मराठी सारस्वतांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दरवर्षी होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या संमेलनातील अध्यक्षपदाची निवडणुक आता होत नसल्याने वादाचा मुद्दा गायब झाला आहे असे आपण समजू शकतो मात्र आता संमेलनाच्या स्थळावरून काहीजण निराश झाले आहेत. स्थानमाहात्म्य हे आपल्याकडे अतिशय महत्वाचे. त्याचे झाले असे की, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने पुढचे संमेलन म्हणजे 98 वे अखिल भारतीय मराठी संमेलन दिल्लीत घेण्याची घोषणा केली आहे.
मुंबई आणि इचलकरंजी ही दोन नावे चर्चेत आसताना ‘सरहद’ संस्थेकडून दिल्लीचे निमंत्रण आल्याने अखेर दिल्लीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निमंत्रक संजय नहार यांनी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाने अभिजात भाषेचा दर्जा व मराठी अस्मिता यासाठी हे संमेलन महत्वाचे ठरेल असे म्हणले आहे. याआधी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 1954 साली दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्राच्या बाहेर याआधी देखील संमेलने झाली. आत्तापर्यंत एकूण 23 संमेलने महाराष्ट्राबाहेर झाली आहेत.
दिल्लीतील होणाऱ्या संमेलनाने अभिजात भाषेचा दर्जा,मराठी अस्मिता व मराठीपण राजधानीत दाखविण्याची योग्य संधी आहे असा विश्वास आयोजक व महामंडळ दाखवत असले तरी साहित्य संस्था, प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांनी मात्र नाराजीचा सूर लावला आहे. त्याला कारणही आहे. त्यांच्या मते इथून सगळा लवाजमा घेऊन प्रकाशन संस्था तिथे जाणार व तिथे म्हणावी तेवढी आर्थिक उलाढाल होणार नसेल तर एवढी खर्चिक बाब अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई ऐवजी दिल्लीला अधिक प्राधान्य
यंदाचे संमेलन हे महामंडळ मुंबईकडे असतानाचे अखेरचे संमेलन असल्याने हे संमेलन मुंबईत व्हावे, अशी इच्छा मुंबईकरांकडून व्यक्त होत होती. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून संमेलनासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसता, अशीही शंका व्यक्त होत होती. त्यामुळे मुंबईला यंदा संधी मिळाली नसेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाचा परिसर संमेलन स्थळासाठी निवड समितीला दाखवण्यात आला होता मात्र, संमेलनासाठीची मंडप उभारणी, पाहुण्यांची निवासव्यवस्था याचा विचार करता, दिल्लीपेक्षा मुंबई अधिक खर्चिक ठरली असती. दिल्लीमध्ये तालकटोरा इनडोअर स्टेडियम येथे या तुलनेत संमेलनासाठी जास्त चांगली सोय होऊ शकते, असे मत निवड समितीतील सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे दिल्लीच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.
'अभिजात दर्जा'साठी मदत होण्याची आशा
केंद्र सरकारचे व मराठीचे विळा भोपळ्याचे सख्य आहे की काय हे कळायला मार्ग नाही. याचे कारण म्हणजे भाषेच्या प्राचिनत्वाच्या संबंधी महाराष्ट्राने अभ्यासपूर्ण अहवाल देऊनही केंद्राने अजून त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. वारंवार योग्य त्या व्यासपीठावर मुद्दे उपस्थित केले गेले. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या काही सदस्यांनी यावर प्रश्न विचारले.परंतु यावर काहीच केले गेले नाही.
केंद्रातील सरकारची मराठीच्यासंबंधी ही पार्श्वभूमी माहिती असून देखील दिल्लीत साहित्य संमेलन घेतल्याने अभिजात दर्जा मिळेल असा आशावाद महामंडळाला असेल आणि त्या आशादायक स्वप्नाची पूर्तता झाली तर चांगलेच आहे. परंतु,सामान्य मराठी भाषिकांना दिल्लीतील आयोजनाने जी अभिरूची समृध्द करणाऱ्या साहित्याची, विद्वत्तापूर्ण काव्य ऐकण्याची मेजवानी भेटणे दुरापास्त होईल. कारण ते सहजगत्या होणाऱ्या प्रवासाच्या, खर्चाच्या मर्यादेत नसेल.
प्रकाशकांची मात्र नाराजी
याचा फटका साहित्य संमेलनातून होणाऱ्या पुस्तक विक्री व अन्य साहित्य विषयक घडामोडींवर होणे साहजिक आहे. याआधी घुमान इथे डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यावेळी सरहद हीच संस्था निमंत्रक होती. त्यावेळी मराठी जनांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. असाच प्रतिसाद दिल्लीतही मिळणे अपेक्षित आहे. संमेलनातील राजकारण हे नवीन नाही. राजकारण्यांचा संमेलनातील वावर देखील नवीन नाही. मुंबईत होणाऱ्या संमेलनाला राजकीय वरदहस्त त्यांच्या अटीशर्तींवर होता अशा चर्चा आहेत. त्यामुळे संमेलनाची जागा दिल्लीला पसंती देण्यात आल्याचे कळते. मात्र यासंदर्भात बोलताना, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे यांनी सांगितले की, "त्यावेळी असलेल्या निवडणुका लक्षात घेता इच्छुक संस्थेने यासाठी वेळ देता येणे कठीण आहे असे कारण दिल्याने मुंबईचा प्रस्ताव मागे पडला."

यासाठी कारणे काहीही असोत, 98 वे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या राजधानीत व्हायच्या ऐवजी देशाच्या राजधानीत होत आहे. अभिजात दर्जा व मराठी भाषेचा प्रचार प्रसार,मराठी अस्मितेचा प्रभाव दाखविण्याची ही संधी आहे असे समजून सर्वच क्षेत्रांतून संमेलन जल्लोषात पार पाडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अध्यक्षांची निवड ऑक्टोबरमध्ये
या आधी १९५४मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकही मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालेले नाही त्यामुळे शताब्दीच्या उंबरठ्यावरील या साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व असेल, असेही सांगण्यात येत आहे. महामंडळ फेब्रुवारी अखेरचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संमेलन आयोजनाचा विचार करीत आहे. महामंडळाची ऑक्टोबरमध्ये पुण्यात बैठक होणार असून त्यात संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी दिली.






