विशाखा शिर्के
- घराण्याचा वारसा राजकारणाचा. त्याने निवड केली, पर्यावरणाची. मन रमवलं, शोध-संशोधनामध्ये. आता तो वलयांकित घराण्याची झूल न पांघरता थेट ग्रामीण लोकांमध्ये वावरतो. रानावनांतून, खाचखळग्यांमधून तो त्यांच्यासोबत फिरतो. त्यांच्याच घरांमध्ये राहतो. त्यांनीच बनवलेलं स्थानिक अन्नही खातो.
- तो आहे तेजस उद्धव ठाकरे ! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र. मितभाषी, मृदुभाषी असणारे तेजस शब्दांपेक्षा कामाला जास्त महत्त्व देतात. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहतात.
- जैववैविध्य असलेल्या भारताच्या कुशीत दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींवर संशोधनात मग्न राहतात. अलीकडेच त्यांनी हिमालयात सापडणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढली आणि त्याला ‘मिट्रिफोरा रश्मी’ असे आईचे नाव दिले.
- अशा या आगळ्यावेगळ्या धाकल्या ठाकरेंच्या अपरिचित जगाचा हा चित्तवेधक आलेख...
सुखासीन जीवनशैली, अवतीभवती शब्द झेलायला सदातत्पर माणसं, सत्ताधीशांशी जवळीक, पाहिजे तसं अबाधित स्वातंत्र्य आणि लाखो लोकांच्या ह्रदयात मिळालेलं निरपेक्ष प्रेमाचं स्थान...एवढं सर्व असताना अगदी थोडक्यात सांगायचं तर चांदीच काय तर सोनं-चांदी-प्लॅटिनम-हिऱ्यांनी मढलेली राजेशाही आयुष्याची किल्ली हाती असताना कोणी कडेकपारीत, घनदाट जंगलात, अडीअडचणी झेलून राज्यातली वनसंपदा कशी वाचवायची याचा विचार करत असेल तर अशा माणसाला काय म्हणावं असा प्रश्न कोणालाही पडेल... पण वन्यजीव संशोधन, संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात दमदार कामगिरी करूनही आपलं अस्तित्व जाणवू न देणाऱ्या या माणसाला सध्या तमाम महाराष्ट्र तेजस उद्धव ठाकरे नावाने ओळखतोय.
सगळ्या सुखसुविधा मागे ठेवून हा अवलिया भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या जैवविविधतेला वाचवण्याच्या निर्धाराने प्रत्यक्ष रानावनात हिंडतोय. संशोधन, संरक्षण आणि संवर्धन यातला नेमका फरक काय, त्यांची गरज आणि हे सर्व कसं घडवून आणायचं याची उत्तम जाण त्यांच्याकडे आहे आणि मुख्य म्हणजे ही जाण, हे ज्ञान त्यांनी केवळ स्वत:पुरतंच ठेवलेलं नाहीये, तर त्याचा समाजाच्या फायद्यासाठी, जंगलांच्या बचावासाठी वापर कसा करून घेता येईल याचाही त्यांनी खोलवर विचार केलेला आहे.
आपल्या याच आगळ्यावेगळ्या कामामुळेउद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते ‘मिट्रिफोरा रश्मी’ या नावामुळे… दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पतींचे संशोधन व संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन’च्या माध्यमातून तेजस ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाचे संशोधन केलं. हिमालयात सापडणाऱ्या ‘मिट्रिफोरा’ या वनस्पतीची नवी प्रजात शोधून काढण्यात फाऊंडेशनला यश आलंय. अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील दापोरिजो परिसरात मिट्रिफोराची नवी प्रजात सापडली आहे.
‘मिट्रिफोरा रश्मी’... हिमालयातील नव्या वनस्पतीला तेजसने दिलं आईचं नाव.
विशेष म्हणजे मिट्रिफोराच्या नव्या वनस्पतीवरील फुलाला तेजस यांनी आपल्या आईचे म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रिफोरा रश्मी’ असे नाव दिले आहे. ‘फेडेज रिपर्टोरियम’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात याबाबत विशेष उल्लेख करण्यात आला आहे. वनसंपदा आणि वन्यजीव संशोधनात रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या पाठीशी उभ्या राहिल्या, असे या लेखात नमूद केलंय.
तेजस ठाकरे यांना वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष रुची आहे. त्यांनी याआधी देखील अनेक दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यांना ही दुर्मिळ प्रजाती अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील घटदाट जंगलात सापडली आहे. या जंगलात एका लहान झाडाची नवीन प्रजाती आढळली. ही प्रजाती सीताफळ कुळातील ‘मिट्रेफोरा’ या वर्गातील आहे. या नव्या प्रजातीचे नामकरण रश्मी ठाकरे यांच्या नावावरून ‘मिट्रेफोरा रश्मिया’ असे करण्यात आलं आहे.

तत्पूर्वी, रश्मी ठाकरेंनी तेजस यांच्या बालपणापासून निसर्गाविषयीची उत्सुकता जोपासली आहे. तसेच त्यांची पर्यावरण विषयातील आवड वाढवण्यास मदत केली. ठाकरे वाईल्डलाइफ फाऊंडेशनच्या स्थापनेत आणि वाढीसाठी पाठिंबा देणाऱ्या रश्मी ठाकरे यांना ही प्रजाती समर्पित करण्यात आली आहे. या दुर्मिळ प्रजातीचे एकच झाड अस्तित्वात असल्याचे समोर आलं आहे. पूर्व हिमालयीन जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्रातील मिट्रेफोरा वर्गातील ही केवळ दुसरी प्रजाती असल्याचे समजतंय. या झाडावर नर आणि उभयलिंगी प्रकारचे फुले येणाऱ्या वर्गातील ही एकमेव प्रजाती आहे. प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारा, जैववैविध्य असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींवर संशोधनात मग्न राहणारा. अशा या आगळ्यावेगळ्या धाकल्या ठाकरेंच्या अपरिचित जगाचा हा चित्तवेधक आलेख...
सगळ्या सुखसुविधा मागे ठेवून तेजस ठाकरे जंगलखोऱ्यात का फिरतात?
काही वर्षांपर्वी सिंधुदुर्गातील आंबोली मधील हिरण्यकेशी मंदिर परिसरात आढळणाऱ्या शिस्टुरा हिरण्यकेशी उर्फ देवाच्या माशाबद्दलचं तेजस यांचं संशोधन खुप मोलाचं ठरलं होतं. हे सोनेरी केसांचे सुंदर मासे पाळीव माशांच्या उद्योगासाठी तस्करांकडून पळवले जाण्याची दाट शक्यता असते. शिवाय प्रदेशनिष्ठ म्हणजे, केवळ इथल्या देवनदीच्या उगमात आणि मंदिराच्या कुंडातच सापडणाऱ्या या माशांचं संरक्षण करणं जरूरी आहे हे ग्रामस्थांना पटवून देणंही गरजेचं होतं. हे लक्षात आल्यानंतर तेजस यांनी या माशाचं स्थानिकांना समजेल असं सोपं नाव ठेवलं, ते म्हणजे ‘देवाचा मासा’.
आपल्याकडे सर्वसाधारणत: गोष्ट देवाशी संबंधित आहे म्हटल्यावर लोक सहसा त्यात ढवळाढवळ करत नाहीत. विशेषत: परंपरा अत्यंत धार्मिकतेने जपणा-या कोकणात देवाशी संबंधित प्रथा-गोष्टी फार काळजीपूर्वक जपल्या जातात. म्हणूनच इथल्या काही गावांमधल्या घनदाट देवरायांच्या रूपात उत्कृष्ट जैवविविधता जपली गेली आहे. त्याचप्रमाणे हा हिरण्यकेशी मासाही जपला जावा, अशी तेजस आणि त्यांच्या टीमची इच्छा होती. मात्र नुसतं सांगून उपयोग झाला नसता, अशा वेळी चातुर्याने या माशाला ‘देवाचा मासा’ असं नाव तेजस यांनी दिलं. अशा त-हेने हिरण्यकेशी लोच या माशाचं संरक्षण आणि संवर्धनाचा मार्ग आपोआप सोपा झाला.
कोणत्याही पशु-पक्ष्यांच्या प्रजातींचं संरक्षण आणि संवर्धनाचं काम हे त्यांच्या संशोधनापेक्षाही अवघड असतं. त्यात स्थानिकांचा सहभाग असेल तर हे अवघड काम तुलनेने बरंच सोपं होतं. केवळ प्रजातींचं संशोधन करून तेजस थांबत नाहीत, तर त्यानंतरच्या संरक्षण व संवर्धनाच्या आव्हानात्मक टप्प्यातही ते उतरतात. वन्यजीवांचं किंवा एखाद्या प्रदेशाचं संवर्धन करताना तिथल्या परिसरातल्या स्थानिकांचाही विकास होणं गरजेचं आहे, असं त्याचं मत आहे. संशोधन, संरक्षण आणि संवर्धन या तीनही गोष्टी त्यांच्यासाठी परस्परपूरक आहेत. म्हणूनच शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या चौथ्या प्रजातीचा शोध लावून फक्त ते थांबलेले नाहीत, तर या महादेव मंदिराच्या परिसरातलं पर्यटन सुयोग्य रितीने वाढून त्यातून स्थानिकांचाही फायदा व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

'ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन'चे (टीडब्लूएफ) प्रमुख आणि वन्यजीव संशोधक या नात्याने तेजस ठाकरे यांनी वन विभागाच्या सचिवांना पत्र लिहून 'शिस्टुरा हिरण्यकेशी' माशाचा अधिवास असणाऱ्या मंदिराचा परिसर 'हिरण्यकेशी लोच जैवविविधता वारसा स्थळ' म्हणून घोषित करण्याची मागणी केली. देशात प्रथमच 'टेम्पल कम्युनिटी कन्झर्वेशन' ही संकल्पना राबवून आपण स्थानिकांच्या मदतीनेच या प्रदेशनिष्ठ माशाचे संवर्धन करू शकतो, असा एक नवाच विचार त्यांनी मांडला. परिणामी राज्य सरकारने हा मंदिर परिसर हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ म्हणून घोषित केला. या पूर्ण २.११ हेक्टर परिसराला जैविक वारसा स्थळाचा दर्जा दिला. Temple Community Conservation चा यशस्वी झालेला हा देशातला पहिलाच प्रयत्न.
‘टॅक्सॉनॉमी’ हा तेजस ठाकरे यांचा आवडता विषय
संशोधनाइतकंच प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनाला महत्त्व देणारे तेजस ठाकरे या तिन्ही टप्प्यांची सांगडही उत्तम रितीने घालतात. अर्थातच त्यामागे आहे त्यांचा अभ्यास, मेहनत, वाचन व्यासंग, निरीक्षणशक्ती व संशोधकवृत्ती. तेजस यांचं शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झालंय तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी जयहिंद कॉलेजातून घेतलंय. मानसशास्त्रातील मास्टर्स त्यांनी लंडनमधून केलंय. शिक्षण मानसशास्त्रातलं असलं तरी त्यांनी वैयक्तिकरित्या प्रचंड वाचन आणि वेळोवेळी तज्ञांशी चर्चा करून, जंगलं-दऱ्याखोरी पालथी घालून, निरीक्षण व अभ्यासाच्या जोरावर टॅक्सॉनॉमी (वर्गीकरण शास्त्र)मधलं उत्तम ज्ञान कमावलंय.
अवघ्या 30 वर्षांच्या या युवकाचा या क्षेत्रातला अभ्यास आणि अचूकता पाहून यातील तज्ञही थक्क होतात. मितभाषी तेजसना भेटल्यावर प्रथमदर्शनीच जाणवतो तो त्यांचा विनम्र स्वभाव आणि त्यांची वाचनाची आवड तसंच तीक्ष्ण निरीक्षणशक्ती. अभ्यासाच्या प्रत्येक क्षेत्रातलं त्यांचं वाचन अफाट असल्याने त्यांच्याशी चर्चा करताना वयाचा अडसर येत नाही, असं मत त्यांच्याशी आजपर्यंत बोललेल्या बहुतेक तज्ञांनी नोंदवलंय.
कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय सहसा ते मत व्यक्त करत नाही, असं त्यांचे सहकारी सांगतात. त्यांचा वागण्या-बोलण्यातला साधेपणा आणि संवर्धनामागील त्यांचे विचार पटल्यामुळेच आज अनेक गावांमधले स्थानिक त्यांना सहकार्य करत आहेत. देशातल्या नामांकित टॅक्सॉनॉमी तज्ञांसमवेत काम करतानाही तेजस फक्त एक संशोधक म्हणून वावरतात.
अनेक प्रजातींना ठाकरे कुटुंबाचे आडनाव देऊन गौरव
वाघ-हत्ती-गेंड्यासारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांसाठी वारेमाप संरक्षण व संवर्धन मोहिमा राबवल्या जातात. ज्यात अनेक संस्था, एनजीओज व प्रत्यक्ष सरकारही जातीने लक्ष घालते. परंतु जैव विविधतेचा तितकाच महत्त्वाचा भाग असणाऱ्या, जैविक साखळीच्या समतोलासाठी पूरक अशा लहान प्रजातींकडे आजवर संवर्धनाच्या बाबतीत दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यापासून थेट नाशिक, साता-यापर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये सामावलेल्या जंगलांमध्ये अशा अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहींचे अधिवास नष्ट होताहेत, तर काही प्रजातीच नष्ट होताहेत.

या लहान प्रजाती व त्यांचे अधिवास वाचवण्याच्या उद्देशाने तेजस ठाकरे यांनी त्यांच्या सहका-यांसोबत संशोधन आणि संवर्धनाचं काम सुरू केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी पाली, सरडे, खेकडे, साप, मासा अशा प्राण्यांच्या तब्बल २० प्रजाती व पोटजातींवर संशोधन केलेलं आहे. त्यातल्या दोन प्रजातींना तर ठाकरे कुटुंबाचं नावही बहाल करण्यात आलं आहे. यात आहे, एक भगव्या रंगाचा गोड्या पाण्यातला खेकडा ‘गुबेरनाटोरियाना ठाकरी’ (Gubermatoriana thakri) जो खेड तालुक्यातील रघुवीर घाट परिसरात सापडला आणि दुसरा आहे, एक कॅट स्नेक(मांज-या जातीचा) वर्गातील सर्प ज्याला ‘ठाकरेज् कॅट स्नेक’ (Boiga Thackerayi बोईगा ठाकराई) असं नाव देण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र संवर्धन क्षेत्रात या प्रजातीचा शोध त्यांनी २०१५ मध्ये लावला. त्यानंतर सातत्याने त्यांचं संशोधन सुरू आहे.
बाळासाहेबांनी त्याच वर्णन लहानपणी ‘आमची तोडफोड सेना’ असं केलं होतं…
इतक्या तरूण वयात इतर समवयस्कांप्रमाणे शहरी नाइटलाइफऐवजी तेजस एका वेगळ्याच दुनियेतल्या संशोधनात रमत आहेत. विविध प्रकारच्या आगळ्या वेगळ्या वन्यजीवांचं विश्व त्यांना सातत्याने खुणावत राहतं. त्यांचं राज्यातल्या पश्चिम घाट पट्ट्यावर अतोनात प्रेम आहे. इथल्या वन्यजीवांना संरक्षण मिळवून देण्यासाठी, जैवविविधतेचा हा वारसा जपण्यासाठी तेजस नेहमीच तत्पर असतात, यामागे सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला आपल्याकडून काहीतरी परत देण्याचा त्यांचा विचार आहे. समाजाच्या भल्यासाठी केवळ राजकारणच केलं पाहिजे, असं नाही तर वन्यजीव संरक्षण-संवर्धनासारख्या कामातूनही समाजाचा उत्कर्ष साधता येऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे.
त्यांचे आजोबा आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांनी समाजासाठी, जनतेसाठी निरपेक्ष सेवेचा वसा उचललेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा गमतीत तेजसचं वर्णन ‘आमची तोडफोड सेना’ असं केलं होतं. मात्र तो लहानपणीचा अजाणतेपणी घरांतल्या वस्तूंची तोडफोड करणारा तेजस आणि आताचे तिशीतला कर्तबगार, अभ्यासू संशोधक तेजस यात आता बरंच अंतर पडलंय. प्रसिद्धीमाध्यमांना दूर कसं ठेवायचं, त्यांना मोजक्याच, स्पष्ट शब्दात मार्मिक व सावध उत्तर कसं द्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व माध्यमांच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहून स्वत:च्या कामात गर्क कसं राहायचं, याची नेमकी जाण तेजस यांना आहे.
सडेतोडपणा आणि विनम्रता यांचे मिश्रण
तेजस वरकरणी लाजाळू वाटले तरी त्यांच्या स्वभावात वडिलांची विनम्रता आणि आजोबांचा सडेतोडपणा यांचं कमालीचं मिश्रण जाणवतं. सक्रिय राजकारणात उतरण्याचा सध्या तरी त्यांची इच्छा नाही. त्यांच्यासाठी आताच्या घडीला त्यांचं वन्यजीव संशोधन आणि वर्गीकरण, त्यातले रिसर्च पेपर्स, राज्यातील पश्चिम घाट परिसराचं संरक्षण व संवर्धन हेच महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. स्वत:च्या संशोधन मोहिमांमधून सह्याद्री रांगांकडे जगाचं लक्ष वेधत इथल्या जैवविविधतेचं संवर्धन करण्याची त्यांची धडपड आता हळूहळू लोकांसमोर येतेय. तेजस यांनी स्वत:च्या संशोधन कार्याद्वारे छोट्या व दुर्लक्षित प्रजातींकडे कोणाचंच विशेष लक्ष नसतं, मात्र इतर मोठ्या प्राण्यांप्रमाणेच लहान प्रजाती देखील जैविक साखळीचा महत्त्वाचा भाग असतात या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याची दखल घ्यायला लोकांना आणि राज्य सरकारला भाग पाडलंय.

स्वभावात वारसागत स्पष्टवक्तेपणा आहे, लोकांमध्ये उतरून काम करण्याची तळमळ आहे, जिथे काम करतील तिथल्या स्थानिकांचा विश्वास मिळवण्याची हातोटी आहे, आपलं उद्दीष्ट नेमकं काय आहे हे जनता व सरकारसमोर मांडण्याचं कसब आहे, नेतृत्वासाठी लागणारं व्यक्तिमत्व आणि देहबोली आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता व चातुर्य आहे, हाती घेतलेल्या कामाला जिद्दीने पूर्ण करण्याची धडाडी आहे, संयमी नेतृत्वगुण आहेत. एकंदरीतच लोकनेता बनण्यासाठी लागणारी बरीचशी वैशिष्ट्यं तेजस यांच्यात दिसतात. परंतु सध्या तरी सत्तेच्या राजकारणाकडे पाठ वळवून ते त्यांच्या आवडीच्या संशोधन मोहिमांमध्येच मग्न राहताना दिसताहेत. हेच आगळंवेगळंपण सर्वार्थाने धाकल्या ठाकरेंना एका उंचीवर नेऊन ठेवतंय...
संशोधक तेजसबद्दल त्यांचे इतर ‘टॅक्सॉनॉमिस्ट’ काय म्हणतात?
विख्यात वन्यजीव छायाचित्रकार आणि टॅक्सॉनॉमिस्ट नयन खानोलकर आपल्या सहकाऱ्याबद्दल बोलताना म्हणतात,’’तेजसला मी त्याच्या शालेय वयापासून ओळखतोय. वाचन आणि ऑन फिल्ड काम करून दिवसेंदिवस त्याने स्वत:चा व्यासंग वाढवत नेलाय. टॅक्सॉनॉमी, प्रजातींचं संरक्षण व संवर्धन याबाबत उत्तम जाण त्याला आहे. एखाद्या संशोधकामध्ये क्वचितच असा मिलाफ दिसून येतो. संशोधक म्हणून त्याची नजर पक्की आहे. वन्यजीवांबद्दल संवेदनशील असणा-या तेजसने प्रयत्नपूर्वक स्वत:ला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवलंय. राजकीय पार्श्वभूमी असणारं घर असूनही त्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली जातेय, यासाठी त्याच्या आई-वडीलांचंही कौतुक केलं पाहिजे. एका अर्थाने उद्धवजीचं वन्यजीवांबद्दलचं प्रेम देखील याला कारणीभूत आहे.
वन्यजीवांबद्दलच्या आस्थेचा, कुतूहलाचा हा वारसा त्याला नक्कीच उद्धवजींकडून मिळालाय. खरं तर राजकारणात राहूनही वन्यजीवनाबद्दल, पर्यावरणाबद्दल काळजी करणारे, देशातलं वनवैभव जपण्यासाठी धडपडणारे इंदिरा गांधींनंतरचे दुसरे कोणी नेते असतील, तर ते उद्धवजी ठाकरे आहेत. त्यामुळे ही आवड तेजसमध्ये त्यांच्याकडून आलीय असं म्हणू शकतो.
पण माझ्या दृष्टीने अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वन्यजीवांबाबतचं त्याचं प्रेम हे केवळ देखावा नाहीये. तो एक संवेदनशील वन्यजीव संशोधक आहे. टॅक्सॉनॉमी क्षेत्रात सक्रीय झाल्यानंतरच्या अगदी काहीच वर्षात त्याने वीसहून अधिक प्रजातींवर संशोधन केलंय. वर्गीकरण शास्त्रातलं कोणतंही अधिकृत शिक्षण घेतलेलं नसतानाही अभ्यास, चिकाटी व मेहनतीवर चाललेला त्याचा हा प्रवास वन्यजीवनासंबंधींच्या क्षेत्रात येऊ पाहाणा-या कोणत्याही तरूणासाठी आदर्शवत आहे. त्याच्याशी पाच-दहा मिनिटं तुम्ही बोलून पाहा..तेवढ्या कमी वेळातही तुम्हाला त्याचं वन्यजीव संशोधन क्षेत्रातलं ज्ञान जाणवेल.

मुळात आपली आवड ही केवळ हौशीपुरती मर्यादित न ठेवता तेजस या वन्यजीवनाच्या संवर्धनासाठी स्वत:ला वचनबद्ध समजतो व तशा प्रकारे तो सक्रियही आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण अनेक संशोधक त्यांच्या पुरतं संशोधन झाल्यावर त्या विशिष्ट प्रदेशाचं, प्रजातीचं संरक्षण व संवर्धन करणं यात स्वारस्य दाखवत नाही. हाच त्यांच्यातला आणि तेजसमधला फरक आहे, अशा शब्दांत नयन खानोलकर तेजस यांचं कौतुक करतात.
‘’तेजस ठाकरेंनी सह्याद्रीतील जंगलांना जीवदान दिलंय’’
ज्येष्ठ सरीसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी यांनीदेखील तेजसच्या या कामाचं कौतपक केलं आहे. ते सांगतात, ‘’तेजसची आणि माझी पहिली भेट झाली ती आंबोलीत, २०१३ साली. तेव्हापासून निरनिराळ्या संशोधनांच्या निमित्ताने आम्ही संपर्कात आहोत. त्याला भेटल्यावर प्रथमदर्शनी जाणवतो तो त्याचा निगर्वीपणा आणि त्याच्या विषयातली त्याची समज. जी या क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांपेक्षाही खूप चांगली आहे असं मला वाटतं. त्याचं एकूणच निसर्गाप्रती आणि वन्यजीवनाबद्दलचं प्रेम हे नुसतीच आवड म्हणून त्याने जोपासलेलं नाहीये तर, संशोधन किंवा संवर्धन क्षेत्रातली त्याने कमावलेली ही जबरदस्त जाण ही त्याच्या निसर्गाशी, वन्यजीवनाशी एकरूप होण्यातून ती आलेली आहे. त्याचं वन्यजीव संशोधनातलं ज्ञान हे आपल्याला चकीत करते इतकं उत्तम आहे. त्याच्याशी चर्चा करतानाही हे मला कित्येकदा जाणवलंय. वर्गीकरण शास्त्राचा तो गाढा अभ्यासक आहे. वन्यजीव संशोधन, संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात त्यांनी स्वत:ला अगदी झोकून दिलंय. या संदर्भातलं काम असेल तर त्यांना कोणत्याही प्रहरी फोन करा, ते उचलणारच, शिवाय तातडीने अशा कामांमध्ये मदतही करणार असा माझा स्वानुभव आहे.
संशोधनातही त्यांची तळमळ नेहमीच जाणवते असे सांगताना डॉ. वरद गिरी पुढे म्हणतात, दिवसभर फिरून बाकीचे दमले असले तरीही रात्री परतताना एखादा प्राण्याचं निरीक्षण करायचं असल्यास ते कोणतीही कारणं न देता तेवढ्याच उत्साहाने पुन्हा जंगलात उतरतात. पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धनात त्यांच्या रूपाने आम्हाला नवं चैतन्य मिळालेलं आहे. तिलारी जंगल संवर्धनातही त्यांचं मोठं योगदान आहे. सह्याद्रीच्या रांगामधली ही जैविक साखळी अबाधित ठेवणं, संशोधनातून सातत्याने या जैवविविधतेला प्रकाशात आणून त्याचं महत्त्व अधोरेखित करणं हा तेजस यांचा एक प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी ते नेहमीच आमच्यासारख्या संशोधकांच्या बरोबरीने उभे असतात.
प्रजाती किंवा परिसराचं संरक्षण आणि संवर्धन करायचं तर त्यासाठी फक्त संशोधन पुरेसं नाही, तर त्या व्यतिरिक्त या संशोधनातून या निरीक्षणांना शास्त्रीय आधार देऊन, विविध प्रकारे त्याचं महत्त्व जगाला पटवून दिल्याखेरीज संवर्धनाचा मार्ग मोकळा होत नाही, हे त्यांनी हेरलंय आणि त्यानुसारच त्यांच्या योजना असतात. त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक मोहिमेचा ते पाठपुरावा करतात, वेळप्रसंगी संशोधकांना मदतही करतात. आज त्यांच्यामुळेच कोकण पट्ट्यातील जंगलांचं संवर्धन शासनाच्या मदतीने होण्याचा मार्ग सुकर झालाय हे विसरता येणार नाही.
तेजस ठाकरेंना बडेजाव माहीत नाही
प्रत्येक संशोधनात तेजस ठाकरे यांच्यासोबत असलेले ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर आपल्या या मित्राबद्दल सांगतात,
मी तेजसजींबरोबर गेली पाच-सहा वर्षं त्यांच्या संशोधन मोहिमांमध्ये सहभागी होतोय. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीचं दडपण कधी त्यांनी जाणवू दिलं नाही. उलट आम्ही इतर कोणत्याही तरूण मुलांप्रमाणेच हसत खेळत एकत्र काम करत असतो. सध्या आमचं तामिळनाडूच्या जिंजी परिसरातल्या पालींसंदर्भात संशोधन सुरू आहे. परंतु पश्चिम घाट, त्यातूनही विशेषत: त्याचा कोकण पट्ट्यातील भाग हा तेजसजींसाठी जिव्हाळ्याचा आहे. तसंच कोयनेचा परिसरही त्यांचा आवडता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधली जैवविविधता जपण्यासंदर्भात आजपर्यंत खूप कमी काम झालेलं दिसतं. त्याच उद्देशाने नवीन योजना आखण्याचा ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशनचा मानस आहे.

अर्थातच तेजसजींच्या पुढाकाराने या सर्व योजनांवर आम्ही विचार विनिमय करत असतो. एखादं संशोधन सिद्ध होण्यासाठी एक ते दीड वर्षांचा काळ लागतो. रिसर्च पेपर प्रकाशन संस्था त्याचं परीक्षण करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी घेते. आमचं संशोधन सातत्याने सुरूच असतं, नवीन मोहिमांवर विचार सुरू असतो. नजिकच्या भविष्यात भारताच्या इशान्यपूर्व भागातही संशोधनाचा तेजसजींचा मानस आहे. तसंच महाराष्ट्रातील आतापर्यंत संरक्षण न मिळालेल्या अधिवासांचं संरक्षण व संवर्धन करण्याच्या काही योजना आहेत. एकूणच टॅक्सॉनॉमी आणि त्यातील संशोधनांबाबत तेजसजींबरोबर नेहमीच गंभीर चर्चा होत असतात.
तेजस ठाकरे यांची आतापर्यंतची संशोधन संपदा
- खेकडे : घाटियाना बोट्टी ,घाटियाना पल्चरा ,घाटियाना रथब्युनेई, गुबेरनाटोरियाना लॉंगीपेस,गुबेरनाटोरियाना मार्लेश्वरेन्सिस, गुबेरनाटोरियाना वालासेई, सह्याद्रीयाना बिल्यार्जुनी, सह्याद्रीयाना पॅचीफालस, सह्याद्रीयाना सह्याद्रींएन्सिस, सह्याद्रीयाना टेन्यूफालस, सह्याद्रीयाना वुडमासोनी, घाटियाना एट्रोपर्पुरीया, घाटियाना स्प्लेंडिडा, गुबेरनाटोरियाना अलकॉकी, गुबेरनाटोरियाना वाघी, गुबेरनाटोरियाना ठाकरायी.
- पाली : शेवारॉय ड्वार्फ गेको, ठाकरेज ड्वार्फ गेको, अंबा ड्वार्फ गेको, कोयना ड्वार्फ गेको, कोलार ड्वार्फ गेको, ग्रॅनाईट ड्वार्फ गेको, येलागिरी ड्वार्फ गेको, रिषीव्हॅली ड्वार्फ गेको, सिरूमलाई ड्वार्फ गेको, रिषीव्हॅली रॉक गेको, शॅलेर्स सकलेशपूर ड्वार्फ गेको.
- साप : ठाकरेज कॅट स्नेक ( बोईगा ठाकरेयी)
- मासे : चन्ना अॅरिस्टोनेई (अॅरिस्टोन्स स्नेकहेड फिश), शिस्टुरा हिरण्यकेशी (हिरण्यकेशी लोच)






