अप्सरा आगा
- २०२६ मध्ये ‘एल-नीनो’ सक्रिय होण्याची ६० टक्के पेक्षा जास्त शक्यता आहे.
- मान्सून उशिरा सुरू होऊ शकतो आणि पाऊस कमी पडण्याचा धोका आहे.
- तज्ज्ञांनी पाणी बचत, योग्य पिकांची निवड आणि प्रशासनाला सजग राहण्याचा सल्ला दिला आहे.
आपल्या देशाचा जीवनधारा मानल्या जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामावर यंदा मोठा संशय निर्माण झाला आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेट आणि इतर हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये ‘एल-नीनो’ नावाच्या हवामान चक्रामुळे मान्सून कमी पडण्याची भीती आहे. याचा अर्थ असा की, भारताला या वर्षी पावसाचा पुरेसा दिलासा मिळणार नाही. त्यामुळे शेती, जलसाठा आणि रोजंदारी या सगळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
‘एल-नीनो’ म्हणजे काय?
‘एल-नीनो’ हा एक हवामानाचा चक्र आहे जो प्रशांत महासागरात होतो. या वेळी समुद्राच्या पाण्याचं तापमान असामान्य पद्धतीने जास्त वाढतं. यामुळे हवामानाचे निसर्गशास्त्रीय पॅटर्न बदलतात. विशेषतः भारताच्या मान्सूनवर याचा खूप परिणाम होतो. ‘एल-नीनो’ सक्रिय झाल्यावर भारतात पाऊस कमी पडतो, मान्सून उशिरा येतो किंवा काही ठिकाणी अगदीच पाऊस न पडण्याची शक्यता असते. याचा परिणाम म्हणून उन्हाळा अधिक उष्ण आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शेतीवर, पाण्याच्या उपलब्धतेवर आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. साध्या शब्दांत, ‘एल-नीनो’ म्हणजे समुद्राचा तापमान वाढण्यामुळे होणारा हवामान बदल, ज्यामुळे आपल्या देशात पावसाची पातळी कमी होण्याची भीती असते.
खासगी हवामान संस्था स्कायमेट हवामानाने सांगितलंय की, २०२६ मध्ये ‘एल-नीनो’ सक्रीय होण्याची शक्यता ६० टक्क्यांहून अधिक आहे. हे जर खरं ठरलं, तर यंदा आपल्याला मान्सून कमी पडण्याचा धोका भेडसावेल. म्हणजेच, जूनपासून सप्टेंबरपर्यंत आपल्याला हवा तितका पाऊस मिळणार नाही. याचा थेट परिणाम शेतीवर होणार आहे, कारण पिकांना पाणी कमी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
२०१४ आणि २०१८ या वर्षांत ‘एल-नीनो’चा परिणाम पाहायला मिळाला होता. २०१४ मध्ये देशाच्या अनेक भागांत मान्सून मोठ्या प्रमाणात कमी पडला आणि दुष्काळाच्या परिस्थती निर्माण झाली. २०१८ मध्ये मात्र पाऊस सामान्यपेक्षा थोडा कमी पडला पण तरीही बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई जाणवली.
याचा परिणाम कसा होईल?
पाऊस कमी पडल्याने नुसते शेतकरीच नाही, तर सामान्य लोकांचंही जीवन कठीण होईल. अन्नधान्याच्या किमती वाढतील, जलस्रोत कमी होतील, शेतीला धोका येईल, आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका लागू शकतो. विशेषतः जिथे आधीच पाण्याचा तुटवडा आहे, तिथे परिस्थिती अजून बिकट होईल. आशिया-पॅसिफिक हवामान केंद्रानेही (एपीसीसी) जुलै २०२६ मध्ये ‘एल-नीनो’ सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजे हा धोका एकदा नाही, तर अनेक हवामान संस्था आणि तज्ज्ञ मान्य करत आहेत. त्यामुळे यंदा हवामान विभागाला आणि प्रशासनाला सजग राहून योग्य नियोजन करावं लागणार आहे.
तज्ज्ञांनी सुद्धा लोकांना आणि शेतकऱ्यांना यासाठी तयारी करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारी यंत्रणांनी जलसाठा वाढवण्याच्या योजना राबवाव्यात, पाणी बचतीवर भर द्यावा आणि शेतीसाठी नवी पद्धत आणावी, असं म्हणतात.
तज्ज्ञ काय म्हणतात...
- पाणी बचत करणं खूप गरजेचं आहे.
- शेतकऱ्यांनी पिकांची योग्य निवड करावी.
- प्रशासनने जलसाठा, धरणं आणि पाण्याच्या व्यवस्था सुधाराव्या.
- लोकांनीही या बदलांकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे.
मान्सून म्हणजे आपल्या देशाचा आधारस्तंभ. पण जर ‘एल-नीनो’ सक्रिय झाला, तर आपण त्याच्या परिणामांना तोंड द्यायला तयार असायला हवं. वेळेत तयारी करून आपण या संकटातून नक्कीच बाहेर पडू शकतो. पण तयारीशिवाय आपण मोठ्या संकटात सापडण्याचा धोका आहे.

स्कायमेट वेदरचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत यांनी सांगितले की, पावसाचे प्रमाणच कमी होणार नाही, तर यंदा मान्सूनची सुरुवातही रखडण्याची शक्यता आहे. साधारणपणे एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा काही दिवस लांबणीवर पडू शकतो. जर मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला, तर त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर होईल. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते. दरम्यान, हा स्कायमेटचा प्राथमिक अंदाज आहे. वसंत ऋतूमध्ये हवामानाचे मॉडल्स काही प्रमाणात त्रुटी दाखवू शकतात. एप्रिल महिन्यात भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आपला अधिकृत अंदाज जाहीर करेल, त्यावेळी परिस्थिती अधिक समोर येईल.






