाते. कौतुक आहेच त्यांचे पण त्यापेक्षा जास्त मजबुरी असते. (अशा कोणत्या बायांना गर्भारपणात आवश्यक आराम आणि बाळंतपणाची सुट्टी मिळते.) मात्र या सगळ्या उदाहरणात लोकांना एकच दिसत असते… आईचे समर्पण, त्याग.
असे मजबूर आयांचे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल झाल्यावर त्याखालील कॉमेंट्स मध्ये एकही कॉमेंट महिलांच्या मातृत्व हक्कांबद्दल नसते किंवा सामाजिक किंवा आईच्या क्रूरपणाबद्दल नसते. अशावेळी कुणीही बाल कल्याण समितीकडे तक्रार करायला हवी असेही म्हणत नाही.
वास्तविक पाहता त्यांच्यावर अशी वेळ यायलाच नको आहे. खरं तर कोणत्याच आईवर अशी वेळ येऊ नये. एकदा का मूल जन्माला आलं की ते मूल ही कुटुंब आणि समाजाची देखील जबाबदारी बनते आणि शासनाचीसुद्धा! मूल हे अख्ख्या समाजाचे असते अशा अर्थाने. कायद्याने मूल किमान सहा महिन्यांचे होईस्तोवर तिला भरपगारी रजा मिळायला हवी, द्यायला हवी. आणि त्यावर लोकांनी बोलायला हवं.

‘आईनं बाळ कडेवर घेऊन ढोल वाजवला’ या बातमीबद्दलचे ‘लोकसत्ता’चे शीर्षक आहे ..”झाशीची राणी… आवडीबरोबर मातृत्व जपणाऱ्या आईचा व्हिडिओ व्हायरल.” असाच बाळाला कडेवर घेऊन बापाने ढोल वाजवला असता तर आईला दिल्या तशाच प्रतिक्रिया आल्या असत्या की काही वेगळ्या… आणखी एक विचार करण्यासाठी मुद्दा. (झाशीच्या राणीसारखा कुणी राजा होऊन गेला आहे का बरं, बाळाला पाठीशी बांधून लढणारा. आठवत नाही, कारण बाळाची जबाबदारी आईची, त्यामुळे तीच पाठीशी बांधून लढणार.
असो. पण चुकून बांधलेच असते/असेल कुण्या बापाने असे बाळ पाठीशी तर त्याचे कौतुकच होणार, याकडे विचाराचा जास्त कल जातो आहे कारण “पुरुषाने”असे करणे “विशेष” ठरलं असतं, नैसर्गिक नाही. आपल्याकडे आईला मातृत्व शिकवायला सगळे पुढे असतात, मात्र पितृत्वावर कुणी बोलत नाही (हे नेहमीच ग्लोरिफाईड असते किंवा नसतेच!). म्हणून तर देशात साधी पितृत्व रजादेखील नाही. अशाच इतर उदाहरणात शीर्षक असतात.. नोकरीबरोबर मातृत्व जपणारी आई वगैरे वगैरे.. (अशावेळी पगारी सुट्टी, कामाच्या ठिकाणी पाळणाघरे का नाहीत असे प्रश्न पडत नाहीत आपल्याला.)

सगळ्या घटनात मूलभूत फरक नाहीच. आता या व्हिडिओतील आईलाही वाटलं असणार की आपण असं केलं तर इतर वेळी इतर आयांचं कौतुक होतं तसं आपलंही होणार. त्यात परंपरेची धार्मिक धुंदी आहेच. (धार्मिक मुद्दा घेतला तरी हा धार्मिक उन्माद या पितृसत्तेनेच पेरला तिच्यात. धार्मिक उन्मादाचे असे परिणाम होणारच आहेत ज्यात जाणीवा बोथट झालेल्या गोष्टी केल्या जातील. ज्यांनी धार्मिक ध्रुवीकरण पेरले त्यांनाही त्याची झळ लागणारच! त्या स्त्रीला नावे ठेऊन काय उपयोग? हा उन्माद पुरुष सत्तेनेच निर्माण केला आहे, बाया फक्त गीनिपिक आहेत यातल्या.
जेव्हा याच बाया किंवा लहान मुले हातात तलवारी घेतात त्यावेळी त्यांचे कौतुकच केले जाते. हासुद्धा त्याचाच भाग आहे.), मात्र त्याहून अधिक मातृत्वाचे उदात्तीकरण आहे. शिवाय तिच्या अशा वागण्याला सामाजिक दुजोरा आहे म्हणूनच ती अशी करू शकली. त्यामुळे यात आई निर्दयी आहे की समाजच बहिरा आहे यावर विचार व्हायला हवा. (मुळात आईने बाळ आपल्या अंगावर बांधून ढोल का वाजवला याची कारणेही माहित नाहीत कुणाला. तरी आपण सगळ्यांनी तिला निर्दयी आई बनवलं. शिवाय त्या बाळाचे वडील आणि इतर नातेवाईक यावेळी कुठे होते की तिच्यावर अशी वेळ आली हा प्रश्न कुणालाही पडला नाही. कृती चुकीचीच आहे, कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही.. तरीही भवताल महत्त्वाचा असतोच माणसाच्या वर्तनात.)

आपणास त्या लेकराची काळजी आहे, असणे स्वाभाविक आहेच. मात्र इतर वेळी जेव्हा अनेक लहान बाळे काम करणाऱ्या आपल्या आईसोबत धोकादायक अवस्थेत असतात त्यावेळी कुणी तिच्यावर केस करावी आणि ती आई किती असंवेदनशील आहे असं बोलत नाही (नसतेच ती मुळात!). लहान लहान मुलींना उंच दोरीवर चालायला लावत असतील तर त्या आई बापाच्या गरिबीबद्दल कणव निर्माण होते. भीक मागणारा भिकारी जसा फाटलेल्या कपड्यात, अस्वच्छ आणि दीन दिसला तरच त्याला भीक मिळते, भीक समर्थनीय ठरते तसं आई कोणत्या परिस्थितीत बाळाला धोक्यात टाकते आहे, तिच्या आवडीसाठी (किती स्वार्थी आई आहे.
फक्त स्वतःचाच विचार करते!) की मजबुरीमुळे यावर तिचे स्थान ठरते आणि हीच पितृसत्ताकता आहे. असे केले की समाजाला, व्यवस्थेला आपली जबाबदारी झटकता येते. मुळात बाळ किंवा आई म्हणून तिने कोणत्याच परिस्थितीत स्वतः किंवा बाळालाही धोक्यात घालू नये, तशी परिस्थिती असू नये ही बेसलाईन आपण विसरतो. त्या दोघांनी मातृत्व आणि बालपणाचा मुक्त आणि मनसोक्त आनंद घ्यावा हे महत्त्वाचे असायला हवे.
मुद्दा एकच आहे – कोणत्याही परिस्थितीत स्त्रीच्या मातृत्वाचे, तिच्या मजबुरीचे उदात्तीकरण नकोच ते थांबलं की बाया अशा अंगावर बाळ बांधून झाशीची राणी (?) बनणार नाहीत. आणि बाळाला सांभाळण्याची सामाजिक यंत्रणा विकसित झाली पाहिजे. हे मात्र पक्के की प्रत्येक आई आणि बाळाला जगण्यास आवश्यक वातावरण मिळायला हवं आणि ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समाजाची, शासनाची, आपली आहे.
(साभार – लक्ष्मी यादव यांच्या फेसबुक वॉलवरून)






