आपला देश उत्सव आणि धार्मिक प्रथा आवडणारा आहे. अनेक सांस्कृतिक प्रथा आपल्या समाजात शेकडो वर्षांपासून रुजलेल्या आहेत. अनेक उत्सव, व्रत, उपासना या देशाचा सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जातात. वर्षभर देशात उत्सवाचं वातावरण असतं. प्रत्येक राज्यात वेगळी संस्कृती यानिमित्ताने दिसून येते. यातही सणांच्या निमित्ताने होणाऱ्या स्वयंपाकाची वेगळीच रुची असते. शिवाय प्रत्येक सणाच्या वेगवेगळ्या परंपरा, नियम असतात. ज्या निभावण्याची जबाबदारी बहुधा स्त्रियांवरच असते.
घर सांभाळण्याची जबाबदारी तशीही स्त्रियांवरच टाकली जाते. लहानपणापासूनच त्यांना यासाठी तयार केलं जातं. सणांमध्ये ही घरकामं तर शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या स्त्रियांना थकवून टाकतात. सणांसाठी घराची साफसफाई असो, सजावट असो, स्वयंपाक करणं असो, सारं काही स्त्रियांनीच करायचं असतं. ईद, नवरात्री, छट पूजा यात तर या बायका उपासतापास करून वर कामंही करतात. यात पुरुषवर्ग सहसा दिसत नाही. तो एरव्हीही या कामात नसतोच. सणांमध्येही त्याच्यावर फार जबाबदारी नसते. पितृसत्ताक रचनेतला हा दोष अशा प्रकारे समोर येतो.
गृहिणी चित्रा मुजुमदार सांगतात, “आम्हा बायकांना तशीही सुट्टी नसतेच. सणांच्या वेळी तर इतकी कामं वाढतात की त्याचा आनंदच घेता येत नाही. काही ठिकाणी पुरुष बायकांना कामात मदत करतात. पण ही फक्त ‘मदत’ असते आणि थोडेच पुरुष असे करतात.”

‘’आपल्या समाजात स्त्रियांची जोपासनाच अशी होते की लहानपणापासूनच त्यांना त्या स्त्रिया असल्याची जाणीव करून देण्यात येते. घरकाम असो, पाहुण्यांचं स्वागत असो, घरातल्या बायांकडेच याची जबाबदारी येते. घरात कोणी आजारी पडलं तरी बाईच सेवा करते. अशा वातावरणातच वाढल्यामुळे मलाही या विचारातून बाहेर पडायला वेळ लागली की ही सारी कामं फक्त बायांचीच असतात. लहानपणी ज्या सणांमुळे आनंद व्हायचा, त्यामागील स्त्रियांचं शोषण दिसून आल्यानंतर माझा आनंद नाहीसा होऊ लागला. खाण्यापिण्याची आवड असतांनाही, सणांच्या खास स्वयंपाकाविषयीची गोडीही नाहीशी झाली. त्यामुळे सणांविषयी मनात एक अंतर्द्वंवद्व सुरू झालं. कुटुंब आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हटल्या तर आपल्या इच्छा दाबाव्या लागतात, मूल्ये, तत्त्वांशी तडजोड करावी लागते, हे मला समजलं. स्त्रीवादी विचारांमुळे मी कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही याची खंत मनात असते ते वेगळंच,’’ असेच काहीसे विचार नोएडा येथील निहारिका यांचेही आहेत.
त्या सांगतात, “घरातील मोठी मुलगी असल्यामुळे घरातील कामं आणि रितीपरंपरा यांची जबाबदारी माझ्यावरच आली. घरातील आणि आजूबाजूचं वातावरण असंच असल्यामुळे मी ही जबाबदारी सहजपणे स्विकारली. पण माझ्या जाणीवा विकसीत होऊ लागल्या तसं मला वाटू लागलं की हा भेदभाव आहे. त्यानंतर मी हळूहळू यापासून दूर होऊ लागले. आता मी माझ्या आनंदाला, सुविधेला जास्त महत्त्व देते आणि त्यात मी समाधानी आहे.”
शिक्षणामुळे आणि स्त्रीवादी विचारांमुळे अनेक बायका आपल्या अधिकारांविषयी जागरूक झाल्या आहेत. पण त्याचवेळी त्यांच्यासमोरची आव्हानंही वाढू लागली आहेत. कारण आपला समाज एक जागरूक, आत्मनिर्भर, आपल्या अधिकारांसाठी लढणाऱ्या बाईचा स्वीकार करत नाही. त्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांत या बायांची आव्हानं वाढतात. घराची साफसफाई, सजावट, स्वयंपाक, सणासाठी खास पेहराव करणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी ताण आणि चिंता बनतात.
याविषयी सामाजिक कार्यकर्त्या गुलमोहर सांगतात, “संयुक्त कुटुंबात अनेकदा आयुष्य सुखी करण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्या वरवर आपल्याला चांगल्या वाटतात. पण तो फक्त एक भ्रम असतो. कितीही स्वतंत्र वृत्तीची बाई असो, तिला सणांच्या दरम्यान संस्कार व संस्कृतीच्या नावाखाली या गोष्टी कराव्याच लागतात. त्यामुळेच सुट्टीच्या दिवशी आपल्या वैयक्तिक आवडी बाजूला ठेवून न आवडणाऱ्या गोष्टी कराव्याच लागतात.”

साधारणपणे एका बाईचा अधिकतर वेळ हा घराच्या आत, स्वयंपाकखोलीत जास्त व्यतीत होतो. घरासाठी रोज आणि सणासुदीला खास स्वयंपाक करणाऱ्या या बाईला स्वतःच्या आवडीचं जेवण करताना मात्र विचार करावा लागतो. सध्या स्त्रिया शिकून स्वतंत्रपणे विचार करू लागल्या आहेत. आपल्या आवडीच्या कामाकडे त्या वळू लागल्या आहेत. त्यासाठी त्यांना कधी घराबाहेरही पडावं लागतं. तरीही घरातल्या उत्सवी जबाबदारीतून त्यांची सुटका मात्र होत नाही. दुसरीकडे शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर असणारे पुरुष जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांची खातीरदारी केली जाते. बायकांना मात्र घरकामात जुंपावं लागतं.
पूजा श्रीवास्तव शिक्षिका आहेत. त्या सांगतात, “सणांच्या वेळी पुरुष आरामात बसून गोडधोडाचा आनंद घेतात. आम्ही मात्र स्वयंपाकखोलीत खपत असतो. वरून सणांच्या दिवशी खास पेहराव करणं, दागिणे घालणं याचा दबाव असतोच. या सणांचं गौरवीकरण, त्याचा नॉस्टेल्जिया वेगळाच ताण देतो. लिंग समानता वगैरे गोष्टींचा आमच्या घराशी काही संबंध नसतो.”
देशाची सांस्कृतिक परंपरा नेहमीच स्त्रियांचा त्याग, सेवा, समर्पणवृत्ती यांचं गुणगाण करत टिकवली गेली आहे. संस्कारांच्या नावाखाली शोषण करणं ही आपल्या समाजाची विशेषता आहे. सांस्कृतिक परंपरा, सण-उत्सव हा कोणत्याही समाजाचा अमूल्य वारसा असतो यात वाद नाही. मात्र त्याची सारी जबाबदारी फक्त स्त्रियांवरच टाकणे चुकीचं आहे. हा विचार पितृसत्ताक आणि अमानूष आहे. शोषणाच्या आधारावर उभी असलेली संस्कृतीची इमारत पाडणं माणूसकीच्या दृष्टीनं गरजेचं असतं. आम्हाला असा समाज विकसीत करावा लागेल ज्यात घरातील सर्व सदस्यांवर सांस्कृतिक वारसा टिकवण्याची समान जबाबदारी असेल. तरच सर्वांना या सणांचा मनापासून खरा आनंद घेता येईल.






