सध्याच्या डिजीटल युगात लोकांशी जोडले जाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोशल मीडियासोबत नवनवीन डेटींग ॲप्समुळे लोकांशी जोडण्याचे, नातेसंबंध बनवण्याचे, मैत्री करण्याच्या अगणित संधी मिळतात. विशेषतः एलजीबीटीक्यू समुदायासाठी डेटींग ॲप्स फार उपयोगाचे आहेत. आपल्या समाजात जिथे नॉन-बायनरी आणि क्वियर समुदायाला स्वतःला अभिव्यक्त करणं मोठं आव्हान असताना, डेटींग ॲप्समुळे ते एकमेकांशी सहज जोडले जाऊ शकतात.
पण अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाच्या दुरूपयोगाप्रमाणेच डेटींग ॲप्सचे दुरूपयोगही आहेतच. मद्रास हायकोर्टाच्या मदुरई पीठाने सोशल मीडिया आणि डेटींग ॲप्सच्या दुरूपयोगाविषयी शंका व्यक्त केली. महाराजा विरूद्ध पोलिस निरिक्षक या प्रकरणात, आरोपी महाराजाने ग्रिंडर ॲपचा उपयोग करत लैंगिक शोषण आणि लूटमार केल्याचं सिद्ध झालं. उच्च न्यायालयानं म्हटलं की हे ॲप एलजीबीटीक्यू समुदायासाठी असल्यामुळे अडचणीचं नसून, याचा मुख्य उद्देश लैंगिक, अश्लील हरकती गोळा करण्याचा आहे ही समस्या आहे.
एलजीबीटीक्यू समुदायासाठी खास डेटिंग ॲप…
ग्रिंडर ॲप 2009 मध्ये लॉन्च झालं होतं. सुरूवातीला ते गे लोकांसाठी होतं. नंतर क्वियर समुदायही यात सामिल झाला. आयओएस आणि एन्ड्रॉईड दोन्हीवर तो उपलब्ध आहे. हे ॲप मोफत आणि प्रिमियम दोन्ही प्रकारात आहे. याची अपडेटेड वर्जन्स ग्रिंडर एक्स्ट्रॉ आणि ग्रिंडर अनलिमिटेड म्हणून आली आहेत. जीपीएसवर हे ॲप आधारीत आहे जे वापरकर्त्याला त्याच्या लोकेशनच्या आसपास असलेल्या समान लैंगिक रुचीच्या लोकांची माहिती देतं.
यातून एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांना त्यांच्यासारख्या समान विचारधारा आणि लैंगिक रुची असलेल्या लोकांशी भेटता येतं. अशा डेटींग ॲपचा उद्देश हा क्वियर समुदायाला एक सुरक्षित आणि खासगी अवकाश देणं हा आहे. जिथे ते कोणत्याही सामाजिक दबाव किंवा भीतिशिवाय आपला जोडीदार निवडू शकतील आणि आपल्या इच्छेनं जगू शकतील. पण काही लोक याचा आपल्या स्वार्थासाठी दुरूपयोग करत आहेत.
ॲपच्या सहाय्याने लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, लूट अशा घटना समोर आल्या आहेत. ॲपवर खोटी प्रोफाईल्स तयार करून लोकांची खासगी माहिती गोळा करून त्यांना ब्लॅकमेल करणं ही गंभीर समस्या आहे. अनेकदा हे लोक भावनिक आणि आर्थिक शोषण करतात. काही वेळेस पुरुषांकडून क्वियर लोकांवर हल्ले झाल्याच्या घटनाही आहेत.
त्यामुळे या समुदायाला दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे सामाजिक भेदभावाचा दबाव की त्यांची ओळख सार्वजनिक तर होणार नाही. आणि दुसरं म्हणजे अशा घटना ज्यात ते कायद्याचा आधार घ्यायलाही कचरतात.
डेटिंग ॲपचे धोके…
ग्रिंडरच्या नियमांनुसार ॲपचा वापर 18 वर्षांवरील व्यक्ती करू शकतात. पण लवचिक नियमांमुळे अनेकदा कमी वयाचे लोकही यात येतात. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या 2018 च्या सर्वेनुसार 14 ते 17 वर्षांच्या मुलामुलींनी आपला लैंगिक जोडीदार शोधण्यासाठी ॲपचा उपयोग केला होता. प्रौढांसाठी असलेले हे ॲप अल्पवयीनांनी वापरणं घातक आहे. यात त्यांचं सहजपणे लैंगिक शोषण होऊ शकतं.
बिहारच्या खगडीया येथील हर्षा (नाव बदललंय) सांगते, “क्वियर समुदायासाठी डेटींग ॲप उपयोगी होऊ शकतात. पण खोट्या प्रोफाईल्सच्या भडीमारामुळे खरा जोडीदार निवडणं आव्हान असतं. मला याचा मिश्र अनुभव आला. काही मित्र झाले जे अजूनही सोशल मीडियावर माझ्या संपर्कात आहेत. पण डेटींग ॲप वर जेवढा वेळ घालवला तेवढा वेळ मी भयग्रस्त होते, संशयी होते.”
ग्रिंडर ॲपच्या दुरूपयोगातून पिडीतांवर होणारा मानसिक परिणाम धोकादायक असतो ज्यात, त्यांना एंक्झायटी, डिप्रेशन, पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर (घटना घडल्यानंतर होणारा तणाव) होणं आढळून आलं आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेले लोक नंतर दीर्घ काळ असे संबंध बनवण्याला उत्सुक नसतात. त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होतो, शिक्षणावर, करियरवर परिणाम होतो. कौटुंबिक जगणं बिघडतं.
जगण्याच्या सर्वच क्षेत्रांत ते माघारू शकतात. स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार पिडीत युवक भीती आणि अविश्वास यामुळे मदत घ्यायला कचरतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्मितीची अत्यंत गरज आहे. जिथे ते आपले अनुभव मोकळेपणाने सांगू शकतील. दिल्लीची शिक्षिका सोना (नाव बदललंय) सांगतात, “सामाजिक भेदभावामुळे मी माझा जोडीदार निवडण्यासाटी डेटींग ॲपची मदत घेतली.

तिथे समजलं की अनेक हेट्रोसेक्सुअल पुरुष तिथे बायकांचं प्रोफाईल तयार करून क्वियर स्त्रियांचं शोषण करतात. त्यामुळे माझी खूप निराशा झाली आणि त्यानंतर मी डेटींग ॲप वापरणं बंदच केलं.”
डेटिंग ॲप वापरताना एलजीबीटीक्यू समुदायाने ही काळजी घ्यावी
ग्रिंडर आणि यासारख्या अन्य डेटींग ॲपच्या दुरूपयोगावर काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्यासाठी एक सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारावा लागेल. आधी तर सरकारी आणि नियामक संस्थांकडून यासंदर्भात सविस्तर दिशानिर्देश तयार करावे लागतील. ठराविक कालावधीच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आणि आरोपींना शिक्षा देणं निश्चित करावं लागेल.
दुसरं म्हणजे ग्रिंडरसहीत अन्य सर्वच डेटींग ॲप्सना आपल्या उपयोगकर्त्यांच्या खासगीपणाची आणि सुरक्षेची जबाबदारी घ्यावी लागेल. संशयीत लोकांना शोधणं, त्यांना थांबवणं यासाठी ॲप तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणं गरजेचं आहे. असे ॲप वापरताना काही काळजी घेतली तर पुढच्या अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात. उदा. प्रत्येक प्रोफाईल काळजीपूर्वक तपासणं. आपली खासगी माहिती, उदा. मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर, पत्ता न देणं. दिली तरी योग्य व्यक्तीलाच ती दिली आहे याची सावधगिरी बाळगणं.
प्रत्यक्ष भेटीसाठी सार्वजनिक स्थळाची निवड करणं. ज्यामुळे संभाव्य धोका टाळता येईल. कोणताही वाईट अनुभव आल्यास त्याची पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे. ज्यामुळे वेळेत योग्य कारवाई होऊ शकेल. याशिवाय क्वियर समुदायाला सामाजिक मान्यता व स्वीकृती देण्याची गरज आहे ज्यामुळे त्यांना आपली ओळख लपवण्याची गरजच भासणार नाही. याशिवाय मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.
यासाठी मुलं, तरुण मंडळी, पालक, शिक्षक यांना डेटींग ॲपची माहिती आणि त्यातील संभाव्य धोके यांची माहिती देणं, तसेच वापरकर्त्यांना याविषयी बोलायला प्रोत्साहन देणं. एलजीबीटीक्यू समुदायाला फक्त ऑनलाईनच नाही तर समाजातही त्यांचे अधिकार आणि सुरक्षा मिळायला हवी आणि त्यासाठी समाज, तंत्रज्ञान, सरकार या सर्व स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
(सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






