- समीर गायकवाड
- हरियाणाच्या गावागावांत कधीकाळी 'रागिनी'चे सूर घुमत होते. काळ बदलला, इंटरनेट आलं, रंगमंच बदलले आणि लोककलेच्या जागी स्टेज डान्सने प्रवेश केला.
- या बदलाच्या मध्यभागी एक नाव वादळासारखं उभं राहिलं, सपना चौधरी… मात्र तिची कहाणी केवळ एका लोकप्रिय नर्तकीची नाही. हरियाणवी 'रागिनी'च्या लोकपरंपरेपासून पुरुषसत्ताक सांस्कृतिक विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या एका स्त्रीच्या संघर्षाची, वादांची आणि सांस्कृतिक परिवर्तनाची ही कहाणी आहे.
सभोवताली चारी दिशांना उभे असलेले हजारो पुरुष, जिकडे नजर फिरवावी तिकडे गर्दीच गर्दी, स्टेजवर वादकांचा ताफा नाही की कुठली वाद्ये देखील नाहीत. पाचपन्नास माणसं रिकामटेकड्यागत स्टेजवर बसून असतात आणि एक तरुण मुलगी स्टेजच्या मधोमध एकटीच नाचते!
तिच्या आजूबाजूला कोरस नर्तिकाही नसतात! बस्स ती एकटीच पिसाळल्यागत नाचते आणि पुरुष विचित्र नजरेने तिच्याकडे पाहत त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात; हे दृश्य सपना चौधरीच्या 'स्टेज शो'मध्ये कायम दिसत असे!
प्रत्येक राज्याला एक सांस्कृतिक इतिहास असतो, तसा तो हरियाणाचाही आहे. मध्ययुगीन काळात मनोरंजनाची साधने नव्हती, तेव्हा हरियाणात गावोगाव 'सांग' म्हणजेच नाटिकाप्रयोग केले जायचे. या नाटिकांची संपूर्ण कथा आणि संवाद काव्यरूपात गाऊन सादरीकरण केले जात! पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक कथा ह्यांचा वापर सर्रास केला जाई.
हरयाणाच्या ‘रागिनी’ गाण्यांचा गौरवशाली इतिहास
‘रागिनी’ गीते सादर करताना किस्से सांगितले जात, हे किस्से बहुतांश करून हरियाणवी प्रदेशातील वीरांचे, पराक्रमाचे, प्रेमाचे आणि नात्यांचे असत. रागिनीचा एक मुख्य प्रकार म्हणजे 'सवाल-जवाब' पद्धतीने मुकाबला होई.
मंचावर दोन गायक बसून गाण्यातून प्रश्न विचारत असत आणि दोघे मिळून एकत्र रागणी गाऊनच त्याचे उत्तर देत असत. कालांतराने स्वातंत्र्योत्तर काळात रागिनी गीते मागे पडत गेली. मात्र काही गायक आपला रुतबा टिकवून होते. रेडियोच्या जमान्यात त्यांना फटका बसला.

लोक कलाकारांचा उत्साहच मावळला. नंतरच्या काळात अगदी मोजकेच लोक ही कला सादर करत. डिजिटल युगाने कात टाकली तेव्हा जुन्या गाण्यांना नव्या स्वरूपात सादर केलं जाऊ लागलं आणि पब्लिक हजारोंच्या संख्येने येऊ लागलं.
हरियाणवी रागिनी पूर्वापार रितीने जत्रेत, सोहळ्यात, देवतांच्या यात्रेत आणि गाण्यांच्या स्पर्धेत सादर केली जाते. काळाने कूस बदलताच तिचे शो मोठ्या प्रमाणात आयोजित केले जाऊ लागले. इंटरनेट क्रांतीनंतर ह्यात आमूलाग्र बदल झाले. एकल नर्तिका किंवा समूह नृत्य स्टेजवर सादर होऊ लागले.
जेव्हा मुली रागिनी गाण्यांवर थिरकू लागल्या…?
हरियाणा हे वैचारिक दृष्ट्या फारसे प्रगत नाही. पारंपरिक विचारांना इथे अजूनही मोठ्या प्रमाणात स्थान आहे. राजस्थानप्रमाणेच जातीवाद मोठ्या प्रमाणात आहे. उच्च जाती आणि मागास जाती ह्यांच्यात संघर्ष आहे. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे इथे पुरुष वर्चस्ववाद अतिशय उघडपणे आणि वाईट पद्धतीने अस्तित्वात आहे.
हरियाणवी लोकसंगीतात खड्या आवाजातली गाणी, दुहाई, पदे आणि भजने समाविष्ट होतात. डिजिटल काळाचा पगडा वाढला तेव्हा यात बदल घडला. नवी साधने वापरात आली आणि ह्याचा चेहरामोहरा बदलला.
गाण्यापेक्षा नृत्यावर भर वाढला. नाचणाऱ्या मुलींचा वरचष्मा वाढला. त्यांच्यात स्पर्धा वाढली. रागिनी गीतांवरचा डान्स पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. ह्या काळात काही मुलींचे खून देखील झाले, ज्या मुलींचे नाव झाले होते, ज्यांना डिमांड होती त्यांच्यावर आपले वर्चस्व राहावे म्हणून मॅनेजमेंटमधील लोकांनीच दगेफटके सुरु केले.
मुली घाबरून गेल्या आणि वचकून राहू लागल्या. परिणामी ह्याची सगळी सूत्रे पुरुषांच्या हातीच राहिली. ह्या सर्वाला सुरुंग लावण्याचे काम सपना चौधरीने केले.
सपना चौधरी नावाचं वादळ…
1990 मध्ये रोहतक येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात सपना चौधरीचा जन्म झाला. तो काळ तिथल्या सांस्कृतिक परिवर्तनाचा होता. 2002 मध्ये तिच्या वडिलांचे अकस्मात देहावसान झाले. या घटनेने तिला अकाली प्रौढपण आले.
त्याच वर्षी तिने शिक्षणावरचा फोकस कमी करून पोट भरण्याकडे लक्ष दिले, बाराव्या वर्षीच तिने ऑर्केस्ट्रा जॉइन केला. त्यात बाल कलाकार म्हणून नाचू लागली. 2015 मध्ये तिचे ‘सॉलिड बॉडी‘ हे गाणे रिलीज झाले आणि सपनाचे नाव हरियाणात घरोघरी झाले.

2017 मधले डीसी मदाना यांनी गायलेल्या ‘तेरी आंख्या का यह काजल‘ रिलीज झाले आणि सपनाने त्याला ब्लॉकबस्टरमध्ये परावर्तित केले. त्यानंतर बिग बॉसमुळे तिला वाढीव प्रसिद्धी मिळाली. मग तिने मागे वळून पाहिले नाही.
2016 मध्ये तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जातिभेदास खतपाणी घालणारे गाणे गायल्याचा तिच्यावर आरोप झाला होता. तिने माफी मागून वाट मोकळी करून घेतली. ह्यानंतर गाण्यांची निवड करताना ती विशेष दक्षता घेत राहिली. हरियाणवी गाण्यात अजूनही उच्चवर्णीय जातींची नावे असतात, व्यक्तींची नावे असतात त्यांचा उदोउदो असतो! क्वचित जातीय टोमणे देखील असतात!
‘सोलो लेडी’ डान्सर्स’ चा उदय आणि व्यावसायिक स्पर्धा
सपना चौधरीचा उदय झाला आणि स्टेजडान्सची परिभाषा बदलली. ‘सोलो लेडी’ डान्सर्सनी स्टेजचा ताबा घेतला. ह्याला आता दीड दशक झालेय आणि ह्याच दीड दशकात ह्या राज्यात लैंगिक अत्याचाराचा आलेख वाढता राहिलाय.
अश्लील हावभाव, बेलगाम नाचणाऱ्या तरुण मुली आणि द्विअर्थी गाणी ह्यामुळे मुलांचे दृष्टिकोन बिघडण्यास मदत झाली असे अनेकांना वाटते. सपनासारख्या मुली ह्या आरोपास धुडकावून लावतात.

सपना चौधरीचे खरे आडनाव अत्री. तिचे यश पाहून तिच्या मावशीने आणि तिच्या मॅनेजरने तिला चौधरी ही उपाधी बहाल केली. ती आता आडनावासारखी चिकटली आहे. तिच्या नावाचा दबदबा इतर मुलींच्या कामी येतोय, त्यांच्या वाट्याला जाण्याआधी लोक आता विचार करतात. तरीही एक रिस्क कायम त्यांच्या मनात असतेच!
सपना आता ज्या पोझिशनला आहे तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी हिंमत लागते. विलक्षण पुरुष वर्चस्ववादी राज्यात, जातीयतेच्या अस्मितेने ग्रासलेल्या प्रदेशात, एका गुंतागुंतीच्या संगीतनृत्य क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य उभं करताना तिने आपल्या चरित्रावर डाग लागणार नाही ह्याची अतिव दक्षता घेतली आहे, हरियाणवी संगीताला ग्लोबल स्टेटस मिळवून देण्यात तिचा वाटा मोलाचा आहे.
अश्लील नृत्याला धुडकावून लावणारी सपना
असे असले तरीही, प्रेमात माणूस बऱ्याचदा फसतो असं म्हटलं जातं हे गृहितक सपनाबाबत खरे ठरलेय! 2020 मध्ये तिने गवगवा न करता हरियाणवी गायक अभिनेता यश वीर साहू सोबत लग्न केले होते. मात्र मधल्या काळात त्याने सपनाला खूप त्रास दिला.
पहिली काही वर्षे तिने सासरच्या लोकांचा आणि पतीचा छळवाद सोसला. नंतर मात्र तिचा बाणेदार स्वभाव उफाळून आला. तिने पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दिली. दिल्लीस्थित द्वारका महिला न्यायालयाने तिच्या बाजूने झुकत तिच्या पतीला काही कठोर निर्देश दिले आहेत. लवकरच ती विभक्त होणार आहे.
सपनाची कमी प्रकाशात आलेली बाजू म्हणजे मुलींचे संरक्षण करणाऱ्या, त्यांचे शोषण होऊ नये म्हणून काम करणाऱ्या अनेक संस्थांसाठी ती एक पैसा देखील न घेता काम करते. त्यांना निधी उभा करून देण्यात मदत करते.

हरियाणामधील जनतेत तिच्याविषयी आदर भावना आहे मात्र पोक्त, वृद्ध पुरुष तिच्यावर खार खाऊन असतात; ती त्यांना मोजत नाही ही गोष्ट वेगळी आहे!
शून्यातून स्वतःचं नाव बुलंद करण्यासाठी पोलादी जिगर लागतं! उत्तरेकडील राज्यात बीभत्स घाणेरड्या विकृत ऑर्केस्ट्रा डान्सर्स आणि त्यांचे धंदेवालीत होऊ घातलेले सायलेंट रूपांतर पाहू जाता, पैशाने समृद्ध असणाऱ्या हरियाणाने सपनाचे आभार मानले पाहिजेत कारण ही विकृती तिने हरियाणाच्या स्टेजवर येणार नाही याची दक्षता घेतली.
मधल्या काळात ती गायब झाली तेव्हा लोकांनी अंदाज लावला की, तिची पावले आता थकली आहेत, तिचा जोश संपलाय! मात्र ह्या सगळ्या आडाख्यांना उधळून लावत तिने नुकताच हा स्टेजशो केला आणि पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला! काही सौदामिनी रोज उठून नित्य चमकत नसतात मात्र जेव्हा कधी त्या कडाडतात तेव्हा आसमंत त्यांची दखल घेतोच, ती देखील डोळे विस्फारून!






