अलमिना खातून
- गरिबीच्या सावलीतून उदयास आलेल्या झारखंडच्या अनुष्का कुमारीने अवघ्या १४ व्या वर्षी टॉप गोल स्कोरर होऊन इतिहास रचला.
- दिहाडी मजूर कुटुंबातील ही मुलगी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित झाली आहे.
- ‘गोल मशीन’ या नावाने साऱ्या पंचक्रोशीत नाव दुमदुमतयं.
२०२२ च्या उन्हाळ्यातली ती एक दुपार… शाळेचे दप्तर खांद्यावर अडकवून अकरा वर्षांची अनुष्का कुमारी नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. रुक्का मुंडा टोली, झारखंडमधलं एक लहानसं आदिवासी गाव. शाळेतून घरी जाण्याच्या वाटेत एक मोकळं मैदान लागतं. खरं तर त्याला ‘मैदान’ म्हणणंही जरा जास्तच; रुक्ष जमीन, सगळीकडे दगडांचे तुकडे पडलेले, गवताचे तुरळक तुकडे. इथेच गावातली काही मुलं रोज फुटबॉल खेळायची…
अनुष्का या वाटेने याआधीही कित्येकदा गेली होती. मुलांना खेळताना पाहिलं होतं. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं… ती थांबली.
मुलं धावत होती. कोणी पास देत होतं, कोणी चुकत होतं आणि जेव्हा एखादा गोल व्हायचा, तेव्हा आनंदाचा जल्लोष व्हायचा, जणू त्या खडबडीत मैदानावर क्षणभर सगळं दु:ख विसरलं जात होतं.
अनुष्का म्हणते,
“मी फक्त उभी राहून पाहत होते. ते किती मन लावून खेळत होते, किती खुश होते… आणि अचानक मला वाटलं, मलाही हेच हवं आहे.”
दुसऱ्या दिवशी ती पुन्हा मैदानाजवळ थांबली. यावेळी पाहण्यासाठी नाही, तर खेळण्यासाठी. सुरुवातीला मुलांना वाटलं, ही मुलगी दोन-चार दिवस येईल आणि निघून जाईल. पण अनुष्का तशी नव्हती. अनवाणी पायाने, पूर्ण ताकदीने फुटबॉलला किक मारणारी, धावताना दम न लागणारी. पहिल्याच दिवशी तिने सणसणीत गोल केला.
खबरदार पुन्हा असले कपडे घातलेस तर बघ आणि फुटबॉल खेळलीस तर…?
तेथून तिचं रोजचं वेळापत्रक बदललं. शाळा सुटली की थेट मैदान. त्यामुळे घरी पोहोचायला उशीर होऊ लागला आणि मग घरात वादळ उठलं…
गावात लगेचच बातमी पसरली. एक मुलगी चक्क मुलांसोबत फुटबॉल खेळतेय. शॉर्ट्स घालतेय. आई रागारागाने मैदानावर गेली. अनुष्काला हाताला धरून घरी आणलं. कडक शब्दांत बजावलं, पुन्हा असले कपडे घातलेस तर बघ आणि खबरदार यापुढे फुटबॉल खेळलीस तर…? तिच्या भावांनीही आक्षेप घेतला. “खेळताना तिला काही लागलं तर?”
“उद्या लग्न कोण करेल?”
‘लोक काय म्हणतील’ हा प्रश्न घरात घुमू लागला.
पण मैदानावरची अनुष्का वेगळी होती. तिथे टोमणे नव्हते, प्रश्न नव्हते… तिथे होता फक्त फुटबॉल गोल आणि मोकळा श्वास…
तीन वर्षांत १४ वर्षांची अनुष्का फक्त तिच्या रुक्का गावाचीच नव्हे तर सबंध झारखंडची एका स्टार फुटबॉलपटू बनली आहे. राष्ट्रीय स्तरावर तिची अतिशय वेगात घोडदौड सुरू असून त्यासबोतच तिला एक टोपण नावाने ओळखलं जातयं… द गोल मशिन!
अनुष्काचं छोटंसं घर, दोन खोल्या. एक स्वयंपाकघर, दुसऱ्या खोतील तिचं सगळं कुटुंब. एका कोपऱ्यातल्या शेल्फवर कपडे आणि त्यातच अनुष्काची थोडीशी जागा. मेडल्स, ट्रॉफ्या, सर्टिफिकेट्स. एक लोखंडी पेटी, ज्यात कधीकाळी नवीन कपडे ठेवले जात, आज त्या ट्रंकमध्ये तिची जर्सी आणि फुटबॉल शूज ठेवले आहेत.
ती हसत सांगते,
“जी माझी आई हातात चप्पल घेऊन माझ्यामागे धावत होती, तीच आज माझे बूट जपून ठेवते.”
हा बदल एका दिवसात झाला नाही… गावाबाहेर कुणीतरी वेगळं पाहिलं, तिची जिद्द.
हजारीबागच्या रेसिडेन्शियल गर्ल्स फुटबॉल सेंटरच्या प्रशिक्षक सोनी कुमारी यांची अनुष्काशी भेट झाली. त्यांनी आधी पालकांशी वाद घालण्याऐवजी अनुष्काशीच बोलणं पसंत केलं.
“घरात भांडू नकोस,” त्यांनी सांगितलं, “तुझा खेळच सगळं बोलेल.”
… आणि सुरू झाला गोल मशीन बनण्यापर्यंतचा संघर्ष
अनुष्काने ते शब्द अक्षरशः जगले. शाळेच्या स्पोर्ट्स डे मध्ये तिने धावण्याच्या शर्यती जिंकल्या. शाळेच्या फुटबॉल टीमने सामने जिंकले. हळूहळू घरातली चर्चा बदलू लागली. १२ व्या वर्षी अनुष्का हजारीबागच्या सेंटरमध्ये दाखल झाली. हॉस्टेल, शाळा, रोजचा सराव आणि स्वप्नाला मिळणारी नवी दिशा.
तिथूनच तिचा झपाट्याने वरचा प्रवास सुरू झाला. सब-ज्युनिअर नॅशनल, स्काउट्स, नेशनल कॅम्प. २०२४ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या SAFF अंडर-१६ महिला स्पर्धेत १३ वर्षांची अनुष्का भारताच्या निळ्या जर्सीत उतरली. प्रत्येक सामन्यात गोल. पाच गोलांसह टॉप स्कोरर.
२०२५ मध्ये भूतान. अंडर-१७ SAFF स्पर्धा… आठ गोल. फायनलमध्ये अवघ्या १९ मिनिटांत हॅट्ट्रिक. भारताचा ८–० विजय. फक्त सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत दहा गोल, म्हणूनच आज तिचं नाव घेतलं जातं,
‘गोल मशीन’.
२६ डिसेंबरला राष्ट्रपती भवनात तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळतो. पण पुरस्काराच्या चमकदार क्षणांपलीकडे तिचं आयुष्य अजूनही कष्टाचंच आहे. आजही ती भावासोबत आणि आईसोबत नवीन घर बांधायला मदत करते. वडील आजारी आहेत. आई मजुरी करते. राज्य सरकार साहित्य देतं, पण घर उभं राहण्यासाठी लागणारी मेहनत तिचीच आहे.
‘’फुटबॉलसाठी मी सगळं काही दिलं, खेळण्यासाठी समाजाशी दोन हात केले इतकचं काय तर कुटुंबाच्या विरुद्धही गेले. आता फुटबॉल हीच माझी ओळख आहे आणि त्यातूनच मला आनंद मिळतो’’ असं सांगून अनुष्का आपल्या भावाच्या हातून फावडा घेते आणि घरासमोर खणलेल्या खड्ड्यांमध्ये सिमेंट भरते.
जगभरातील बहुतांश मुलं लिओनेल मेसी किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो यांसारख्या जागतिक फुटबॉलपटूंना आदर्श मानत मोठी होतात. पण अनुष्काच्या स्वप्नांना दिशा देणारे नायक दूरदेशी नव्हते. तिचे फुटबॉल हिरो होते, तिच्याच मोहल्ल्यात रोज संध्याकाळी धावत, घाम गाळत खेळणारी ती मुलं.
आई-वडील आजही दिहाडी मजदूर
त्यातलाच एक होता वीस वर्षांचा सचिन…“आम्हाला वाटलं होतं, ही मुलगी दोन-चार दिवस येईल आणि मग आपोआपच खेळणं सोडून देईल,” सचिन हसत सांगतो. “पण तसं काहीच झालं नाही. उलट, एक दिवस ती मैदानावर दिसेनाशी झाली आणि थोड्याच काळात आम्ही तिला राष्ट्रीय पातळीवर खेळताना पाहिलं.”
सचिन त्या मुलांपैकीच एक, ज्यांच्यासोबत अनुष्का सुरुवातीला मैदानात खेळायची. पहिल्याच दिवशी ती त्याच्या लक्षात भरली होती. अकरा वर्षांची, अनवाणी , संपूर्ण ताकद एकवटून चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न करणारी ती मुलगी, अगदी तसंच, जसं ती मुलांना करताना पाहत होती. आणि त्या पहिल्याच प्रयत्नात तिने गोल केला होता.
आज सचिन आपल्या मोबाईलवर अनुष्काच्या इंस्टाग्राम रील्स दाखवतो.
“आता ती फक्त या गावाची नाही,” तो अभिमानाने म्हणतो, “ती संपूर्ण देशाची नायिका आहे. आधी आम्ही तिला मैदानावर खेळताना पाहायचो. आता आम्ही तिला स्क्रीनवर पाहतो.”
दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर, २०२४ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या साउथ एशियन फुटबॉल फेडरेशन (SAFF) अंडर-१६ महिला चॅम्पियनशिपमध्ये अनुष्काने प्रथमच भारताची निळी जर्सी अंगावर चढवली. तेव्हा तिचं वय अवघं तेरा वर्षांचं होतं. पण मैदानावर तिचं खेळणं वयाच्या चौकटीत बसणारं नव्हतं. त्या स्पर्धेत तिने प्रत्येक सामन्यात गोल केला आणि पाच गोलांसह संयुक्तपणे टॉप स्कोरर ठरली.
भारतासाठी खेळण्याचा क्षण अनुष्कासाठी केवळ एक सामना नव्हता, तर स्वप्नाचा साकार होणारा टप्पा होता. “भारतासाठी खेळणं हे कोणत्याही खेळाडूचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं,” ती म्हणते. “ट्रायलला शेकडो खेळाडू येतात आणि मोजकेच निवडले जातात. त्या टीमचा भाग होणं आणि अशा पद्धतीने जिंकणं… हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं.”
सुरुवातीला अनुष्काची भूमिका आक्रमक मिडफिल्डरची होती. तिची वेगवान धाव, बॉलवरची पकड आणि अचूक पास, हे सगळं परफेक्ट होतं. पण जसजशी ती राज्य आणि राष्ट्रीय वयोगटातील संघांमध्ये पुढे सरकत गेली, तसतसं प्रशिक्षकांनी तिला गोलच्या अधिक जवळ खेळवायला सुरुवात केली. हळूहळू अनुष्का स्ट्रायकर बनली. डिफेंडर्सवर सतत दबाव टाकणारी, बॅकलाइनच्या मागे अचूक धाव घेणारी आणि मिळालेल्या संधीचं आत्मविश्वासाने गोलमध्ये रूपांतर करणारी.
तिच्या कोच सोनी कुमारी सांगतात, ती संघात वयाने सगळ्यात लहान आणि उंचीनेही कमी आहे. पण तिची ताकद दुर्लक्षित करता येत नाही. ती ज्या प्रकारे बॉलला फटका मारते, त्यातून गोल होतो, हेच तिचं वैशिष्ट्य आहे.”
मैदानावरचे सामने संपले तरी हजारीबागच्या ट्रेनिंग सेंटरवर अनुष्काचं लक्ष ढळत नाही. सराव सत्रानंतर अनेकदा कनिष्ठ खेळाडू, कधी कधी वरिष्ठही, तिच्याशी बोलायला येतात. कुणी अभिनंदन करतो, तर कुणी खेळातील डावपेचांवर चर्चा करतो.
अंडर-१७ संघातील तिची सहकारी सुचिता म्हणते,“आता खूप मुलींना अनुष्कासारखं व्हायचं आहे. आम्हालाही तेच करायचं आहे, जसं तिने केलं. आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटावा, असं काहीतरी.”
ज्या अनुष्काला प्रशिक्षणासाठी आपलं गाव सोडावं लागलं, तिच्याच प्रेरणेतून आता इतर मुलींना तोच मार्ग घ्यावा लागणार नाही. लवकरच रुक्का गावात एक प्रशिक्षण स्पोर्ट्स ग्राउंड उभारलं जाणार आहे, जिथे स्वप्नं घराजवळच आकार घेऊ शकतील.
ओरमांझीचे झोनल अधिकारी उज्ज्वल सोरेन सांगतात, “आपल्या आसपास अनेक अनुष्का आहेत, पण मूलभूत सुविधा नसल्यामुळे त्यांची प्रतिभा पुढे येत नाही. अनुष्काने इतर मुली आणि तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. हे ट्रेनिंग ग्राउंड त्यांना पुढे जाण्यास मदत करेल.”
निळी जर्सी. नंबर सात. आणि प्रत्येक मैदानावर भारतासाठी गोल
जेव्हा तिला तिच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूबद्दल विचारलं जातं, तेव्हा अनुष्का कोणत्याही जागतिक सुपरस्टारचं नाव घेत नाही. ती लेन लेस्टनला फॉलो करते. अमेरिकन कॉलेज सॉकर आणि युथ क्लब्समध्ये खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडू.
“तो फार प्रसिद्ध नाही,” अनुष्का सांगते, “पण मला मैदानावर त्याची हालचाल आणि नेतृत्व पाहायला आवडतं. एक दिवस तो प्रसिद्ध होईल, आणि तेव्हा मी सगळ्यांना सांगेन, मी त्याला सुरुवातीपासून फॉलो करत होते.”
अनुष्काचं स्वप्न ठरलेलं आहे. सीनियर नॅशनल टीम. निळी जर्सी. नंबर सात. आणि प्रत्येक मैदानावर भारतासाठी गोल.
नवीन घराच्या एका भिंतीकडे पाहत ती म्हणते,
“इथे माझी ड्रीम वॉल असेल. माझी सगळी ओळख. मग मला कुणाला सांगावं लागणार नाही, मी कुठून आले आहे.”
(सौजन्य - द प्रिंट)






