पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतींची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे अधोरेखीत होत आहे. त्यामुळे वारंवार जात पंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षेची प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्र शासनाने सहा वर्षांपूर्वी जात पंचायतीच्या मनमानी विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तयार केला.
असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असले तरी अधूनमधून जात पंचायती डोकं वर काढतच असतात. जात पंचायत ही समांतर न्याय व्यवस्था असल्याने लोकशाही कमकुवत बनते. अनेक जातीत न्यायनिवाडे अजूनही जात पंचायतमध्येच चालतात. त्यातूनच अमानुष प्रकार घडतात.
असाच एक जात पंचायतीचा प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्यामुळे एका व्यक्तीला जात पंचायत दंड करते, मात्र ती व्यक्ती तो दंड भरत नाही… मग कालांतराने अचानक ही जात पंचायत त्या व्यक्तीच्या सुनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करते आणि तुझा सासरा दंड भरत नाही ना, मग आता तो दंड तू भरायचा अन्यथा तुला आणि तुझ्या पुढच्या सात पिढ्यांना सामाजिक बहिष्कृत करू असे तुघलखी फर्मान ही जात पंचायत सोडते. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
त्याचं झालं असं की, एका महिलेच्या सासऱ्याने प्रेमविवाह केला होता. जेव्हा प्रेमविवाह केला त्यावेळी देखील जातपंचायत बसली होती आणि त्यांना दंडही ठोठावण्यात आला होता. पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. मग बऱ्याच वर्षांनंतर, 'आले पंचांच्या मना तिथे कोणाचे चालेना' असा प्रकार घडला. जातपंचायत बोलावणं हा तसा कायद्याने गुन्हा. मात्र बीड जिल्ह्याच्या आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या डोईठाणे या गावात काहींनी तो गुन्हा केला अन् महाराष्ट्रासह देशाला एका अजब निर्णयाची घटना समजली.

सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून सुनेकडून जबरन वसुली करण्याचा प्रयत्न
नंदिवाले समाजाच्या जात पंचांनी दिलेला हा निर्णय आहे. मालन शिवाजी फुलमाळी (32वर्षे) यांच्या विरोधात निर्णय दिला आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. त्यांची जात नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. सासऱ्याने प्रेमविवाह केल्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना 2 लाख 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
पण अनेक वर्षे उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे 21 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात राहणारे शिवाजी पालवे यांच्यामार्फत जात पंचायतमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती.
या पंचायतीमध्ये मालन आपले पती शिवाजी आणि मुलांसह तिथे पोहचल्या होत्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे 800 ते 900 लोकं आगोदरच एकत्र आले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही. त्यानंतर 22सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावली. सकाळी 11 पंचांसमारे त्यांना उभे केले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा असे त्यांना सांगितले गेले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू अशा धमक्या दिल्या गेल्या.
FIR वाचण्यासाठी इथे क्लिक करा:
https://baimanus.s3.amazonaws.com/media/uploads/2024/09/27/ashti-ps-cr408_compressed_yvhSzCN.pdf
पुढच्या सात पिढ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा फतवा
शेवटी मालन यांनी दंड भरू न शकल्याने पंचांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला चक्क सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेर 9 जणांविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायती व त्यांनी दिलेले जाचक निर्णय हा मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून,आष्टी पोलिस ठाण्यात, गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुलमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालवे यांच्यासह इतर पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या सर्वांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण 4, 5, 6 तसेच बीएनएस 189 (2), 351 (2) (3), 352अशा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सबंध जिल्ह्यात आला चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.
मागे कंजारभाट समाजाची जातपंचायत व त्यांनी दिलेले निर्णय याविरोधात त्या समाजातील तरुणांनी विरोध दर्शवला होता.जात पंचायतीची मनमानीला आळा घालणं गरजेचे आहे. यासाठी समाजात जनजागृती महत्वाची आहे.






