अप्सरा आगा
- लग्नाच्या चार दिवस आधी भिगवणमध्ये तरुणीला रस्त्यातून अपहरण करून नेल्याचा आरोप
- पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून सहा पथकांद्वारे शोध सुरू केला
- सोशल मीडियावर मुलीचा “मी स्वतःहून गेले” असा व्हिडिओ व्हायरल; तरुणी आणि तरुण बारामती पोलिस ठाण्यात दाखल.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे तरुणी बेपत्ता होण्याची घटना सुरुवातीला सरळ अपहरण वाटत होती. मात्र काही तासांतच तिला वेगळं वळण मिळालं आणि आता हे प्रकरण गुन्हा, प्रेमआणि राजकारण या तिन्हींच्या संगमावर येऊन ठेपलं आहे. लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधी घडलेली ही घटना असल्याने कुटुंबीयांचा आक्रोश, गावकऱ्यांचा संताप आणि नेत्यांची आक्रमक भूमिका सगळं एकाच वेळी समोर आलं. दरम्यान, अपहरण झाल्याची तक्रार दाखल असलेली तरुणी आणि तरुण हे एकत्रच मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी नवं वळण मिळालं आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी संबंधित २१ वर्षांची तरुणी आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत होती. रस्त्यात दोन तरुणांनी त्यांना अडवलं. आई-भावाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून गोंधळ उडवला आणि त्या गोंधळात मुलीला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. ही माहिती पसरताच भिगवण परिसरात संताप उसळला. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, पोलिस ठाण्यासमोर जमाव जमा झाला आणि काही काळ महामार्ग रोखण्यात आला. कारण एकच, मुलगी सुरक्षित परत मिळाली पाहिजे.
अपहरणाचा गुन्हा दाखल अन मुलीचा व्हिडिओ व्हायरल
पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली. सहा स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली. मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही आणि संपर्कांची तपासणी सुरू झाली. याच दरम्यान तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली, मुलगी आणि संशयित तरुण यांच्यात मागील काही काळापासून फोनवर संपर्क होता. त्यामुळे प्रकरण सरळ अपहरण आहे की ओळखीच्या व्यक्तीसोबत जाण्याचा प्रकार आहे, हा प्रश्न निर्माण झाला.

घटनेनंतर काही तासांतच सोशल मीडियावर मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये ती स्वतःच्या इच्छेने गेल्याचं सांगताना दिसली. या व्हिडिओने संपूर्ण चित्रच बदललं. एकीकडे कुटुंबीयांनी हा व्हिडिओ दबावाखाली बनवला असल्याचा आरोप केला, तर दुसरीकडे काहींनी हे प्रेमसंबंधाचं प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण बनलं.
दबाव टाकून व्हिडिओ बनविल्याचा आरोप
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर भिगवणमध्ये दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते हा साधा प्रकार नसून मुलीवर दबाव टाकून व्हिडिओ बनवण्यात आला असू शकतो. आरोपीवर यापूर्वीही गुन्हे असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. जनआक्रोश मोर्चात सहभागी होत त्यांनी मोक्का लावण्याची मागणीही केली. त्यामुळे प्रकरणाला स्पष्ट राजकीय रंग मिळाला.
आमदार पडळकर म्हणाले, "मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ पोलिस आणि नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी आता मुलीचा भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केली. मुलीला वडील नाहीत. तिचं लग्न ठरलं होतं. पुढील दोन-चार दिवसात तिचं लग्न होणार होतं.

अशा स्थितीत तिचं जबरदस्तीने अपहरण केलं. त्यामुळे आज मी भिगवणला आलोय. भिगवण पोलीस स्टेशनला मी भेट देणार आहे. मुलीचा हा व्हिडिओ कुठून आला, असं मी पोलीस अधीक्षकांना विचारलं. त्यांनी सांगितलं की, आरोपींनी वेगळं अॅप वापरलं आहे, त्यामध्ये लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलाय, नंतर कुटुंबाला व्हिडिओ पाठवणं, म्हणजे त्यांचं धाडस वाढलं आहे, त्याला वाचवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतंय," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, गावात बंदची हाक देण्यात आली. विविध संघटना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पोलिस प्रशासनाने शांततेचे आवाहन करत अफवा पसरवू नयेत, धार्मिक रंग देऊ नये, अशी विनंती केली. कारण छोट्या गावात निर्माण होणारा तणाव मोठ्या संघर्षात बदलू शकतो, याची जाणीव प्रशासनाला होती.
अखेर मुलगी बारामती पोलीस ठाण्यात हजर
आत्तापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्या नगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वर ला गेले. काल मध्यरात्री दोघे मुलगा आणि मुलगी बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले. एकच मुलगा जो प्रियकर आहे तो हजर झाला आहे. त्याचा दुसरा भाऊ अजून आलेला नाही, तरूणीच्या आईला अन् भावाला पोलिसांनी बोलवलं होत पण अजूनही आले नाहीत. मुलीच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संवाद साधल्यावर, "मुलीचे कुटुंब यायला तयार नसल्याचे पोलिसांची माहिती आहे." मुलीला न्यायालयासमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर केले जाणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात हजर करून न्यायाधीशांसमोर जबाब घेतला जाईल.
संबंधित तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने घरातून निघून गेल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तसं प्रतिज्ञापत्रही तिनं दिलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती अथवा अपहरण झालं नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. या जबाबानंतर सदर प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.






