- भागा वरखडे
"मी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आलो होतो. मी आलो तेव्हा इथे खूप गर्दी होती. माझी आई मरता मरता वाचली आहे. आम्ही थोडक्यात बचावलो. खूप गर्दी होती. जिथून बाहेर पडायचा रस्ता (एक्झिट) होता तिथून लोक आत घुसत होते. एक ट्रेन निघून गेल्यानंतर तिथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती तयार झाली. माझ्यासमोर एका ज्येष्ठ महिलेची शुद्ध हरपली.’’
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत कसेबसे वाचलेल्या एका प्रत्यक्षदर्शीची ही प्रतिक्रिया…
रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या काजलनं सांगितलं, "खूप गर्दी होती. लोक एकमेकांना धक्का देत होते. आम्ही 13 नंबर प्लॅटफॉर्मवर होतो, सगळे लोक एकेमकांना ढकलत होते. गोंधळ उडाला होता. दवाखान्यात एका बेडवर चार चार बॉडीज ठेवण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमधले सर्व डॉक्टर उपचार करत आहेत. तिथे खूप मृतदेह पडले आहेत, ते बघू वाटत नाहीये. माझ्या जावेचा यात मृत्यू झाला आहे. यात माझ्या दीराचा पाय तुटला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत महिलांचा, लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मी जिथे बघितलं तिथे चार पाच बेडवर मृतदेह ठेवलेले होते."
गेल्या काही दिवसांपूर्वी जळगावमध्ये रेल्वे डब्याला लागलेल्या आगीच्या अफवेतून प्रवाशांनी उड्या मारल्याने शेजारून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली सापडून अनेक प्रवाशांचा बळी गेला. या घटनेच्या चौकशीचा अहवाल अजून बाहेर आलेला नसताना राजधानी दिल्लीत चेंगराचेंगरी होऊन 18 जणांना प्राणाला मुकावे लागले. अपघाताच्या वेळी तातडीची मदत मिळाली, तर जीवितहानी कमी होते; परंतु देशाच्या राजधानीतही चेंगराचेंगरीच्या वेळी पुरेशी मदत मिळू शकली नाही. त्यामुळे बळींचा आकडा वाढला. 
महाकुंभमधून भले 4 लाख कोटी मिळवाल पण प्राणहानी झाली त्याचं काय?
अपघात आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्याचे आपत्ती निवारण दल मदतीला धावून जाते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे; परंतु प्रयागराजला 29 जानेवारीला झालेली चेंगराचेंगरी आणि आता नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी आपत्ती निवारण दल कोठे होते, असा प्रश्न पडला आहे.
अपघातानंतर काही लाख रुपये मृतांच्या वारसांना तोंडावर फेकले, की आपली इतिकर्तव्यता संपली असे मानणाऱ्या यंत्रणा असल्या, की दुसरे काय होणार, म्हणा! अपघात होणार नाहीत आणि झाले, तर त्यात प्राणहानी होणार नाही, हे उद्दिष्ट असायला हवे. त्यातही गर्दीच्या काळातील व्यवस्थापन आणि गर्दीची मानसिकता जाणून घेणे यातील आपले अपयश वारंवार अधोरेखित झाले आहे.
प्रयागराजला 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभाला धार्मिक अधिष्ठान देऊन, त्यातून चार लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा हेतू चांगला आहे; परंतु 44 कोटी लोक येणार असतील, तर ते कधी, कसे येणार आणि एवढ्या लोकांच्या येण्यामुळे किती ताण येणार, त्याचे व्यवस्थापन कसे करणार, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.
माघी पौर्णिमेला भाविकांच्या झालेल्या गर्दीने दोनशे किलोमीटरच्या परिसरात वाहनांची कोंडी झाली. त्यात अडकून पडलेल्या भाविकांचे अन्न-पाण्यासाठी हाल झाले. पैसे कमवताना भाविकांच्या सोईचा सोईस्कर विसर पडलेले प्रशासन आणि भाविकांना त्यांच्या नशीबावर सोडून दिलेले राजकारणी असल्याने त्यांचे जगणेही रामभरोसे झाले आहे.
दिल्लीपासून पाटण्यापर्यंत तसेच पुण्यापासून प्रयागराजपर्यंत रेल्वेला झालेली गर्दी पाहता एवढ्या गर्दीला सामावून घेता येईल का, भाविकांची संख्या हजारोंत आणि रेल्वेच्या रेकची संख्या हाताच्या बोटावर मोजण्यासारखी. यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा अंदाज सामान्यांना आला होता; परंतु रेल्वेला नव्हता.
दिल्लीत अपघात झाल्यानंतर जखमी प्रवासी मदतीसाठी इकडे तिकडे भटकत होते. वेदनेने विव्हळत होते. आप्तेष्टांना रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाइक मदतीच्या शोधात होते; पण परिस्थिती अशी होती, की त्यांना मदतीसाठी कुणीच उपलब्ध होत नव्हते. दिल्लीत जवळ रुग्णालय कोठे आहे, रुग्णवाहिका कुठे उपलब्ध होतात, याची माहिती नसल्याने नातेवाइक सैरभैर झाले होते.
अशा परिस्थितीत काही जण पायी, तर काही खासगी वाहनातून आपल्या प्रियजनांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या काही दिवसांपासून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची स्टेशनवर गर्दी वाढत असताना ही परिस्थिती निर्माण झाली होती. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचता आले नाही, एवढा निष्काळजीपणा होता.
महाकुंभासाठी प्रयागराजला जाणाऱ्या बहुतांश गाड्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून रात्री आठ वाजता सुटतात. या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 ते प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून रवाना केल्या जातात. रात्री आठ वाजण्यापूर्वीच फलाटावर गर्दी वाढू लागते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून प्रयागराजला जाणाऱ्या लोकांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे.
शनिवारी संध्याकाळपासून स्थानकावर सतत गर्दी वाढत होती; मात्र रेल्वे किंवा रेल्वे पोलिसांकडून तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नाही. या प्लॅटफॉर्मवर मोजकेच पोलिस दिसत होते. ज्या प्रकारे गर्दी वाढत होती, त्यानुसार प्रत्येक फलाटावर किमान 30 ते 40 पोलिस तैनात असायला हवे होते. रेल्वे कर्मचारीही गायब होते.
रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते, याची जाणीव रेल्वे आणि रेल्वे पोलिसांना कशी नसेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाकुंभाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या काळात तरी रेल्वेस्टेशनवर जादा रुग्णवाहिका, आपत्ती निवारण दल, जादा पोलिस बंदोबस्त, जादा माहिती कक्ष आदींची व्यवस्था करायला हवी होती; परंतु रेल्वे स्थानकावर एकच रुग्णवाहिका उपलब्ध होती. या वातावरणात तिथे रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात आलेली नाही, हीदेखील दुर्लक्षाची बाब होती. काहींनी जखमींना रिक्षातून रुग्णालयात नेले, तर काहींनी खासगी वाहनांच्या मदतीने रुग्णालय गाठले.
बैल गेला आणि झोपा केला…
आश्चर्याची बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही प्रशासनाकडे कोणतीही माहिती नव्हती. रुग्णांच्या नातेवाइकांचा रोष लक्षात आल्यानंतर सुमारे 50 रुग्णवाहिका तातडीने रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलिस आणि इतर यंत्रणा रेल्वे स्थानकावर पोहोचल्या; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने तपास सुरू केला आहे. अपघातानंतर ‘रेल्वे प्रोटेक्शन फोर्स’ (आरपीएफ) च्या पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर पोहोचले आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी चेंगराचेंगरी झालेल्या जिन्याची पाहणी करून अपघाताची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
जास्त गर्दी, अव्यवस्थित प्रवासी व्यवस्थापन आणि संभाव्य चुकीच्या घोषणेमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे रेल्वे अधिकारी घटनेचा तपास करीत आहेत. आता स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेकडून दर तासाला 1500 सामान्य तिकीटांची विक्री केली जात होती, त्यामुळे स्थानकावर गर्दी वाढली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
आता चौकशी पथक सीसीटीव्ही फुटेजची कसून चौकशी करणार असून, गोंधळापूर्वी काय घडले होते, याची माहिती घेत आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे, की चेंगराचेंगरीचे मुख्य कारण शोधण्यासाठी त्या वेळी केलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि घोषणांचे विश्लेषण केले जाईल.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी सर्वाधिक नऊ जण बिहारचे, तर आठ जण दिल्लीचे आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा जादा भरणा आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एलएनजेपी हॉस्पिटल आणि रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा तैनात केली आहे.
प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी आणि ट्रेनला उशीर झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या आधीच उशिराने धावत होत्या.
दरम्यान, प्रयागराजला जाण्यासाठी विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली. दरम्यान, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 ते 16 च्या दिशेने गर्दी सुरू झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन अपघात झाला. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला होता. जेव्हा ही दुःखद घटना घडली, तेव्हा पाटण्याकडे जाणारी मगध एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर उभी होती आणि जम्मूच्या दिशेने जाणारी उत्तर संपर्क क्रांती प्लॅटफॉर्म क्रमांक 15 वर उभी होती.
या वेळी फलाट क्रमांक 14-15 च्या दिशेने येणारा एक प्रवासी घसरून पायऱ्यांवर पडला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला. त्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जात आहे. स्थानकावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याने चेंगराचेंगरी आणि मृत्यूनंतरही रेल्वे अधिकारी घराबाहेर पडले नाहीत, उलट अपघाताला अफवाच ठरवत राहिले. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी चेंगराचेंगरी झाल्याचा इन्कार केला. वरिष्ठांनी मात्र ते मान्य केले.






