ऐश्वर्या रेवडकर यांची ‘विहिरीची मुलगी’ ही कादंबरी वाचायला हातात घेताना कादंबरीचे शीर्षक आणि मुखपृष्ठ फार आवडले होते. कादंबरीतील अनुभवविश्व आणि कथनाच्या अवकाशात येणारी मिथके, त्या दोन्ही गोष्टी सार्थ ठरवतात.
मीरा ही या कादंबरीची नायिका. ती एक कॉलेजात शिकणारी तरूण मुलगी आहे. ती एक ब्लॉग लिहिते, ‘विहिरीची मुलगी’. या शीर्षकातून अनेक पदरी, अनेक अर्थाचे स्तर असलेले एक मिथक वाचकांसमोर येते, जे कादंबरी नायिकेच्या व्यक्तिगत अनुभवापासून पारंपरिक स्त्रीजीवनाच्या लोकतत्त्वांपर्यंत विस्तारत जाणारे आहे. या ब्लॉगमधील मीराच्या लेखनात स्वप्न, वास्तव आणि फँटसी यांची सरमिसळ आहे, पण तिचे हे लेखन तिच्या अनुभवाशी प्रामाणिक वाटते. तिची मानसिक गरज वाटते. ही संपूर्ण कादंबरी मीराच्या अस्तित्व शोधाची कहाणी आहे. या शोधात तिच्या वाट्याला जीवनमरणाचा संघर्ष येतो. मीराचा संघर्ष तीन पातळ्यांवर आहे. पहिला तिच्या दैहिक पातळीवरील ‘स्व’च्या शोधाचा. दुसरा तिच्या आयुष्यात आलेल्या स्त्रीपुरुषांच्या नातेसंबंधातील स्वतःच्या अस्तित्व शोधाचा आणि तिसरा वर्तमान सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील स्त्री-पुरुषसंबंधातील लैंगिक, धार्मिक व नैतिक धारणांच्या शोधाचा.
‘विहिरीची मुलगी’ मधील मीराचा हा अस्तित्वशोध तिच्या विशिष्ट कौटुंबिक स्थितीतून तिच्या एकटीच्या वाट्याला आला असला तरी तो प्रातिनिधिकही वाटतो. कादंबरीचे निवेदन तृतीयपुरुषी असले तरी मीराच ते कथन करीत असल्याचे लक्षात येते. ब्लॉग, पत्र, आत्मचिंतन आणि स्वप्न अशा अनेक कथनरूपातून मीरा अभिव्यक्त होत जाते. तिच्या ‘स्व’चा तिच्या मनाशी आणि शरीराशी सततच संघर्ष सुरू आहे. मीराची आई सुमन लहानपणी सोडून गेलेली आहे. सुमनचीच मैत्रीण निशा ही मिरची सावत्र आई आहे. निशाचा द्वेष करणारी मीराची आजी, तिची मैत्रीण सायली आणि दर्शना. या सर्व स्त्रियांची कहाणी वेगवेगळी आहे. एखाद्या कॅलिडोस्कोपमधील प्रतिमांसारखी त्यांच्या दुःखाची वेगवेगळी रूपे आहेत. पण त्यामागे पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेचा काचेरी त्रिकोण एकच आहे. धर्म, संस्कृती आणि बाईपणाचा कृत्रिम कोष अशा त्रिकोणी व्यवस्थेने नैसर्गिक स्त्रीत्व कसे चिरडून टाकले आहे, ह्याची कहाणी म्हणजे ‘विहिरीची मुलगी’ ही कादंबरी.

मीरा ही मनस्वी आहे. स्वत:च्या शारीरिक रूपाविषयी आणि मानसिक स्वास्थाविषयी ती अनेक न्यूनगंड बाळगून आहे. यामागे तिचे कुटुंबातील एकटेपण आणि तिला वाटणारी असुरक्षितता आहे. ‘प्रेम’ या कल्पनेच्या आकर्षणातून तिचे यशशी संबंध येतात. त्या प्रेमसंबंधातून तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचे सामर्थ्य जोखायचे असते. आपल्या शरीरावर आपलाच हक्क असतो तर, मैथुनातून मिळणारा आनंद घेताना स्वतःचा देह पुरुषाच्या हवाली का करावा? संभोगात संपूर्णपणे समर्पण स्त्रीनेच का करायचे? मग शरीरसंबंधात स्त्रीच्या आनंदाचे काय? असे प्रश्न तिला पडतात. परंपरेने स्त्रीला असे प्रश्न पडूच नये अशी व्यवस्था केली असेल तर समानतेचे काय? अशा जाणिवेने ती खिन्न होते. ती आपल्या देहाचाही अनेक अंगाने शोध घेते, पण त्यातही तिला संघर्ष करावा लागतो. कादंबरीतील नायिकेच्या या संघर्षाला वैचारिक, तात्विक आणि मानसशास्त्रीय अनेक पदर आहेत. कादंबरीच्या प्रवाही निवेदनात येणारे हे वैचारिक मंथन कादंबरीला बहुपेडी करते. स्त्रीच्या लैंगिक दमणाविषयी अनेक पातळ्यांवर समाजाचा दृष्टिकोन कसा दुटप्पी आहे, ह्याचे फार प्रभावी चिंतन लेखिकेने अनेक तऱ्हेने केले आहे. त्यासाठी कथन-निवेदनाच्या अनेक तऱ्हा तिने वापरल्या आहेत.
मीराच्या आयुष्यात सुमन, निशा, सायली आणि दर्शना या स्त्रिया आहेत. तिचे वडील अविनाश, सुमनशी लग्न करणारे देव अंकल आणि मीराचे मित्र यश, मल्हार व नितीन हे पुरुष आहेत. यापैकी प्रत्येक स्त्री ‘बाई’ म्हणून घडवलेल्या गेलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या कशा बळी आहेत, ही जाणीव मीराच्या अनुभवाचे केंद्र आहे. या सर्वच स्त्री-पुरुषांचे स्वतंत्र व्यक्ती म्हणून आणि स्त्री-पुरुष संबंधात जोडीदार म्हणून जगणे यातील ताणतणावांतून त्यामागील प्रेरणांचा शोध मीरा घेऊ पाहते. एकीकडे ती स्वतः त्याचा एक भाग आहे, दुसरीकडे ती तटस्थ राहून हा शोध घेऊ पाहते. त्यातून तिला प्रचंड मानसिक संघर्षाला सामोरे जावे लागते. तिच्या या शोधात एकीकडे आधुनिक काळातील स्वातंत्र्य समता ही मूल्ये आहेत तर दुसरीकडे सांस्कृतिक वर्चस्वभावातून यातील पुरुषांचे स्त्रीला केवळ एक उपभोग्य वस्तू समजणे ही वस्तुस्थिती आहे, यातील विसंगती मीरा सातत्याने अधोरेखित करीत जाते. या विसंगतीशी झगडताना ती शारीर व मानसिक पातळीवर थकून जाते. अक्षरशः वेडी होते.
संपूर्ण कादंबरीत मीराभोवती आई-सावत्र आई, बाप-सावत्र-बाप आणि प्रियकर-मित्र यांच्या नातेसंबंधाचे जाळे विणले गेले आहे. जाळ्यातून सुटण्याचा संघर्ष मीरा करते. या नातेसंबंधाच्या गुंतागुंतीतून ती आपल्या ‘स्व’चा शोध घेऊ पाहते. यातील प्रत्येक व्यक्ती पुरुषप्रधान संस्कृतीने निर्माण केलेल्या व्यवस्थेचे बळी आहेत, याची जाणीव मीराला आहे. दर्शना ही डॉक्टर आहे. ती स्वतः आपल्या शारीर वासना-इच्छांचा ती मनसोक्त उपभोग घेऊ पाहते. पण लग्नाच्या आधी राहिलेला गर्भ पडून घेते. ती मीराला सांगते, “माझे जुने प्रेम प्रकरण स्वीकारेल इतपत माझा नवरा मोठ्या मनाचा आहे. पण त्याला गर्भपाताची गोष्ट कदाचित झेपायची नाही.
लग्न म्हणजे काय असतं गं दुसरं. बाईच्या गर्भाशयावर कायदेशीर हक्क, त्यामुळे ती जुनी लाजिरवाणी गोष्ट सांगून नवऱ्याच्या पुरुषी इगोची परीक्षा घ्यायची हिंमत माझ्यात नाही. बघ ना स्त्री आणि पुरुष दोघेही वयाच्या एका टप्प्यावर शारीरिक आकर्षणाच्या मोहात पडतात. प्रेम करतात. मोठी स्वप्ने बघतात. पण जगताना स्त्री सोबत नेहमी तिचे शरीर असते. पुरुष कधीही गुंत्यात अडकलेला पाय आणि त्याचे शिश्न उचलून पाठ फिरवून जाऊ शकतो. पण स्त्री मात्र अडकून पडते केवळ तिच्या शरीरामुळे. प्रेमाच्या कितीही आभाळाला पोहोचणाऱ्या उत्तुंग गप्पा केल्या ना, तरी हे सत्य उरते की त्या प्रेमाचे बीज स्त्रीच्या गर्भाशयात रुजते. आणि त्यामुळे तिलाच समाजाला तोंड द्यावे लागते. पुरुष नेहमीच सुटून जातो या साऱ्यातून त्याच्या लिंगासकट आणि त्या लिंगामुळेच. समाज नेहमी स्त्रीकडे बोट दाखवतो. माझ्याकडे जेव्हा विधवा किंवा घटस्फोटीत बायका येतात ना गर्भपातासाठी, तेव्हा त्या शरमेने मेलेल्या असतात.”
आपल्या भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न मीरा करते. पण ते सोपे नसते. या नातेसंबंधांच्या शोधातूनच ती या प्रश्नाच्या मुळाशी पोचण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी तिला दीर्घकाळ मानसिक संघर्षाचा प्रवास करावा लागतो. कादंबरीच्या उत्तरार्धात तिच्या या प्रवासाची नोंद आहे. आई सुमनने बोलावले म्हणून ती रत्नागिरीला जाते. तिथे तिचा अपेक्षाभंग होतो. देव अंकल तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्या धक्क्याने ती मानसिक रुग्ण बनते. ती आपल्या गावी परतते. तिच्यावर मानसिक उपचार केले जातात. गार्गी तिचे सेशन्स घेते. त्यातून स्त्रीपुरुष संबंधांच्या अनेक रूपांची चर्चा कादंबरीत येते. घर, कुटुंब आणि समाजातील स्त्रीच्या अस्तित्वाचे अनेक पापुद्रे उलगडले जातात. स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व नाकारणाऱ्या अत्यंत प्राचीन आणि व्यापक संस्कृतीच्या मुळाशीच जाण्याचा प्रयत्न मीरा करते. त्यासाठी कथन आणि निवेदनाच्या अनेक तऱ्हांचा वापर लेखिकेने फार कौशल्याने केला आहे.
कादंबरीच्या अखेरीस मीरा ‘रजस्वला’ या एका संघटनेत ती काम करू लागते. लिंगभावात्मक विवेकी विचार जागृती करणारी ही संघटना आहे. ती अनेक उपक्रम करते. कादंबरीच्या अखेरीस ‘रजस्वला’मध्ये ‘वृंदा-जालंदर’ यांची कथा सांगणारे एक नाटुकले सादर केले जाते. त्यानंतर तिथे त्यावर चर्चा होते.

“समाजाच्या व्याख्येने ठरवलेले वृंदाचे पावित्र्य परपुरुषाच्या स्पर्शाने नष्ट होताच तिचा दानव पती जालंधर देवांकडून लढाईत मारला जातो. देव वृंदेची विनवणी करतात. तिच्यासमोर गुडघे टेकतात. पतीच्या मृत्यूला स्वतःच कारणीभूत ठरलेली शोकमग्न वृंदा त्या देवांना मोठ्या मनाने माफ करते. दगडाचा पुन्हा देव होतो. ती बिचारी मात्र सती जाते. हा तर सरळ सरळ बलात्कार आहे. बहुरूपी कथाकथित देवाने केलेला चक्क. त्या स्त्रीच्या नवऱ्याचे रूप घेऊन तिच्यासोबत संभोग केला. यात तिची अनुमती भंग झाली. असेल तिचा नवरा दानव, पण त्याच्यावर तिचे प्रेम होते. वरती तिचे लग्न पुन्हा त्या बलात्कारासोबत लावले गेले. हा सरळ सरळ नीचपणा आहे. म्हणे, अधर्म संपवायला देवांना असा निर्णय घ्यावा लागला. धर्म कोणता? अधर्म कोणता? देव कोण दानव कोण? हे कोण ठरवते? इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो, त्यामुळे जिंकले ते देव आणि हरले ते दानव असेही असू शकते.
प्रत्येक धर्म स्त्रीची जागा पुरुषाच्या पायाशीच ठेवतो. शिळा असलेल्या अहल्येचा रामाचा पदस्पर्श होऊन उद्धार होतो. सगळीकडे सूत्र एकच की भ्रष्ट झालेल्या स्त्रीचा पुरुष उद्धार करतो. वास्तव उलटे आहे. वृंदेचे प्रेम जालंदरवर आहे. तिच्या मर्जी विरुद्ध विष्णुशी लावल्या गेलेल्या लग्नाने तिला किती वेदना होत असतील? उलट वृंदाच्या केसमध्ये तर फक्त विष्णूचेच शील भ्रष्ट व्हायला हवे. कारण वृंदाला तो तिचा नवरा वाटला होता. त्यातून मनातून तर ती त्या नवऱ्यासोबतच संभोग करत होती. विष्णू मात्र जाणून-बुजून तिला फसवत होता .त्याला सत्य माहिती होते त्याने ठरवून जेव्हा परिस्थिती सोबत सेक्स केला, तेव्हा त्याचे पावित्र्य भंग होऊन, त्याला व त्याच्या पत्नीला अशा असत्य अधर्मी आचरणाचा त्रास व्हायला हवा होता. या एकाच कहानीने स्त्रीची योनिशूचिता ही एकच गोष्ट तिच्या समग्र अस्तित्वाचे केंद्र मानून तिला नाकारले जाते आणि त्यासाठी धर्माच्या मुखवट्यामागे हा हीडीसपणा लपवला जातो.” इत्यादी.
मीराच्या अशा अत्यंत मनस्वी निवेदनात-कथनात स्त्रीचे लिंग, योनी, विहीर, ओली बाळंतीणीची आत्महत्या आणि हडळ अशा अनेक रूपातून कल्पनांचे जे जाळे कादंबरीत उभे राहते, त्यातून ‘विहिरीची मुलगी’ हे तिच्या ब्लॉगचे आणि कादंबरीचे नाव अधिक गडद होत जाते.
कादंबरी – विहिरीची मुलगी
लेखिका – ऐश्वर्या रेवडकर
प्रकाशन – न्यू एरा पब्लिशिंग हाऊस, पुणे






