तुम्हाला माहिती आहे का की जगात दर वर्षी लाखो लोकांना मेनोपॉजचा (रजोनिवृत्ती) सामना करावा लागतो? मेनोपॉज अशी एक स्थिती आहे की ज्यावर फार कमी चर्चा होते आणि तिच्याविषयीची समजही कमी आहे. ज्यांना मासिक पाळी येते त्या लोकांमधील एक नैसर्गिक बदल म्हणजे मेनोपॉज. या बदलात शारिरीक आणि मानसिक प्रभाव पडतो आणि त्रास वाढला तर त्यावर उपचारही आहेत.
सध्याच्या भांडवलशाही काळात बाजाराची ही एक सकारात्मकता म्हणता येईल किंवा लाभ कमावण्याची शर्यतही की दुर्लक्षित गोष्टींकडे तसेच पारंपरिक विचारांना मागे टाकत या विषयाला समोर आणत यावर चर्चा केली जात आहेत.
डॉक्टरांपासून ते मासिक पाळी असणाऱ्या लोकांपर्यंत मेनोपॉजविषयीची चर्चा फारच कमी केली जाते. अमेरिकेत केवळ 20 टक्के स्त्रीरोगतज्ञ मेनोपॉजविषयीचं प्रशिक्षण घेतात. त्यामुळे मूळातच अनेक डॉक्टरांकडे याविषयावर निदान आणि उपचार करण्याचं प्रशिक्षणच नसतं. मेनोपॉज होणाऱ्या लोकांपुढे कमी पर्याय आणि मदतीचे मार्ग उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज यांचा सामना करणं आव्हानात्मक असतं.
त्यामुळे त्यांच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यावर चांगलाच प्रभाव पडतो. अमेरिकेतील एका अभ्यासातून असं आढळलंय की 10 पैकी 4 स्त्रियांचं म्हणणं होतं की, मेनोपॉजमुळे त्यांच्या कामाचं प्रदर्शन तसेच उत्पादकतेवर काही प्रमाणात तरी प्रभाव पडतो. 17 टक्के स्त्रियांनी म्हटलंय की मेनोपॉजमुळे त्यांनी नोकरी सोडली किंवा सोडण्याच्या विचार करत आहेत.


ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार मेनोपॉजच्या कारणामुळे जगभर उत्पादकता नुकसान आणि आरोग्यावरील खर्च 150 अब्ज डॉलर्स असतो. मेनोपॉजमुळे लोकांच्या भावना बदलत राहतात, योनीत कोरडेपणा येतो, शरीरात उष्णता वाढते, झोप नीट होत नाही, केस गळती होणे अशा समस्या वाढतात. जगभरात 2025 पर्यंत 1.1 अब्ज लोकांना पोस्ट मेनोपॉज प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. मागील काही वर्षांत मेनोपॉजसंबंधी उत्पादनांच्या कंपन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
अनेक नव्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. मेनोपॉज काळात घेण्यासाठी म्हणून न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि इतर उत्पादनं तयार केली जात आहेत. यातून मेनोपॉज केयर मार्केटचाही विस्तार होत आहे. तो केवळ थेरपी, मेन्स्ट्रुअल वेलनेस आणि केयर इतकाच मर्यादित नाही. मेनोपॉज उत्पादनं आणि थेरपीसाठी लागणारी औषधी यांचाही बाजार वाढत आहे. मेनोपॉज टेस्टिंग किट, मेनोपॉज सप्लिमेंट्स, मेनोपॉज स्किन-केयर, मेनोपॉज डाएट, मेनोपॉज ब्रेसलेट फॉर हॉट फ्लॅश रिलिफ, मेनोपॉज हेयर केयर अशी विविध उत्पादनं बाजारात येत आहेत.
हा बाजार पुढे आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. 2033 पर्यंत तो 17.33 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. वाढती लोकसंख्या, वाढती सजगता, तंत्रज्ञानातील विकास आणि आरोग्यावरील खर्च इत्यादींनी प्रेरित असलेला बाजार आता मेनोपॉजसाठीही तयार होत आहे. मेनोपॉजविषयी वाढती चर्चा होत असल्यामुळे लोकही आता चांगल्या उपचारांच्या पर्यायांच्या शोधात आहेत.
मेनोपॉज असलेल्या लोकांची संख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे याच्या औषधींचा बाजारही वाढत आहे. एलॉय आणि एवरनाव यांच्यासारख्या हेल्थ स्टार्टअप्स तसेच स्ट्राईप्ससारख्या सेलिब्रिटी समर्थित ब्रँड्समध्ये मेनोपॉजविषयी गुंतवणूक केली जात आहे.
फंडींग आणि सामाजिक जागरूकता यामुळे ब्रँड्स याविषयी विचार करू लागले आहेत आणि त्यांच्या चांगल्या योजनांमुळे यातली स्पर्धा देखील वाढली आहे. यातूनच या उत्पादनांची निर्मिती, प्रचार, सादरीकरण यातही सुधारणा होत आहेत. पूर्वीच्या तुलनेत याचं मार्केटिंगही वेगळ्या पद्धतीनं केलं जातंय. पूर्वी याला बरा होणारा आजार समजलं जायचं आणि मार्केटिंग पूर्णपणे लैंगिक परंपरांवर आधारीत होतं. आता तसं नाही.
वूमनेस या ब्रँड समूहाने आपल्या जुन्या जाहिराती यामुळेच नव्या पद्धतीने तयार केल्या आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की या उद्योगात आता किती बदल झाले आहेत. काही ब्रँड्स यात सातत्यानं मार्गक्रमण करत आहेत. माल्टेअर्स, हॉलँड आणि बॅरेटने मी.नी. पॉज या जाहिरात अभियानातून टीएफएल 2019 ची स्पर्धा जिंकली होती. टेना नावाच्या ब्रँडने मध्य पूर्व भागातील देशांमध्ये मेनोपॉज समजांना आव्हान देणारी जाहिरात तयार केली.
इथं मेनोपॉजसाठी जो अरबी शब्द आहे त्याचा अर्थ निराशेचं युग असा होतो. पण टेनाने याविरोधात प्रचार केलाय की ही दूर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही आणि यात त्या एकट्या नाहीत.
मेनोपॉज म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर जगण्याचा नवा अध्याय आहे. काही कंपन्या हाच विचार त्यांच्या विक्रीसाठीही वापरत आहेत. मेनोपॉजची वाढती चर्चा पाहून अनेक कंपन्या युरोपात मेनोपॉजचा समावेश असलेली धोरणं तयार करत आहेत. मागच्या सप्टेंबर महिन्यात डेव्हिड मॅककिनले आणि सिंडी एक्स यांनी मेनोपॉज रिसर्च सादर करत, 2023-24 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये 100 मिलियन डॉलर्सची गुंवतणूक करण्याची घोषणा केली होती.


मेनोपॉजच्या मार्केटींगमध्ये फॅमटेक कंपन्याही सक्रिय आहेत. एका अहवालानुसार, फिमेल फाऊंडर्स फंडच्या एक गुंतवणूकदार एड्रियाना सॅमनिगो यांनी मागील वर्षी क्रंचबेस न्यूजला सांगितलं होतं की केवळ 5 टक्के फॅमटेक कंपन्या मेनोपॉज उत्पादनांत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक मोठी संधी आहे. प्रजनन क्षमता नऊ महिन्यांची असते तर मेनोपॉज याहून जास्त काळ टिकतो. बाजारात आता मेनोपॉज केयरशी संबंधीत उत्पादनं मोठ्या संख्येनं येत आहेत.
ब्रँड आणि मार्केटींग विविध प्रकारे जगण्यातील या एका पर्वाला सुखकर करण्यासाठी काम करत आहेत. पण यासोबतच वास्तवाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. इतिहासापासून वर्तमानकाळापर्यंत पाहिलं तर लक्षात येतं की प्रजनन आरोग्य आणि स्त्री-आरोग्याशी संबंधित गोष्टींबाबत बाजारात लैंगिकवादाचा आधार आहे. कंपन्या केवळ फायदा कमावण्यासाठी यात उतरतील तर यातून केवळ बाजार वाढेल पण अनारोग्य आणि वाईट प्रथा नष्ट करण्याचा मुद्दा मात्र मागेच राहिल.
अनुवाद - प्रतिक पुरी






