कुणाल नक्षणे / बृजेन्द्र दुबे
- वनक्षेत्रातील शेतकरी पिकांचं रक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवती वीजेच्या तारांचे कुंपण उभारायचे. अशा थेट विद्युत प्रवाहामुळे कधीकधी केवळ प्राणीच नाही तर शेतकरीही मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
- महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र राखीव परिसरात मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्यासाठी सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
- सोलार एलईडी डिटेरंट हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.
“माझं पूर्णपणे शेजारच्या जंगलालगत असलेल्या शेतावर अवलंबून आहे. माझ्या शेतात पाण्याची चांगली उपलब्धता आहे, त्यामुळे साधारण परिस्थितीत मी तीन एकरवर सहज दोन–तीन पिके घेऊ शकलो असतो. पण आता ते शक्य नाही, कारण वारंवार वन्यप्राणी शेतात घुसतात, पिकं तुडवतात आणि नासधूस करतात.”
सिलारी गावातील ५४ वर्षांचे श्यामलाल चामा हिरपाजी, आपलं आयुष्य आणि उपजीविका जंगलाशी किती घट्ट जोडलेली आहे ते सांगतात. ते म्हणतात “पूर्वी त्यांना जंगलातून येणाऱ्या रानडुकरं, हरणं आणि इतर प्राण्यांची फार भीती वाटायची. हे प्राणी वारंवार शेतात घुसून उभं पीक तुडवतात. त्यामुळे आता त्यांनी कुटुंबाचा गुजराण होईल इतकंच पीक घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे. “आता मी फक्त २ एकरवरच पिकं घेतो,” असं शेतकरी श्यामलाल सांगतात.
श्यामलाल चामा हिरपाजी, सिलारी गावातील शेतकरी, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन सीमेच्या जवळ असलेल्या त्यांच्या शेतात उभे.
पूर्वी महाराष्ट्राच्या वनक्षेत्रातील शेतकरी पिकांचं रक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवती वीजेच्या तारांचे कुंपण उभारायचे. अशा थेट विद्युत प्रवाहामुळे कधीकधी केवळ प्राणीच नाही तर शेतकरीही मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दिल्लीस्थित वन्यजीव संरक्षण संस्था (WPSI) च्या ऑक्टोबर २०२० च्या अहवालानुसार, २०१० ते २०२० या काळात जाणीवपूर्वक किंवा अपघाती विद्युतप्रवाहामुळे सुमारे १,३०० वन्यप्राणी मृत्युमुखी पडले, यामध्ये ५०० हत्ती, २२० सारस क्रौंच, १५० बिबटे आणि ४६ वाघांचा समावेश आहे. केवळ महाराष्ट्रातच ७४ वन्यप्राण्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला, त्यात १८ बिबटे आणि १६ वाघ होते. ऑगस्ट २०२० मध्ये मध्यप्रदेशातील संजय व्याघ्र राखीव क्षेत्रात “T‑43” या वाघाचा अशाच इलेक्ट्रिक तारांमुळे मृत्यू झाला.
मानवी-वन्यजीव संघर्षामुळे पेंच वाघसंरक्षित क्षेत्राभोवतीच्या सहा गावाच्या पिकांच्या नुकसानीच्या डाव्यांची आकडेवारी. स्रोत: महाराष्ट्र वन विभाग, पेंच वाघसंरक्षित क्षेत्र
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र राखीव परिसरात मानव–वन्यजीव संघर्ष गंभीर टप्प्यावर पोहोचला असून आदिवासी शेतकऱ्यांच्या उपजीविकेस मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाच्या आकडेवारीनुसार, बफर झोनमधील सहा गावांमध्ये २०२२ साली पिकहानीसाठी केलेले दावे प्रति गाव १ ते २० च्या दरम्यान होते, तर २०२५ पर्यंत हे दावे २८ ते १२३ इतके वाढले.
२०२२ मध्ये एखाद्या गावात सर्वाधिक २० दावे होते, तर २०२५ मध्ये सर्वात कमी दावे २८ होते, यावरून पूर्वी सुरक्षित मानली जाणारी गावंही आता बाधित होत असल्याचं दिसून येतं. सरकारने पेंच वाघसंरक्षित क्षेत्राभोवती असलेल्या फक्त या पाच गावांमध्ये मानवी-वन्यजीव संघर्षातील पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईवर २०२३ मध्ये ₹५८.६० लाख, २०२४ मध्ये ₹१५.८६ लाख खर्च केले, एकूण ₹७२.३० लाख (२०२२ -२०२५ पर्यंत). ही आकडेवारी वन विभागानुसार आहे. प्रति दावा सरासरी नुकसानभरपाई सुमारे १२,८०० रुपयांपर्यंत येते, मात्र शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम त्यांच्या प्रत्यक्ष तोट्यापेक्षा अपुरी आहे.
गेल्या चार वर्षांपासून पेंच व्याघ्र राखीवच्या कोअर–बफर सीमेवर वसलेल्या सहा गावांमध्ये दररोज सकाळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. वन्यजीवांची समृद्ध विविधता पाहण्यासाठी पर्यटनासाठी येणाऱ्यांसाठी हा परिसर स्वर्गासारखा असला, तरी स्थानिक गावकऱ्यांसाठी मात्र त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी तो कायम धोक्याची घंटा ठरतो.
राज्यस्तरीय आव्हान
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या मानव–वन्यजीव संघर्षावरील अहवालानुसार, २०२० ते २०२४ दरम्यान देशभरातून १०,५९,९२८ दावे दाखल झाले. त्यापैकी फक्त ४८ टक्के (५,०९,४४४) दावे मंजूर झाले आणि सुमारे २१०.४२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरीत झाली. या भरपाईमुळे सरकारी अर्थसंकल्पावर मोठा ताण येतो, तरीही प्रत्यक्ष तोट्याच्या निम्म्याहून कमी नुकसान भरून निघतं. उदाहरणार्थ, भंडारा जिल्ह्यातच एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ६,४१७ प्रकरणांसाठी (बहुतेक पीकहानी आणि काही जनावरांच्या हानीसाठी) तब्बल ७.३३ कोटी रुपये खर्च झाले, त्यातील ५.३५ कोटी रुपये केवळ पिकांच्या नुकसानीसाठी होते. हे आकडे पेंच परिसरातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी थेट जोडलेले आहेत, जिथे नुकसानभरपाई असूनही चालू तोटा थांबत नाही.
वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर दिवे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पेंच राष्ट्रीय उद्यान सातपुडाच्या दक्षिण टोकाला वसलं आहे आणि त्याचे नाव या परिसरातून उत्तर–दक्षिण अशी वाहणाऱ्या पेंच नदीवरून पडले आहे. उद्यानाचा मुख्य भाग मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात असून, काही भाग नागपूर (महाराष्ट्र) येथे आहे. पेंच व्याघ्र राखीवाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे २,९१,३३७.२ एकर इतके असून, यात कोअर आणि बफर दोन्ही क्षेत्रांचा समावेश आहे. मध्यप्रदेशातील मुख्य भागात इंदिरा प्रियदर्शिनी पेंच राष्ट्रीय उद्यान आणि मोगली पेंच अभयारण्य मिळून सुमारे ७३,८८४.५ एकर क्षेत्र आहे, उर्वरित भाग बफर झोनमध्ये येतो.
या संपूर्ण लँडस्केपमध्ये पिकांची हानी हे सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक आहे. २०२२ पासून काही शेतकरी सोलार एलईडी डिटेरंटचा वापर करत आहेत. पूर्वी ते शेतात उंच व्यासपीठ (मचाण) बांधून, रात्रीभर तेथे बसून पहारा देत असत. पण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची वारंवारता वाढत गेल्याने बहुतेकांनी रात्रीच्या पहाऱ्याचा त्याग केला आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा पर्याय स्वीकारला.
शिवदास कुदवते, सिलारी गावातील शेतकरी, त्यांच्या शेतात बसवलेल्या सोलार एलईडी दिव्याजवळ उभे. मागे पेंच व्याघ्र राखीवाचा कोअर जंगल पट्टा दिसतो.
सिलारी गावचे ५७ वर्षीय शेतकरी शिवदास कुदवते म्हणतात,
“माझं शेत अगदी जंगलाच्या कुशीत आहे. अनेक वर्षे आम्हाला वन्यप्राण्यांमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. सुमारे तीन वर्षांपूर्वी सातपुडा फाउंडेशनकडून हे दिवे मिळाले. तेव्हापासून वन्यप्राण्यांचा दहशत कमी झाली आहे.”
सिलारी गावातील बहुतांश रहिवाशांचा रोजगार शेतीवरच अवलंबून आहे. शिवदास कुदवते म्हणतात,
“रानडुकरं आणि नीलगाय रात्री सगळ्यात जास्त सक्रिय असतात आणि हेच शेतकऱ्यांसाठी मोठं संकट आहे. या सोलार एलईडी डिटेरंटच्या उजेडामुळे आणि चमकामुळे प्राण्यांना जणू माणसं उपस्थित असल्यासारखं वाटतं. ते शेताजवळ येतात, पण लगेच वळून पळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ण रात्र मचानवर जागून काढण्याची खडतर मजूरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.”
वाघोळी गावचेच ५८ वर्षीय शेतकरी रघुनाथ गंगाराम दुरवे म्हणतात,
“आम्ही तीन भाऊ मिळून १० एकर शेत शेअर करतो आणि आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे वन्यप्राणी. सांबरसारखी हरणं आणि बिबटे दिवस–रात्र शेतात घुसतात. पिकांचं रक्षण करण्यासाठी आम्ही शॉक मशीन बसवल्या, पण प्राणी इतके हुशार की ते तार तोडून आत शिरतात. अजूनपर्यंत आम्हाला सोलार एलईडी डिटेरंट मिळालेले नाहीत. वाघ आणि बिबट्यांच्या भीतीमुळे आम्हाला स्वतःच्या शेतात जाण्याचीही भीती वाटते. आम्ही भात आणि कापूस घेतो, पण जेव्हा प्राणी पिकं नष्ट करतात, तेव्हा आम्ही वन अधिकाऱ्यांना कळवतो. ते येतात, पंचनामा करतात आणि नुकसानभरपाई देतात. आमच्या भाताच्या शेतातून जेव्हा १७ पोतीची अपेक्षा होती, तेव्हा प्रत्यक्षात फक्त ५ पोतीच मिळाली.”
एनजीओच्या मदतीने दिलेले दिवे
लायन्स क्लबच्या आर्थिक सहकार्यातून सौरऊर्जेवर चालणारे सोलार एलईडी डिटेरंट शेतकऱ्यांना दिले जात आहेत. सातपुडा फाउंडेशनचे उपसंचालक मंदार पिंगळे जंगलाच्या सीमेकडे बोट दाखवत सांगतात की, या सोलार एलईडी डिटेरंटमुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींना अडथळा निर्माण होतो. पिकांची हानी आणि मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्या संस्थेने पेंच व्याघ्र राखीव (महाराष्ट्र) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–मोहरली व्याघ्र राखीव परिसरात ४५० शेतकऱ्यांना ५०० सौर दिवे वितरित केले आहेत.
“आम्ही प्रथम सितारामपेठ आणि जीणोना या गावांत काम सुरू केले. तेथे जंगल–गाव सीमेवर, जिथे सांबर, चितळ आणि अस्वलांचे हालचाली जास्त होत्या, तेथे ५० दिवे बसवले. दिवे बसवल्यानंतर गावकऱ्यांनी वन्यप्राणी गावात येण्याचे प्रकार कमी झाल्याचे सांगितले. पेंच व्याघ्र राखीवातील सिलारी गावात आम्ही २० शेतकऱ्यांना ३० सोलार एलईडी डिटेरंट दिले आणि त्यानंतर पिकहानीच्या तक्रारी कमी झाल्या,” ते सांगतात.
सातपुडा फाउंडेशनचे उपसंचालक मंदार पिंगळे.
हे उपकरण चौकोनी कोंड्यासारख्या आकाराचे असून त्यात चार एलईडी दिवे बसवलेले आहेत. छोट्या सौर पॅनलमधून निर्माण होणारी ऊर्जा लिथियम–आयन बॅटरीमध्ये साठवली जाते. “पराब्रक्ष” नावाचे हे उपकरण कटीधन या मानवी–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीने तयार केले आहे. “पराब्रक्ष” हे नाव कन्नडमधील “वन्यप्राण्यांपासून संरक्षण” या अर्थाच्या शब्दावरून घेतले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन–वन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या दिव्यांवर ७५ टक्के अनुदानात उपलब्ध होत आहेत.
हे उपकरण झाडाच्या किंवा खांबाच्या आधाराला बांधले जाते. स्विच चालू केल्यानंतर ते सुमारे २५० मीटर अंतरापर्यंत प्रकाश टाकते, ज्यामुळे वन्यप्राण्यांना त्या परिसरात मानवी वस्ती असल्याची भावना निर्माण होते. एक दिवा साधारण एका हेक्टर क्षेत्रात प्रभावी काम करतो. कंपनीच्या मते, या दिव्यामुळे कोल्हा, लांडगा, नीलगाय, रानडुकरं आणि अगदी हत्तींपासूनही संरक्षण मिळू शकते.
चिनी सोलार एलईडी दिव्यांचा वापर
पिपरिया गावचे ६० वर्षीय शेतकरी दिलीप वाडके हातात एक चिनी दिवा धरून म्हणतात,
“हा दिवा माझ्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे. पूर्वी मला शेताचं रक्षण करण्यासाठी रात्रभर मचानवर जागं राहावं लागायचं. गेली तीन वर्षं मी हे दिवे वापरत आहे आणि आता मचानवर रात्रभर बसावं लागत नाही. पूर्वी माझ्याकडे सातपुडा फाउंडेशनकडून दिलेला एक सोलार एलईडी दिवा होता, पण तो बंद पडला. नवीन सोलार दिवा घेणं फार महाग, सुमारे १०,००० रुपये खर्च येतो. त्याऐवजी मी हा चिनी दिवा घेतला. तो फार स्वस्त, फक्त ५०० रुपयांत मिळतो. फरक एवढाच की हा चिनी दिवा मला रोज चार्ज करावा लागतो, तर सोलार दिव्यासाठी वेगळं चार्जिंग करावं लागत नाही.”
दिलीप वाडके, पिपरिया गावातील शेतकरी, त्यांच्या शेतीसाठी वापरत असलेला चिनी दिवा दाखवत आहेत.
पौनी प्रादेशिक वन परिक्षेत्र, नागपूरचे वनक्षेत्र अधिकारी सागर बंसोडे म्हणतात,
“मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आपण केवळ एका उपायावर अवलंबून राहू शकत नाही. सोलार एलईडी डिटेरंट उपयुक्त आहेत, पण ते पूर्ण तोडगा नाहीत. गावांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना या उपकरणांचे कार्यप्रणाली आणि मर्यादा समजतील. सोलार एलईडी डिटेरंट रात्रीच्या वेळी शेतांपासून प्राण्यांना दूर ठेवतात, पण त्यातून कुणालाही इजा होत नाही.”
पेंच व्याघ्र राखीव परिसरातील वाघोळी गावचे ५० वर्षीय शेतकरी काशीराम टेकव सांगतात,
“आमच्या गावातच वन्यप्राण्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. आमच्याकडे ३ एकर जमीन आहे, पण या प्राण्यांमुळे पिकं सतत नष्ट होत आहेत. मौडी, डोंगरटाल, झिझर, कर्वे आणि तुआपर या गावांत अनेक लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये आपला जीव गमावले आहेत. आम्ही वन विभागाला प्राण्यांच्या वाढत्या वावराबद्दल सांगितलं की ते शेताभोवती कुंपण घालायला सांगतात. त्यांचं म्हणणं असतं, आपण कुंपण बांधल्यास आपली जनावरे जंगलात जाणार नाहीत आणि त्यांचे वन्यप्राणी शेतात येणार नाहीत. पण वन विभाग मात्र हल्ले थांबवण्यात अपयशी ठरतो. एखाद्या व्यक्तीचा वन्यप्राणी हल्ल्यात मृत्यू झाला तर कुटुंबाला २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि एका सदस्याला १४,००० रुपये पगाराची नोकरी दिली जाते. पण जर आम्ही कसाबसा जीव वाचवला, तर आम्हाला केवळ १० क्विंटल भात मिळतो. ना सरकार, ना इतर कोणी आम्हाला दिवे किंवा उपकरणं देतं. दिव्यांचा या प्राण्यांवर काहीही परिणाम होताना मला आढळल नाही.”
वन्यजीव संशोधक निशिकांत काळे यांच्या मते, “शेतकऱ्यांना दिलेल्या सोलार एलईडी डिटेरंटची मुख्य कमतरता त्याच्या डिझाइनमध्ये नसून निकृष्ट दर्जाच्या बॅटरीमध्ये आहे. या बॅटऱ्या इतक्या लवकर निकामी होतात की अनेक युनिट सहा महिन्यांतच बंद पडतात, त्यामुळे शेतकरी पुन्हा रात्रीचा पहारा ठेवण्याच्या जुन्या पद्धतीकडे वळतात किंवा सतत दुरुस्ती–बदलाचा आर्थिक बोजा उचलतात.”

ते पुढे म्हणतात, “जर आपण या सोलार दिव्यांसाठी चांगल्या दर्जाच्या बॅटऱ्यांमध्ये गुंतवणूक केली, तर हे दिवे दीर्घकाळ टिकणारे, विश्वासार्ह साधन ठरू शकतात, ज्यामुळे पिकं नष्ट करणारे प्राणी दूर राहतील. सुरुवातीला थोडा अधिक खर्च करून मजबूत बॅटऱ्या दिल्या तर या दिव्यांचं आयुष्य वाढेल, शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळेल आणि खऱ्या अर्थाने सौर तंत्रज्ञान रात्रीच्या वेळी शेतांचं रक्षण करू शकेल.”
(This story is part of the Climate Narrative Hub’s work, developed in collaboration with The Migration Story.)






