‘’रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फुलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फुलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फुलनने दारिद्रय आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतीमध्ये मध्ये माती लिपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो.
आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं, पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली.
तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्ष ती उत्तरप्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती.
अत्याचाराची शिकार होणाऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचाऱ्यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदील झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्ष खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. अजूनही तळागाळातल्या शोषित वर्गाला ती आपली वाटते.
फुलन म्हणते, "मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय, अन्यायानं दबल्या जाणाऱ्या आणि अपमानानं जळणाऱ्या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न."

‘मी फुलनदेवी’ या पुस्तकाचा हा ब्लर्ब… 1994 साली फुलन देवीची सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी तिला भेटून तिला स्वत:बद्दल पुस्तक लिहिण्याची विनंती केली. फुलनला पुस्तक म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हतं.
तिनं संमती दिल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी फुलनची कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड केली आणि नंतर शब्दांत उतरवून पुस्तकरूपानं प्रकाशित केली. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी दोन वर्षं लागली. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी ‘मी फुलनदेवी’या नावाने मराठी अनुवाद केला आहे.
शेखर कपूरच्या ‘Bandit Queen’ सिनेमामुळे फुलनदेवी साऱ्या जगाला कळली. परंतू या सिनेमात दाखवण्यात आलेले अनेक प्रसंग प्रत्यक्षात फुलनच्या आयुष्यात घडलेलेच नाहीत किंवा ते अतिरंजित करून दाखवण्यात आले आहेत. कारण तो सिनेमा फुलनची परवानगी घेऊन बनवलेला नाही. पण मी ‘फुलनदेवी’ या पुस्तकामध्ये फुलननं स्वतःच आपली जीवनकहाणी सांगितली आहे.
Bandit Queen हा चित्रपट बघितल्यापासूनच मला फुलनदेवी बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली होती. एका साध्यासुध्या महिलेला हातात बंदूक घेण्याची नेमकी गरज का पडली मला हे जाणून घ्यायचं होत.
चित्रपट बघून मी इंटरनेट व इतर ठिकाणी काही तुटकी फुटकी माहिती वाचली पण मला विशेष आणि विस्तृत जाणून घ्यायला काही मिळालं नाही आणि माझ्या हाती मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले ‘मी फुलनदेवी’ हे पुस्तक पडलं.
पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मी एकंदरीत सुन्न आणि थक्क झालो… जातीव्यवस्था,भेदभाव, महिलांचे शोषण, बलात्कार इत्यादी नेहमी कानांवर पडणाऱ्या शब्दांची मला घृणा येत होती. या पुस्तकाने मला एक वेगळं दृष्टिकोन दिलं. कोणतीही स्त्री ही अबला किंवा कमजोर नाही…स्त्री एवढं शक्तिशाली मनुष्य या पृथ्वीतलावर कोणीच नाही याची मला प्रचिती आली.
स्त्रीला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नव्हती आणि नसणार जेव्हा जेव्हा प्रश्न तिच्या अब्रु किंवा इज्जतीचा येईल, तिच्या रक्षणाचा,मान सन्मानाचा येईल तेव्हा ती कोणत्याही शक्तीशी लढा द्यायला माग पुढं बघणार नाही एवढं नक्की....
1994 साली फुलनदेवीची जेलमधून सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली या लेखकांनी फुलनदेवीचा शोध घेतला व फुलनदेवीची संमती मिळाल्यानंतर तिची जीवन कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड केली आणि नंतर टेपवरून ती शब्दात उतरवली आणि हे पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी २ वर्ष लागले.
शेखर कपुर यांनी बनवलेला Bandit_Queen हा चित्रपट मी किती वेळा बघितला असेल याचा नेम नाही. चित्रपट बघितल्यापासूनच मला फुलनदेवी यांच्या बद्दल जाणून घेण्याची खूपच इच्छा होती..त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला प्रत्येक दृश्य बघून अंगावर काटा येतो आणि आपल्या समाजाचा भयानक चेहरा आपल्याला त्यामधून दिसतो.

या पुस्तकामधून आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा समोर दिसतो. जातिव्यवस्था, गरिबी, उच-नीच, भेदभाव, स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, यौनशोषण, बालविवाह, कर्मठपणा, अज्ञान, रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, हुंडा, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांवर हे पुस्तक भाष्य करतं.
गुन्हेगार किंवा समाजाशी विद्रोह करणारे लोक हे आपल्याच समाजाचे घटक असतात. ते अचानक गुन्हेगार का बनतात? या गोष्टीबद्दल आपला समाज कधी विचार का करत नाही? आपण फुलनचंच उदाहरण बघू. एका साध्यासुध्या घरातली, शेतात काम करणारी मुलगी हातामध्ये बंदूक घेण्यासाठी का प्रवृत्त होते? या गोष्टीला समाजसुद्धा जबाबदार नाही का? असे अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना पडतात.
फुलनचा एकूण जीवनसंघर्ष खूपच दुःखद आहे. पुस्तक वाचत असताना मी कितीतरी वेळा रडलो. फुलनच्या कथेतून आपल्याला आपल्या समाजरचनेबद्दल खूप माहिती मिळते. गुन्हेगार, पोलीस, डाकू आणि डाकूंचा राजकारणासाठी उपयोग करणारे मतलबी सत्ताधारी, अशा अनुभवांचं प्रत्ययकारी चित्रण या आत्मकथेतून वाचलं की मन अंतर्मुख होतं.
उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (हे लोक मासेमारी किंवा नावड्याचा व्यवसाय करणारे) जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म झाला. वसंतोत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘फुलन’ ठेवण्यात आलं. तिचे वडील खूपच गरीब आणि दुर्बल होते, तर आई स्वभावानं कडक आणि रुबाबदार होती.
फुलन तिच्या आईवरच गेली होती. ती कोणालाही घाबरत नसे. फुलनला तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार भावंडं होती. फुलन दुसऱ्या नंबरची. फुलनच्या वडिलाची सारी शेतजमीन त्यांच्याच सख्या भावानं (बिहारी) कपटानं घेतली होती. तो त्यांना नेहमी धमक्या देत असे. तो नेहमी फुलन व तिच्या बहिणीला मारत असे. त्यांना शेतात पायसुद्धा ठेवू देत नसे.
फुलन घरचं सर्व काम करत असे. दुसऱ्यांच्या शेतात राबणं, गाई-म्हशी सांभाळणं, शेतातून गवत कापून आणणं, जळण आणणं, कधी कधी वडिलांसोबत गवंडी कामाला जाणं, अशी कामं फुलन करत असे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांना कधी कधी उपाशीही राहावं लागतं असे.
मोठ्या बहिणीनंतर वयाच्या 11व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या इसमासोबत झालं (तिच्या नवऱ्याचं नाव पुट्टीलाल). त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. फुलनचं यौनशोषण केलं. तिचा मानसिक, शारिरीक छळ केला.
तो तिला नेहमी मारहाण करत असे. त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळालीसुद्धा. पण तिला समजावुन पुन्हा त्या नराधमाच्या हवाली केलं गेलं. पण नंतर तिचा नवरा तिला एका बोटीवर सोडून पळून गेला. नंतर त्यानं तिकडे दुसरं लग्न केलं. फुलन तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता गावकरी तिचा छळ करू लागले.
‘नवरा सोडून आलेली रांड’ म्हणून तिला हिनवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि तिचा चुलत भाऊ (मायादीन) तिला धमकावू लागले.
वयाच्या 15 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला, तोसुद्धा तिच्या आई-वडिलांसमोर. बलात्कार करणारा सरपंचाचा मुलगाच होता. फुलन त्याला काही उलटसुलट बोलली होती. फुलननं पोलिसांकडे मदत मागितली, पण पोलिसांनी तिला काही मदत केली नाही. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली.
तेव्हा इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या बापाला पोलिस ठाण्यात टाकतात. तिथं काही पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करतात. तिच्यावर अनेक अत्याचार करतात आणि तिला धमकीही देतात की, ‘कोणाला सांगू नकोस. अन्यथा आम्ही तुझ्या xxx मध्ये चटणी/मिरची टाकू...’ ती भीतीमुळे गुन्हा कबूल करते आणि काही महिने जेलमध्ये राहते. नंतर तिची आई कर्ज काढून तिचा जामीन घेते..
जेलमधून सुटल्यावर ती तिच्या गावी येते, पण इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ काही शांत बसत नाहीत. ते तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर या डाकूला तिची सुपारी देतात. नंतर काही डाकू येऊन फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात.
बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवतो. कारण तो फुलनच्या जातीचा असतो. पुढे तो फुलनशी लग्न करतो आणि तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतो.
येथून फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. गरिबांवर कोणी अत्याचार केला तर त्याला शिक्षा करते. अनेक गरीब मुलींचं लग्न लावून देते. ते गरिबांसाठी एक प्रकारे मसीहा बनतात.
डाकू बनल्यानंतर फुलन पुट्टीलालनं केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्याचं ठरवते. ती त्याला ठार करते. सरपंच, पाटील व मायादीन यांनासुद्धा खूप बदडते. पुढे विक्रम मल्लाहचा मित्र असलेला डाकू श्रीराम (ठाकूर) - ज्याला स्वतः विक्रम जेलमधून सोडवतो - विक्रम मल्लाहला ठार करतो.
फुलनला नागडी करून गावागावांत फिरवतो. तिच्यावर अनेक जणांना बलात्कार करायला लावतो आणि तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवतो. एके दिवशी एका ब्राह्मण व्यक्तीच्या मदतीनं फुलन तेथून पळून जाते. ही बातमी कळताच श्रीराम त्या ब्राह्मण व्यक्तीला जिवंत जाळतो.

तेथून पळून जाऊन फुलन काही डाकूंची मदत घेऊन एक नवीन गँग बनवते. ती श्रीरामनं केलेल्या विक्रमच्या खुनाचा व तिच्या सोबत केलेल्या बलात्काराचा सूड घेण्याचं ठरवते. ती श्रीरामला शोधत शोधत एका गावात येते. त्या गावामधील 22 ठाकूर व्यक्तींना गोळ्या घालून ठार करते. कारण त्यांनी श्रीरामला लपण्यासाठी मदत केलेली असते.
ही बातमी आगीच्या वेगानं देशभरात पसरते. पोलिसांचा बंदोबस्त कडक होतो. फुलनवर सरकार एक लाखाचं बक्षीस जाहीर करतं. पण फुलन कोणाच्याच हाती येत नाही. श्रीरामला शोधत असतानाच तिला महिती मिळते की, श्रीराम ठाकूरला त्याच्याच भावानं ठार केलं आहे.
पोलीस इकडे फुलनचा शोध घेत असतात. ती त्यांना जिंदा किंवा मुर्दा हवी असते. फुलनवर खूप दबाव निर्माण होतो. ती विचारात पडते. तिच्या कुटुंबावरही खूप अत्याचार होतात. त्यामुळे फुलन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते.
12 फेब्रुवारी 1982 रोजी ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण करते. तेव्हा तिला बघण्यासाठी हजारो लोक येतात. तिला 11 वर्षं विनाखटला जेलमध्ये राहावं लागतं. 1994 मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. ती जेलमधून मुक्त होते...
इथं हे पुस्तक संपतं. पण त्यानंतर फुलनच्या आयुष्यात मोठा बदल होतो. ती 1996 साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत जाते. 1999 साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येते. 25 जुलै 2001 रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली जाते.






