विठ्ठल साबळे
- भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे ‘फलज्योतिषा’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
- राज्याच्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या सुरुवातीच्या मसुद्यात फलज्योतिषाचा समावेश होता, परंतु व्यापक सहमतीच्या नावाखाली तो नंतर वगळण्यात आला.
- गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्रात या कायद्यांतर्गत अंदाजे २००० गुन्हे दाखल झाले असून, फलज्योतिषाला कायदेशीर चौकटीत आणल्याशिवाय ही लूट थांबणार नाही.
नको नको रे ज्योतिषा।
माझ्या दारी नको येऊ।
माझे दैव मला कळे।
माझा हात नको पाहू॥१
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह।
तळहाताच्या रेघोट्या।
बापा नको मारू थापा।
अशा उगा खऱ्या खोट्या॥२
ही कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची… अशा खणखणीत शब्दांत दारी आलेल्या ज्योतिष्याला त्यांनी हाकललंय....
एकविसाव्या शतकात भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आकाश गाठत असताना, लोकांचं मन मात्र अजूनही अंधश्रद्धेच्या सावटाखाली अडकलेलं आहे.. आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करत नवा इतिहास घडवला, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र मोहिमा हाती घेतल्या. मात्र, याच विज्ञानाच्या युगात मानवी मन अजूनही नशिबाच्या आणि ग्रहांच्या अदृश्य साखळदंडांनी जखडलेलं आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं, फुले-शाहू-आंबेडकरांचं आणि विज्ञानाचं संस्कार लाभलेले राज्य आहे, म्हणूनच या राज्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि त्यांच्या बलिदानानंतर २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येऊ शकला. हा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलं. अघोरी प्रथांवर बंदी आली, पण 'फलज्योतिषा'च्या नावाखाली होणारी अधिकृत लूट या कायद्याच्या कक्षेत का नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे ‘फलज्योतिषा’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
जेव्हा आपण फलज्योतिष आणि अंधश्रद्धेबद्दल बोलतो, तेव्हा भोंदू अशोक खरात सारखं प्रकरण समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी पुरेसं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणामुळे हे सिद्ध झाले की, अंधश्रद्धेचा शेवट किती अघोरी असू शकतो. स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या खरातने दैवी शक्ती आणि अलौकिक प्रभाव यांचा आधार घेत अनेक सुशिक्षित कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केल. या प्रकरणात केवळ आर्थिक लूटच नाही, तर जादूटोणा आणि अघोरी कृत्यांच्या माध्यमातून मानवी जीवनाशी खेळ केला गेला.
खरातवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटकही झाली. पण मूळ प्रश्न हा आहे की, खरातसारखे भोंदू लोक आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी 'फलज्योतिषाचा' आधार घेतात. तुमच्यावर कुणीतरी करणी केली आहे किंवा तुमचा मंगळ तुम्हाला संपवेल असे सांगून भीती घातली जाते. जर फलज्योतिषावर सुरुवातीलाच कायदेशीर निर्बंध असते, तर खरातसारख्या प्रवृत्तींना आपले पाय पसरता आले नसते.

'बाईमाणूस'शी बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर सांगतात की,
जादूटोणा विरोधी कायद्याच्या सुरुवातीच्या मसुद्यात फलज्योतिषाचा समावेश होता, परंतु व्यापक सहमतीच्या नावाखाली तो नंतर वगळण्यात आला. अशोक खरातसारख्या प्रकरणांकडे पाहिल्यास असं लक्षात येतं की, भोंदूगिरीची सुरुवात ही ज्योतिषापासूनच होते आणि पुढे त्याचे रूपांतर तंत्र-मंत्र आणि अघोरी कृत्यात होते. ज्योतिष स्वतःला 'कलाकार' म्हणवून घेत असला, तरी प्रत्यक्षात तो लोकांच्या आयुष्यातील सर्व समस्यांवर तोडगे सुचवण्याचे दावे करतो, जी शुद्ध फसवणूक आहे. जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचा समावेश का होत नाही, यावर बोलताना हमीद दाभोलकर सडेतोड मत व्यक्त करतात. ते म्हणतात की, "देशातील प्रमुख वृत्तपत्रे आणि राजकारणी या दोघांचाही या मोठ्या मार्केटला आणि हितसंबंधांना पाठिंबा आहे. आज आपण विज्ञानाच्या युगात पुढे जाण्याऐवजी उलट्या पावलांचा प्रवास करत आहोत. शालेय अभ्यासक्रमात वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याऐवजी उच्च शिक्षणात ज्योतिषासारखे विषय समाविष्ट केले जात आहेत, हे चिंताजनक आहे."गेल्या १२ वर्षांत महाराष्ट्रात या कायद्यांतर्गत अंदाजे २००० गुन्हे दाखल झाले असून, फलज्योतिषाला कायदेशीर चौकटीत आणल्याशिवाय ही लूट थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांच्या मते, अशोक खरात प्रकरण हे एखाद्या एकट्या व्यक्तीपुरते मर्यादित नसून, भोंदूगिरीच्या संघटित पद्धतीचे उदाहरण आहे. स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन अशी ओळख देत, उच्चभ्रू आणि राजकीय वर्तुळाशी संबंध असल्याची प्रतिमा निर्माण केली जाते आणि त्यातून सामान्य लोकांमध्ये विश्वासार्हता मिळवली जाते. अशा व्यक्तींच्या दारी सुशिक्षित आणि प्रभावशाली लोकांची उपस्थिती हीच त्यांच्या प्रभावाची मोठी कारणे ठरतात. या विश्वासाच्या आधारावर लोक त्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू लागतात आणि त्यातून आर्थिक तसेच वैयक्तिक शोषणाच्या घटना घडू लागतात. या प्रकारात अध्यात्म, भविष्यकथन आणि वैयक्तिक अडचणींचा फायदा घेत लोकांना मानसिकदृष्ट्या बांधून ठेवले जाते, आणि याच साखळीतून भोंदूगिरीचा विस्तार होत जातो.
खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यांच्यात नेमका फरक काय?
फलज्योतिष म्हणजे अवकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा मानवी जीवनावर आणि भविष्यातील घटनांवर परिणाम होतो, असा दावा करणारी एक पद्धत होय.. येथे खगोलशास्त्र आणि फलज्योतिष यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. खगोलशास्त्र हे पुराव्यांवर आणि गणितावर आधारित विज्ञान आहे, तर फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक समजूतीवर आधारलेले आहे. अंकशास्त्र, हस्तसामुद्रिक आणि वास्तूशास्त्र यांसारख्या शाखांमधून आज गल्लीबोळांत भविष्य सांगणारे तयार झाले आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर मंगळ किंवा शनी यांसारख्या ग्रहांचे गुरुत्वाकर्षण माणसाच्या नोकरीवर किंवा लग्नावर परिणाम करू शकत नाही, हे वारंवार सिद्ध होऊनही समाजात याचा प्रभाव कायम आहे. हा केवळ श्रद्धेचा भाग नसून, लोकांच्या भीतीचे बाजारीकरण करणारा एक मोठा उद्योग झाला आहे.

ज्ञानेश महाराव यांच्या मांडणीनुसार, ज्योतिषशास्त्राचा पाया हा वैज्ञानिक पुराव्यांवर नव्हे तर गृहीतकांवर उभा आहे. ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, हा दावा अनेकदा वैज्ञानिक कसोटीवर तपासला गेला असला तरी त्याला ठोस आधार मिळालेला नाही. तरीही भय, अज्ञान आणि अनिश्चिततेमुळे लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यातूनच हा उद्योग वाढत राहतो. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा ही केवळ श्रद्धेचा विषय नसून सामाजिक आणि आर्थिक परिणाम घडवणारी समस्या असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अशा प्रवृत्तींकडे केवळ वैयक्तिक श्रद्धेच्या चौकटीत न पाहता, सार्वजनिक हित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
कायद्याची चौकट आणि फलज्योतिषाची पळवाट
२०१३ मध्ये लागू झालेल्या महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यात एकूण १२ प्रकारच्या कृत्यांना गुन्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये नरबळी देणे, अघोरी प्रथा करणे, करणी-बाधा करून आजार बरा करण्याचा दावा करणे, तसेच चमत्कारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे यांचा समावेश आहे. मात्र, या कायद्यात भविष्य सांगणे, ग्रहशांती’ किंवा ‘ज्योतिषीय सल्ला’ यांसारख्या कृत्यांचा स्पष्टपणे समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे, ज्योतिषाच्या नावाखाली भीती निर्माण करून आर्थिक व्यवहार घडवून आणले जात असले, तरी ते थेट या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. परिणामी, अशा प्रकारच्या कृतींवर कारवाई करण्यासाठी विद्यमान कायद्यात मर्यादा असल्याचे दिसून येते, आणि हीच बाब भोंदू प्रवृत्तींसाठी पळवाट ठरत आहे.
'बाईमाणूस'शी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे सांगतात की,
आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो आणि तो विशिष्ट धार्मिक विधी किंवा पूजा करून बदलता येतो, ही धारणा समाजात रुजवण्यात फलज्योतिषी यशस्वी झाले आहेत. "राजकारणी सुद्धा एक व्यक्तीच असतात, त्यामुळे तेही या भ्रमाचे बळी ठरतात आणि केवळ वैयक्तिक समाधानासाठीच नव्हे, तर 'मतांच्या राजकारणासाठी' अशा थोतांडाचा वापर केला जातो, विशेष म्हणजे, जादूटोणा विरोधी कायद्याच्या सुरुवातीच्या मसुद्यात फलज्योतिषाला गुन्हा ठरवणारे कलम समाविष्ट होते, मात्र नंतर ते राजकीय किंवा सामाजिक दबावापोटी वगळले गेले, असा मोठा खुलासा चांदगुडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत अंदाजे २००० हून अधिक गुन्हे दाखल झाले असले, तरी कायद्याचे नियम अद्याप पूर्णपणे तयार नसल्याने आणि पुराव्यांच्या अभावामुळे ३० ते ४० टक्के प्रकरणांतच शिक्षा झाली आहे. सुशिक्षित माणसे सुद्धा केवळ भविष्याची भीती आणि हव्यासपोटी लाखो रुपये खर्च करत असल्याने, फलज्योतिषाचा फसवणुकीच्या कलमात समावेश व्हावा, ही अंनिसची मागणी आजही कायम आहे.
राजकीय अनास्था आणि सत्तेचे साटेलोटे
या विषयातील सर्वात मोठे अडथळे म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. महाराष्ट्रातील सत्ताधारी कोणताही पक्ष असो, नेतेमंडळी स्वतः शपथविधीची वेळ काढण्यासाठी किंवा निवडणूक अर्ज भरण्यासाठी ज्योतिषांवर अवलंबून असतात. जेव्हा कायदे बनवणारे स्वतःच या प्रथेचे समर्थक असतात, तेव्हा ते याविरोधात कठोर पाऊल उचलण्यास हिम्मत करत नाहीत. फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्यामुळे आणि ज्योतिष समाजावर प्रभाव टाकत असल्यामुळे, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करणे राजकीयदृष्ट्या कठीण ठरते.

जादूटोणा विरोधी कायद्याचे १० वर्षे: यश की केवळ कागदी घोडा?
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा २०१३ मध्ये लागू झाल्यानंतर गत राज्यात या कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद सातत्याने होत आहे. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 12 वर्षांत महाराष्ट्रात या कायद्यांतर्गत 2000 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी सर्वाधिक गुन्हे हे पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांत आहेत. या प्रकरणांमध्ये महिलांवरील शारीरिक आणि मानसिक शोषणाच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय असल्याचेही निदर्शनास येते. तथापि, या वाढत्या आकड्यांकडे केवळ गुन्ह्यांची वाढ म्हणून न पाहता, कायद्याबाबत वाढलेली जागरूकता आणि तक्रार नोंदवण्याचे धाडस वाढल्याचेही त्यातून स्पष्ट होते.
'बाईमाणूस' शी बोलताना फुलंब्रीतील गेवराई गुंगी या गावातील रहिवाशी समाधान डकले सांगतात की,
ग्रामीण भागात अजूनही ज्योतिष, कुंडली आणि ग्रहदोष यांसारख्या गोष्टींवर लोकांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. लहानपणापासून घरात आणि समाजात जे ऐकत आलो, तेच सत्य मानण्याची सवय लागलेली असते. लग्न ठरवताना राशी जुळवणं, अडचणी आल्या की पूजा किंवा ग्रहशांती करणं हे सगळं आजही अनेक कुटुंबांमध्ये नेहमीचं आहे. खरं तर मनातून सगळ्यांना ठाऊक असतं की या गोष्टींना ठोस आधार नाही, पण ‘काही वाईट झालं तर? ही भीती मनात असते. त्यामुळे मन:शांतीसाठी आणि घरच्यांच्या समाधानासाठी लोक हे विधी करतात. ते पुढे म्हणतात, गावाकडे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अजूनही पुरेशा प्रमाणात पोहोचलेला नाही. त्यामुळे परंपरा आणि श्रद्धा यांचा प्रभाव अधिक आहे. एखाद्या व्यक्तीचं काम झालं की लगेच त्या मागे ज्योतिषीय उपाय कारणीभूत असल्याचा समज तयार होतो आणि त्यातून इतरांचाही विश्वास वाढत जातो. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत अनेकदा लोकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक होते. त्यामुळे सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, अशा प्रकारच्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट आणि कडक कायदे करणे गरजेचे आहे.”
कायद्यातील १२ कलमे आणि फलज्योतिषाची हुलकावणी
या कायद्याच्या अनुसूचीमध्ये १२ प्रकारच्या कृत्यांना गुन्हा ठरवण्यात आले आहे. यामध्ये काही प्रमुख आहेत...
- एखाद्या व्यक्तीच्या अंगात देव किंवा भूत आल्याचा दावा करून लोकांची फसवणूक करणे, तसेच अघोरी व अमानुष कृत्ये करणे किंवा नरबळी देणे अथवा त्याचा प्रयत्न करणे.
- करणी, जादूटोणा किंवा अलौकिक शक्तींच्या माध्यमातून एखाद्याला आजारातून बरे करण्याचा दावा करणे, किंवा अशा प्रकारे लोकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करणे.
- चमत्कार, अलौकिक शक्ती किंवा दैवी शक्तींचा दावा करून एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक अवस्थेचा फायदा घेणे..
या सर्व कृत्यांसाठी कलम 11 अंतर्गत कठोर शिक्षा (कारावास व दंड) करण्याची तरतूद आहे. मात्र, या बाराही कलमांमध्ये कुठेही ग्रहशांती किंवा भविष्य सांगणे यावर बंदी नाही. जेव्हा एखादा फलज्योतिषी सांगतो की, तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही अडीच लाखांची अंगठी घ्या किंवा अमूक अमूक एक महायज्ञ करा, तेव्हा तो प्रत्यक्षात आर्थिक जादूटोणा करत असतो. जर चमत्कार करणे गुन्हा असेल, तर ग्रह बदलण्याचे' अशक्य दावे करणे गुन्हा का नसावा? हा कायदेशीर पेच आजच्या घडीला सर्वात मोठा अडथळा ठरत आहे.
बाजारपेठेतील उलाढाल आणि 'डिजिटल ज्योतिष'
आज आपण गल्ली ते दिल्ली आणि टीव्ही ते मोबाईल असा ज्योतिषांचा प्रवास पाहत आहोत. भारतातील अध्यात्मिक आणि भविष्य वर्तवणाऱ्या बाजारपेठेची वार्षिक उलाढाल ४० ते ५० हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. सकाळच्या सत्रात वृत्तवाहिन्यांवर रंगणारे राशीभविष्याचे कार्यक्रम केवळ माहिती देत नाहीत, तर ते लोकांच्या मनात भीती पेरतात. ही भीतीच या उद्योगाचे इंधन आहे. आज अनेक मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत, जिथे पाच मिनिटांच्या चॅटिंगसाठी शेकडो रुपये घेतले जातात. सुशिक्षित तरुण वर्गही या 'डिजिटल अंधश्रद्धे'च्या जाळ्यात ओढला जात आहे. या बाजाराला वेसण घालण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यात सुधारणा करून व्यावसायिक फसवणूक या श्रेणीत फलज्योतिषाचा समावेश करणे अनिवार्य आहे.

ज्ञानेश महाराव यांनी विविध उदाहरणांच्या आधारे हे अधोरेखित केले आहे की, अशा प्रकारच्या भोंदू प्रवृत्तींचा इतिहास नवीन नाही. वेगवेगळ्या काळात स्वतःला संत, महाराज किंवा ज्योतिष म्हणून सादर करणाऱ्या व्यक्तींनी लोकांचा विश्वास संपादन करून आर्थिक व लैंगिक शोषण केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सुरुवातीला भविष्य सांगण्याच्या किंवा समस्यांचे समाधान देण्याच्या नावाखाली लोकांना आकर्षित केले जाते, त्यानंतर त्यांच्यावर प्रभाव निर्माण करून त्यांचा गैरफायदा घेतला जातो. काही प्रकरणांमध्ये तर अशा व्यक्तींनी मोठी संपत्ती उभी केली, राजकीय आणि सामाजिक स्तरावर मान्यता मिळवली आणि दीर्घकाळ कोणत्याही कारवाईशिवाय कार्यरत राहिले. हीच पुनरावृत्ती दर्शवते की, भोंदूगिरी ही केवळ वैयक्तिक घटना नसून एक ठराविक पद्धतीने चालणारी प्रणाली बनली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लढा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. जेव्हा वैयक्तिक समस्या, भीती किंवा अनिश्चिततेच्या काळात लोक तर्कशुद्ध विचार करण्याऐवजी ज्योतिष आणि अघोरी उपायांकडे वळतात, तेव्हा अंधश्रद्धेला बळ मिळते. अशा परिस्थितीत तर्क, विवेक आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना प्राधान्य देणे अत्यावश्यक ठरते. संविधानातील कलम ५१-ए (h) नुसार, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे प्रत्येक भारतीयाचे मूलभूत कर्तव्य आहे. फलज्योतिष हे कर्मापेक्षा नशिबावर अधिक भर देते, ज्यामुळे समाज आळशी आणि नशिबवादी बनतो. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी पास होण्यासाठी ज्योतिषाने दिलेला पेन वापरतो, तेव्हाच समाजाच्या वैचारिक अधोगतीची सुरुवात होते.
राजकीय हतबलता की सोयीचे दुर्लक्ष?
“ज्योतिष आणि अंधश्रद्धेच्या या संपूर्ण व्यवस्थेचा विचार केला तर, ती केवळ श्रद्धेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती हळूहळू एक संघटित आणि फायदेशीर उद्योगात रूपांतरित झाल्याचे दिसून येते. ज्ञानेश महाराव यांच्या विचारातून स्पष्ट होते की, भविष्यकथनाच्या नावाखाली भीती निर्माण करून त्यावर उपाय सुचवण्याची एक ठराविक पद्धत या क्षेत्रात विकसित झाली आहे. ग्रह, दोष, बाधा आणि अशुभ संकेत यांची भीती दाखवून लोकांना मानसिकदृष्ट्या अस्थिर केले जाते आणि त्यातून आर्थिक तसेच वैयक्तिक स्तरावर त्यांचा गैरफायदा घेतला जातो. विशेष म्हणजे, या प्रक्रियेला सामाजिक मान्यता आणि काही वेळा प्रतिष्ठित व्यक्तींचा अप्रत्यक्ष आधार मिळत असल्याने, सामान्य लोकांमध्ये त्याचा प्रभाव अधिक वाढतो. परिणामी, अंधश्रद्धा ही वैयक्तिक निवड न राहता एक व्यापक सामाजिक समस्या बनते, ज्याचा परिणाम व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर आणि समाजाच्या विचारसरणीवर स्पष्टपणे दिसून येतो.”
सौजन्य- AI निर्मित
केवळ कायदा केल्याने अंधश्रद्धा संपणार नाही, हे जरी खरे असले तरी, कायद्याचा वचक असणे ही काळाची गरज आहे. फलज्योतिष हे विज्ञानाच्या नावाखाली चालणारे एक सुसंघटित 'थोतांड' आहे. अशोक खरात सारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत आणि समाजातील मध्यमवर्गीय माणसाची लुटमार थांबावी, यासाठी जादूटोणा विरोधी कायद्याची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. आपल्याला असा महाराष्ट्र हवा आहे जिथे माणूस ग्रहांच्या भीतीखाली न जगता, स्वतःच्या परिश्रमावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवेल. फलज्योतिषाला या कायद्याच्या कक्षेत आणणे, ही केवळ कायदेशीर सुधारणा नसून ती डॉ. दाभोलकरांना आणि विवेकवादी विचारांना दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. आपण विज्ञानाच्या पंखांनी आकाशात झेप घेतली असली, तरी जमिनीवरचा हा अंधकार दूर केल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने प्रगत आणि सक्षम राष्ट्र होऊ शकणार नाही.






