शोनाली समर्थ
- अगोदर क्रिकेट, मग अॅथलेटिक्स, हळूहळू बॉक्सिंग, जलतरण, फुटबॉल अस करता करता अखेर जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमधूनही ट्रान्सजेंडर खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे.
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन पात्रता निकषानुसार पारलिंगी (ट्रान्सजेंडर) महिला खेळाडूंना आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही.
- हा निकष २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धास्तीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
अगोदर क्रिकेट, मग अॅथलेटिक्स, हळूहळू बॉक्सिंग, जलतरण, फुटबॉल अस करता करता अखेर जगातील सर्वोच्च क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिम्पिकमधूनही ट्रान्सजेंडर खेळाडूंना हद्दपार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गुरुवारी जाहीर केलेल्या नवीन पात्रता निकषानुसार पारलिंगी (ट्रान्सजेंडर) महिला खेळाडूंना आता ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. हा निकष २०२८ लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून लागू होईल.
"ऑलिम्पिक स्पर्धा किंवा 'आयओसी' च्या अन्य स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूला महिला गटात सहभागी होण्यासाठी आता नैसर्गिकदृष्ट्या महिला असणे गरजेचे असेल. हे 'एसआरवाई जीन स्क्रीनिंग'च्या आधारे ठरविण्यात येईल," 'आयओसी'ने म्हटले आहे.
नवीन धोरणानुसार, आता फक्त 'बायोलॉजिकल फीमेल्स' (ज्या महिला जन्मापासूनच महिला आहेत) त्यांनाच महिला गटात खेळण्याची परवानगी असेल. यासाठी एकदा जीन टेस्ट (SRY जीन स्क्रीनिंग) करणे आवश्यक असेल, ज्यामुळे लिंगाची पुष्टी केली जाईल. ही चाचणी लाळ, गालाचा स्वॅब किंवा रक्ताच्या नमुन्यातून केली जाऊ शकते. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे जे खेळाडू जन्मावेळी महिला होते, परंतु आता स्वतःला ट्रान्सजेंडर पुरुष (Trans Men) मानतात, ते मात्र महिला स्पर्धांमध्ये खेळणे सुरू ठेवू शकतात.

आतापर्यंत, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ट्रान्सजेंडर महिलांना टेस्टोस्टेरोनची पातळी कमी ठेवण्याच्या अटीवर खेळण्याची परवानगी देत होती, किंवा निर्णय वैयक्तिक क्रीडा संघटनांवर सोडला जात होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धास्तीमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांच्या खेळामधील पारलिंगी खेळाडूंच्या सहभागावर बंदीची मागणी केली होती. २५ जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर सही केली होती. या आदेशानुसार ट्रान्सजेंडर व्यक्तींना महिलांविरोधात क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खेळामध्ये निष्पक्षता येईल असे रिपब्लिकन नेत्यांचे म्हणणं आहे.
हा निर्णय का घेण्यात आला?
- IOCला आता सर्व खेळांसाठी एक समान धोरण हवे आहे, जेणेकरून विविध क्रीडा संघटना वेगवेगळे नियम बनवू नयेत.
- अनेक क्रीडा संघटनांनी आधीच ट्रान्सजेंडर ॲथलीट्सवर बंदी घातली आहे.
- हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महिला खेळांशी संबंधित कार्यकारी आदेशानंतर आला आहे.
- IOC चे मत आहे की SRY जीन चाचणी सर्वात अचूक आणि कमी हस्तक्षेप करणारी पद्धत आहे.
- हा बदल खेळांमध्ये निष्पक्षता म्हणजेच फेअर कॉम्पिटिशन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे.
- हा नियम निष्पक्षता, सुरक्षा आणि महिला वर्गाची अखंडता राखण्यासाठी घेण्यात आला आहे.
या निर्णयासंबधी प्रतिक्रिया व्यक्त करताना आयओसीच्या अध्यक्षा कर्स्टी कोवेंट्री यांनी सांगितले की, ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर जय आणि पराजय यांच्यात खूप कमी फरक असतो. ऑलिम्पिक खेळांमध्ये अगदी लहानसा फरकही जय आणि पराजय ठरवू शकतो. अशा परिस्थितीत जैविक पुरुषांनी महिलांच्या गटात स्पर्धा करणे योग्य ठरणार नाही. संशोधनानुसार जन्मापासून पुरुष असल्याने शारीरिक फायदा मिळतो. आयओसीने आपल्या या धोरणामागे वैज्ञानिक संशोधनाचाही हवाला दिला आहे. संशोधनानुसार, जन्मापासून पुरुष असल्याने खेळाडूला ताकद (स्ट्रेंथ), सहनशक्ती (एंड्युरन्स) आणि शक्ती-आधारित खेळांमध्ये शारीरिकदृष्ट्या कायमस्वरूपी फायदा किंवा 'अॅडव्हान्टेज' मिळतो. संस्थेचे मत आहे की हार्मोनल बदलांनंतरही हा शारीरिक फरक पूर्णपणे संपत नाही.
ट्रान्सजेंडर महिलांवर बंदी का घातली?
गेल्या काही काळापासून ट्रान्सजेंडर महिलांच्या स्पर्धेतील सहभागाबद्दल अनेक वाद निर्माण झालेले आहेत. टोकयो ऑलिम्पिकनंतर हा विषय अधिक चर्चेत आला. त्या वेळी न्यूझीलंडच्या वेटलिफ्टर ४३ वर्षीय लॉरेल हबबार्ड यांनी महिलांच्या ८७ किलो वजनीगटात सहभाग घेतला होता. हबबार्डने यापूर्वी २०१३ साली पुरुषांच्या वेटलिफ्टिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी तिचे वय ३० होते. एनसीएएच्या (National Collegiate Athletic Association) स्वीमर लिया थॉमस यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर पुरुष गटातून महिला गटात खेळण्यास सुरुवात केली. फिनाने (Fina) ट्रान्सजेंडर महिलांवर बंदी घालेपर्यंत लिया थॉमसने IVY लिग स्पर्धेत अनेक विक्रम प्रस्थापित केले होते.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान दोन महिला बॉक्सर्सच्या सहभागावरून वाद निर्माण झाला होता. 66 किलोग्राम वजनी गटात अल्जेरियाच्या इमान खलीफ आणि 57 किलोग्राम वजनी गटात तैवानच्या लिन यू टिंग यांच्या खेळण्यावर इतर खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. तैवानी बॉक्सर लिन यू-टिंगला 2023 मध्ये इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) द्वारे केलेल्या लिंग-संबंधित तपासणीत अयशस्वी घोषित करण्यात आले होते. याउपरही, IOC ने त्यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला 57 किलोग्राम वजनी गटात भाग घेण्याची परवानगी दिली, जिथे त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या पात्रतेबद्दल काही खेळाडू आणि IBA ने प्रश्न उपस्थित केले होते, तथापि IOC ने या प्रक्रिया विश्वासार्ह मानल्या नाहीत. त्याचप्रमाणे, इमान खलीफला देखील 2023 मध्ये IBA द्वारे लिंग-संबंधित तपासणीत अपात्र घोषित करण्यात आले होते. IBA ने त्यांना 2023 मध्ये दिल्लीत आयोजित महिला विश्व चॅम्पियनशिपच्या सुवर्णपदकाच्या लढतीत भाग घेण्याची परवानगी दिली नव्हती.
बंदी घालण्याआधी ट्रान्सजेंडर महिलांसाठी काय नियम होते?
याआधी ट्रान्सजेंडर महिलांवर सरसकट बंदी नव्हती. ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याच्या १२ महिने आधी सलगपणे शरीरात टेस्टोस्टेरोन (testosterone) या संप्रेरकाचे प्रमाण पाच (mol/liter) नॅनोमोल प्रतिलिटरपेक्षा कमी करावे लागत होते.
जागतिक अॅथलेटिक्सने ट्रान्सजेंडर महिलांवर कायमची बंदी घालण्यापेक्षा प्राधान्य पर्याय सुचविला होता. जागतिक अॅथलेटिक्सने सांगितले की, ट्रान्सजेंडर महिलांना जर महिला गटातून स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर त्यांना दोन वर्षांसाठी रक्तातील टेस्टोस्टेरोन संप्रेरकाचे प्रमाण २.५ नॅनोमोल प्रतिलिटरपेक्षा कमी करावे लागेल. या नव्या नियमातून जागतिक अॅथलेटिक्सने आधीच्या नियमात वेळेची मर्यादा दुपटीने वाढवली, तर टेस्टोस्टेरोन संप्रेरकाचे प्रमाण अर्ध्यावर आणले.
खेळाडूंच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत?
हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा जगभरात महिलांच्या खेळांमध्ये ट्रान्सजेंडर ॲथलीट्सच्या सहभागावरून वादविवाद सुरू आहे. अमेरिकेनेही नुकतेच महिला खेळांमध्ये कठोर नियमांबाबत एक कार्यकारी आदेश (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) जारी केला होता. आयओसीचे म्हणणे आहे की, हे निष्पक्षतेसाठी आवश्यक आहे, परंतु मानवाधिकार गट आणि कार्यकर्त्यांकडून या निर्णयावर टीका होण्याची पूर्ण शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू आणि LGBTQ कार्यकर्त्या मार्टिना नवरातिलोवा (Martina Navratilova) यांनी फिनाची (FINA) बाजू उचलून धरली. ‘द ऑस्ट्रेलियन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, अशा टोकाच्या परिस्थितीत ट्रान्सजेंडर अॅथलिट्सच्या बाजूने वातावरण तयार झालेले असताना निर्णय घेणे अवघड असते. पण जेव्हा खेळांचा विषय येतो तेव्हा जैविक ओळख ही सर्वात महत्त्वाची ठरते. फिना संघटनेने हा निर्णय घेण्याआधी न्यायपूर्ण प्रक्रिया राबविली असावी, तसेच या निर्णयाप्रत पोहोचण्याआधी अनेक लोकांशी चर्चा केलेली असावी, असे मला वाटते. शेवटी खेळांमध्ये प्रामाणिकपणा असायला हवा, असे माझे मत आहे. यासोबतच मार्टिना यांनी ट्रान्सजेंडर खेळांडूच्या पात्रतेचे निकष ठरविण्याची जबाबदारी क्रीडा संघटनांवर ढकलणाऱ्या ऑलिम्पिक समितीचा निषेध केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ट्रान्सजेंडर खेळाडू “OUT”
दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला होता. ट्रान्सजेंडर खेळाडूंना आणि ज्यांनी लिंग बदल उपचार घेतले आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय खेळासाठी लिंग बदलाबाबत नवीन नियमांना आयसीसी बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता कोणताही पुरुष खेळाडू लिंग बदलून महिला क्रिकेट संघात खेळू शकणार नाही हा निर्णय नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे.
आयसीसीने असे सांगितले की, आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कोणत्याही पुरुष ते महिला खेळाडूला (ट्रान्सजेंडर महिला खेळाडू किंवा पुरुष लिंग बदलणारा पुरुष खेळाडू) जो कोणत्याही प्रकारच्या लिंगबदल शस्त्रक्रियेतून गेला आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. मग कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा लिंग परिवर्तन उपचारांचा अवलंब केला असला तरीही. खेळाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आयसीसी ने ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधून बंदी घातली आहे. डॉ. पीटर हार्कोर्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीने हा निर्णय घेतला. हे नवीन धोरण महिलांच्या खेळाच्या अखंडतेचे संरक्षण, सुरक्षा, निष्पक्षता आणि समावेशन या तत्त्वांवर आधारित आहे. याचा अर्थ, यापुढे एखादा पुरुष लिंग परिवर्तन करून स्त्री झाला असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळता येणार नाही. आयसीसीच्या मते, यासाठी त्याने कोणतीही शस्त्रक्रिया किंवा लिंग पुनर्नियुक्ती उपचार घेतले असले तरी तो आंतरराष्ट्रीय महिला खेळात सहभागी होण्यास पात्र असणार नाही.






