भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात तवायफ, कोठेवाली यांचा खरोखरच सहभाग होता का…? याचे उत्तर ‘होय’ असे असेल तर मग इतिहासांच्या पानांत तसा उल्लेख का आढळत नाही हा दुसरा प्रश्न उपस्थित होतो, आणि जर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे असेल तर मग ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत असलेल्या संजय लीला भन्साळीच्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजचे कथानक ‘काल्पनिक’ आहे का…? असा आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारताचा इतिहास कोणी लिहिला, इतिहासकार कोणत्या वर्गाचे होते, इतिहासाची छेडछाड कशाप्रकारे झाली या खोलात न शिरता या लेखातून आपण हेच जाणून घेणार आहोत खरोखरच तवायफांचा भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग होता…

बनारस… भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगते शहर आणि याच बनारसची प्रसिद्ध दालमंडी गल्ली. आज ही दालमंडी गल्ली व्यापाराचे एक प्रमुख केंद्र जरी बनले असले तरी कधीकाळी या गल्ल्यांमध्ये तवायफांचे कोठे होते आणि या कोठ्यांमधून येणाऱ्या घुंगरांच्या झंकाराने इंग्रजांच्या राजवटीला हादरे बसत होते. शास्त्रीय संगीतातील बनारस घराण्याचा जन्म याच बनारसच्या दालमंडीमधून झाला असे म्हटले जाते. दालमंडीमधील कोठे अतिश्रीमंत नवाबांच्या नाचगाण्यांसाठी तर होतेच परंतू इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी रणनितीचेदेखील केंद्र होते. याच दालमंडीच्या कोठ्यातील एक महान गायिका म्हणजे विद्याधरी बाई…
लोककला-लोकसंस्कृतीचे अभ्यासक आणि पत्रकार डॉ. मुकुंद कुळे यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत कोठेवाल्यांचा कसा थेट सहभाग होता याबद्दल विद्याधरी बाई या कोठेवाली तवायफचे उदाहरण दिले आहे. ‘दै. सामना’ मध्ये लिहिलेल्या एका लेखात ते सांगतात की,
‘भारत न रह सकेगा हरगिज गुलाम खाना,
आजाद होगा होगा आया है वो जमाना।
भारत वतन हमारा भारत के हम हैं बच्चे,
माता के वास्ते है मंजूर सर कटाना।।’
आपल्या एका रंगलेल्या मैफलीत विद्याधरीबाईंनी कोठीवर हा आजादीचा मुजरा गायला आणि उपस्थित सगळे सर्दगर्द झाले… किंबहुना त्यांच्यावर ‘तोबा तोबा’ म्हणण्याची पाळी आली. मैफलीला मोठमोठे जमीनदार, रईसजादे, धनदांडगे व्यापारी उपस्थित होते. त्यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ते चक्रावूनच गेले. पण विद्याधरी बाई भारतीय स्वातंत्र्यलढ्याने भारावून गेली होती. आजवर ती रसिकजनांसाठी गात आली होती, आता तिला देशासाठीही गायचं होतं… तेव्हा भारतातील असं एक संस्थान नव्हतं, जिथे विद्याधरीबाईंच्या गाण्याचे जलसे झाले नसतील. त्यांचा आवाज आणि त्यांच्या गाण्याच्या हुकुमतीवर-अदेवर दिवाने झालेले तर लाखोंनी होते, तरीही सगळ्यांसाठी त्या होत्या- बनारसची एक कोठेवाली तवायफ! म्हणूनच जेव्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, त्यांनी हसतहसत या संधीला गळामिठी घातली.
कुणी तरी त्यांना आवाहनच केलं होतं की तू तुझ्या नेहमीच्या गाण्यांबरोबरच आजादीची गाणीदेखील गा… भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून-आवाजातून लोकांपर्यंत पोचू दे… आणि हे आवाहन करणारी व्यक्ती साधीसुधी नव्हती, तर ते होते महात्मा गांधी!

महात्मा गांधी म्हणाले, स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी तुझ्या गाण्यातून लोकांपर्यंत पोचू दे…
1930 चा सुमार असेल. महात्मा गांधी कामानिमित्ताने बनारसला गेले होते. स्वातंत्र्यलढ्यात महिलांचादेखील सहभाग असावा म्हणून ते प्रयत्नशील होते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून बनारसला त्यांनी बनारसच्या कोठेवालींनादेखील या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं. इतकंच नाहीतर तवायफ म्हणून करीत असलेला परंपरागत व्यवसाय सोडून द्या, असंही त्यांनी आवाहन केलं.
त्या आवाहनानुसारच त्यावेळी उत्तर भारतातील गाण्याच्या दुनियेतील शानोशौकत असलेल्या हुस्नाबाई आणि विद्याधरीबाई या दोघींनी गांधींना लगेच प्रतिसाद दिला. एवढंच नव्हे, तर हुस्नाबाईच्या अध्यक्षतेखाली ‘अखिल भारतीय तवायफ संघा’ची स्थापना देखील करण्यात आली. परंपरेनं चालत आलेली कोठासंस्कृती नाकारून तिथल्या महिलांनी बाहेर पडावं आणि चारचौघींसारखं आयुष्य जगावं, हा या संस्थेचा उद्देश होता. तो पुढील काळात किती साधला गेला शंकाच आहे. कारण तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या पांढरपेशा महिलांनीच जिथे या कोठेवाल्या महिलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाला विरोध केला होता, तिथे सर्वसामान्य समाज या महिलांना कसा स्वीकारणार होता, हा मोठाच सामाजिक प्रश्न होता.

विद्याधरी बाईने खोऱ्याने पैसा कमावला आणि चळवळीसाठी देणगी दिली
अर्थातच विद्याधरीबाईंनीदेखील लगेच आपला कोठा बंद केला नाही. उलट त्या दणक्यात कार्यक्रम करू लागल्या आणि खोऱ्याने पैसा कमावू लागल्या. मात्र जे कमावून आणलं त्यातलं अर्ध्याहून अधिक त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी देणगी म्हणून दिलं. गांधींसारख्या महात्म्याने आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन करावं आणि आजादीची गाणी गायला सांगावं, याचंच त्यांना कोण अप्रूप वाटलं होतं. म्हणूनच स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्या जिथे जिथे गायल्या, त्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आजादीचा मुजरा जरूर गायला. एवढंच कशाला, गांधींच्या ‘परदेशी मालावर बहिष्कार’ या धोरणाला पाठिंबा देत विद्याधरीबाईनी आपल्या परदेशी कपड्यांची देखील होळी केली होती म्हणे!
तसंच त्या काळात विद्याधरीबाईंचा बनारसमधला कोठा म्हणजे भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचं लपण्याचं हक्काचं ठिकाणही होतं. परिणामी त्यांच्या कोठ्यावर ब्रिटिशांनी अनेक वेळा पायधूळ झाडली. मात्र त्यांच्या हाती कधीच काही लागलं नाही. कारण हे स्वातंत्र्यसैनिक कधी सारंगिये म्हणून वावरत, तर कधी तबलिये म्हणून… पण विद्याधरीबाई काय, हुस्नाबाई काय किंवा त्यांच्यासारख्या आणखी कुणी काय, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातल्या कामाची दखल कुणी का घ्यावी? त्या थोड्याच मध्यमवर्गीय समाजातल्या गरत्या बायका होत्या?
‘अखिल भारतीय तवायफ संघा’ची स्थापना
मुकुंद कुळे पुढे लिहितात की, कोठ्यांवरील महिलांच्या आयुष्याची दखल लब्धप्रतिष्ठित समाजाने खऱ्या अर्थाने कधी घेतलीच नाही. उलट त्यांची वस्ती असलेल्या परिसरावर कायमचा ‘बदनाम गली’चा शिक्का मारून टाकला. परंतु कुणी समजून-उमजून डोकावलं असतं या कोठेवाल्या तवायफ महिलांच्या घरा-दारात, तर त्यांनाही दिसून आलं असतं- केवळ कलावंताचं जिणं नाही, तर समाजासाठी त्यांनाही काही तरी करायची असलेली आस आणि आच. पण त्यांनी कुणी कधी आपलं म्हटलंच नाही. एवढंच नाही तर त्यांना समाजाच्या मुख्य धारेतही कधी सामावून घेतलं नाही. एक महात्मा गांधीच निघाले पहिले या कोठेवाल्या महिलांना स्वातंत्र्य लढ्यासारख्या देशव्यापी आंदोलनात सामील करून घेणारे. मग त्या तरी कशाला मागे राहिल्या असत्या. नाच-गाणं, जडजवाहीर, शाही थाटमाट हा तर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होताच. पण याचा अर्थ त्यांना समाजाविषयी, देशाविषयी आस्था नव्हती असा थोडाच होतो? गांधीजींना ते नेमकं उमगलं.

रसूलन बाईने ‘पण’ केला, भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत लग्न करणार नाही
‘फुलगेंदवा न मारो, मैका लगत जोबनवा (करेजवा) में चोट…’ सारखे अजरामर गाणं गाणारी रसूलन बाई याच दालमंडीची तवायफ… ठुमरी गायकीमधील एक दिग्गज नाव म्हणजे रसूलन बाई. महात्मा गांधींची स्वदेशी चळवळ सुरू झाली आणि या रसूलन बाईंनी तेव्हांपासून आभूषणं घालायचेच सोडून दिले. एका उच्चकोटीच्या तवायफाने आभूषणे न घालण्याची ही कृती काही साधीसुधी नव्हती. जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी शपथ रसूलन बाईने घेतली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत ती पाळलीदेखील. स्वतंत्र भारतात रसूलन बाईंना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार अमितभ भट्टाचार्य सांगतात की, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत फक्त दालमंडीच नाही तर रजादरबार, नवाबांचे महाल आणि मंदिरात होणाऱ्या नाच-गाण्यांच्या मैफिलीत क्रांतीकारीदेखील सहभागी व्हायचे. जद्दन बाई ही तवायफ म्हणजे अभिनेत्री नर्गिसची आई आणि संजय दत्तची आजी. जद्दन बाईचा कोठा म्हणजे क्रांतीकाऱ्यांचा अड्डाच असायचा. इंग्रजांनी अनेकदा जद्दनबाईच्या कोठ्यावर छापा मारले. या त्रासाला कंटाळून जद्दनबाईला दालमंडीची कोठी सोडावी लागली, मात्र तरीही मैफिलींमधून मिळणारे पैसे ती लपूनछपून क्रांतीकाऱ्यांपर्यंत पोहचवायची.

दुलारी बाईचा तो संदेश आणि इंग्रजांची दैना…
दालमंडीच्या तवायफांच्या कोठ्यांमध्ये क्रांतीची ठिणगी पेटवणाऱ्यांच्या यादीतील आणखी एक नाव म्हणजे दुलारी बाई. त्यावेळी बनारसमध्ये नन्हकू सिंह नावाच्या एक मोठ्या गुंडाची दादागिरी चालायची. दुलारी बाईच्या कोठ्यावर हा नन्हकू सिंह नियमित येत असे. ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सला बनरास शहरावर ताबा मिळवायचा होता. एकेदिवशी भल्या पहाटे हेस्टिंग्सनचे ब्रिटिश सैन्य बनारस शहरात घुसले. इकडे सैनिकांच्या घोड्यांच्या टापेचा आवाज तर दुसरीकडे अगदी पहाटेपर्यंत सुरू असणाऱ्या दालमंडीतील मुजऱ्यांचा आवाज… इंग्रज शहरात शिरल्याची खबर जशी दुलारी बाईला लागली तशी तिने पायातले घुंगरू फेकले आणि ती नन्हकू सिंहला शोधायला बाहेर पडली. नन्हकूला बघितल्यानंतर दुलारी ओरडून त्याला सांगू लागली,’’ इंग्रजांनी बनारसच्या महाराजांना घेरले आहे आणि महाराणी पन्नाचा जीवदेखील धोक्यात आलाय.’’ हे ऐकताच नन्हकू सिंग पेटून उठला, गुंड असला तरी ब्रिटिशांचे नाव एकताच तो पेटून उठायचा. नन्हकूने दुलारी बाईचे शतश: आभार मानले आणि मग काही वेळातच खबर आली की नन्हकू आणि त्याच्या साथीदारांच्या अचाट पराक्रमाने इंग्रज सैनिकांचे शीर धडापासून वेगळे झाले, सगळीकडे ब्रिटिश सैन्यांच्या मृतदेहांचा खच पडलाय आणि वॉरेन हेस्टिंग्सतर महिलेचा वेष घालून पळून गेला.
कोठासंस्कृतीतील असे अनेक अलक्षित कोपरेच खरंतर पुन्हा उजळून काढण्याची गरज आहे. कारण आता-आतापर्यंत त्यांचं जगणंच नाही, तर त्यांचं नाचगाणंही बदनामच केलं गेलं होतं.






