गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र या राज्यांत अपयश येण्यामागे शेतकऱ्यांची नाराजी हे एक महत्त्वाचे कारण होते. तेव्हापासून भाजपने शेतकऱ्यांच्या बाबतीत सबुरीचे धोरण घेतले आहे. त्यातच हरयाणासारख्या शेतीप्रधान राज्यांत विधानसभेची निवडणूक सुरू आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक आगामी तीन महिन्यांत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष या काळात वाद होणार नाही आणि काही अंगलट येणार नाही, याची दक्षता घेत असताना कंगना राणावतने मुक्ताफळे उधळली आहेत.
एखाद्या क्षेत्रात आपल्याला गती असली, म्हणजे सर्वंच क्षेत्रात आपण नाक खुपसावे, असा त्याचा अर्थ होत नाही; परंतु कंगनासारख्यांना ते कोण सांगणार? पक्षाबरोबर आपणही तोंडघशी पडायचे, असे तिने जणू ठरवले आहे. मुंबईत बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा असो, की शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर घेतलेला पंगा; वाद आणि कंगना हे एक नाते तयार झाले आहे.
शेतकऱ्यांविषयी मागे वादग्रस्त टिप्पणी केल्याचा राग केंद्रीय राखीव दलातील एका महिलेने कंगनाच्या श्रीमुखात लगावून व्यक्त केला होताच. ते चुकीचे असले, तरी ‘बातोंकी भाषा न समजनेवालोंको लातोकी भाषासे समझाना पडता है’ हा हिंदी चित्रपटातील संवाद लागू होतो.
आताही तिने शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीने तिला खुनाची धमकी दिली असेल, तर ते चुकीचे आहे; परंतु याचा अर्थ तिने काहीही बोलावे आणि इतरांनी ते निमूटपणे सहन करावे असा होत नाही. पुणेरी अनुल्लेखने अशांचे फावते, हे समजून घ्यायला हवे.
हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत कंगनाच्या वक्तव्यामुळे फटका बसू शकतो, हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने तिच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवून तिला समज दिली असली, तरी पूर्वीचा अनुभव लक्षात घेता तिला त्याचा किती फरक पडतो, हे पाहावे लागेल.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांनी 11 डिसेंबर 2021 रोजी आंदोलन मागे घेतले होते; मात्र सरकारने शेतकरी संघटनांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली असून आता शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात शंभू सीमेवर मोर्चा काढणार आहेत.
फेब्रुवारीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला 31 ऑगस्टला 200 दिवस पूर्ण होणार आहेत. या काळात वेळोवेळी काही नेत्यांकडून आक्षेपार्ह विधाने करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा सरकारला सीमा अंशतः खुली करण्याचे निर्देश दिले होते आणि शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरून ट्रॅक्टर आणि ट्रॉली हटवण्यास सांगितले होते.
असे असूनही, 21 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी पंजाब पोलिस, शेतकरी आणि हरियाणाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात पटियाला येथे झालेल्या बैठका अनिर्णित राहिल्याने सीमा उघडण्याचे काम तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
एकीकडे ही स्थिती असताना शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत; परंतु सर्वोच्च न्यायालयाने बहुसदस्यीय समिती स्थापन करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुढील सुनावणीची तारीख 2 सप्टेंबर निश्चित केली आहे.
दुसरीकडे 31 ऑगस्टला शंभू बॉर्डरसह तीन ठिकाणी निदर्शने करण्याची रणनीतीही शेतकरी नेत्यांनी आखली आहे. देशातील शेतकरी कर्ज आणि आर्थिक संकटामुळे सातत्याने आत्महत्या करत असताना शंभू सीमेवर धरणे आंदोलनात आतापर्यंत २६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
22 ऑगस्ट रोजी लुधियानामधील घुंघराना गावातील एका शेतकरी कुटुंबातील तीन सदस्यांनी लुधियाना-धुरी रेल्वे मार्गावर गाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. अशा परिस्थितीत आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती असताना भाजप खासदार कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
कंगनाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, "सरकारने कठोर पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबचे रूपांतर बांगला देशात होईल. तीन रद्द केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मृतदेह लटकवले जात होते आणि बलात्कार होत होते.'' असे सांगितले.

कंगनाच्या या वादग्रस्त वक्त्वाचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलित मिळाले. त्यामुळे भाजपने कंगनाच्या वक्तव्यापासून दूर राहून तिला धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले आहे. शेतकरी आंदोलनामुळे परिसरातील रहिवाशांचीही मोठी गैरसोय होत असून शासनाच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसत आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे सर्व पक्षांच्या हिताचे आहे.
आता या वर्षी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका असल्याने सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले, तर त्याचा फायदा होऊ शकतो; परंतु त्याबाबत सरकारची भूमिका आडमुठेपणाची आहे. त्यातच सरकारी पक्षाचे खासदार अशी मुक्ताफळे उधळतात. चीन आणि अमेरिकेसारख्या विदेशी शक्ती भारतात काम करतात, असा दावाही कंगनाने केला होता.
कंगना आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले होते. तिथून ती खासदार बनली आहे. तीन कृषी कायद्यांबाबत शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाच्या अनेक विधानांवरून वाद निर्माण झाला आहे.
खासदार झाल्यानंतर दिल्लीत येत असलेल्या कंगनाला मोहाली विमानतळावर महिला हवालदाराने थप्पड मारली होती. कुलविंदर कौर नावाच्या महिला हवालदाराने त्याचे समर्थन करताना सांगितले होते, की कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या वक्तव्याचा राग आला होता. शेतकरी आंदोलनादरम्यान आणि त्यानंतरही अनेक प्रसंगी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती.
88 वर्षीय महिला शेतकरी महिंदर कौर पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत झेंडा घेऊन कूच करताना दिसल्या. महिंदर कौरच्या या फोटोनंतर ‘सोशल मीडिया’वर त्यांची तुलना शाहीन बाग आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बिल्किस दादीशी करण्यात आली.
त्या वेळी कंगनाने बिल्किस आणि महिंदर कौर या दोघींचे एकत्र फोटो ट्विट करून टोमणा मारला होता, "हा हा. ही तीच आजी आहे जिचा टाईम मासिकाच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला होता... आणि या 100 रुपयांना उपलब्ध आहेत. कुलविंदर त्यामुळेच संतापली होती. ती स्वतः आणि तिची आईदेखील शेतकरी आंदोलनात सहभागी झाली होती.
कंगनाचा प्रताप (!)इथेच संपत नाही. संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिवाच्या चक्रव्यूह आणि महाभारताच्या कथेचा उल्लेख केला होता. कंगनाने त्यावर राहुल गांधीं ड्रग्ज घेत असून त्यांची चाचणी केली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
तिने जुलै महिन्यात शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याअगोदर कंगना म्हणाली, होती की भारताला 1947 साली भीक मागून स्वातंत्र्य मिळाले आणि देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रदीर्घ लढा आणि संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले, तर 2014 मध्ये मोदी पहिल्यांदाच मोदी भारताचे पंतप्रधान झाले.

कंगनाच्या या वक्तव्यानंतरही मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाने चित्रपट अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांच्यावर केलेली टिप्पणी ‘सोशल मीडिया’वर चर्चेत आली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने दोन्ही अभिनेत्रींचे वर्णन बी-ग्रेड अभिनेत्री असे केले होते. कंगनाच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षांसारख्या अनेक विरोधी पक्षांना भाजपवर जोरदार प्रहार करण्याची संधी मिळाली आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. तेथून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात उतरले होते. याशिवाय येत्या काही दिवसांत हरियाणात विधानसभा निवडणुका होणार असून, येथील शेतकऱ्यांनीही विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील सत्ताधारी भाजपला कंगनाने मांडलेल्या अमेरिका आणि चीनबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि चुकीची असेल, तर असे बोलणाऱ्याला पक्षातून काढून टाका, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांवर अशा प्रकारची टिप्पणी कोणीही केली नाही आणि 'हे पक्षाचे विधान नाही' एवढेच सांगून भाजप सुटू शकत नाही.
अशा वेळी कंगनाच्या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच भाजपने तिला जाहीरपणे इतक्या कडक भाषेत इशारा दिला आहे. त्याचा तिच्यावर किती परिणाम होईल, याबाबत साशंकता आहे.






