- उत्पल व. बा.
- मंगला सामंत यांचं नुकतंच निधन झालं. स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख होती; पण त्यांच्या विचारांचं वैशिष्ट्य इतक्यावर थांबत नव्हतं.
- स्त्रियांच्या प्रश्नांइतक्याच गांभीर्याने त्यांनी पुरुषांच्या लैंगिकतेचा, त्यांच्या मानसिक गुंतागुंतीचा आणि लैंगिक शिक्षणाच्या अभावाचा विचार मांडला. लैंगिक गुन्ह्यांवर केवळ कठोर शिक्षांचा आग्रह धरण्याऐवजी त्या त्यामागच्या जैविक, मानसिक आणि सामाजिक कारणांकडे पाहण्याची मागणी करत राहिल्या.
- आज त्या नसल्या तरी त्यांचा हा समतोल आणि अस्वस्थ करणारा विचार अधिकच महत्त्वाचा वाटतो.
‘तिघी’ या सिनेमात 'पेडोफेलिया'चा संदर्भ येतो. सिनेमातल्या आईला जेव्हा आपल्या नवऱ्याचं सत्य कळतं तेव्हा ती त्याच्याशी संबंध तोडते. पण ती त्याला हेही म्हणते की तू आजारी आहेस. डॉक्टरांची मदत घे, बरा हो. पेडोफेलियासारख्या गंभीर मुद्द्यावर ती स्त्री नवऱ्याला शांतपणे सल्ला देते हे मला फारच आवडलं होतं. आई म्हणून ती आपलं कर्तव्य करतेच; पण ‘तुला उपचारांची गरज आहे’ हे सांगण्याची प्रगल्भता तिच्यात आहे हे फार आश्वासक होतं.
सिनेमातला हा प्रसंग बघताना एक जुनी जाहिरात आठवली. बऱ्याच वर्षांपूर्वी थिएटरमध्ये पाहिली होती. एक मध्यमवयीन गृहस्थ (सागर देशमुख) लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा बास्केटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. तो गृहस्थ अस्वस्थपणे मुलाकडे अधूनमधून बघतोय.
थोड्या वेळाने लिफ्ट थांबते. दार उघडतं. मुलगा बॉलशी खेळतच बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते - 'डू यू लाइक चिल्ड्रेन इन अ वे यू शुड नॉट? हेल्प इज अॅव्हलेबल.' त्यानंतर संबंधित संस्थेचं नाव, हेल्पलाइन नंबर दिसतो.
पेडोफेलियासारख्या विषयालादेखील समजून घेता येऊ शकतं, किंबहुना माणसातल्या सर्व प्रकारच्या विकार, विकृतींना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला तरच त्या प्रश्नांवर काही उत्तर मिळण्याची शक्यता असते हे ज्या समाजाला समजतं तो समाज एक प्रगल्भ समाज असतो. लैंगिक गुन्ह्यांच्या संदर्भात बोलताना पुरुषांच्या लैंगिक वर्तनाबरोबरच त्यांच्या ‘लैंगिक मानसा’बाबत जास्तीत जास्त बोललं जायला हवं. त्यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी.
हे आठवण्याचं/लिहिण्याचं एक कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी अभ्यासू लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सामंत गेल्या. पुरूषांच्या लैंगिकतेच्या अभ्यासाबाबत आग्रही असणाऱ्या स्त्रीवादी अभ्यासक म्हणून माझा त्यांच्याशी परिचय होता. त्यांच्याशी जेव्हा जेव्हा गप्पा व्हायच्या तेव्हा त्या पुरूषांबरोबर काम करणं किती आवश्यक आहे हे आग्रहाने सांगायच्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील पुरूषांना लैंगिक समुपदेशन देणारी केंद्रं उघडली गेली पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. त्याबाबत आमचा थोडा विचारही झाला होता; पण तो पुढे गेला नाही. अशा केंद्रांची खरंच फार गरज वाटते.
लैंगिक गुन्ह्यांच्या मुळाशी असलेल्या मानसिकतेचा शोध
पुरूषांचं लैंगिक मानस, त्यांचा सेक्स ड्राइव्ह (लिबिडो) हा महत्त्वाचा विषय अशाकरता आहे की, तो अत्यंत धोकादायक वळण घेऊ शकतो हे आपल्याला वारंवार दिसतं. माध्यमिक शाळेतला एक मित्र आठवतो. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता. आणि लैंगिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्याच्याकडून त्या काळात काही वेड-वाकडं घडलं नाही; पण त्याचं वागणं थोडं विचित्र होतं.
तो अतिरिक्त प्रमाणात हस्तमैथुन करत असे असं त्याच्याकडूनच कळल्याचं आठवतं. त्याचं डोकं ताळ्यावर नसण्याचा संबंध त्यांच्या लैंगिक उपासमारीशी किंवा ‘इनऑर्डिनेट सेक्शुअल डिझायर’शी होता का असा आज प्रश्न पडतो. त्या वयातच त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेलं असतं तर कदाचित काही फरक पडला असता. आजही तो मानसिकदृष्ट्या अस्थिरच आहे. घरची मंडळी त्याला बाहेर जाऊ देत नाहीत असं कळलं. त्यामुळे पुरूषाची सेक्शुअल हेल्थ ठीक आहे की नाही हे बघणं गरजेचं ठरतं.

२०१९ साली ‘उद्याचा मराठवाडा’ या दिवाळी अंकात ‘कामस्वातंत्र्य’ या विषयावरील एक विभागाचं संपादन केलं होतं. त्यात मंगलाताईंनी ‘कामशमन : वहिवाटेची बिकट वाट’ हा लेख लिहिला होता. लेखात त्यांनी पुरूषांच्या लैंगिक (दु)वर्तनावर प्रकाश टाकला होता. लेखातले काही उतारे…
'कामशमन : वहिवाटेची बिकट वाट'मधील महत्त्वाची मांडणी
पुरूषाची कामेच्छा तीव्र असण्यामागील कारणांचा अजून शोध घेतल्यास असं लक्षात येतं की स्त्रीमधील स्त्री-बीज आणि पुरूषामधील शुक्राणू यांच्या संयोगाने जर गर्भधारणा नाही झाली तर ती बीजे शरीरात ठेवली जात नाहीत. ती शरीराबाहेर टाकली जातात.
स्त्रीमध्ये तिचं बीज मासिक पाळीद्वारे बाहेर टाकलं जातं तर पुरूषामध्ये ते वीर्यस्खलनाद्वारे बाहेर पडत असतं. पुरूषबीजाचा संयोग स्त्रीबीजाशी होणार नसला तरी त्याला शरीराबाहेर बाहेर पडावंच लागतं. त्यातही पुरूषामध्ये त्याचं बीज हे पुरूषाच्या शिस्नाच्या ‘इरेक्शन’ आणि ‘इज्यॅक्युलेशन' या क्रियेने वीर्यरूपात बाहेर पडत असतं. ही प्रक्रिया माणसाच्या मज्जासंस्थेशी कशी जोडलेली असते हे आपण आधी पाहिलं.
अर्थात वीर्य बाहेर टाकण्याकरता पुरूष लिंगाची जी ताठर स्थिती यावी लागते त्या स्थितीसाठी पुरूषाने काम-उत्तेजित होण्याची गरज असते. पुरूषाची शारीरिक आणि म्हणून मानसिक गरज या अर्थाने हे अनिवार्य असेल तर मग त्या उत्तेजनेसाठी पुरूष विविध मार्ग अवलंबून पाहणार हे ओघाने आलंच.
हे मार्ग प्रत्येक पुरूषागणिक वेगवेगळे असू शकतात. म्हणजे कुणाला सुंदर स्त्रीकडे निव्वळ पाहून उत्तेजित व्हायला होतं, कुणाला स्त्रीच्या आवाजामुळे उत्तेजित व्हायला होतं, कुणाला स्त्रीचे कपडे पाहण्याचा नाद असतो, कुणाला तिचे फोटो, कुणाला स्त्रीचे शरीरवर्णन, तर कुणाला तिच्या जवळिकीचे सीन (बेड सीन्स) पाहून उत्तेजना येते.
कामुक आवाजातील गाणी ऐकावीशी वाटतात. कुणाला स्त्रीबरोबर कामुक हावभावांचं नृत्य करावंसं वाटतं. कुणी पुरूष वेश्यांकडे जाऊन, कुणी डान्सबारमध्ये किंवा पब्समध्ये जाऊन तर कुणी तमाशाला जाऊन, कुणी स्त्रियांना अश्लील मेसेज लिहून, स्त्री-शरीराची चित्रं, वर्णनं, शिल्पं घडवून किंवा निरखून, पोर्न फिल्म पाहून - अनेक प्रकारांनी पुरूष आपली कामभावना उत्तेजित करू पाहतात.

कामोत्तेजना आल्यावर तिचे शमन हा महत्त्वाचा मुद्दा असतो. बरेचजण त्याकरता हस्तमैथुनाचा आधार घेतात. कारण पुरूषाचं बीज शरीराबाहेर पडणं ही क्रिया अंतिमतः त्याच्या कामशमनातून होणार असते. ते शमन पुरुष हस्तमैथुनाद्वारे करू पहातो. एकूण पुरूष बीज बाहेर पडण्याची ही नैसर्गिक धडपड आहे. तसंच हे वीर्य बाहेर न पडल्यास पुरूष अस्वस्थ आणि ताणाखाली राहतो. अखेरीस त्याला झोपेत स्वप्नावस्था आणून त्याचे बीज वीर्याद्वारे बाहेर टाकण्याचे काम त्याच्या मेंदूकडून पार पाडले जाते.
याउलट स्त्री-बीज बाहेर टाकण्याची प्रक्रिया ही शरीरांतर्गत असते. ते बाहेर पडण्यासाठी स्त्रीला कामोत्तेजना येण्याची गरज नसते. त्यामुळे स्त्रीचे लक्ष वेधून घेण्यासाठी पुरूष जे वरील मार्ग वापरतो ते स्त्रीला पुरूषासाठी वापरण्याची गरज नसते, तो तिचा शरीरधर्म नसतो.
स्त्रिया सभ्य व शालीन आणि पुरुष असभ्य असे जे दोन भाग आपण करून ठेवले आहेत त्याबाबतच मग प्रश्न उभे रहातात. विशेषतः पुरूष जे कामोत्तेजनाचे वरील उपाय अमलात आणतो ते अश्लील समजले जातात. स्त्री-पुरूषांच्या बीज-उत्सर्जनातील हा मोठा फरक समजून घेणं हे पुरूषाला समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.
पुरूषाला स्त्रीदर्शन इतकं महत्त्वाचं का वाटतं, तिचं सान्निध्य किंवा स्पर्श हवासा का वाटतो, साहित्यातून स्त्री-शरीराची वर्णने करण्यात आणि वाचण्यात तो का रमतो, तो सेक्सविषयक सिनेमांना गर्दी का करतो याबाबत आपल्याकडून सातत्याने दुर्लक्ष झालेलं आहे. या वर्तनाच्या मुळाशी जावं असं कुणाला वाटत नाही.
जैविक गरज, सामाजिक संस्कार आणि हिंसेचं नातं
बीज शरीराबाहेर पडण्याची पुरूषाची नैसर्गिक गरज समजून घेतली जात नाही. त्याच्या या कामशमनाच्या प्रयत्नांचा सर्वसाधारणपणे उपहास केला गेलेला आहे. हस्तमैथुन हा तर पुरूषांचा आजारदेखील समजला गेला आहे. यातून होत राहिलेल्या लैंगिक दमनामुळे, आपल्या कामशमनासाठी स्त्रीवरील लैंगिक अत्याचाराचे, विनयभंगाचे नवेनवे चोरटे मार्ग पुरूष वापरून पाहतो.
आपल्या या वर्तनामागे निसर्गाचा कार्यभाग काय हे पुरूषालाही न समजल्यामुळे त्याला तो 'पुरूषार्थ’ वाटू लागतो आणि त्यामुळे स्त्रीला उपद्रव होईल अशा पद्धतीने कामशमन करणाऱ्या पुरूषांची संख्या वाढत जाते. त्यातून काही पुरूष विकृत मार्गाचा अवलंब करतात जो अखेर गंभीर गुन्हा ठरतो.
अशा पुरूषांना कडक शिक्षा ठोठावून काहीही निष्पन्न होत नाही हे आपण अनुभवतो कारण त्याच्या कामशमनाच्या कोंडमाऱ्यावर, आणि त्यातून पुरूषावर ओढवलेल्या अगतिकतेवर वास्तव उपाय शोधले जात नाहीत. जन्मठेप, फाशी यासारखे कठोर उपायदेखील वरवरचेच ठरतात.

बीज उत्सर्जनाची निकड आहे म्हणून सामाजिक व्यवहारांच्या पातळीवर पुरुषांचं सर्व प्रकारचं वर्तन आपोआपच समर्थनीय ठरत नाही; पण जैविक-मानसिक ट्रिगर्स समजूनच न घेणंही बरोबर नाही. एकूणात पाहता पुरुषांचं पुष्कळ प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि त्यात हा लैंगिक उद्दीपनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
कामेच्छेच्या नियमनाअभावी होणारे लैंगिक गुन्हे आणि स्त्रीवर अधिकार, सत्ता गाजवण्याच्या मानसिकतेतून होणारे लैंगिक गुन्हे अशी विभागणीही इथे करावी लागेल. वरील लेखातही मंगलाताईंनी ‘मुलामुलींचे लैंगिक शिक्षण ही तर आवश्यक गरज आहेच, पण समाजात मुलगे/पुरूषांसाठी ‘सेक्स-क्लिनिक्स’ उघडली गेली पाहिजेत’ हे मांडलं होतं.
'स्त्री विरुद्ध पुरुष' नव्हे, समाजस्वास्थ्याचा प्रश्न
पुरूषांमधील कामेच्छा आणि पितृसत्ताक पद्धतीने केलेले त्यांच्यावरील कुसंस्कार या दोन्हीमुळे समाजासाठी, विशेषतः स्त्रियांसाठी, फार अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत. पुरुष हा पितृसत्तेचा निर्माताही आहे आणि एका अर्थी बळीही आहे. त्याची लैंगिक अडचण समजू शकली तरी त्याच्यातली हिंसा, स्त्रीला कमी लेखण्याची मानसिकता हे मुद्दे गंभीर आहेत. आणि ते परंपरेने घडत आलेल्या 'वृत्ती विकृती'तून निर्माण झाले आहेत.
पुरूष म्हणूनचे जैविक प्रश्न आणि पितृसत्ता, परंपरा यातून उभे राहिलेले वृत्तीचे प्रश्न या दोन्हीमुळे पुरूष 'बिघडत' राहिला आहे. स्त्रीला बाहेर फिरताना सुरक्षित न वाटणं हे त्या समाजाचं मोठं अपयश तर आहेच; पण त्या समाजातल्या पुरुषांच्या ‘लिबिडो’चं नीट नियोजन होत नाही आहे याचंही ते निदर्शक आहे. दिवसागणिक लैंगिक गुन्हे वाढत असण्याच्या काळात आपण पुरूषकेंद्री विचार करून काही काम करणार की नाही हा खरा प्रश्न आहे.
मंगलाताई असा विचार करत होत्या. त्यांच्याशी बोलताना बरं वाटायचं. त्या करारी फेमिनिस्ट होत्या; पण त्यांना पुरूषांचा ‘लिबिडो प्रश्न’ सुटल्याशिवाय स्त्रीप्रश्न सुटायला मदत होणार नाही हेही कळलं होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल आस्था वाटायची. माझे 'पुरुषपणाचे प्रश्न' त्यांच्याशी डिस्कस करता यायचे. अर्थात मी ‘मिळून साऱ्याजणी’तला एक पुरूष सदस्य होतो. त्यामुळे मला खरं तर ती संधी आधीपासूनच मिळाली होती.
आसपास स्त्रिया असल्या, आपल्याला भरपूर मैत्रिणी असल्या आणि त्यांच्याशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलता येऊ शकलं तर पुरूष म्हणूनचे आपले काही गुंते सुटायला किती मदत होते याचा मला चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे 'स्त्री विरुद्ध पुरूष' अशी विचित्र, अर्थहीन, मूळ प्रश्नाला भरकटवणारी, पूर्णपणे अनावश्यक अशी आजची ‘बायनरी’ पाहिली की मंगलाताईंची आठवण होते. त्यांच्यासारखा सम्यक विचार करता आला तर 'समाजस्वास्थ्य' सुधारायला मोठीच मदत होईल.






