'खाकी वर्दी हा आमचा रोजगार नाही, तर तो आमचा अभिमान आहे..' पुण्याच्या शेख कुटुंबाचे हे ब्रीदवाक्य… ते अशासाठी की अगदी ब्रिटिशांच्या काळापासून ते आतापर्यंत अशा 108 वर्षांच्या कालावधीत या शेख कुटुंबातील तब्बल 26 जणांनी पोलिसांची सेवा बजावली आहे आणि सध्या या शेख कुटुंबाची पाचवी पिढी पोलीस खात्यात कार्यरत आहे. पोलीस सुभेदार,पोलीस उपअधीक्षक,बॅंडपथक अधिकारी,गुप्तचर विभाग,रेल्वे पोलीस,ग्रामीण पोलीस,जेलर,गुन्हे शाखा,सायबर क्राईम अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये शेख कुटुंबातील व्यक्तींनी काम केलं आहे.
पुण्याच्या शुक्रवार पेठ परिसरात राहणारे पाचव्या पिढीतील सोहेल शेख पुण्याच्या खडकवासला पोलीस मुख्यालयात नाईकपदावर आहेत. ते सांगतात, 'गेल्या चारशे वर्षांपासून आमच्या कुटूंबाच्या 14 पिढ्या पुण्यातच आहेत. पहिल्या पिढीतील हजरत चिमणशहा हे पुण्यातील पर्वती गावठाणात राहणारे सुफी संत होते. त्यांचा मुलगा काझी हैदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात वकील होते. ते फारसी आणि उर्दू कागद्पत्रांचं मराठीत भाषांतर करायचे. तसेच शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर मुस्लिम समाजातील भांडण सोडवणे, मुस्लिम बांधवांकडून जुम्माची नमाज अदा करून घेणे ही काम नेमून दिली होती. पेशव्यांच्या काळातही आमचे शेख कुटूंब धार्मिक कामांमध्ये सक्रिय होत.'
आपल्या 14 पिढ्यांच्या कामाचे आणि त्यांना मिळालेल्या इनामाचे व्यवस्थित संग्रह शेख कुटुंबाने केले आहे. या संदर्भातील शेकडो फोटो आणि दोनशेपेक्षा जास्त कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
पोलीस सेवा बजावत असतानाच वर्षानुवर्षे चालत आलेलं सुफी परंपरेच्या शिकवणूकीचे कामही शेख कुटुंबिय करतात. धर्माचा योग्य अभ्यास आणि त्याचे संशोधन करून लोकांना मानवतेचा संदेश देण्याचे काम त्यांना महत्वाचं वाटतं. सोहेल शेख सांगतात की, आमच्या कुटुंबियातील प्रत्येक मुलाला वा मुलीला या खाकी वर्दीचे एक आकर्षण आहे. अध्यात्मिक मार्ग आणि देशसेवा हेच आमच्या कुटुंबियांचे ध्येय आहे.
या आहेत शेख कुटुंबाच्या पोलीस सेवेतील पाच पिढ्या
पहिली पिढी - शेख कुटूंबाच्या पोलीस सेवेची सुरुवात काझी निजाम शेख यांच्यापासून झाली. निजाम काझी हे 1832 मध्ये ब्रिटिशांच्या काळात पोलीस दलात दाखल झाले. पुणे पोलिसांच्या तोफखाना आणि घोडदळ विभागाचे प्रमुख होते. 1885 मध्ये 23 वर्षाच्या सेवेनंतर शनिवार वाड्यातल्या एका समारंभात त्यांना सुभेदार म्हणून नियुक्ती मिळाली. काझी निजाम शेख हे ब्रिटिश राजवटीचे पुण्यातले पहिले पोलीस सुभेदार होते.
दुसरी पिढी - काझी निझाम शेख यांच्यानंतर त्यांचा मुलगा करीम शेख हे पोलीसदलात दाखल झाले. करीम शेख यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी इंग्लंडचे राजे सहावे जॉर्ज आणि राणी एलिझाबेथ यांच्याकडून पदक मिळालं होतं.
तिसरी पिढी - करीम शेख यांच्यानंतर त्यांची सात मुलं पोलीस दलात भरती झाली. अहमद शेख, इब्राहिम शेख, अब्दुल शेख, रहीम शेख, भाईमिया शेख, दादामिया शेख, मोहम्मद शेख. हे सातजण अर्धा काळ ब्रिटिश राजवटीत होते आणि त्यानंतर स्वतंत्र भारतात पोलीस म्हणून कार्यरत होते. या सात मुलांपैकी इब्राहिम शेख पोलिसात मुख्य कवायत निरीक्षक होते. तसेच पुणे पोलीस हॉकी संघाचे कर्णधार होते. पुण्यामध्ये मोहम्मद शेख हे पोलीस निरीक्षक होते. तसेच ते पुण्याच्या गुप्तचर विभाग मुस्लिम शाखेचे प्रमुखही होते. इतर पाचजण तीस ते पस्तीस वर्ष पोलीस सेवेत होते. त्यांनी बँड पथकप्रमुख,गुन्हेगारांना शोधणं,न्यायालयाच्या कामात मदत करणं. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
चौथी पिढी - मोहम्मद शेख हे तिसऱ्या पिढीतील. यांना नऊ मुलं होती. यापैकी सात मुलांनी पोलीस दलात वेगवेगळ्या पदावर काम केलं.मोहम्मद शेख यांच्या सात मुलांपैकी युसूफ शेख यांनी पोलीस मुख्यालयात कंपनी कमांडर पदावर काम केलं.तसेच त्यांनी बॅंडपथक प्रमुख म्हणूनही काम केलं.
युसूफ शेख यांचे भाऊ रझ्झाक शेख यांनी अनेक पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिलं. पुणे,अमरावती, सोलापूर, औरंगाबाद,नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे. रझ्झाक शेख यांनी मुंबई पोलिसांच्या श्वानपथकातल्या जंजीर कुत्र्याला प्रशिक्षित करण्याचं काम केलं होतं. सध्या रझ्झाक शेख निवृत्त झाले आहेत. ते मुंबई गुन्हे शाखेच्या उपयुक्तपदावरून निवृत्त झाले.
शमशुद्दीन शेख हे युसूफ शेख आणि ,रझ्झाक शेख यांचे लहान भाऊ. शमशुद्दीन शेख पुणे पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षक होते. त्यांनी अनेक वर्ष गुन्हेगारांना कोर्टात आणण्याची, सुनावणीनंतर त्यांना तुरुंगात नेण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
शमशुद्दीन शेख यांच्याकडे पुण्यात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यातल्या जक्कल,सुतार आणि इतर आरोपींना कोर्टात हजर करण्याची जबाबदारी होती.
युसूफ, रझ्झाक, शमशुद्दीन या तीन भावांव्यतिरिक्त इस्माईल शेख, अजीज शेख,हसन शेख,फिरोज शेख,शाकीर शेख यांनी पोलीस सेवेत योगदान दिलं. यापैकी फिरोज शेख सध्या वायरलेस विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहेत.
पाचवी पिढी - युसूफ शेख यांचा मुलगा शाहिद शेख सध्या सहाय्य्क पोलीस फौजदारआहेत. ते वाहनचोरी विभागात काम करतात. अजीज शेख यांचा मुलगा सलमान शेख खडक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून काम करतात. फिरोज शेख यांचा मुलगा शाहरुख सायबर क्राईम विभागात आणि शमशुद्दीन यांचा मुलगा सोहेल शेख पोलीस मुख्यालयात नाईकपदावर आहेत.
एवढंच नाही तर त्यांच्या मुलींची मुलं देखील पोलीस दलात आहेत. तिसऱ्या पिढीतील मोहम्मद शेख यांच्या तीन मुलींची तीन मुलं सध्या पोलीस दलात आहेत. मोहम्मद शेख यांना नूरजहाँ,जमीला,रझिया या तीन मुली. त्यातील नूरजहाँ यांचा एक मुलगा अरिफ इनामदार रेल्वे पोलिसात हेड कॉन्स्टेबल आणि दुसरा मुलगा रौफ इनामदार नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षक आहेत. जमीला यांचा मुलगा इम्रान दहशतवादीविरोधी पथकात काम करत आहे. तसेच मोहम्मद शेख यांची तिसरी मुलगी रझिया यांचा मुलगा बाबा काझी केंद्रीय राखीव पोलीस दलातून निवृत्त झाले असून ते सध्या मुंबईत फायरब्रिगेड अधिकारी आहेत.
शेख कुटूंबीयांनी 160 वर्ष कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात योगदान दिलं आहे. पिढ्यानपिढ्या पोलीस सेवेत योगदान दिलेल्या कुटूंबातील सोहेल शेख सांगतात,'खाकी वर्दी आमचा रोजगार नाही, तो आमचा अभिमान आहे.'image widget






