अमेरिकेत राहणाऱ्या इतिहासकार आणि लेखिका, शैलजा पाईक या, 8 लाख डॉलर्सची प्रतिष्ठीत आणि अनौपचारिकरित्या ‘जिनीयस ग्रँट’ म्हणून ओळखली जाणारी, मॅकऑर्थर शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या पहिल्या दलित स्त्री ठरल्या आहेत. शैलजा पाईक म्हणतात, “दलितांनी आपलं रक्त आणि आयुष्य वाहिलं आहे आणि मला आशा आहे की, अ दलित लोकही दलितांसोबत उभे राहतील आणि दक्षिण आशिया आणि बाहेरही, जाती, लिंग आणि वांशिक भेदभावाच्या विरोधात लढतील. ही शिष्यवृत्ती दलित अभ्यासकांच्या योगदानाची संस्मरणीय आठवण आहे.”
शैलजा यांनी विविध ज्ञानशाखांमध्ये काम केलं आहे, सोबतच सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यावरही जागतिक स्तरावर त्यांनी योगदान दिलं आहे. या शिष्यवृत्तीमुळे त्यांना आपल्या कामाचा परिघ अधिक वाढवता येईल. बुद्धीवंत आणि सर्जनशील लोकांना त्यांच्या कामावर घेतलेल्या अथक मेहनतीसाठी या शिष्यवृत्तीने गौरवण्यात येतं.

(शैलजा पाईक)
एका दलित कुटुंबात जन्मलेल्या शैलजा यांची झेप
ग्रामीण महाराष्ट्रातील एका गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या शैलाजा, पुण्यातील येरवडा येथील झोपडपट्टीत वाढल्या. त्यांचे वडील त्यांच्या गावातील पहिले दलित पदवीधर होते. शैलजा यांनी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि फोर्ड फाऊंडेशनच्या मदतीने ब्रिटनच्या वार्विक विश्वविद्यालयातून डॉक्टरेट मिळवली. त्या सध्या सिनसिनाटी युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे इतिहासाच्या प्राध्यापक आहेत.शैलजा
यांना ही शिष्यवृत्ती, आधुनिक भारतात दलित अध्ययन, लिंग आणि लैंगिकता यांच्या व्याख्या करण्यासाठी मिळाली आहे. त्यांच्या कामाने दलित स्त्रीवादी अभ्यासाला व्यापक आणि सखोल केलं आहे. त्यांच्या पुस्तकांमधून दलित स्त्रियांच्या दैनंदिन जगण्याची मांडणी केली गेली आहे. यातूनच भेदभाव आणि सन्मानाच्या गोष्टीही त्यांनी पुढे आणल्या आहेत. इंग्लिश, मराठी, हिंदी पुस्तकांतून त्यांनी आपल्या अभ्यासाला नवी दिशा दिली.
भारतात परिघावरील समुदायांच्या दडलेल्या इतिहासाची मांडणी करणं अभ्यासकांसाठी नेहमीच आव्हान राहिलेलं आहे. कारण यावर मुख्यप्रवाहातील भारतीय विश्वविद्यालयांमध्ये फारच कमी काम झालं आहे. दीर्घकाळापासून दलित इतिहासलेखनाचं कोणतंही औपचारिक नोंदीकरण न झाल्यामुळे त्या आता आपल्या मुलाखती आणि क्षेत्रकाम संग्रहीत करणार आहेत.
मॅकऑर्थर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर शैलजाविषयी लिहिलंय, “शैलजा जातिवर्चस्वाच्या इतिहासात नवीन अंतर्दृष्टी प्रदान करतात आणि त्या पद्धतींचा छडा लावतात ज्यात लिंग, लैंगिकता यांचा उपयोग दलित स्त्रियांची अब्रु आणि व्यक्तिमत्व नाकारण्यात केला गेला आहे.”

कशाप्रकारची आहे ही मॅकऑर्थर शिष्यवृत्ती?
ही शिष्यवृत्ती ‘बिनशर्त’ म्हणून ओळखली जाते आणि दर पाच वर्षांनी त्या कलाकाराला, विद्वानाला आणि अभ्यासकाला दिली जाते, ज्याचं काम ज्ञान आणि सृजनाच्या इतिहासातील पोकळी भरण्यासाठी उपयुक्त ठरतं. पैसे कसे खर्च करायचे याविषयी यात कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. यासाठी बाहेरच्या लोकांकडून नामांकनं मागवली जातात. यापूर्वी गणितज्ञ सुभाष खोत, बायोइंजिनियर मनु प्रकाश आणि पर्यावरण इंजिनियर कार्तिक चंद्रन या भारतीयांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
या वर्षी 22 जणांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे यात, समाजशास्त्रज्ञ, ट्रान्स स्कॉलर, नर्तक, कवि, विकलांग कार्यकर्ता, संगणकतज्ञ, चित्रपट निर्माता, व्हायोलिन वादक, विकासवादी जीववैज्ञानिक, विज्ञान शिक्षक, कायदेतज्ञ, समुद्र वैज्ञानिक इत्यादींचा समावेश आहे. 1981 पासून संस्थेने 1,131 शिष्यवृत्तींचं वाटप केलं आहे.
दलित तमाशा कलाकारांच्या जीवनावर आधारीत पुस्तक
शैलजा पाईक यांचं पहिलं पुस्तक होतं, ‘आधुनिक भारतात दलित स्त्रियांचं शिक्षणः दुहेरी भेदभाव,’ जे दशकभरापूर्वी प्रकाशित झालं. याला समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ञांनी पाठींबा दिला. यात विसाव्या शतकातील भारतात, शिक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी जो संघर्ष होता, त्याच्या इतिहास लिखाणात, महाराष्ट्रातील दलित महिलांचे अनुभव आले आहेत. मागील शतकातील बदलत्या आणि अपरिवर्तीत भारतात जाति आणि लिंग यामुळे होणाऱ्या दुहेरी अत्याचारांवर भर देत, पाईक यांनी शिक्षणाच्या पडताळणीला आणखी पुढे नेलं.

दलित तमाशा कलाकारांच्या जीवनावर आधारीत दुसऱ्या पुस्तकात त्यांनी पितृसत्ताक ताकदी आणि राज्य यांच्यातील तणाव उघड केला आहे. ‘द व्हल्गरिटी अव्ह कास्ट’ नावाच्या या पुरस्कार विजेत्या पुस्तकात तमाशाला एक सामाजिक कलंक तसंच, अश्लील आणि लैंगिक समजणं आणि राज्याकडून या सामाजिक धारणेला नवं रुप देण्याच्या प्रयत्नांची माहिती आहे. या कलाकारांनी अनेकदा हिंसा आणि लैंगिक शोषणाचा सामना केला आहे. पण तमाशावरच जगणं असल्यामुळे या दलित तमाशा कलाकारांना सर्व काही सोसावं लागतं.
शैलजा सांगतात, “मी या दलित स्त्रियांचा प्रतिकार, लवचिकता, आणि तर्कयुक्त बौद्धीक प्रतिवादाच्या गोष्टी समोर आणून, आपल्या सामुहिक मानवी वारशाच्या नव्या इतिहासात योगदान देत आहे. त्या वारंवार दबल्या पिचल्या गेल्या तरीही पुन्हा पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहतात.” शिष्यवृत्ती मिळाल्यानं पाईक फार आनंदात आहेत.
त्यांनी एनपीआरला सांगितलं, “मला याआधी कधी जिनीयस म्हटलं गेलं नाही. पण जेव्हा मी विचार करते की मी इथवर कशी पोहोचले, जी नेहमीच एक कठीण यात्रा होती, तेव्हा कृतज्ञपणे मी या सन्मानाचा स्वीकार करते.”
अनुवाद - प्रतिक पुरी






