पुण्याच्या एका सामाजिक संस्थेमध्ये बस्तू रेगे हे 'प्रकल्प अधिकारी' म्हणून काम करत होते. एका दिवशी बस्तू रेगे सायंकाळच्या वेळेत जात असताना नगर रस्त्यावर शहराकडून दगडाच्या खाणीकडे धावणाऱ्या डंपरखाली एका 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा अपघात झाला. डंपरचा पाठलाग करत बस्तू रेगे दगडखाणीत पोहोचले. तिथे त्यांना एक वेगळंच जग नजरेस आलं.
दगडाच्या खाणीमध्ये काम करणारी अनोळखी माणसं, वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं, धुळीने माखलेली दगडाच्या ढिगावर खेळणारी मुलं, शहरापासून थोड्याच अंतरावर असणारी दिवसभर धुळीत आणि रात्रीच्या अंधारात धडपडत असणारं वेगळं जग दिसलं. त्यांच्यासाठी राहायला घर नाही, ना शाळा. खाणीत काम करताना उद्भवणाऱ्या आजारासाठी परवडणारा दवाखाना नाही. साधं रेशनकार्ड नाही. जिथे काम मिळेल, तिथे बिऱ्हाड घेऊन राहतात.
सततच्या स्थलांतरांमुळे कोणत्याही गावात कसल्याही प्रकारची नोंद नाही. ही अनोखी दुनिया बस्तू रेगे यांच्या नजरेस आल्यावर 'या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर 1997 साली वाघोली गावच्या दगडखाण कामगारांसाठी पहिली रात्रशाळा सुरु केली. 'जेथे मुलं तिथेच शाळा ' पाहिजे, या परिस्थितीची गरज समजून मुलांसाठी दिवसाची 'पाषाण शाळा' सुरु केली.
दगडखाण क्षेत्रातील अल्पशिक्षित तरुण स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी पुढे आले. समाजात वाढत असलेली गरिब-श्रीमंतामधील विषमता, लींग, जात, धर्मवादाखाली शोषण, होणारी पिळवणूक थांबली पाहिजे, सोडवली पाहिजे, या विचाराने 1998 साली पल्लवी रेगे आणि बस्तू रेगे यांनी संतुलन या सामाजिक संस्थेची स्थापना केली.
महाराष्ट्रात स्थलांतरित होणाऱ्या कुटुबांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वेगवेगळ्या कामात कमी पगारावर मिळेल ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र दगड खाणीने समृद्ध असल्यामुळे या कामात मजुरांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे राज्य - परराज्यातून या कामासाठी अनेक कुटूंबे स्थलांतर करतात. हे काम एक -दोन दिवसात होणार नसतं, हे कायम स्वरूपी चालत ंत्यामुळे लोक कुटूंबासोबत स्थलांतर होतात.

(पाषाण शाळेतील मुलं आणि बस्तू रेगे)
लोकवस्तीपासून दूर,नजरेस न पडणाऱ्या डोंगरात, दगडखाणीत असंख्य कुटूंब पोटापाण्यासाठी काम करत असतात. धुळीने माखलेली लोक, आई-वडील दगड फोडताना त्यांच्या आजूबाजूने फिरणारे लहान- लहान मुले. मुलांना शाळा आहे ना योग्य खाणं. शहरातील मुलांचं शिक्षण हे लहानपानापासूनच सुरु होत.
पण दिवसभर या दगडखाणीत वावरणाऱ्या मुलांचं भविष्य कसं असेल? की याच आयुष्य दगडखाणीत काम करणार…? या असंख्य प्रश्नांचा शोधात जात असतानाच नजरेस आली ती पुण्यातील बस्तू रेगे यांनी सुरु केलेली पाषाण शाळा. दगडखाण वस्तीचा आणि परिस्थितीचा विचार करून 'जेथे मुलं तिथेच शाळा' पाहिजे. असा विचार करून बालमजुरांसाठी 'पाषाण शाळा' सुरु केली.
चौकटी बाहेरच्या मुलांसाठी शिक्षण…
कुठेही नोंद नसल्यामुळे कोणती कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शासनाच्या शिक्षण पद्धतीत ही मुलं बसत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांसाठी पाषाण शाळा हा उपक्रम. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, आणि राज्यातील इतर ठिकाणी पाषाण शाळेच्या माध्यमातून चाळीस हजाराच्या वरती मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहे. शाळेच्या माध्यमातून निरक्षरता, अंधश्रद्धा, बालमजुरी, बालविवाह रोखण्यास यश आलं.
एका पाषाणशाळेपासून सुरू झालेला हा प्रवास आज खूपच : विस्तारला आहे. जवळपास १५-१६ जिल्ह्यांत आज दीडशे पाषाण शाळांमधून 24484 मुले-मुली 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा बाबासाहेब आंबेडकरांचा पाढा गिरवत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये 55 टक्क्यांच्या आसपास मुली आहेत, तर अगदी स्वाभाविकपणे यांपैकी 93 टक्के विद्यार्थी हे भटके-विमुक्त, आदिवासी, दलित आणि इतर मागास समाजांतील आहेत. जातीनिहाय आरक्षण आणखी किती वर्षे, असे कुत्सितपणे विचारणाऱ्यांनी हे वास्तव आणि याच समाजाचे शासनाच्या क्लास वन, क्लास टू नोकऱ्यांतील अत्यल्प प्रमाण याची तुलना जरूर करावी.

पाषाण शाळेचे फायदे…
- मुलांच्या बाबतीत कोणतीच सुरक्षितता नसल्यामुळे आणि शिक्षणाची कोणतीच सुविधा नसल्यामुळे मुलं आई-वडिलांसोबत खाणीत मजुरीसाठी जातात. पाषाण शाळा दगडखाण भागात असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवतात. त्यामुळे बालमजुरी कमी झाली. मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली.
- दगडखाणीत कमी मजुरीत काम करावं लागतं. मजुरी कमी असल्यामुळे पोषक आहाराची कमतरता निर्माण होते. त्यामुळे कुपोषणाचा प्रमाण जास्त असतं. पाषाण शाळेत मुलांना मध्यान्न पोषक आहार मिळत असल्यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होते.
- पाषाण शाळा दुर्बल, शोषित दुर्लक्षित समाजातील मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळत असल्यामुळे या घटकाच्या विकासास मदत होते.
या सर्व कामाची सुरुवात जशी एका वेदनेतून झाली तसाच इथपर्यंतचा प्रवासही कष्टदायक, थकवणारा, अनेकवेळा निरुत्साही करणारा परंतु सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या सहकार्याच्या भावनेवर आणि त्यातही कष्टकरी महिलांच्या सक्रिय पुढाकारातून पुढे नेणारा ठरला आहे.
छोट्या छोट्या मागण्यांसाठी सरकार दरबारी उंबरठे झिजवताना, मोर्चे काढताना, धरणे आंदोलन करताना प्रशासनातील बहुसंख्य सरकारी बाबूंच्या नकारात्मक आणि असंवेदनशील प्रतिसादाने आलेली निराशा खाणकामगारांच्या जिद्दीमुळे आणि एकीमुळेच केवळ पळवून लावता आली असे रेगेभाऊ व पल्लवीदीदी आवर्जुन नोंदवितात. सर्व खाणकामगार आणि पाषाणशाळेतील मुले त्यांना प्रेमाने आणि आदराने भाऊ आणि दीदी म्हणूनच हाक मारतात.
पाषाण शाळांसाठी लढा…
कामगार व मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सुरुवातीला तीन शाळा सुरू झाल्या. नंतर महाराष्ट्रातील इतर भागात देखील शाळा सुरू झाल्या. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक व राज्यातील इतर ठिकाणी पाषाण शाळेच्या माध्यमातून सुमारे 45012 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शाळेच्या माध्यमातून निरक्षरता, अंधश्रद्धा, बालमजुरी, बालविवाह व शोषणाला आळा घातला आहे.

पाषाण शाळांना मान्यता देऊन अनुदान मिळावे, अशा मागणीचा प्रस्ताव 1999 साली जिल्हा परिषदेकडे पाठविला. परंतु, प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 2001 साली पुणे जिल्ह्यातील पाषाण शाळांनी पहिला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं ही घोषणा देत शाळाबाह्य मुलांबरोबर आंदोलन करण्यात आले. वाघोली परिसरात शाळाबाह्य मुले नसताना जिल्हा प्रशासनाने दिलेला अहवाल हा चुकीचा असल्याचे संतुलनाने दिलेल्या 340 शाळा बाह्य मुले असल्याचा संतुलन पाषाण शाळांनी दिला.
2003 साली देखील दोन वेळा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संतुलनाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर २००४ साली प्राथमिक शिक्षण विभागाने अहवाल विकास मंत्रालयाकडे पाठविला. २००५ साली दोन वर्षासाठी तात्पुर्ती मान्यता मिळाली.नंतर राज्यशासनाकडून 2009 मध्ये पाषाण शाळांबाबत विशेष निर्णय घेण्यात आले.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधीकार अधिनियम 2009 अंतर्गत 2012 साली दगडखाण क्षेत्रातील मुलांच्या शिक्षणाबाबत अभ्यास करून राज्यसरकारला शिफारसी करण्यासाठी नऊ सदस्यीय समिती गठीत केली 'जेथे मुल तेथे शाळा व जेथे खाण तेथे शाळा ' म्हणजे खाणीतील प्रत्येक शाळाबाह्य मुलांना शिक्षण घेता येईल या हेतूने समितीने संतुलन संस्थेने 1997 पासून चालवलेल्या पाषाण शाळेला भेट दिली.
शाळांची पाहणी करून अहवाल 2013मध्ये शासनाकडे पाठवला. मात्र 2014 च्या शासनाने वरील शासन निर्णयाला न जुमानता संतुलन पाषाण शाळा बंद करण्याचा 23 ऑगस्ट 2016 ला बंद करण्याचा आदेश दिला. काही ठिकाणच्या शाळा बंद आहेत. पण पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी चालू आहे. पाषाण शाळांमुळे दगडखाणीतील बालमजुर मुक्त होऊन विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत पोहचले आहेत. पण आजही राज्य शासन त्याच्याबाबत योग्य उपाय- योजना करताना दिसत नाही.






