
ग्राउंड रिपोर्ट
BaiManus Exclusive : जूनच्या कोरड्या आभाळाखाली, एका शेतकऱ्याची 24 तासांची अस्वस्थ रोजनिशी…
पहाटे पाच वाजता गणेश डकले यांची झोप उघडते. शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात पूर्वीसारखीच होते, पण यंदा एक गोष्ट बदलली आहे, पाऊस आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी गावात जूनचा पंधरवडा उलटून गेला, तरी मान्सूनचा पत्ता नाही. शेत नांगरून तयार आहे, खत-बियाण्यांवर ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत, विहिरीचा तळ उघडा पडला आहे आणि बँकेच्या व्याजाचं मीटर मात्र सुरू आहे. पाऊस लांबल्यावर एका शेतकऱ्याचा दिवस कसा जातो, त्याच्या घरात, शेतात, गोठ्यात आणि मनात नेमकं काय घडतं, हे समजून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने शेतकरी गणेश डकले यांच्यासोबत तब्बल २४ तास घालवले आणि समोर आली त्याची एक अस्वस्थ रोजनिशी…