एक खेळ, एकसारखे नियम-शर्ती, पण पोषाख वेगवेगळे. खेळांच्या जगात अनेकदा हे बघायला मिळतं की स्त्री-पुरुषांच्या एकाच खेळामध्ये महिला खेळाडूंना वेगळा पोषाख करावा लागतो. लैंगिक भेदभावातून समाजात नेहमीच स्त्रियांवर आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यातून खेळांचीही सुटका झालेली नाही. खेळातही स्त्रियांचा पोषाख जुन्या पारंपरीक विचारातून व लैंगिक भेदभावातून ठरवला जातो. खेळाच्या इतिहासापासून वर्तमान काळापर्यंत नजर टाकली तरी हे स्पष्टपणे दिसून येतं की खेळ संघटनांनी नियमांच्या माध्यमातून स्त्रीत्वाची कल्पना महिला खेळाडूंच्या द्वारे राबवण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला खेळाडूंच्या क्रिडा कौशल्याला महत्त्व देण्याऐवजी त्यांना कौतुकास्पद वस्तूत बदललं आहे. महिला खेळाडूंच्या शरीरावर यांचं जास्त लक्ष असतं आणि त्यांचे पोषाखही सेक्सिस्ट असतात. हे पोषाख पुरुषांच्या नजरेतून आकर्षक वाटतील असे असतात. महिला खेळाडूंना अधिकी स्त्रैण आणि आकर्षक दाखवणारे कपडे घालण्यावरच भर दिला गेला आहे.
न्यूझीलंडने महिला खेळाडूंच्या ड्रेसचे नियम बदलले
या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमधून एक सकारात्मक बातमी आली आहे. न्यूझीलंडमध्ये जिमनॅस्टिक खेळाच्या पोषाखात नवे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला खेळाडूंना आता जिमनॅस्टिकमध्ये घालण्यात येणाऱ्या लियोटाय म्हणजे बिकिनीसारख्या पोषाखावर शॉर्ट्स किंवा लेगिंग्स घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरुषांसाठी हा नियम आधीपासूनच लागू करण्यात आला होता.
‘द गार्डियन’च्या बातमीनुसार तिथे आता स्पर्धेत अंडरवियर किंवा ब्रा स्ट्रॅप दिसली म्हणून महिला खेळाडूंना दंड लावण्यात येणार नाही. 200 हून जास्त खेळाडूंच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे. महिला खेळाडूंना खेळताना ‘सुरक्षित आणि सहज’ असण्यासाठी याची गरज असल्याचं म्हटलं गेलं आहे. हा नियम सध्यातरी न्यूझीलंडमध्येच लागू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मात्र जिमनॅस्टिक महासंघाचे नियमच लागू असतील. त्यासाठी महिला खेळाडूंना स्पोर्टिव नॉन-ट्रान्सपॅरेंट लियाटाय किंवा युनिटाय घालावी लागेल ज्यावर सुंदर डिझाईन असेल.
या नियमाचं उल्लंघन झाल्यास महिला खेळाडूंच्या व्यक्तिगत किंवा सांघिक कामगिरीतून मिळालेल्या गुणांमधून 0.30 ते 1.00 गुण कापण्यात येऊ शकतात. महिला खेळाडूंनी या पोषाखाविषयी अनेकदा आपली काळजी व्यक्त केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीच्या संघाने महिलांच्या यौन शोषणाविरोधात भूमिका घेत, फुलबॉडी सूट घालण्याचा पर्याय स्वीकारला होता.

महिला खेळाडूंच्या पोषाखांचा एक प्रदीर्घ इतिहास
19 व्या शतकात जेव्हा उच्च-मध्यम वर्गातील स्त्रियांना लॉन टेनिस खेळण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा त्यांचा पोषाख स्त्रैण होता, शालीन होता आणि त्यांचं आकर्षण वाढवण्यासाठी त्याची खास निर्मिती करण्यात आली होती. त्या वेळी जे कॉर्सेट आणि पूर्ण शरीर झाकणारे पोषाख होते त्यामुळे तेव्हाच्या खेळाडूंना कोर्टात झेप घेताना, उड्या मारताना प्रतिबंध व्हायचा.
20 व्या शतकात शारिरीक शिक्षणातील सुधारांमुळे महिला खेळाडूंच्या पोषाखातही शारिरीक हालचाली करणं सोपं जाईल असे बदल होऊ लागले. जिमस्लिप आणि ट्युनिकसारख्या कपड्यांनी महिला खेळाडूंना कॉर्सेटपासून मुक्त केलं. हा एक पुरोगामी निर्णय वाटला तरी प्रत्यक्षात या पोषाखाच्या बरणीसारख्या आकारातून तरुण महिलांच्या शरीराला काळजीपूर्वक लपवण्यात आलं आहे.
असे फारच कमी खेळ आहेत ज्यात महिला आणि पुरुषांसाठी समान पोषाख आहेत. कुस्ती, गोल्फ, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल यात स्त्री-पुरुष खेळाडूंचे कपडे जवळपास सारखेच असतात. पण त्यापलिकडे जाऊन बाकीच्या खेळांमध्ये दोघांच्याही पोषाखात खूप अंतर असतं. ट्रॅक अँड फिल्डमध्ये प्रोफेशनल लेवलवर महिला खेळाडू स्पोर्ट्स ब्रा आणि मायक्रो शॉर्ट्स घालताना दिसतात तर पुरुष लांब स्पॅन्डेक्स शॉर्ट्स घालतात. जिमनॅस्टिकमध्येही महिला लियोटाय घालतात तर पुरुष ट्रॅकपँट आणि टँक टॉप घालतात.
टेनिसमध्येही महिला खेळाडू मिनी स्कर्ट घालतात तर पुरुष आरामदायक शॉर्ट्स घालतात. बीच वॉलिबॉलमध्ये पुरुष शॉर्ट्स आणि टँक टॉप घालतात तर महिलांना बिकिनी घालावी लागते. काही जणांचं म्हणणं आहे की काही खेळांमध्ये कमी कपडे घालणं हे आरामदायक आणि हालचाली वाढवण्यासाठी गरजेचं असतं. पण प्रश्न हा आहे की कमी कपडे महिलांनीच का घालावे? याचं सोपं उत्तर हे आहे की स्त्रियांच्या शरीराला सेक्सुअल आणि आकर्षक दाखवण्याची ही एक चाल आहे.
उदाहरणार्थ स्कर्ट स्त्रीत्वाचं प्रतीक मानलं जातं. खेळ, स्त्री सबलीकरण आणि लैंगिक समानता आणण्याचं एक माध्यम आहे पण असे नियम हे दाखवतात की खेळातून घातले जाणारे पोषाख हे लैंगिक भूमिका दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

… आणि महिला खेळाडूंनी आवाज उठवला
महिला खेळाडूंनी अनेकदा त्यांच्या पोषाखाशी जोडल्या गेलेल्या लैंगिक अपेक्षांच्या विरोधात आवाज उठवला आहे. लोकांनी त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याच्या विरोधात जात त्यांनी त्यांना जे आरामदायक आणि सहज वाटतात असेच पोषाख घातले आणि त्यासाठी दंड, बंदी, इशारे यांची परवा केली नाही. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्सने 2018 सालच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत कस्टम मेड काळा केटसूट घातला होता ज्याचा फ्रेंच टेनिस फेडरेशनने विरोध केला होता.
त्यांच्या या पोषाखावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सेरेना सातत्याने या पोषाखी नियमांच्या विरोधात उघडपणे बोलत आहे. बल्गेरीयात युरोपियन चँम्पियनशीपच्या स्पर्धेत नॉर्वेजियन महिला बीच हँडबॉल संघावर दंड लावण्यात आला होता कारण त्यांनी बिकीनी न घालता शॉर्ट्स घातल्या होत्या. युरोपीय हँडबॉल महासंघाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची धमकी देत त्यांना स्पर्धेतून बाद करण्याचा इशारा दिला होता तरीही त्यांनी शॉर्ट्स घालण्याचा पर्याय निवडला.
त्यानंतर संघावर 1500 युरोचा दंड लावण्यात आला होता. पुरुष संघाला नेहमीच शॉर्ट्स घालण्याची परवानगी मिळते पण महिला खेळाडूंना असं केलं तर त्यांच्यावर दंड लावण्यात येतो. 2021 मध्ये स्विटजरलँड येथे युरोपीय कलात्मक जिमनॅस्टिक स्पर्धेत महिला खेळाडूंनी त्यांच्या पोषाखाचा विरोध केला होता. 2012 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटनमध्ये महिलांचा रस वाढावा म्हणून खेळ संघटनेच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की या खेळात महिला खेळाडूंचा पोषाख अधिक स्त्रैण दिसणं गरजेचं आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने म्हटलं होतं की महिला खेळाडूंना स्कर्ट घालावा लागेल ज्यामुळे त्या अधिक सुंदर दिसतील आणि प्रायोजक आणि प्रेक्षकांचं (म्हणजेच पुरुषांचं) आकर्षण टिकून राहिल.

स्त्रियांना खेळांमध्येही फार पूर्वीपासून अनेक पद्धतींनी नियंत्रणात ठेवण्यात आलं आहे. त्या कशा दिसतील, कशा वागतील, काय कपडे घालतील, त्यांच्यासाठी काय योग्य राहिल हे सारं पुरुष सदस्यांनी भरलेल्या खेळ संघटना ठरवत असतात. पण याच्या विरोधात महिला खेळाडू ज्या पद्धतीने आवाज उठवत आहेत त्यावरून दिसत आहे की महिला खेळाडू आता याविरोधात आपली इच्छा पुढे आणत आहेत. आपला निर्णय घेत आहेत की त्यांना काय चांगलं वाटेल, कशात त्यांना सहजता लाभेल.
त्यांना नियंत्रीत करणाऱ्या, लैंगिकतेत अडकवणाऱ्या गोष्टींचा त्या विरोध करत आहेत. प्रत्येक स्त्री खेळाडूला सहजपणे, कोणत्याही दबावाविना प्रत्येक खेळात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सेक्सिस्ट ड्रेस कोड त्यांच्या मार्गात अडथळा होऊ शकतो. त्यामुळे खेळातील असे नियम बदलण्याची फार गरज आहे कारण त्यामुळे अनेक मुलींना ज्यांना खेळायचं आहे त्यांना सुरूवातीलाच अशा नियमांमुळे त्या खेळाविषयी नावड निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या पोषाखात खेळताना तुम्ही सहज असता तोच पोषाख तुम्ही करायला हवा. कोणताही खेळ शेवटी कसा खेळला जातो याविषयी असतो, खेळताना तुम्ही कोणते कपडे घालता त्याविषयी नसतो.
अनुवाद – प्रतिक पुरी






