Skip to main content

कोणता चार्ली चॅप्लिन खरा…? बाईलवेडा, हिंसक, हुकुमशहा, विलासी आयुष्य जगणारा की पडद्यावरचा साधाभोळा, गरीब, विनोदी असलेला?

Team BaiManus
25 Dec 2025
6 min read
991 views
कोणता चार्ली चॅप्लिन खरा…? बाईलवेडा, हिंसक, हुकुमशहा, विलासी आयुष्य जगणारा की पडद्यावरचा साधाभोळा, गरीब, विनोदी असलेला?

आज 25 डिसेंबर…नाताळ. या दिवशीची थोडी वेगळी आठवण सांगायची म्हटलं तर साधारण ४८ वर्षांपूर्वी सगळ्या जगाला हसवणारा आणि हसवता हसवता गहिवर आणणारा मूकपटांचा अनभिषिक्त बादशहा चार्ली चॅप्लिन काळाच्या पडद्याआड गेला. चार्लीला नाताळ कधीच आवडला नाही. नाताळ त्याला त्याच्या लहानपणच्या गरिबीची आणि हलाखीच्या दिवसांची आठवण करून देतो, असे तो नेहमी म्हणत असे. पण चार्ली वयाच्या 88 व्या वर्षी म्हणजे 1977 साली नाताळच्याच दिवशी सकाळी झोपेत असताना वारला. त्याच्या रूपानं वर्तमानात तग धरून असलेला मूकपटयुगाचा अखेरचा दुवा खऱ्या अर्थानं इतिहासजमा झाला.

‘अक्षरनामा’ मध्ये या विषयावरच्या लेखात आदित्य कोरडे यांनी चार्लीचा अनेक अंगाने वेध घेतला आहे, कोरडे लिहितात की, एकशेदहा वर्षांपूर्वी म्हणजे 1914 साली त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला – ‘Making a Living’ नावाचा, तर 1967 साली त्याचा शेवटचा चित्रपट आला – ‘A Countess from Hong Kong’. त्याने एकूण 82 चित्रपट बनवले. त्यातले 77 मूकपट होते, तर 5 बोलपट होते. त्याच्या अनेक मूकपटांना नंतर संगीत दिलं गेलं. शेवटच्या ‘A Countess from Hong Kong’चा अपवाद सोडला तर सगळे चित्रपट कृष्णधवल 35 मिमी फिल्मवर शूट केलेले होते. त्याचे ‘The Kid’ (1921), ‘City Lights’ (1931), ‘Modern Times’ (1936), ‘The great Dictator’ (1940), ‘Limelight’ (1952) हे चित्रपट ‘मास्टरपीस’ मानले जातात. आजदेखील चार्लीचे चित्रपट कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर दाखवले जात असतातच. त्याची लोकमानसावरची मोहिनी यत्किंचितही कमी झालेली नाही.

आदित्य कोरडे लिहितात की, चार्ली कुणाला माहिती नाही असं होणं शक्य नाही आणि आवडत नाही, असं तर अजिबातच शक्य नाही. पण तो जसा पडद्यावर दिसत होता तसा तो प्रत्यक्षात नव्हता. चार्ली चॅप्लिन वैयक्तिक आयुष्यात इतका साधा, भोळा, स्वभावाने गरीब, विनोदी वगैरे नव्हता. त्याचं आयुष्य आणि व्यक्तिमत्त्व विरोधाभासांनी भरलेलं होतं. तो क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता, रागीट होता, एकलकोंडा होता, बाईलवेडा होता. पडद्यावर साधाभोळा, सज्जन, सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत:च्या मुलांशी क्रूरपणे वागायचा. तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगत होता. त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आले आणि त्यातल्या बहुतेक त्याच्यापेक्षा वयानं खूप म्हणजे खूपच लहान होत्या. कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा?



कलाकाराचं काम पाहायचं की खासगी जीवन? माणूस म्हणून चार्ली चॅप्लिन हा हुकूमशाही प्रवृत्तीचाच होता, आप्तस्वकीयांना त्रास देण्यात धन्यता मानणारा होता, हे सांगणारं नवं संशोधन लक्षात ठेवायचं की आजही जगण्याचं बळ देणारे त्याचे सिनेमे? कलाकाराचं मूल्यमापन फक्त त्याच्या कलाकृतीद्वारेच करायचं की त्याच्या आयुष्यातही डोकावायचं? एखाद्या कलाकाराचं कलाभान आणि त्याचं जीवनभान यांत काही समानता असते का? असायला हवी का? असली तर तो कलाकार अधिक मोठा ठरतो किंवा नसली तर तो जरा काही पायऱ्यांवरून घसरतो..असं होतं का? आणि हा कलाकार थेट चार्ली चॅप्लिन असेल तर?

‘ज्या लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या लोकांना मी ठाऊक आहे’

त्या वेळी चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता. इतका की लेनिन असं एकदा म्हणाले होते की हा (चॅप्लिन) असा एकच माणूस आहे की मला त्याला जाऊन भेटायची इच्छा आहे. चॅप्लिनची उंची इतकी की चर्चिल आपल्या राजघरात त्यांना राहायला बोलावत. बर्नार्ड शॉ, केन्स, एच जी वेल्स.. असे अनेक नामवंत चार्लीचे चाहते होते. याचा चॅप्लिन यालाही अभिमान होता. अगदी गर्व वाटावा इतका होता. त्याचमुळे तो एकदा म्हणाला : जगात ज्या प्रदेशात लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या प्रदेशातल्या लोकांना मी ठाऊक आहे.

तर अशा आणि इतक्या लोकप्रिय चार्ली चॅप्लिन याच्या आयुष्यातला आतापर्यंत गुलदस्त्यात असलेला तपशील प्रकाशित झालाय. त्यावरून कलाकार, त्याची कलासाधना आणि त्यामागचा माणूस यातल्या संबंधांबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि समस्या ही की त्याचं उत्तर बऱ्याचदा वेदनादायीच असतं..चार्लीसारख्या कलाकाराच्या बाबतीत तर या वेदना अधिक तीव्र असू शकतात. पीटर अक्रॉइड यांनी प्रचंड संशोधन करून चार्लीचं संपूर्ण आयुष्य पुन्हा नव्यानं मांडलंय. त्याचा धांडोळा घ्यायला हवा.

चार्लीच्या खऱ्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका

त्यानुसार चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन याचा जन्म हा जिप्सींच्या वाहनांतल्या घरात झाला. त्याच्या वडिलांचा पत्ता नाही. म्हणजे जे सांगितले जातात तेच त्यांचे वडील आहेत किंवा काय, या संदर्भात प्रश्न आहेत. जो कोणी गृहस्थ वडील म्हणून सांगितला जातो तो दारूडा आणि बिनकामाचा होता. अडतिसाव्या वर्षीच तो दारू पिऊन मेला. तरीही त्यांना बऱ्याच बायका होत्या. चार्लीच्या खऱ्या आईसंदर्भातही काही गंभीर शंका आहेत.आईनं जगण्यासाठी प्रसंगी देहविक्रयही केला असावा असं मानायला जागा आहे. तीही व्यसनी होती आणि चक्रमही होती. वेगवेगळय़ा पुनर्वसन केंद्रांवर तिला वारंवार दाखल करावं लागलं होतं. त्यामुळे चार्लीचा बराचसा शालेय काळ अनाथ मुलांच्या केंद्रांत वा वसतिगृहांतच गेला.



या सगळय़ासाठी अर्थातच चार्ली चॅप्लिन या कलाकाराला दोष देता येणार नाही. उलट इतकं सगळं भोगूनही तो इतकं सगळं करू शकला याबद्दल त्याचं कौतुकच वाटावं. लहानपणी घर असं काही नव्हतंच. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी आणि जगण्यासाठीही तो स्थानिक कलाकारांच्या मेळय़ांत पडेल ते काम करू लागला. आपल्याकडे डोंबाऱ्याकडे कसा एक हरहुन्नरी पोरगा असतो, तसा चार्ली होता. त्यातल्याच एकाबरोबर 1913 साली तो कार्यक्रमाच्या निमित्तानं इंग्लंडमधून अमेरिकेत गेला. तिकडे तो छोटे छोटे सिनेमे बनवायला लागला. तेच ते.. वेंधळय़ा चार्लीचे.. ज्यात तो पडतो, धडपडतो.. त्याच्यावर काही ना काही आदळतं.. किंवा तो कोणावर तरी आदळतो. असा सगळा मसाला असलेले. हसवणारे.

वैयक्तिक आयुष्यात चार्ली प्रचंड हिंसक?

पण पीटर सांगतात की चार्ली वैयक्तिक आयुष्यात क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता. एकेकटा राहायचा आणि सतत खिन्न असायचा. रॉबर्ट फ्लोरे नावाचा त्याचा सहायक दिग्दर्शक होता. त्यानं तर चार्लीचं वर्णन हुकूमशहा, एकाधिकारशाही गाजवणारा, हिंसक, क्रूर आणि जराही जवळ करू नये असा माणूस.. या शब्दांत केलंय. पीटर या चरित्राच्या निमित्तानं चार्लीच्या अनेक मुलांना भेटला. या सर्वाच्या मनात वडिलांविषयी एकच भावना होती. भीती. त्याचा एक मुलगा तर म्हणाला की चार्लीचा राग आणि त्यातील हिंसा यांचं प्रमाण कायमच व्यस्त होतं.. छोटय़ाशा रागासाठीही ते प्रचंड हिंसक व्हायचे.. आम्हाला त्यांच्याकडे पाहायलाही भीती वाटायची. आणखी एक बाब सर्वाच्या बोलण्यातून समोर आली. ती म्हणजे आजचा दिवस कोणता.. म्हणजे सोमवार आहे की गुरुवार की आणखी कोणता.. हे कळून घ्यायला चार्लीला अजिबात आवडायचं नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर ते अत्यंत हिंसक होत. आणि दुसरं म्हणजे ते कधीही घडय़ाळ घालत नसत. त्याचाही भयंकर राग चार्लीच्या मनात होता.

मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा चार्लीला छंद

हे सगळंदेखील ठीक आहे. असतात माणसं अशी, असं म्हणून सोडून देता येईल. पण त्याच्या बाहेरच्या उद्योगांचा तपशील मात्र भीतीदायक आहे. आई वेडी झाल्यापासून चार्लीच्या मनात स्त्रियांविषयी कमालीचा राग, संशय होता. त्यामुळे मिळेल त्या स्त्रीचा उपभोग घ्यायचा छंदच त्याला लागला. त्यातली गंभीर बाब ही की चार्लीला बरोब्बर 15 वर्षांच्या मुलीच आवडायच्या. त्याबाबत तो इतका आग्रही असायचा की 16 वर्षांच्या होऊन त्यांच्याशी लग्न कसं करता येईल यासाठी तो वाटेल ते करायचा. त्यातल्या अनेकींशी त्यानं लग्न केली. त्यानंतर या मुलींना लक्षात यायचं आपण भल्या मोठय़ा जनानखान्याचा घटक आहोत ते. मग चार्लीचा प्रयत्न असायचा, या त्यांच्या पत्नींनी शिकावं वगैरे यासाठी. त्यातल्या अनेक जणींनी पुढे घटस्फोट घेतले.

त्या घटस्फोट प्रकरणांचा अभ्यास पीटरनं केला. त्याला आढळलं की यातल्या बऱ्याचशा घटस्फोटांत तरुणींची एकच तक्रार आहे. ती म्हणजे लग्न झाल्यावर चार्लीनं आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही.. तो नव्या मुलींना शोधत राहिला. यातल्या काहींनी चार्लीच्या लैंगिक सवयींची वर्णनं केली आहेत, ती वाचवत नाहीत. अमेरिकेसारख्या मुक्त देशालाही त्याच्या भानगडी झेपल्या नाहीत, यावरून काय ते कळेल. त्याची शेवटची पत्नी उना ओनील ही त्याच्यापेक्षा 36 वर्षांनी लहान होती. म्हणजे लग्नाच्या वेळी चार्ली 54 वर्षांचा तर ती 18 वर्षांची होती. ती विख्यात युजिन ओनील यांची मुलगी.



या लग्नानंतर उनाचं काय झालं याचं वर्णन त्याच्या सहकाऱ्यांनी करून ठेवलंय. ती कधीही भेटली की अंगावर बाळ असायचं तिच्या.. असं चार्लीचा एक सहकारी म्हणतो. खरंही असेल ते. कारण तिला चार्लीपासून आठ मुलं झाली. चार्लीबरोबरच्या ताणतणावांमुळे तीही मद्याच्या आहारी गेली. नंतर नंतर तर त्यांच्यात माऱ्यामाऱ्या होत.. म्हणजे चार्लीच मारहाण करायचा. त्याचे सहकारी सांगतात की दिग्दर्शक म्हणून चार्ली शुद्ध हुकूमशहा होता. फक्त आदेश द्यायचा. सिटी लाइट या त्याच्या गाजलेल्या सिनेमात त्यानं एक दृश्य तब्बल 342 वेळा चित्रित केलं. दृश्य काय? तर त्यातल्या लिटिल ट्रॅम्पला एक अंध फुलविक्रेती फुलांचा गुच्छ देते, इतकंच.

चार्लीचं असं वागणं, त्याचं राजकारण, कम्युनिस्टप्रेम वगैरेमुळे अमेरिकेनं त्याला जवळ जवळ देशातनच हाकललं. 1952 साली. मग चार्ली स्वित्झर्लंडला जाऊन राहिला. तिथेच 1977 साली तो गेला. त्याचं मरणही सरळ नव्हतं. त्याची शवपेटिकाच चोरली गेली. चोरटय़ांना वाटलं तिच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावता येतील. म्हणून त्यांनी चार्लीची एक पत्नी पॉलेट गोडार्ड..द गोल्ड रश या सिनेमातली नायिका.. हिला फोन करून सांगितलं..आम्ही चार्लीचं पार्थिव असलेली शवपेटी चोरलेली आहे. पॉलेट फक्त इतकंच म्हणाली.. बरं मग. आणि तिनं फोन ठेवला.

कोणता चार्ली खरा? पडद्यावरचा? की पडद्यामागचा? ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये म्हणतात. हीच बाब कलाकारांबाबतही तंतोतंत लागू होते. त्यांचं वास्तवातलं चरित्र आणि चारित्र्य आपल्या मनातील त्यांच्या प्रतिमेशी विसंगत असू शकतं, नव्हे असतंच. तेव्हा त्यांचं मूल्यमापन कोणत्या फुटपट्टीनं करावं आणि कोणत्या फुटपट्टीनं करू नये, असल्या फंदात न पडलेलंच बरं, नाही का?

आज चार्लीचा स्मृतिदिन... त्या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा फडा वर काढून आला.. इतकंच.

(संदर्भ - चार्ली चॅप्लिन – त्याला नाताळ कधीच आवडला नाही, पण तो नाताळच्याच दिवशी सकाळी झोपेत असताना वारला! - आदित्य कोरडे, अक्षरनामा)

Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...