समृद्धी तिवारी
- काय करते सध्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्वायव्हर…?
- तिची एक लढाई कोर्टात तर दुसरी सोशल मीडियावर सुरू आहे…
- “मी अदृश्य होणार नाही. मी मागेही हटणार नाही.”
आपली फिकट गुलाबी रंगाची ओढणी ठीक करत, २५ वर्षांच्या ‘एस’ने तिचा चेहरा झाकण्यास नकार दिला. ‘एस’ म्हणजे उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्वायव्हर… आपल्या प्राधान्यक्रमात ‘एस’ने तिच्या गोपनियतेला अगदी शेवटचे स्थान दिलं आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन ईस्ट इथे आपल्या वकिलांच्या कार्यालयात खुर्चीवर बसताना ‘एस’ने थकलेल्या आवाजात सांगितलं, “आता उरलं तरी काय आहे माझ्या आयुष्यात? फक्त माझा चेहरा ‘ब्लर’ करा. माझ्यासोबत जे काही झालं, त्यानंतर मी माझ्या वडिलांना गमावलं, माझा सन्मान गमावला. चेहरा दाखवला किंवा नाही दाखवला तरी आता काहीच बदलणार नाही.”
तिनं सांगितलं की, ती गेल्या आठ वर्षांत १०० पेक्षा जास्त वेळा न्यायालयात जाऊन आली आहे. ‘एस’च्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसतो, पण त्याचबरोबर हेही दिसतं की ती अदृश्य होण्यास नकार देत आहे, जरी भारतीय जनता पक्षाचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या समर्थकांकडून तिचा सातत्याने अपमान केला जात असला आणि तिच्यावर आरोप लावले जात असले तरीही... सेंगर हा तोच माणूस आहे ज्याने ती किशोरवयीन असताना तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपांपासून ते सेंगरला शिक्षा होईपर्यंतच्या वर्षांत या प्रकरणाने ‘एस’च्या आयुष्याची दिशा पार बदलून टाकली.

हल्ले, धमक्या, न्यायालयाच्या तारखा, बहिष्कार, आंदोलन, बचाव, टीव्ही न्यूज मुलाखती, कोर्टरूम, वकील आणि न्यायाधीश.. मागील दशक पूर्णपणे गोंधळाने भरलेले होते. आज ‘एस’ दोन मुलांची आई आहे, दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतेय आणि कायदा शिकण्याचे स्वप्न पाहतेय, जेणेकरून आपल्या प्रकरणाची शेवटच्या अपीलपर्यंत स्वतः पाहणी करू शकेल आणि इतर बलात्कार प्रकरणांसाठीही लढू शकेल. या सगळ्या प्रक्रीयेत ती एक धडा शिकली आहे, की न्याय फक्त निकालाने मिळत नाही आणि ही लढाई फक्त कोर्टरूमपुरती मर्यादित नसते.
मनोवैज्ञानिक नीतू सरीन म्हणाल्या, “ट्रॉमा म्हणजे फक्त शरीरासोबत जे घडलं तेच नसतं. ते माणसाची ओळख मोडून टाकते. ते त्या व्यक्तीला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवतं आणि काय आणि कधी जाणवावं हे समजत नाही. त्यांना माहिती असतं की ही लाज त्यांची नाही, पण त्यांना जगत राहावं लागतं.”
उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्वायव्हरचा रोजचा दिवस कसा जातो?
सुनावणीच्या दिवशी ‘एस’ पहाटे चार वाजता उठते. स्वयंपाक करते, साफसफाई करते, आपल्या चार जणांच्या कुटुंबासाठी जेवण तयार करते आणि मग सीआरपीएफ एस्कॉर्टला फोन करते. सकाळच्या सुमारास ती न्यायालयात जाण्यासाठी कारमध्ये असते तेव्हा तिच्यासोबत सहसा दोन किंवा तीन वकिलही असतात. सरकारने ‘एस’ला कार आणि सुरक्षा दिली आहे.
‘एस’ २०१९ साली दिल्लीला आली. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने तिला राष्ट्रीय राजधानीत एक घर दिले. उन्नावच्या मोकळ्या शेतांपासून दूर, दक्षिण-पश्चिम दिल्लीतील घिटोरनीच्या अरुंद गल्ल्या तिचा नवा परिसर बनला. तिची ये-जा सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ)च्या जवानांच्या देखरेखीखाली होते. हे छोटेसे घर आता तिच्या दोन लहान मुलांमुळे गजबजलेले असते. दिल्लीला आल्यानंतरपासून ‘एस’ चे दोन प्रकारचे दिवस असतात, न्यायालयात जाण्याचे दिवस आणि न्यायालय नसलेले दिवस.
डिसेंबर २०१९ मध्ये, दिल्लीतील एका न्यायालयाने सेंगरला बलात्काराचा दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील ताज्या घडामोडी २३ डिसेंबर २०२५ रोजी घडल्या, जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने सेंगरच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देत त्याला अटींसह जामीन मंजूर केला. शिक्षेविरुद्धचे त्याचे अपील न्यायालयात प्रलंबित आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाने शिक्षा तात्पुरती स्थगित केली आहे, मात्र दोषसिद्धी रद्द केलेली नाही. न्यायालयाने जामिनावर कठोर अटी घातल्या आहेत. न्यायालयाने बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या कोठडीत झालेल्या हत्येतील भूमिकेसाठी सेंगरच्या भावालाही दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
“पूर्वी हे भीतीदायक वाटायचं. आता याची सवय झाली आहे.’’
‘एस’चं महिन्याचं कॅलेंडर पूर्णपणे भरलेलं असतं. एक तारीख उच्च न्यायालयात, मग साकेत न्यायालयात, मग सर्वोच्च न्यायालयात आणि मग सीबीआय न्यायालयात एक प्रकरण. काही दिवस सुनावणी काहीच मिनिटे चालते. इतर दिवशी ती तासन् तास वाट पाहते. कधी कोर्टरूमबाहेरील बाकावर बसून आणि कधी कधी दिल्ली उच्च न्यायालय परिसरातील एका झाडाखाली बसून. ती पूर्ण दिवस सरताना बघत राहते. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान, सेंगरचे १०-१२ वकील उपस्थित होते. तर सर्वायव्हर आपली वकील महमूद प्राचा यांच्या दोन कनिष्ठ सहकाऱ्यांसोबत उपस्थित होती. ‘एस’ ठामपणे म्हणचे, “पूर्वी हे भीतीदायक वाटायचं. आता याची सवय झाली आहे. मी तिथं घाबरण्यासाठी नाही. मी लढण्यासाठी आहे. मी इथून जाणार नाही.”
संध्याकाळी ती आपल्या वकील महमूद प्राचाकडे जाते, जे तिला न्यायालयातील कायदेशीर भाषा सोप्या शब्दांत समजावून सांगतात. ‘एस’ म्हणते, “बहुतेक गोष्टी इंग्रजीत होतात. जेव्हा ते मला समजावून सांगतात, तेव्हा मला कळत की माझ्या प्रकरणात काय चालल आहे. मला अधिक जागरूक असल्यासारखं वाटतं.”
सध्या कायद्याचं शिक्षण घेतेय उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्वायव्हर
ज्या दिवशी न्यायालयाची फेरी नसते, त्या दिवशी ‘एस’चे घरच तिचा वर्ग बनतो. २०२२ साली तिने ८९ टक्के गुणांसह इंटरमीडिएट पूर्ण केले. एक वर्षानंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये बीए प्रोग्राम कोर्समध्ये प्रवेश घेतला. तिच्या विषयांमध्ये इतिहास, साहित्य, पर्यावरण विज्ञान आणि अर्थशास्त्र यांचा समावेश आहे. जेव्हा पुस्तके कठीण वाटतात, तेव्हा ती हिंदीतील यूट्यूब ट्युटोरियल्स पाहते.

हलक्या आणि थकलेल्या स्मितासह ‘एस’ म्हणते, “मला हे शिक्षण अठराव्या वर्षी घ्यायला हवं होतं. जे घडलं त्यामुळे ते घेता आलं नाही, पण मला वाटतं की मला उशिर झालेला नाही. कुठेतरी सुरुवात तरी झाली.”
पुन्हा शिक्षण सुरू करणं सोपं नव्हतं. ती अनेकदा आपले धडे विसरते. कधी कधी ती लहानसहान गोष्टीही विसरते, जसं की मुलांना जेवण दिलं की नाही, किंवा आपलं काम पूर्ण केले की नाही.
मनोवैज्ञानिक सरीन म्हणतात, “ट्रॉमातून गेलेल्या लोकांमध्ये थकवा हा मोठा घटक असतो. योग्य वेळी योग्य भावना जाणवण्याची क्षमता त्यावर परिणाम होतो. स्मरणशक्तीमध्येही घट होते.”
न्यायालयाच्या तारखा, शिक्षण आणि मुलांची काळजी यामध्ये, ‘एस’ आपल्या प्रकरणाशी संबंधित व्हॉट्सअॅप संदेश वाचते आणि नातेवाईकांना न्यायालयातील ताज्या घडामोडींची माहिती देते.
‘एस’ला कविता, पुस्तके, कथा वाचण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट पाहण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशी तिची इच्छा आहे. दर सकाळी, जेव्हा ती वर्तमानपत्र हातात घेते, तेव्हा मथळे तिला ओळखीचे वाटतात. त्यात लहान मुले, किशोरवयीन मुली आणि महिलांवरील लैंगिक हिंसेच्या बातम्या भरलेल्या असतात. अनेकांना मारलेही जाते आणि ज्या वाचतात त्यांना वर्षानुवर्षे खटला लढावा लागतो, ज्यात न्याय मिळण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत.
‘एस’ म्हणते, “२०१७ पासून आजपर्यंत काहीच बदललेले नाही.”
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्वायव्हर असणे म्हणजे भीती, धमक्या आणि शांततेच्या सावलीत जगणे. ‘एस’ने धमकावणे, आप्तांना गमावणे आणि जवळजवळ जीवघेण्या अपघाताचा सामना केला आहे. जेव्हा तिने प्रथमच टीव्ही कॅमेऱ्यांचा सामना केला, तेव्हा ती खूप घाबरली होती, प्रश्नांपासून, विधान देण्यापासून आणि सत्य बोलण्यापासून.
‘एस’ म्हणते, “पण मला बोलावं लागलं कारण माझा सन्मान गेला होता.” ती लगेच खाली पाहू लागते.
‘एस’ वारंवार “माझा सन्मान गेला” हे शब्द वापरत राहते. तिच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की तसे नाही. “मी फक्त उन्नावची मुलगी नाही, तर भारताचीही मुलगी आहे, पण मला तसं जाणवू दिलं गेलं नाही.”
ती म्हणते की नेत्यांनी तिला साथ दिली नाही, महिला वकिलांनी तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या, पोलिस अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली नाही आणि उन्नावमधील लोकांनी तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तिच्याकडून पुरावे मागितले, सेंगरकडून नाही.
आई दिवसभर चुरगळलेल्या पॉलिथिनच्या पिशवीत कागदपत्रे घेऊन फिरतात
एक स्त्री जी या संपूर्ण कायदेशीर लढ्यात ‘एस’सोबत ठाम उभी राहिली, ती म्हणजे तिची ७२ वर्षांची आई. प्रत्येक दुसऱ्या दिवशी, जेव्हा सुनावणी असते, त्या नांगलोईहून दिल्लीतील विविध न्यायालयांत आपल्या मुलीसोबत उभे राहण्यासाठी येतात. काही वर्षांपूर्वी त्या सर्वायव्हरला साथ देण्यासाठी दिल्लीला आल्या होत्या. आई एका चुरगळलेल्या पॉलिथिनच्या पिशवीत कागदपत्रे घेऊन फिरतात, ज्यात आठ वर्षांची कागदपत्रे भरलेली आहेत. त्यात एफआयआरची प्रत, वैद्यकीय नोंदी, न्यायालयीन कागदपत्रे आणि छायाप्रतींचा समावेश आहे. जेव्हा टीव्ही कॅमेरे समोर येतात, तेव्हा त्यांची आई शांतपणे एक चेहऱ्यासाठी मास्क काढून घालते.
प्रत्येक वेळी आई कॅमेऱ्यासमोर बोलायला सुरुवात करते आणि म्हणते, “सेंगरला शिक्षा व्हावी,” तेव्हा एस आईला थांबवत म्हणते, “फाशी.”
त्या म्हणाल्या, “माझी मुलगी तिच्या वडिलांसाठी न्यायाची लढाई लढत आहे.”
कुटुंबाने अजूनही ‘एस’च्या वडिलांचा अंत्यसंस्कार केलेला नाही. आईने स्पष्ट शब्दांत सांगितले, “आम्हाला न्याय मिळाल्यानंतरच आम्ही ते करू. ज्या प्रकारे ते माझ्या मुलीबद्दल बोलतात, अशोभनिय कमेंट करतात, ज्या प्रकारे त्यांनी बलात्कार खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आमच्या लक्षात राहील.”
‘एस’च्या कुटुंबातील सगळ्या लहान मुली तिला आदर्श मानतात. ‘एस’ त्यांची अशी मोठी बहिण बनते, जी कोर्टात गेल्ली, स्वतःचा खटला लढली आणि कोणत्याही तडजोडीसाठी तयार झाली नाही. आई म्हणतात, “आम्ही आमच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात राहत नाही; ही एक कुर्बानी आहे जी आम्हाला द्यावी लागली, पण आमच्या कुटुंबातील सर्व महिलांना ‘एस’चा खूप अभिमान आहे.”
एक लढाई कोर्टात तर दुसरी सोशल मीडियावर…
ही लढाई फक्त कोर्टरूमपुरती मर्यादित नाही. सोशल मीडियावर वारंवार असे धक्कादायक दावे केले जातात जे सर्वायव्हरचे म्हणणे खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे तिच्या गोपनीयतेत हस्तक्षेप होतो. ‘एस’ म्हणते की, ऑनलाइन जगात तिला सर्वायव्हर म्हणून मान दिला जात नाही. दररोज तिच्यावर खटला चालतो.

तिच्या प्रकरणाला “खोटे” म्हटले गेले आहे आणि असेही सांगितले गेले की ती तिच्या ट्रॉमाची “खोटी कहाणी बनवत आहेत.” स्थानिक पत्रकार आणि कार्यकर्ते एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर तिची बदनामी करतात. फेसबुकवर, सेंगरचे समर्थक सतत पोस्ट करत असतात. हरिओम सिंह चंदेल यांनी एका पोस्टमध्ये सर्वायव्हरची बदनामी करत लिहिले, “गजब का शातिर खेल गई.”
मॉर्फ केलेले फोटोही पसरवले जात आहेत, ज्यात सर्वायव्हरचा चेहरा स्पष्ट दिसतो आणि ती सीआरपीएफ जवानाच्या खांद्यावर हात ठेवून उभी असल्याचे दाखवले आहे.
उन्नावच्या वकील नंदिनी दीक्षित यांनीही फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले, “सीआरपीएफला यापासून घाबरायला हवे.” अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये पीडितेला “मास्टरमाइंड” म्हटले गेले.
सर्वायव्हर आणि तिच्या काकांमधील एका कथित फोन कॉलची रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर पसरवली गेली. या ऑडिओमध्ये काका सर्वायव्हरला सेंगरला फसवण्यासाठी सांगत असल्याचे ऐकू येते. त्यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स स्थानिक मीडियानेही मोठ्या प्रमाणात शेअर केल्या आहेत. त्यांचा चेहरा अनेक वेळा दाखवला गेला, कॅप्शनसह—“ही उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता आहे.”
‘एस’ म्हणते, “माझ्या प्रकरणाबाबत सतत (मीडिया आणि कोर्टकडून) प्रश्न विचारले गेल्यामुळे मी माझ्या ट्रॉमाच्या गोष्टी विसरू लागले आहे. कधी कधी मला आठवत नाही की मी मीडियाला काय सांगितलं होतं.”
उन्नाव आणि दिल्लीतील वकिलांनी या प्रकरणावर व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या प्रत्येक विधानाचे “विश्लेषण” करण्यात आले आहे. ‘हमारा कुलदीप निर्दोष है’ सारख्या फेसबुक पेजवर तिचे, तिच्या आईचे आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे फोटो शेअर केले गेले आहेत. या अकाउंट्सनी ‘एस’ला “बनावट बलात्कार पीडिता” म्हटले आहे, जी “मीडिया, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची दिशाभूल करते.” फेसबुकवरील एका कमेंटमध्ये लिहिले होते, “हा भारतातील आंधळ्या कायद्याचा परिणाम आहे.”
स्थानिक पत्रकारांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सर्वायव्हरचे फोटो सतत शेअर केले जातात. ग्रुपचे सदस्य तिला लज्जित करतात आणि दोष देतात. या ग्रुपमधील अनेक पोस्ट्स एकाच वाक्यावर संपतात: ‘पण, तीच त्यांच्यासोबत बाहेर गेली होती.’
‘एस’चा अँड्रॉइड फोन तिची ही सगळी कहाणी सांगतो.
आपला मोबाईल फोन हातात घेत ती म्हणते, “माझा जीव यातच आहे.” तिने शिवीगाळ, कमेंट्स आणि पोस्टचे २०० हून अधिक स्क्रीनशॉट जतन करून ठेवले आहेत. ती काहीही डिलीट करत नाहीत. हे तिच्या रोजच्या अपमानाचे एक डिजिटल रेकॉर्ड बनले आहे.
“माझा बलात्कार लोकांसाठी सोशल कंटेंट बनला आहे.”
दरम्यान, उन्नावमध्ये लोकांनी सेंगरसाठी “हवन” आणि “सार्वजनिक प्रार्थना” यांचे आयोजन केले. रडत ‘एस’ म्हणते, “माझा बलात्कार लोकांसाठी सोशल कंटेंट बनला आहे.”
दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, ज्यात सेंगरला सशर्त जामीन देण्यात आला, सर्वायव्हरने राष्ट्रीय राजधानीतील रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला, जिथे २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात पिडीतेच्या समर्थनार्थ आंदोलन झाले होते. डिसेंबरमध्ये, सर्वायव्हर, तिची आई, कार्यकर्ती योगिता भयाना आणि काही इतर कार्यकर्ते आपल्या वकील महमूद प्राचा यांच्या कार्यालयातून कागद आणि काळे मार्कर घेऊन, संध्याकाळी इंडिया गेटवर आंदोलनासाठी पोहोचले. त्यांनी घोषवाक्ये लिहिली आणि इंडिया गेटच्या लॉनवर बसले.
योगिता म्हणाल्या, “आम्ही तिथे फक्त बसलो होतो कारण आम्हाला आमचा आवाज ऐकवायचा होता. वकिलाने केस नीट लढवली नाही. तो खूपच कॅज्युअल होता. आम्ही फक्त आंदोलनच करू शकत होतो.”
बलात्काराच्या ट्रॉमापेक्षा अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू धक्कादायक
योगिता २०१८ मध्ये प्रथमच सर्वायव्हरला भेटल्या, जेव्हा गुन्ह्यानंतर ‘एस’ला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योगिता म्हणाल्या, “मी तिला भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणालाही भेटू दिले जात नव्हते. मी अनेकदा तिची खबर घेत राहिले. शेवटी, २०२२ मध्ये तिने एका अनोळखी नंबरवरून माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की तिला आर्थिक मदतीची गरज आहे, कारण ती गर्भवती होत्या आणि केस सुरू होती. मग आम्ही मदत केली.”
योगितासाठी, ‘एस’ इतर कोणत्याही पीडितेसारख्या नव्हती. त्या म्हणाल्या, “ती मजबूत आहे, चांगल्या बोलते. गरज पडल्यास मदत मागते. ‘एस’ अशा कुटुंबातून येते ज्यांनी नेतागिरी जवळून पाहिली आहे. मी बलात्काराचा ट्रॉमा तितका पाहिला नाही, पण रस्ता अपघातानं तिला खूप हादरवलं होतं.”
प्रकरणाच्या नोंदींनुसार, २०१९ मध्ये एका ट्रकने त्या कारला धडक दिली होती, ज्यामध्ये बलात्कार सर्वायव्हर, तिचे वकील आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य प्रवास करत होते. या अपघातात तिच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर महिला आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले.
२३ डिसेंबर रोजी, ज्या दिवशी दिल्ली उच्च न्यायालयाकडून सेंगरला बलात्कार प्रकरणात जामीन मिळाला, ‘एस’ने योगिताला भेटण्यासाठी फोन केला.
योगिता म्हणाल्या, “तिने मला मिठी मारली आणि रडू लागली. पहिल्यांदाच मी ‘एस’ला तुटताना पाहिलं.”
२०१७ पूर्वी ‘एस’चं आयुष्य खूप वेगळ होत…त्या घटनेपूर्वी, जेव्हा तिला स्वतः पोलिस तक्रार लिहावी लागली. ती लहानपणापासून आपल्या काकांसोबत रायबरेली इथे राहत होती. २०१३ मध्ये ती उन्नावला आली. ‘एस’ म्हणते, “हे नवं शहर होतं. माझ्या नव्या आयुष्यासाठी मी उत्सुक होते. मला शाळेत जाता आलं नाही, पण मला जायचं होतं. मी कधीच विचार केला नव्हता की फक्त चार वर्षांत, ज्या शहरात मी नवं आयुष्य सुरू करू इच्छित होते, त्याच शहरात माझं संपूर्ण आयुष्य बदलेल.”
आता ‘एस’च्या आयुष्याचा पुढचा अध्याय दिल्लीमध्ये लिहिला जात आहे आणि ती आधीपेक्षा अधिक ठाम निर्धाराने उभी. ती म्हणते म्हणाल्या, “मी अदृश्य होणार नाही. मी मागेही हटणार नाही.”
(सौजन्य - द प्रिंट, अनुवाद - प्रतिक पुरी)






