देश-प्रदेश कोणताही असो, माणसांनी आपली भाषा शोधली. संवाद साधला. त्यातून प्रेम वाटले, वाढले. माणसांचा समाज उभा राहिला. पंढरीची वारी हे याच समाजातील मानवता, एकता, समता, बंधुतेचे अनोखे प्रतीक! त्यामुळे वारीच्या वाटेवरच श्रीविठ्ठलाचे आगळे शब्दशिल्प उभारण्याची संकल्पना आम्ही साकारली.
अनेक भाषांतील मराठी शब्द किंवा इतर भाषांतून मराठीने स्वीकारलेले शब्द या शिल्पकृतीत सामावले आहेत. या सर्व शब्दांनी त्या त्या भाषेत वेगवेगळी लिपी स्वीकारली. त्यांचा लिखित आकार बदलला. परंतु, अर्थ मात्र कायम राहिला. भाषा आणि शब्द कोणतेही असो; अर्थाचा विठ्ठल तोच राहिला !
आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने... जगद्गुरू तुकाराम महाराजांचे हे शब्द फार मोलाचे आहेत. महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील शब्दांचे ‘अक्षर’ माहात्म्य वर्णन करण्यास पुरेसे आहेत. महाराष्ट्राचे लोकदैवत विठ्ठल हे भक्तिसंप्रदायाचे आद्य प्रतीक आहे. या विठुरायाची, आपल्या पंढरीची वारी म्हणजे विविध भाषा, संस्कृतींचे एकजिनसी अस्तित्वच.
या अस्तित्वाचे विविध पदर वारकरी संतांनी आपल्या अभंगांतून, ओव्यांमधून आणि काव्यांतून अजरामर केले आहेत. ज्या काळी सामान्यांना संस्कृत जाणण्याचा, बोलण्याचा अधिकार नव्हता, त्यांना या भाषेतील ज्ञान मिळत नव्हते, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील भगवद्गीता जनसामान्यांसाठी मराठी भाषेत उलगडली. गीतेतील अगाध ज्ञान सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचणे, ही त्या काळी फारच मोठी घटना होती.
त्यानंतरच्या काळात नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंतच्या मराठी संतांनी केलेल्या अभंग, काव्यरचनांमधून मराठी भाषा आणखी समृद्ध होत गेली. वारकऱ्यांनी गेली आठशे वर्षे मौखिक परंपरेतूनही भाषा जपली. अलीकडच्या साधारण दीडशे वर्षांत आपल्याकडे मुद्रित साहित्याचा प्रसार झाला.

तथापि, त्यापूर्वी संतसाहित्य, काव्यरचनांची ही दिंडी मौखिक परंपरेतूनच रूढ झाली आणि पुढे जात राहिली. मराठीची भाषिक अभिवृद्धी आणि तिच्यातील शब्दसमृद्धीचे हे मूलभूत आणि अभूतपूर्व काम वारीच्या परंपरेने केले, हे आपल्या लक्षात येते.
भक्तिमार्गाचा संदेश देणाऱ्या संतांनी आपल्या काव्य - अभंग - ओवी अशा साहित्यातून मराठीच्या याच सामर्थ्याचा अपूर्व साक्षात्कार आपल्याला घडवला. विठ्ठल म्हणजे प्रेमाची भाषा रुजवणारा संतांचा सखा झाला! वारी म्हणजे अभंग, भाषा, प्रेम, जिव्हाळा, समता, सलोखा सांगणारा प्रवाह ठरला.
मराठी माणसाने गेली आठशे वर्षे हा संतभाव जिवापाड जपला आहे. या संत साहित्यातून आणि काव्यातून मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत गेली. म्हणूनच अनेक संतांच्या साहित्यातून मराठी, कोकणी, कानडी, तेलगू, हिंदी, भोजपुरी तसेच उर्दू, पर्शियन, अरबी अशा विविध भाषांतील शब्दांचा आणि त्या भाषांचाही सहज वापर झाल्याचे दिसते. संतांनी आम्हाला भाषिक सहिष्णुतेची महती शिकवली.
अशा भाषिक संयोग-संगमातून मराठी भाषा आणि समाज गेल्या सातशे-आठशे वर्षांत समृद्ध झाला. आपल्या देशात 750, तर महाराष्ट्रात 42 भाषा बोलल्या जातात. दर बारा कोसांवर भाषा बदलते, असे म्हटले जाते. भाषेला भौगोलिक सीमा वा राजकीय सीमा नसते. महत्त्वाचे म्हणजे, भाषा ही संस्कृतीची वाहक असते.
या अशा सर्व भाषाभगिनी एकमेकांमध्ये सरमिसळ होत विविधतेत एकता निर्माण करत असतात. मराठी भाषेत विविध भाषांतील शब्द असे मिसळले गेले आहेत, की ते मूळ मराठीच शब्द आहेत असे वाटते. तसेच आपल्या भाषेतील शब्द इतर भाषेशीही एकरूप झाले आहेत. अशी सांस्कृतिक घुसळण होत राहणे, ही एक निरंतर प्रक्रिया आहे.
विठ्ठलाच्या रूपात शब्दशिल्प उभारण्याचा विचार मनात आला.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करावे, यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले होते. या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 1 मे 2022 रोजी राष्ट्र सेवा दलाने पंढरपूरमध्ये तनपुरे महाराज मठ ते शिवाजी महाराज पुतळा अशी ‘सामाजिक सलोखा दिंडी’ काढली होती. त्यानंतर साने गुरुजींचे ‘आंतरभारती’चे काम आणि त्यांचा "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा विचार मनात घोळवतच मी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोलीजवळच्या चिंचणी गावात पोहोचलो.
चिंचणी हे धरणग्रस्तांचे पुनर्वसित गाव. संत साहित्यातील शब्दवैभव भाविक वारकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे, हाही विचार मनात होताच. चिंचणीत आलो आणि त्याच ठिकाणी विठ्ठलाच्या रूपात एक शब्दशिल्प उभारण्याचा विचार मनात आला. ज्या शब्दांचा वापर विठ्ठलभक्त आपल्या काव्यात, अभंगरचनांमध्ये करतात, ते मराठी शब्द असे एकत्र गुंफायचे की त्यांच्या बाह्यकृतीत विठ्ठलाचे रूप दिसेल.

त्याच रात्री ही कल्पना लेखक मित्र प्रमोद मुजुमदार, निशा साळगावकर आणि चिंचणीचे ग्रामस्थ मोहन अनपट यांना सांगितली. त्यांनीही लगेच ती उचलून धरली. ‘आमच्या गावातच तुम्ही हे शब्दशिल्प उभारा, आम्ही त्याचा सांभाळ करू’, अशा शब्दांत त्यांनी आश्वस्त केले. मी दृश्यकलेचा विद्यार्थी असल्याने मला हे माहीत होते, की सृजनशील विचार अथवा कल्पना सुचणे ही फक्त एक टक्क्याइतकी सुरुवात असते आणि ती प्रत्यक्षात आणण्याचे 99 टक्के काम बाकी राहते.
आषाढीच्या पालखी सोहळ्याची सुरुवात 20 जून 2022 ला होणार होती. त्यामुळे त्या दिवशी हे शब्दशिल्प उभे करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला. या प्रकल्पाच्या खर्चाची तजवीज व्हावी आणि त्यात लोकसहभाग असावा म्हणून आम्ही त्यासाठी क्राऊड फंडिंगचा पर्याय अवलंबला.
विविध भाषांतील मराठी समानार्थी शब्दांचा शोध घेणे
महाराष्ट्रातील तमाशा या लोककलेचा 2002 साली मी अभ्यास केला, त्यावर पुढे पुस्तकही प्रकाशित झाले. ‘वारी : एक आनंदयात्रा’ हे पुस्तक 2008 मध्ये प्रकाशित झाले आणि त्या काळात ते खूप गाजले. ‘तमाशा’ शब्द हा अरबी भाषेतून आला, असा उल्लेख मला शब्दकोशात मिळाला. ‘कुस्ती’ हा शब्दही अरबी असल्याचे समजले. आपल्या रोजच्या व्यवहारात कानडी, तेलगू या भाषा आणि आपल्या मराठी भाषेतील अनेक शब्द समान आहेत.
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांना ही संकल्पना फार आवडली. विविध भाषांतील मराठी समानार्थी शब्दांचा शोध घेणे, हा या शब्दशिल्पाच्या निर्मिती आणि उभारणीतील महत्त्वाचा भाग होता. या कामी महाराष्ट्रातील विविध भाषा अभ्यासकांची मदत मिळाली.
कानडी - चंद्रकांत पोकळे (बेळगाव), कोकणी - उदय ओक (तळेगाव), उर्दू - अतीक शेख (पुणे), अरबी - जयंत गाडगीळ (पुणे), फारसी - सरफराज अहमद, भोजपुरी - भारत यादव (सोलापूर) हिंदी - राजेंद्र होळकुंडे (पुणे), संस्कृत - सई बांदिवडेकर (पुणे) यांचे साहाय्य मोलाचे ठरले. तामिळ, तेलगू, गुजराती, काश्मिरी, बांगला, ओडिया, पंजाबी, आसामी, भोजपुरी अशा अन्य भाषांसाठी भारतीय भाषा व्यवहारकोश उपयुक्त ठरला.
शब्द निवडण्याचे काम संपल्यानंतर त्या सर्वांची रचना करून अमूर्त आकारातील विठ्ठलाची बाह्याकृती तयार केली. त्यात अर्थवाही शब्द भरले. हे शिल्प ऊन - पावसात उभे राहणार असल्याने ते पोलादी पत्र्याचे करायचे ठरले. त्याचे वेल्डिंग करणे, लोखंडाचा चौथरा करणे ही कामे पुण्यात केली. सचिन निंबाळकर, जितेंद्र कळसकर, उल्हास कागदे, प्रवीण गायकवाड या मित्रांनी त्यासाठी मोठी मदत केली.
हे शिल्प ट्रकमधून चिंचणी येथे आणण्यात आले. मोहन अनपट यांच्या नेतृत्वाखाली चिंचणी ग्रामस्थांनी ते उतरवून घेतले आणि तेथे त्याची उभारणी केली. 23 फूट उंचीचे हे विठ्ठलाचे शब्दशिल्प आता वारीच्या वाटेवर दिमाखात उभे आहे.
भाषा हे माणसांशी संवाद-संपर्क साधण्यासाठी माणसानेच शोधलेले एक विलक्षण साधन आहे. भाषेने माणसे जोडली गेली, संवाद घडला, परस्परप्रेम आणि जिव्हाळा वाढला. देश-प्रदेश कोणताही असो, माणसांनी आपली भाषा शोधली. संवाद साधला. त्यातून प्रेम वाटले, वाढले.
माणसांचा समाज उभा राहिला. अनेक भाषांतील मराठी शब्द किंवा इतर भाषांतून मराठीने स्वीकारलेले शब्द या विठ्ठलाच्या शिल्पकृतीत सामावले आहेत. या सर्व शब्दांनी त्या त्या भाषेत वेगवेगळी लिपी स्वीकारली. त्यांचा लिखित आकार बदलला.
परंतु, अर्थ मात्र कायम राहिला. भाषा आणि शब्द कोणतेही असो; अर्थाचा विठ्ठल तोच राहिला ! संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे संतपरंपरेने आपल्याला शब्दांचे धन अन् शब्दांचीच रत्ने बहाल केली आहेत. हे भान आणि शहाणीव विस्मृतीत जात असताना ती काही प्रमाणात जागवण्याचे काम विठोबाच्या भाषिक शब्दशिल्पातून करण्याचा प्रयत्न आम्ही करू शकलो.
पंढरीची वारी मानवता, एकता, समता, बंधुतेचे अनोखे प्रतीक आहे. आठशे वर्षांपासून संतपरंपरने जपलेली, समृद्ध केलेली आणि वर्षानुवर्षे विठ्ठलभक्तांच्या मांदियाळीने अभिमानाने चालवलेली भाषिक सहिष्णुतेची वारी पुढे नेण्याचा प्रयास आम्ही या शब्दशिल्पातून केला. हा शब्दरूप विठ्ठल वारीच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाचे आत्मभान जागृत करेल, ते अधिक उजळवेल...
मौखिक ते मुद्रित परंपरा... : संतांचे अभंग गात वारकरी वारीच्या वाटेवर चालतात, हे नेहमीचे दृश्य. गेली आठशे वर्षे वारकरी असे अभंग मौखिक परंपरेने पुढच्या पिढ्यांकडे पोहोचवत आहेत. अलीकडे वारीत सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नव्याने सामील होणाऱ्या सर्वच वारकऱ्यांना हे अभंग मुखोद्गत नसतात. तेव्हा ते वारीमध्ये चालताना पुस्तकातून अभंग वाचत पंढरीपर्यंत मार्गक्रमण करीत असल्याचे दिसते.






