अगदी आता आतापर्यंत शाळेच्या वर्गात अभिनव अरोडाच्या बाजूला कोणी बसत नव्हतं. पण जेव्हा अवघ्या दहा वर्षाच्या ‘कृष्ण भक्त’ अभिनवचे सोशल मीडिया प्लॅटफॉमवर 13 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले, तेव्हा प्रत्येक पालक त्यांच्या मुलांना शाळेत ‘अभिनवच्या बाजूलाच बस’ म्हणून आग्रह करू लागले.
अयोध्येच्या राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण अभिनवला मिळाले तेव्हा सारेच चकीत झाले आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जेव्हा ‘भारताचा सगळ्यात लहान अध्यात्मिक गुरु’ अशी पदवी त्याला दिली तेव्हापासून सोशल मीडिया आणि या देशातल्या प्रत्येक चॅनेलने-दैनिकांनी अभिनवला डोक्यावर घ्यायला सुरूवात केली.
अभिनव भारताचा नवा नवा धार्मिक सेलिब्रिटी बनलायं, जो सार्वजनिक कार्यक्रमांत आणि सोशल मीडियावर भक्ती, इश्वर यासंबंधी बोलत असतो. आतापर्यंत इन्स्टाग्रामवर त्याचे 9.5 लाख, फेसबुकवर 2.2 लाख आणि युट्युब चॅनेलवर 1.3 लाख सबस्क्रायबर झाले आहेत. मात्र लोकं जितके अभिनवला पसंत करत आहेत तितकेच ट्रोलही करत आहेत.
अभिनव सध्या या सगळ्या गोष्टींना कसा सामोरा जातोय असे विचारल्यावर अतिशय निरागसपणे तो म्हणतो,’’कृष्ण भगवानकडे माझे मन आणि माझा आत्मा आहे. राधा-कृष्ण तिथेच वसतात ज्यांच्या मनात प्रेम आहे. मी तर वृंदावनमधील एखाद्या फाटक्या झोपडीत राहण्यासाठी सगळ्याच सांसारिक गोष्टींचा त्याग करू शकतो.’’

‘भारताचा सगळ्यात लहान अध्यात्मिक गुरु’
पश्चिम दिल्लीत एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अभिनव अरोडाला एकही मित्र नाहीये. त्यालाही मित्र नकोच आहेत. स्मार्टफोन किंवा गेम्सकडे तो ढुंकूनही बघत नाही. टिव्ही हा त्याच्यासाठी अडसर आहे. त्याची एकच इच्छा आहे, ती म्हणजे दिवस-रात्र कृष्ण आणि राधेशी गप्पा मारणे, त्यांच्या सेवेत तल्लीन होणे आणि धार्मिक ग्रांथांचे पारायण करणे. धोतर आणि सदरा अशा वेशात असलेल्या अभिनवला कृष्णाच्या जन्मस्थळी म्हणजे वृंदावनला जाणं, भगवत गीता वाचणं आणि घरातल्या मोठ्या देव्हाऱ्यातील देवांच्या मुर्तींची देखभाल करणं यातच अधिक रस आहे.
‘’कृष्ण-राधेनेच माझी निवड केली आहे’’
‘’मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो की, श्री राधा राणीने मला त्यांचा भक्त बनवून घेतलं. धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली, त्यांना त्यासाठी मी योग्य वाटलो. अगदी सुरुवातीपासून त्यांनीच माझा हात त्यांच्या हातात घेतला’’ असं अवघ्या दहा वर्षांचा अभिनव म्हणतो तेव्हा आश्चर्यचकीत व्हायला होतं.
नुकताच अभिनव अरोडाचा गणपती विसर्जनाचा एक भावपूर्ण व्हिडियो व्हायरल झाला होता. अभिनव अद्याप पौंगाडावस्थेतही पोहचला नसला तरी तो एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे बोलत असतो. त्याचे लाखो फॉलोअर्स त्याला ‘बाल संत’ म्हणून संबोधतात. मात्र दुसरीकडे त्याचे टीकाकारही सोशल मीडियावर त्याच्यावर तुटून पडतात. या देशातील धार्मिक व्यक्तींना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम आणि विचारपूर्वक पद्धतीने अभिनव अरोडा हे मॉडेल तयार करण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केलाय.
‘एक्स’वर अभिनवला ट्रोल करताना,’या बालकाने भारताचा एल्गोरिदम क्रॅक केला आहे…. तु आज शाळेचा गृहपाठ केलास का…? आज शाळेत का नाही गेलास…? अशा कॉमेंट्स व्यक्त केल्या आहेत.

अभिनवच्या आई-वडिलांची काय भूमिका आहे?
अभिनवच्या वृंदावन तीर्थयात्रेच्या व्हिडियोला ३० हजार लाईक्स आहेत. वृंदावनचे एक पुजारी म्हणतात की, आम्ही या मुलाला अद्याप उपदेश करताना तरी पाहिलेले नाही. हा दहा वर्षांचा पोरगा भगवत गीता, त्याचे व्याकरण, त्याचा आशय कसा काय समजू शकतो? कुठे शिकलाय तो आणि कोण आहेत त्याचे गुरु…?
या सगळ्या प्रकारावर अभिनवच्या आई-वडिलांची काय भूमिका आहे? वास्तविक आपल्या मुलाचे असे आयुष्य त्यांना मान्य नाही, परंतू आता त्यांनी या गोष्टीला मनापासून स्वीकारलं आहे. अभिनवची आई ज्योती अरोडा म्हणते, आम्ही कधीच तसे फारसे धार्मिक नव्हतो. इतर हिंदू घरांमध्ये जसं वातावरण असतं तसच आमच्याकडे होतं. अभिनव अगदी छोटा असताना सकाळी आणि संध्याकाळी देवाची एक छोटीसी आरती करायचो इतकचं...
अभिनव जेव्हा चालायला आणि बोलायला लागला तेव्हा तो त्याच्या आजोबांसोबत देवळात जायला लागला. देवळात तो इश्वरभक्तीमध्ये समरसून गेलेल्या पुजाऱ्यांकडे एकटक बघायचा. त्याने कृष्ण आणि भगवत गीता संबंधी जे काही ज्ञान मिळवलयं ते आमच्या घराजवळ असलेल्या देवळांच्या पुजाऱ्यांकडून मिळवलयं… मात्र जेव्हापासून तो वाचू लागला तेव्हापासून त्याने धार्मिक ग्रंथच वाचायला सुरूवात केले.
आपल्या मुलाने एक सामान्य मुलाप्रमाणे वागावं बोलावं यासाठी ज्योती अरोडाने खुप प्रयत्न केले. अभिनवला त्यांनी वेगवेगळे खेळ शिकवण्याचा प्रयत्न केला, कार्टून्स मालिका वाचायला दिल्या, लोकप्रिय कार्टून ‘मोटू-पतलू’च्या गोष्टी सांगून पाहिल्या, जीन्स आणि टि शर्ट विकत घेऊन दिले, मात्र अभिनवला या सगळ्यात रसच नव्हता.
जर देशाबाहेरचे भक्त साडी आणि सदऱ्यामध्ये वृंदावनला येत असतील तर मग आपण हिंदूंनी वेगळा पोषाख का घालायचा, असे उत्तर अभिनव देतो.

(अभिनवच्या घरातील देव्हारा)
‘’इतर मुलं अरे यार, अरे भाई म्हणायचे तर हा ‘राधे राधे’ म्हणायचा’’
अभिनवचे वडील राज अरोडा हे एक व्यावसायिक सल्लागार, TEDxचे प्रेरणादायी वक्ते आणि लेखक आहेत. ते सांगतात की, अभिनव इतर मुलांसारखा व्यवहार करत नसल्याने आणि त्याच्या चुलत भावांसोबत खेळत नसल्याने मी अनेकदा त्याला ओरडलोय.
इतर मुलं जेव्हा ‘अरे यार’ किंवा ‘अरे भाई’ असे बोलतात तेव्हा आमचा मुलगा मात्र ‘राधे राधे’ बोलतो म्हणून त्याच्यासोबत इतर मुलं बोलतच नव्हती. अभिनवशी या विषयावर आम्ही बोलायचो तेव्हा तो म्हणायचा की, मला काहीएक फरक पडत नाही, कारण माझ्यासोबत भगवान कृष्ण बोलतो, खेळतो… शेवटी आम्हाला त्याच्या भक्तीपुढे गुडघे टेकवावे लागले.’’
आई-वडिलांकडून मुलं शिकतात, मात्र आमच्या घरात उलटं आहे. आम्हीच आमच्या मुलाकडून सध्या शिकतोय. आम्ही त्याला बदलण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आता त्यानेच आम्हाला बदलवून टाकलयं, अशी अभिनवची आई म्हणते.
अरोडा कुटुंब आता पूर्णपणे आपल्या मुलासोबत आध्यात्मिक यात्रेत दंग झाला आहे. मुलाप्रमाणे त्यांनीही आता टिव्ही बघणं पूर्णपणे बंद केलयं. आता त्यांच्या घरात फक्त सात्विक जेवणं खाल्ल जातं…
तीन वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडवरून अरोडांचे चुलत भाऊ आल्यानंतर सगळी चक्र फिरली. त्यांच्या सुचनेनुसार अभिनवच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या कथा वाचनाच्या, आणि वृंदावन मंदिरातील दर्शनाच्या क्लिप्स टाकायला सुरूवात केली. आज अभिनव अरोडा सगळ्या ठिकाणी आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोन क्रमांक आहे ज्याद्वारे त्याच्या वडिलांशी संपर्क साधता येऊ शकतो.
अनेक लोकं आता वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी अभिनवला निमंत्रित करतात. ईदच्या निमित्ताने अभिनवने एका मुस्लिम मुलासोबतची एक रील पोस्ट केली होती ज्यात त्याने म्हटलं होतं,’’ सनातन एक अशी संस्कृती आहे जी अभिनव आणि अब्दुल या दोघांनाही एकत्र बांधून ठेवते.’’

(भारताचा सगळ्यात लहान आध्यात्मिक गुरु)
अगोदर अभिनवचे सोशल मीडिया अकाऊंट घरातील लोकं सांभाळायची, आता मात्र त्यासाठी एक विशेष टीम कार्यरत आहे. त्याच्या अकाऊंटवर श्लोक, भजनं, मुलाखती आणि पॉडकास्ट असा कंटेट उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी सरकारने अभिनवच्या धार्मिकतेवर शिक्कामोर्तब केले आणि त्याला ‘ग्लोबल इंडियंस कॉन्क्लेव एंड अवार्ड्स’ अंतर्गत भारताचा सर्वात युवा आध्यात्मिक वक्ता असा पुरस्कार दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जुलै 2024 मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रमुख नेत्या साध्वी ऋतंबरा यांच्या हस्तेही अभिनवला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला आज अभिनवच्या बाजूला बसायचं आहे…
… आणि आता तर अभिनव हा शाळेत सगळ्यात लाडका विद्यार्थी बनलाय. त्याचे शिक्षक फावल्या वेळेत त्याच्याकडून भजनं एकतात. ते म्हणतात वर्गात अभिनव एकटा आहे आणि त्याच्यासोबत २८ इतर मुलं ज्यांना अभिनवच्याच शेजारी बसायचं आहे, त्यामुळे आम्हाला वर्गात आता आळीपाळीने मुलांना अभिनवच्या शेजारी बसवावं लागतं…
सोशल मीडियावर भलेही अभिनवला शाळेत जातोस की नाही म्हणून ट्रोल करण्यात येत असलं तरी त्याचे आई-वडील या मुद्द्यावर गंभीर आहेत. अभिनवला हिंदी भाषेत जास्त रस असून तो गुरुकुल शिक्षण पद्धतीत पुढे शिकायला जाणार आहे. तो म्हणतो, मी मन लावून अभ्यास करेन परंतू मला आठवड्यातून किमान एकदा तरी वृंदावन मंदिरात जायची परवानगी मिळायला हवी…

सोशल मीडियावर धार्मिक आणि भक्तीप्रधान कंटेटमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला अभिनव अरोडा हा पहिलाच मुलगा नाहीये. त्याचा मुकाबला जयपूरच्या एका अवघ्या पाच वर्षीय ‘भक्त भागवत’शी आहे ज्याचे इंस्टाग्रामवर तब्बल २२ लाख फॉलोअर्स आहेत.
समाजशास्त्राचे अभ्यासक आणि मनोवैज्ञानिक आशिष नंदी म्हणतात की, अशा प्रकरणामुळे कधीकधी वाईट गोष्टींचाही जन्म होऊ शकतो. लहान वयात येणारे प्रौढत्व हे एक संकटदेखील आहे.
(सौजन्य - द प्रिंट)






