शोनाली समर्थ
- भारतीय सिनेसृष्टीत अनेक ‘ट्रान्स’ पात्र दाखवण्यात आली आहेत, पण त्यांचं चित्रिकरण योग्य पद्धतीने दर्शवले आहे का?
- लहान मुलं पळवणारी हिजड्यांची टोळी, विनोदासाठी पारलिंगी पात्रांचं विकृतीकरण, ट्रान्स पात्रांना क्रूर खलनायकाच्या भूमिकेत दाखवणे यामुळे समाजाच्या विचारसरणीवर गंभीर परिणाम होतो.
भारतात चित्रपट, लघुपट, वेबसिरीज, मालिकांसारखे अनेक कार्यक्रम फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनापर्यंत मर्यादित नसतात. ते समाजाचाच एक भाग समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. हल्ली तर कोणत्याही विषयाची माहिती घेण्यासाठी त्या संबंधित पुस्तकं किंवा लेख न वाचता लोकं सरळ त्या विषयावर आधारित चित्रपट किंवा सीरीज बघतात. परंतु मनोरंजनासाठी बनवलेल्या या सिरीज खरंच त्या विषयाची योग्य रीतसर माहिती देतात का? की उलट चुकीच्या सादरीकरणाने त्या विषयांवरचा गैरसमज अजून वाढवतात?
दृश्यकला बऱ्याचदा “मॅजिक बुलेट सिद्धांत” सारखे काम करते. हा सिद्धांत सांगतो की, काही माहितीचा आपल्यावर एखाद्या बुलेटच्या गोळी सारखा परिणाम होतो. ती माहिती जशी ऐकली/पहिली, तशीच ती थेट आपल्या मेंदूवर रुजते आणि त्याने आपण त्या माहितीविषयी एक दृढ मत बनवतो आणि मग तेच परमसत्य आहे असं आपण मानायला लागतो.
चित्रपट आणि सिरीजच्या माध्यमातून आपण अनेक समाजांविषयी, विचारधारेविषयी जाणतो आणि आपले मत बनवतो. ह्याच समाजांपैकी एक आहे पारलिंगी म्हणजे ट्रान्सजेंडर समाज. भारतीय सिनेसृष्टीत अनेक ट्रान्स पात्र दाखवण्यात आली आहेत, पण त्यांचं चित्रिकरण योग्य पद्धतीने दर्शवले आहे का? ह्यातल्याच काही पात्रांविषयी आपण पुढे वाचणार आहोत.
‘गंगुबाई काठीयावाडी’ सिनेमाची रझियाबाई…
2022 साली प्रदर्शित झालेला “गंगुबाई काठीयावाडी” हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुऱ्यातील सेक्स वर्कर महिलांवर आधारित होता. ह्याच चित्रपटात रझियाबाई हे पारलिंगी म्हणजेच ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर असलेलं पात्र अभिनेता विजय राज यांनी रंगवलं आहे. गंगुबाई या कामाठीपुऱ्यातील “मुखिया” म्हणजेच प्रमुख पदासाठी निवडणुका लढत असतात आणि त्यांचीच विरोधक ही रझियाबाई असते.
रझियाबाईची भूमिका एक अत्याचारी आणि जुलमी पारलिंगी बाई असल्याची दाखवली आहे, जी अनेक वर्षांपासून कामाठीपुऱ्यावर क्रूर अधिराज्य गाजवते. त्यात तिचे काही डायलॉग आहेत “जब दोनों हाथों से ताली पिटती हूं, तब उसमें दुश्मन का सिर भी पीस देती हूं” तसेच “निवाला छीन के खाने में मज़ा आता है”... ह्यातून असं सुचित होतं की रेड लाईट भागात सत्तेमध्ये पारलिंगींचे स्थान हे ‘सिसजेंडर’ महिलांपेक्षा वरचं होतं.

परंतु सत्य परिस्थिती तशी होती का? सेक्स वर्क क्षेत्रात ‘सिस’ महिलांपेक्षा ट्रान्स महिलांना हिंसेचा धोका सर्वाधिक असतो. सोबतच मिळणाऱ्या मोबदल्यातही भरपूर फरक असतो. एखाद्या महिलेच्या तुलनेत पारलिंगींना ग्राहकाकडून कमीच मोबदला मिळते, सोबतच त्यांच्यावर कामक्रीडा अत्यंत विचित्र आणि क्रूर पद्धतीने होत असते. मग अशा परिस्थितीत पारलिंगी सेक्स वर्करची जागा ही सिस महिलांपेक्षा मोठी कशी काय असू शकते?
हा चित्रपट जरी गंगुबाईच्या जीवनावर आधारित असून त्यातील पात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित असले तरीही ते चित्रपटांच्या माध्यमातून समाजाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकतात, ज्याने समाजाचा समज पारलिंगी व्यक्ती विकृत आणि क्रूर असतात असा होतो.
“शक्ती – अस्तित्व के एहसास की”... हिजडा लहान मुलं पळवतात?
2016 साली कलर्स वाहिनीवर “शक्ती – अस्तित्व के एहसास की” ही मालिका प्रदर्शित झाली. ह्या मालिकेचा मूळ विषय होता “किन्नर असलेल्या सौम्याचं आयुष्य”. ज्यात सौम्या जन्मतः “किन्नर” असते आणि तिची आई तिला लहानपणापासून घरात डांबून ठेवते, या भीतीने की किन्नरांची टोळी सौम्याचं कधीही अपहरण करू शकते. पुढे सौम्या मोठी होते, तिचं लग्नही होतं आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याला समजतं की ती एक “किन्नर” आहे आणि पुढे ही मालिका चालू राहते.
ह्या मालिकेचा उद्देश जरी खूप महत्त्वपूर्ण असला, आणि एवढ्या गंभीर विषयाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न केला असला तरीही ह्या मालिकेची LGBTQIA समुदायांविषयी असलेली समज अत्यंत ठिसूळ वाटते. सौम्याचं पात्र जरी ट्रान्सजेंडर दाखवलं असलं तरीही ते पात्र ट्रान्सजेंडर नसून इंटरसेक्स होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर ट्रान्सजेंडर (पारलिंगी), इंटरसेक्स आणि किन्नर समाज या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
पारलिंगी व्यक्तींचा जन्म हा स्त्री किंवा पुरुष शरीरात होत असतो आणि नंतर त्यांची लैंगिक ओळख ही त्यांच्या जन्मगत लिंगाशी विपरीत आहे असे समजते. परंतु ज्यांचा जन्म संपूर्ण स्त्री किंवा पुरुष शरीरात होत नाही अशा व्यक्तींना “इंटरसेक्स” असे म्हणतात. राहिला किन्नर आणि हिजडा व्यक्तींचा प्रश्न तर हे दोन्हीही एक समाज आहेत.

जसे वारकरी संप्रदाय, जोगती समुदाय, देवदासी समाज तसाच हिजडा/किन्नर समाज. कोणीही व्यक्ती जेव्हा ह्या समाजाची शपथ घेते तेव्हा त्यांना किन्नर किंवा हिजडा संबोधण्यात येते. हा समाज स्वीकारण्यासाठी इंटरसेक्स किंवा ट्रान्सजेंडरच व्हावं असेही नाही; याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनीही किन्नर समाजात प्रवेश करून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पद सांभाळलं.
“शक्ती – अस्तित्व के एहसास की” ह्या मालिकेमधून असेच LGBTQIA समाजाविषयी गैरसमज पसरले. सोबतच मालिकेत दाखविल्याप्रमाणे किन्नरांची टोळी ही नेहमी सौम्याचं अपहरण करू पाहते. ह्याने प्रेक्षकांवर असा समज होतो की किन्नर लोक लहान मुलांचं अपहरण करत असतात. शिवाय सौम्या ह्या पात्राचं लुकही पूर्णतः एका सिस महिलेसारखं दाखवलं आहे, ज्याचा खऱ्या इंटरसेक्स व्यक्तींच्या दिसण्याशी काहीही संबंध नाही.
तसेच किन्नर समुदायातील व्यक्तींच्या दैनंदिन जीवनाच्या अडचणी दाखवण्याऐवजी ह्या मालिकेतही सासू–सूनांच्या कहाण्याच जास्त दर्शवल्या. खरं तर मुख्य प्रवाहात LGBTQIA समुदायांच्या प्रश्नावर मालिका प्रदर्शित करणे खरंच मोठी बाब होती आणि हा प्रयत्नही वाखाणण्याजोगा होता, परंतु जर मालिकेने आपल्या विषयाचाच गाभा पक्का केला असता तर ह्याचा समाजावर खूप सकारात्मक बदल झालेला दिसून आला असता.
फक्त विनोदासाठी पारलिंगी पात्रांचं विकृतीकरण
अनेक मराठी–हिंदी चित्रपटांमध्ये पारलिंगी पात्रांना फक्त विचित्र विनोद करण्यासाठी कहाणीत घेतलेलं असतं. हे पात्र साकारणारे कलाकार ट्रान्सजेंडर नसून पुरुषच असतात. कोणत्याही ट्रान्सजेंडर व्यक्तींचा सोंग घेऊन हे विचित्र विनोद करतात. ह्याचेच उदाहरण म्हणजे “तुम मिलो तो सही” चित्रपटातलं एक दृश्य, ज्यात एक ट्रान्सजेंडर चित्रपटातील नायकासमोर नाचते आणि म्हणते, “ये पैसे देना, तेरे वास्ते नाची मैं” आणि मग नायक पण तिच्यासमोर नाचतो आणि म्हणतो, “मैं भी नाचा तेरे वास्ते, मुझे पैसे दे.” हा विनोद प्रेक्षकांना भलताच आवडला, पण ह्या समुदायावर अशी भीक मागण्याची पाळी का येते, असा विचार त्यांना कधी आला का?
समाजातील सगळ्यात उपेक्षित घटकातल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना मुबलक शिक्षण असूनही रोजगाराच्या संधी नसतात. समाजाच्या पूर्वाग्रहामुळे मजुरीकाम, भांडीकाम सारख्या कामांवरही ट्रान्सजेंडर व्यक्तींना जागा नसते. त्यामुळे भीक मागण्यापलीकडेही त्यांना जास्त कामे नसतात. मग त्यांच्या ह्या परिस्थितीचा विनोद करून त्यांच्यावर हसणं कोणत्या सुशिक्षित समाजाला शोभतं?

असेच एका मराठी “शहाणपण देगा देवा” ह्या चित्रपटात “खाल्यावीन पादेन” असं पात्र दाखवलं, जे पुरुष असून त्याचं वागणं हे स्त्रीसदृश असतं. हे पात्र सतत तरुण पुरुषांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत अत्यंत वासनाधीन आणि कामोत्तेजित असल्याचं दर्शवलं. मुळात समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयी ह्याच चुकीच्या भावना समाजात पसरलेल्या असतात. चित्रपटात त्यांच्या अशा पद्धतीच्या सादरीकरणाने समाजाचा अशा गोष्टींवर दृढ निश्चय होतो की ट्रान्सजेंडर व्यक्ती नेहमी वासनाधीन असतात.
कोती…पारलिंगींची जीवनकहाणी दाखवणारा सर्वश्रेष्ठ चित्रपट
2015 साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “कोती” हा पारलिंगींची जीवनकहाणी दाखवणारा सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे. हिजरा–फारसी भाषेत (जी भाषा किन्नर–हिजडा समुदायातील व्यक्ती बोलतात) “कोती” शब्दाचा अर्थ पारलिंगी महिला असा होतो. ह्या चित्रपटात श्याम नावाचा लहान मुलगा ट्रान्सजेंडर असतो. त्याच्या स्त्रियांसारख्या हावभाव आणि वागणुकीमुळे त्याचे पितृसत्ताक विचारसरणीचे वडील त्याचा कठोरपणे विरोध करतात.
वडिलांसकट समाजाच्या अवहेलनेमुळे त्या लहान मुलाच्या मनात निर्माण होणारी घुसमट अत्यंत योग्य पद्धतीने सादर केली आहे. शिवाय वडिलांचा श्यामविषयी असलेला तिरस्काराचं नेमकं कारण पितृसत्ताक समाज आहे आणि कशा पद्धतीने समाज हे पारलिंगी व्यक्तींना आपल्याच कुटुंबापासून दूर करतो हेही चित्रपटात उत्तम पद्धतीने दाखवले आहे. अगदी खऱ्या आयुष्यात ज्या प्रमाणे बहुसंख्य ट्रान्सजेंडर व्यक्तीं सोबत होतं त्याच पद्धतीने चित्रपटाचा शेवट होतो श्याम आपल्या कुटुंबाला सोडून दूर निघून जातो.
सामाजिक परिस्थिती अगदी नीट पद्धतीने दाखवल्याने प्रेक्षकांना आपल्याच समाजाचं कटू सत्य उमजतं. अगदी लहानपणापासून पारलिंगी व्यक्तींच्या मनात काय असतं, त्यांचं नेमकं कसं जीवन असतं आणि त्याविषयी असलेले गैरसमज दूर होतात व समाजाकडून स्वीकारतेची अपेक्षा वाढते.
ट्रान्स पात्रांना क्रूर खलनायकाच्या भूमिकेत दाखवणे
चित्रपटसृष्टीत जास्त करून पारलिंगी पात्र हे विनोदासाठी किंवा खलनायकाच्या भूमिकेत दाखवले जातात. मुद्दाम केलेले वेडेवाकडे हावभाव, जाणूनबुजून केलेला अति मेकअप ह्या पात्रांना विचित्र दर्शवतो किंवा विचित्र दाखवण्यासाठीच ह्या गोष्टी करण्यात येत असतात.
2011 मध्ये “मर्डर 2” नावाचा एक psychological horror शैलीचा चित्रपट आला. ह्या चित्रपटातील खलनायक हा विकृत आणि castrated (आपले पुरुषी जननांग काढलेला व्यक्ती) दाखवला आहे. हा खलनायक सुंदर अभिनेत्री किंवा मॉडेल्सना आपल्या घरी ऑडिशन साठीबोलवतो. त्या आल्यावर हा त्यांना दोरीने बांधत, स्वतः साडी नेसून, दागिने घालून त्या मुलींचा अत्यंत निर्घृण पणे खून करतो आणि एका रिकाम्या विहिरीत त्यांचे मृतदेह फेकतो.
ह्या खलनायकाला एका ट्रान्सजेंडर गुरूचा चेला दाखवलं आहे. तो स्वतः जेव्हा स्त्रियांसोबत संबंध बनवू शकत नाही तेव्हा तो स्वतःच बाईचं रूप घेऊन त्या स्त्रियांची हत्या करतो. जेव्हा त्याला पोलिस पकडून नेतात तेव्हा त्याची ट्रान्सजेंडर गुरु, जी एक मंत्री दाखवली आहे, ती त्याला सोडवून नेते.

ह्या कहाण्या जरी काल्पनिक असल्या तरी त्यांचा समाजाच्या विचारसरणीवर गंभीर परिणाम होतो. लोकांच्या मनात आधीच गैरसमज असतो की, नपुंसकतेमुळे किंवा शारीरिक कमतरतेमुळे पुरुष ट्रान्सजेंडर होतो, आणि तो पारलिंगी असल्याने तो विकृतही असतो. अशा पात्रांमुळे हा गैरसमज विश्वासात बदलतो आणि समाज ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयी नॅरेटिव्ह तयार करतो. चित्रपट किती इंटेन्स आणि थ्रिलर आहेत हे दाखवण्यासाठी ट्रान्सजेंडर पात्रांचा उपयोग केला जातो.
उदा.: “सडक” चित्रपटातील महाराणीचं पात्र जी महिलांची लैंगिक तस्करी करत असते, “संघर्ष” चित्रपटातील लज्जाशंकर पांडेचं पात्र जे अमरत्वासाठी लहान मुलांचे बळी चढवतं, “लक्ष्मी बॉम्ब” चित्रपटातील एका ट्रान्सजेंडर भूताचं पात्र… अशा अनेक मनोरंजनासाठी निर्मित केलेल्या पात्रांमुळे खऱ्या आयुष्यात जगणाऱ्या पारलिंगी, इंटरसेक्स किंवा किन्नर समाजातील व्यक्तींना भेदभाव आणि हिंसा सारख्या अनेक बाबींचा सामना करावा लागतो.
ट्रान्सफोबिक आणि क्वीअरफोबिक दिग्दर्शकांच्या बुद्धीच्या उपजेतून अशी पात्र तयार होतात, पण क्वीअर समाजातीलच काही दिग्दर्शकांकडून क्विअर पात्रांचे प्रतिनिधित्व अगदी योग्य पद्धतीने होतं, ज्याचं उदाहरण आहे 2018 सालची वेबसीरिज “स्टिल अबाउट सेक्शन 377”. आशा आहे भविष्यात LGBTQIA समाजातीलच दिग्दर्शक आणि कलाकार उदयास येतील व प्रेक्षकांना सकारात्मक क्विअर पात्र पाहण्यास मिळतील.






