सुकेशनी नाईकवाडे,
- बीड शहराजवळील ऐतिहासिक खजाना बावडी सध्या प्लास्टिक कचरा आणि दुर्लक्षामुळे पर्यावरणीय संकटाच्या छायेत
- संशोधक याला बीडचे 'स्पेस सेंटर' म्हणतात, 500 वर्षांपूर्वीच्या विहिरीत पृथ्वी-चंद्राचं अंतर दडलंय
- राज्यस्तरीय पर्यटन यादीत समावेश असला तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता अद्याप बाकी; योग्य संवर्धन झाल्यास पर्यटन नकाशावर ठळक स्थान मिळण्याची शक्यता
बीड शहरापासून काहीच अंतरावर उभी असलेली ऐतिहासिक खजाना बावडी आज गंभीर पर्यावरणीय संकटाचा सामना करतेय. प्लास्टिक कचऱ्याचे ढीग, दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, या सगळ्यांच्या छायेत ही प्राचीन वास्तू हळूहळू आपलं मूळ वैभव गमावतेय. एकेकाळी ज्ञानाचा आणि जलसंवर्धनाचा केंद्रबिंदू असलेली ही खजाना बावडी आज संरक्षणाच्या प्रतीक्षेत उभी आहे.
स्थानिक लोक तिला ‘खजाना बावडी’ म्हणून ओळखतात. पण पुण्यातील वास्तुविशारद सम्राट सरोदे यांच्या संशोधनानुसार ही केवळ पाण्याची विहीर नसून, प्राचीन खगोलशास्त्र आणि गणिताचा जिवंत दस्तऐवज आहे. खजाना बावडीच्या पायऱ्यांवर उभं राहिल्यावर जाणवतं ही वास्तू फक्त दगडांची रचना नाही. ती काळाच्या ओघात टिकून राहिलेलं वैज्ञानिक ज्ञान आहे. मात्र वाढता कचरा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या ‘ज्ञानाच्या खजिन्या’वर धोक्याची सावली गडद होत चाललीये.बीड शहरापासून काहीच अंतरावर असलेली खजाना बावडी ही फक्त जुनी विहीर नाही, तर प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, भूगोल आणि गणिताचा अद्भुत संगम आहे.
(वास्तुविशारद सम्राट सरोदे ( photo credit: sanjib roy))
पुण्यातील वास्तुविशारद सम्राट सरोदे यांनी या बावडीवर केलेल्या सखोल अभ्यासातून असे निष्कर्ष निघाले आहेत की, विहिरीची रचना आणि मोजमाप हे प्राचीन काळातल्या वैज्ञानिक ज्ञानाचे प्रतीक आहेत. स्थानिक लोक या बावडीला “खजाना बावडी” असे म्हणतात. परंतु सरोदे यांचा अभ्यास सांगतो की, उर्दूमध्ये ‘बीर का खजाना’ या नावाचा अर्थ “ज्ञानाचा खजिना” असा होतो. यामुळे या बावडीचे नाव फक्त भौतिक खजिन्याशी संबंधित नसून, ज्ञान आणि विज्ञानाशी संबंधित असल्याचे दिसून येते.
काय आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी?
खजाना बावडीची निर्मिती कधी आणि कोणत्या काळात झाली याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र, स्थापत्यशास्त्र, मोजमाप आणि विहिरीतील गणितीय पद्धती यावरून असं लक्षात येतं की, या वस्तूची निर्मिती प्राचीन भारताच्या गणितीय आणि खगोलशास्त्रीय परंपरेशी संबंधित आहे. विहिरीची रचना अश्या पद्धतीने केली गेली आहे की, प्रत्येक घटकात पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि वेळेच्या गणिताचा समावेश आहे.
बीडचं 'स्पेस सेंटर'! 500 वर्षांपूर्वीच्या विहिरीत दडलंय पृथ्वी-चंद्राचं अंतर
सम्राट सरोदे यांनी विहिरीच्या आतील वर्तुळाचा व्यास १२.५४७ मीटर मोजला आहे, जो पृथ्वीच्या व्यासाच्या मोजमापाशी (१२,५४७ किमी) अगदी जुळतो. त्याचप्रमाणे, वर्तुळाचा परीघ ३९.४१९ मीटर असून, पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाशी (३९,४१९ किमी) साधर्म्य दाखवतो. बाह्य वर्तुळाची लांबी मोजली असता येणारा आकडा ३,५७,७२३ किमी हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या आधुनिक वैज्ञानिक मोजमापाशी अगदी जुळतो.
ही आकडेवारी पाहता प्राचीन शिल्पकार आणि गणितज्ञ किती शास्त्रीय आणि गणितीयदृष्ट्या सूक्ष्म विचार करत होते, हे लक्षात येतं. विहिरीतील ३५९ किष्कू अंगुल व्यास पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या गणिताशी संबंधित आहे. याशिवाय, विहिरीतील १५ पायऱ्या अमावास्या ते पौर्णिमा या चंद्रकालनुसार तयार केल्या गेल्या आहेत, ज्यातून प्राचीन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या गतीचे निरीक्षण केले.
राहुल सरोदे यांनी ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगितले की,
“ही बावडी केवळ पाणीसाठ्यासाठी नव्हे, तर शास्त्रीय ज्ञानाचा खजिना आहे. तिच्या माध्यमातून आधुनिक विज्ञान आणि प्राचीन ज्ञान यांचा संगम अनुभवता येतो.”
सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संकट
खजाना बावडी परिसर सध्या कचरा, प्लास्टिक, भिंतीवरील लेखन आणि इतर पर्यावरणीय घटकांमुळे बाधित झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राहुल म्हस्के यांच्या म्हणण्यानुसार, “खगोलशास्त्र आणि वास्तूशास्त्र यांवर आधारित सांस्कृतिक प्रदर्शन आणि शैक्षणिक कार्यशाळा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळू शकते. परिसर स्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन याबाबत पर्यावरणीय जनजागृती करणे आवश्यक आहे.
(सामाजिक कार्यकर्ते राहुल म्हस्के(( photo credit: sanjib roy))
त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा कर्मचारी, माहिती फलक आणि नियमित स्वच्छता यांसारख्या उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. स्थानिक समाज, शाळा आणि स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून संवर्धनाची जबाबदारी सामायिक केल्यास ही चळवळ अधिक प्रभावी ठरू शकते."
संशोधन प्रक्रिया आणि अहवाल
बीडमधील अनेक स्थानिकांच्या मदतीने हे संशोधन पूर्ण केले गेले. संशोधनात विहिरीचे मोजमाप, वास्तूशास्त्र, प्राचीन भारतीय मोजमाप पद्धती, चंद्रकालनुसार पायऱ्यांचे गणित यांचा अभ्यास समाविष्ट होता. हा अहवाल जिल्हाअधिकारी यांना सादर करण्यात आला आहे, आणि आता प्रशासनातून योग्य उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे. राहुल सरोदे म्हणतात, “या अभ्यासातून स्पष्ट झाले की, प्राचीन भारतीय वास्तूकार आणि शिल्पकार किती गहन वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय ज्ञानासह काम करत होते. ही बावडी भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनू शकते.”
राज्यस्तरीय ओळख, पण राष्ट्रीय मान्यता अद्याप बाकी
बीडमधील खजाना बावडीचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत पर्यटन स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे या वास्तूला राज्यस्तरीय ओळख मिळाली असली, तरी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरातत्त्वीय वारसा म्हणून अधिकृत मान्यता अद्याप प्राप्त झालेली नाही. गुजरातमधील राणी की वाव ही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली ऐतिहासिक बावडी आहे. तिच्या अप्रतिम स्थापत्यकलेमुळे आणि सुबक शिल्पांमुळे तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीतील अग्रसेन की बावली ही राजधानीतील महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरली असून, देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण बनली आहे.

अभ्यासकांच्या मते, बीडमधील खजाना बावडीमध्येही अशाच प्रकारचे स्थापत्यवैशिष्ट्य आणि शास्त्रीय महत्त्व दडलेले आहे. योग्य संवर्धन, शास्त्रीय पडताळणी केल्यास ही वास्तू केवळ जिल्हास्तरावर नव्हे, तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करू शकते. पर्यटन विभाग, पुरातत्त्व तज्ज्ञ आणि स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तपणे विकास आराखडा तयार केल्यास खजाना बावडी पर्यटन नकाशावर ठळकपणे उमटू शकते. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






