गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्ट एजन्सी’ (एनटीए)या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. परीक्षा घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यापासून ही संस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जयपूर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशन थांबवलेले नसले, तरी ज्या पद्धतीने ‘नीट’ परीक्षा घेतल्या आणि वाढीव गुणांमुळे जो गोंधळ घातला, त्यावरचे भाष्य कान उघडणारे आहे. केंद्र सरकार भलेही ‘नीट’ परीक्षेत गैरव्यवहार झाला नाही असे म्हणत असले, तरी त्यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने ‘एनटीए’ला ग्रेस गुण दिलेल्या 1563 विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रद्द करून त्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही परीक्षा 23 जून रोजी होणार आहे. 1563 मुलांना वाढीव गुण का दिले, या प्रश्नाचे उत्तर ‘एनटीए’ला देता आले नाही. ‘एनटीए’ने वाढीव गुण दिलेल्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले आहेत. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा त्यांच्या जुन्या गुणांसह समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकतात; परंतु त्यांच्या गुणपत्रिकेतून अतिरिक्त गुण काढून टाकले जातील. ज्या उमेदवारांना आपण पुनर्परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो, असा आत्मविश्वास आहे, ते पुनर्परीक्षेला बसण्याचा निर्णय घेऊ शकतात.
‘नीट’च्या निकालाची रात्र गोंधळाचे कारण का बनली?
‘नीट’ निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी चार जूनची रात्र गोंधळाचे कारण बनली. सुमारे सोळाशे मुलांना उच्च श्रेणी मिळाली. नंतर जेव्हा 67 मुलांना शंभर टक्के गुण मिळाल्याचे उघड झाले, तेव्हा सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटले. नंतर त्यांना या परीक्षेत हेराफेरीचा संशय येऊ लागला. ‘नीट’ परीक्षेच्या अर्ज भरण्यास अनाकलनीय वाढ देण्यात आली, तसेच ठरलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच ‘नीट’चा निकाल लागल्याने अनेकांचा एकूणच परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप आहे.
विद्यार्थी देशभर रस्त्यावर उतरले. सर्वोच्च न्यायालयालाही त्याची दखल घ्यावी लागली. ‘नीट’चा निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक निकालाचा दिवस निवडला नसता, तर कदाचित 67 मुलांचे शंभर 100 टक्के गुण हा प्रतिभेचा स्फोट मानला गेला असता. जसजशी माहिती समोर येऊ लागली, तसतसे परीक्षेच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) ची स्थापना केली होती. संसदेच्या कायद्याने निर्माण केलेल्या या स्वायत्त संस्थेची जबाबदारी राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, केंद्रीय विद्यापीठे यासारख्या उच्च शिक्षणाच्या संस्थांसाठी प्रवेश परीक्षा घेणे आणि त्यांचे निकाल जाहीर करणे ही आहे.
या संस्थेला संपूर्ण पारदर्शकतेने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती; पण ‘नीट’ परीक्षेच्या निकालावर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे ही संस्था आणि तिचे काम संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या वादानंतर काही मुले आणि त्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि प्रवेशासाठी समुपदेशनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या मागण्या मान्य केल्या नसल्या, तरी टिप्पणी करताना ‘एनटीए’कडून उत्तर मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या टिप्पणीत परीक्षेच्या पावित्र्याला बाधा पोहोचल्याचे मान्य केले आहे.
सहा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण का दिले गेले?
या संस्थेचे प्रमुख प्रदीप जोशी हे देशातील सर्वात संवेदनशील आणि सर्वोच्च परीक्षा आयोजित करणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांची नियुक्ती करताना ‘एनटीए’मध्येही ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे पावित्र्य राखतील असा विचार झाला असावा; परंतु ‘नीट’ निकालानंतर निर्माण झालेल्या वादामुळे तसे होताना दिसत नाही. ‘नीट’ निकालावरील सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांचा आहे. तसेच, याच मालिकेतील ‘नीट’ टॉपर्समध्ये आठ विद्यार्थ्यांची उपस्थिती संशयाचे कारण बनली आहे.
प्रथम क्रमांक मिळविलेले यातील सहा विद्यार्थी हरियाणातील बहादूरगड येथील एकाच परीक्षा केंद्रातील आहेत. एका प्रसिद्ध कोचिंग कंपनीच्या संस्थापकाने ‘नीट’ परीक्षेतील सर्व गैरप्रकारांबाबत औपचारिक निवेदन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘एनटीए’ ने ज्या 1576 विद्यार्थ्यांना वाढीव गुण दिले, त्यांची योग्य तपासणी केली नाही. सहा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण का दिले गेले? प्रत्यक्षात आठपैकी सहा टॉपर्सना वाढीव गुण देण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रामुळे ज्यांचा वेळ वाया गेला, त्यांना गुण देण्याची व्यवस्था करण्यात आली होती, असे समर्थन करण्यात आले. काही परीक्षा केंद्रांवर उत्तरपत्रिका वाटण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी होत्या. 67 टॉपर्सपैकी सहा विद्यार्थी याच बहादूरगड केंद्रावरचे आहेत. त्यांना वाढीव गुण देण्यात आले आहेत. एवढी स्वायत्त संस्था, काटेकोर नियोजन, यंत्रणा हाताशी असताना मुळात काही केंद्रावर उत्तरपत्रिका पोचण्यास विलंब का झाला आणि त्याला जबाबदार असणाऱ्यावंर काय कारवाई केली, हे पुढे यायला हवे होते.
ते तसे आले नाही. ‘नीट’ परीक्षा पाच मे रोजी झाली होती. त्यासाठी 9 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरायचे होते. त्या वेळी दोन दिवस अर्ज दाखल करण्याची वेबसाइट क्रॅश झाली होती. त्यानंतर पालकांच्या मागणीनुसार ‘एनटीए’ने फॉर्म भरण्याची शेवटची मुदत दोन दिवसांनी वाढवली होती. आठ टॉपर्सबाबतही सांगितले जात आहे, की त्यांनी वाढीव दोन दिवसांत फॉर्म जमा केले नाहीत का, याचीही चौकशी करावी.

‘नीट’परीक्षेसाठी 20 लाख 38 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज करून परीक्षा दिली होती. यापैकी 11 लाख 45 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येबाबतही वाद आहे; मात्र या आरोपांनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ‘नीट’ परीक्षेत वेळ संपत असल्याच्या तक्रारी आल्या, तेव्हा वाढीव गुणांची तरतूद करण्यात आली होती.
‘एनटीए’चे म्हणणे आहे, की ही प्रणाली सर्वोच्च न्यायालयाने सेट केलेल्या सामान्यीकरण सूत्रावर आधारित आहे. निकालाबाबत असमाधानी असलेले विद्यार्थी वाढीव गुण आणि गुणांमध्ये असामान्य वाढ यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे ‘नीट’परीक्षेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एवढेच नाही तर ‘नीट’च्या सामान्यीकरणाच्या सूत्रावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विद्यार्थ्यांचा असंतोष दूर करण्यासाठी सर्व शंकांचे निरसन केले पाहिजे. ‘नीट’च्या निकालाबाबत गोंधळ सुरू आहे. अनेक ठिकाणी निदर्शने झाली. पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे या परीक्षेच्या निकालाबाबत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
नेहमीचा पाढा…
या परीक्षेबाबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा वादाशी संबंधित आहेत. प्रवेश परीक्षेतही दोनदा पेपर फुटल्याची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजित करताना अनेक अनियमितता झाल्या असून, त्यामुळे अनेकवेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत. पेपरमधील चुकांसोबतच त्याच्या संस्थेतही अनेक चुका झाल्या आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाचा पेपर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला आणि नाराजी व्यक्त केली. 2022 मध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता.

देशातील अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीचे पेपर देण्यात आले. त्या वेळी हे प्रकरण खूप चर्चेत होते. ‘नीट’ 2021 मध्ये विचारलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नाबाबतही वाद झाला होता. त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. या प्रश्नात हिंदी आणि इंग्रजी अनुवादात फरक होता. प्रत्येक वेळी ‘नीट’ परीक्षेत काहीतरी चूक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. गेल्या काही वर्षांत ‘नीट’च्या परीक्षेवरून मागचा गोंधळ पुढे चालू हे नाट्य सुरू असते. ते कोठेतरी थांबले पाहिजे. आधीच जीवघेणी आणि गळाकापू स्पर्धा असताना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा सरकारला अधिकार कुणी दिला, याचे उत्तर मिळाले पाहिजे.






