नवरात्र सुरु होती. आम्ही राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील देशनोक या शहरात होतो. रस्त्यावर माता माऊल्यांची जरा जास्तच वर्दळ जाणवत होती. मग हळूच नजर रस्त्यांवर लावलेल्या होर्डिंग्स वर गेली. शहरातील तरुणांचे फोटो दिसले. पण वर कुठेतरी कोपऱ्यात एका देवीचा फोटो आणि शेजारी करणी मातेचा उल्लेख आढळून आला.
मग लक्षात आलं की ज्या करणी मातेची चर्चा राजस्थानमध्ये पाय ठेवल्यापासून सुरु होती किंबहुना लहानपणापासून काही वेळा ज्या देवीच्या मंदिराविषयी ऐकल्यासारखं वाटतंय त्या करणी मातेचं मंदिर याच देशनोक शहरात आहे.
'करणी माता मंदिर' हे इथल्या आणि राजस्थानातील लाखों लोकांसाठी फार श्रद्धा आणि भावनेचं ठिकाण आहे. नवरात्रीच्या काळात तर तुम्ही बिकानेर भागात फिरत असाल तर शेकडो पावलं 'करणी माता की जय' म्हणत याच देशनोक शहराकडे कूच करताना दिसतील.
करणी माता मंदिरात आम्हाला 'हे' दिसलं...
करणी मातेच्या नावाने या भागात अनेक जत्रा-यात्रा, उत्सव साजरे केले जातात. पण हे सगळं सांगण्याचा आटापिटा करण्यामागचं कारण वेगळं आहे. करणी माता राजस्थानेतर राज्यांमध्ये चर्चिली जाण्याचं कारण अगदीच अटपटं आहे. हेच कारण जाणण्याचा जिज्ञासेपोटी आम्ही देशनोक शहराच्या दक्षिणेकडे वळलो. चोहोबाजूनी मिठाईच्या, नारळांच्या, इतर प्रसादाच्या, खेळभांड्यांच्या, चैनीच्या वस्तू असलेल्या टपऱ्या आणि दुकानांचा वेढा मोडत आत शिरलं की मग कुठे मंदिराचं महाद्वार दिसलं.
मंदिरात जाण्याअगोदर एका मिठाईच्या दुकानात चप्पल, जोडे सोडले आणि प्रसाद घेऊन बसलेल्या दुकानदारांच्या "भैय्या, प्रसाद लेलो माता के लिये" अशा आरोळ्यांकडे दुर्लक्ष करत दर्शन-रांगेत उभे ठाकलो. पण देवीच्या दर्शनाआधीच आमची जिज्ञासा पूर्ण झाली. ती अशी की, महाद्वाराचा उंबरठा, दरवाजे, दरवाज्यांमागच्या भेगा, पायऱ्या, छताचे कोपरे, ठिकठिकाणची अडगळ जिकडे नजर जाईल तिकडे फुटाणे, गव्हाच्या दाण्यांचे, मिठाईचे खचच खच दिसून आले आणि त्यावर निश्चिन्त मनाने ताव मारत बसलेली अगणित उंदरं दिसली. ही उंदरं देवीचीच अपत्य असल्याचं लोकांकडून सांगण्यात येतं.
हजारो उंदरांचं 'आश्रयस्थान' : करणी माता मंदिर
भक्तीपोटी, कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी किंवा इतर काही कारणास्तव परराज्यांहून आलेल्या लोकांची इथे जरा तारांबळच उडते. कारण मंदिरात जिकडे नजर जाईल तिकडे उंदरंचं उंदरं दिसतात. कुठे भल्या मोठ्या सपाट कढईत ठेवलेलं दूध पितांना, कुठे कोपऱ्यात एकावर एक मस्तपैकी सुस्तावलेल्या अवस्थेत, कुठे भाविकांनी टाकलेल्या फुटाणे आणि पेढ्यांवर तुटून पडलेले असताना, कुठे इकडून तिकडे स्वैर फिरणारे कित्येक उंदीर इथे दिसतात. बरं या उंदरांना भाविकांच्या तिथे असण्याचा विशेष काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी इथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत.
काय आहे इतिहास?
मंदिर परिसरात आम्हाला बिकानेर जवळील उदयरामसर गावचे रिंकू यादव आम्हाला भेटले. ते नवरात्रीत रोज तिथे दर्शनासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना आम्ही जेव्हा मंदिराविषयी विचारलं तेव्हा ते म्हणाले, "करणी मातेचं हे मंदिर फार पुरातन आहे. जोधपूर जवळील एका गावात हिंदू वर्षांनुसार 1444 साली करणी मातेने चारण या जातीत अवतार घेतलेला.तिला सतीचा अवतार मानल्या जातं. अवैवाहिक जीवन जगलेल्या करणी माता आपल्या बहिणींच्याच मुलांना स्वतःची मुलं मानायच्या. बहिणीच्या चार मुलांपैकी एक मुलगा काही कारणास्तव वाराला. पुढे करणी मातेने यमराजाकडे त्याला जिवंत करण्यासाठी विनंती केली. शेवटी यमराजाने असं सांगितलं की हा मुलगा उंदीर बनून जन्माला येईल आणि चरण जातीतील कुठलीही व्यक्ती मरण पावल्यास तिचा उंदीर म्हणून जन्म होईल."
रिंकू यांनी सांगितलेल्या दंतकथेसारख्या बऱ्याच कथा स्थानिकांमध्ये प्रचलित आहेत. या उंदरांना हे भाविक देवीची मुलं मानतात. देवीनेच बिकानेर शहराची स्थापना केली असल्याचंही सांगितलं जातं. पुढे बिकानेरच्या राजांनी देशनोक येथे करणी मातेचं भव्य मंदिर उभारल्याची आख्यायिका प्रचलित आहे.
मंदिराविषयी काही रंजक गोष्टी...
1. करणी माता मंदिरात असलेल्या उंदरांमुळे कसलाही आजार पसरत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
2. मंदिरातील हजारो उंदरांमध्ये सर्व उंदरांचा आकार एकसारखा आढळतो.
3. या हजारो उंदरांमध्ये कधीच नवजात उंदीर आढळत नाही.
4. या उंदरांचा DNA माणसांच्या DNA शी मिळत असल्याचं सांगण्यात येतं.
5. उंदरांनी खाल्लेला प्रसाद पुन्हा भाविकांमध्ये वाटलं जातो आणि भाविकही त्याला श्रद्धेने खातात. यामुळे त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
6. मंदिरात पांढऱ्या रंगाचा उंदीर दिसणे आणि कुठलाही उंदीर आपल्या पायांवरून जाणे शुभ मानले जाते. पण जर उंदीर पायाखाली येऊन जखमी झाल्यास ते अशुभ मानले जाते.
7. मंदिरात वर्षभर सकाळ संध्याकाळ भाविकांना मोफत जेवण दिलं जातं.
उंदरांसाठीच्या मिठाईसाठी भाविकांकडून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च
आपल्या घरात असलेल्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण सदैव तत्पर असतो. त्यांना हकलून लावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो, खर्च करतो. पण करणी माता मंदिरात याबाबत विरोधाभास दिसून येतो. करणी माता मंदिर परिसरात साधारणपणे 50 मिठाईची दुकानं असतात.
नवरात्री किंवा इतर वेळी या दुकानांची संख्या 150 च्या घरात जाते. येथील मिठाईच्या दुकानाचे मालक 'करणिदान देपावत' यांच्याशीही आम्ही बोललो. नवरात्रीत एका दुकानातुन एका दिवसात जवळपास 20 हजार रुपयांपेक्षा अधिकची मिठाई विकली जाते. नवरात्रीव्यतिरिक्त एका दिवसात विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या खर्चाचा हाच आकडा 4 ते 5 हजारांचा असतो.
भाविक खरेदी करत असलेल्या मिठाईसाठी लागणाऱ्या पैशांची आकडेवारी दिवसांनुसार वेगळी असली तरी नवरात्री आणि इतर दिवसांचा मिठाईवरील एकूण वार्षिक खर्च बघता तो तब्बल 11 कोटींच्या घरात जातो. हा खर्च फक्त मंदिरातील उंदरांसाठी केला जातो. फक्त मंदिरातच नाही तर परिसरातील दुकानांमध्येही उंदीर बघायला मिळतात. पण हे दुकानदार म्हणतात की उंदीर आमच्या दुकानाला कसलंही नुकसान पोहचवत नाहीत.
राजस्थानातील या मंदिरात असलेली उंदरांची अवस्था आणि त्यांच्यासाठीची व्यवस्था पाहिल्यावर कुठलाही माणूस अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. राजस्थानी लोकगीतांमध्ये 'पधारो म्हारो देश' म्हणण्यामागे कदाचित हे देखील एक कारण असावं...
फोटो क्रेडिट : ऋषिकेश मोरे






