अनेक वर्षांपासून आपलं काम आणि त्याच्याशी जोडलेल्या इतर गोष्टी करत असताना मला एक गोष्ट नेहमीच जाणवली की, भारतात स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधीत गोष्टी, त्याची अंमलबजावणी यात काही बदल झालेला नाही. बाकी अनेक बाबतीत प्रगती झाली, महत्त्वाचे बदल घडले, पण अन्य प्रश्नांच्या तुलनेत हा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. ज्या जगात स्त्रियांचं आरोग्य आणि त्यांचे अधिकार यांना प्राधान्य असेल, असं जग तयार करण्यासाठी सातत्यपूर्ण संवाद आणि कटिबद्ध प्रयत्न केले जात नाहीत, तोवर आम्ही खरे बदल बघू शकणार नाही.
भारतात स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न संदिग्ध नजरेने पाहिले जातात. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, त्यांचं यश यावरच भर दिला जातो. पण या देशातील 50 टक्के स्त्रिया एनिमिया अर्थात रक्तक्षयाने ग्रस्त आहेत याकडे तेव्हाच लक्ष जातं जेव्हा त्या गरोदर राहतात. पण आई या ओळखीशिवाय एक स्त्री म्हणून जगताना, रक्तक्षयामुळे त्यांच्या आरोग्यावर किती घातक दीर्घकालीन प्रभाव पडतो त्याचं काय? एका बाईला यामुळे रोज ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्याचं काय?

भारतात 50 टक्के महिलांना रक्तक्षय
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोशाची दूत म्हणून मला मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील स्त्रियांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला. मला जाणवलं की त्यांना याची माहिती तर आहे की बायांच्या चेहऱ्यावर जी पांढुरकी छटा येते त्यामागे आरोग्याचं कारण काय आहे. हे रक्ताच्या कमतरतेमुळे होतं. पण बेजबाबदारपणामुळे याकडे दुर्लक्ष केलं जातं. रक्ताची कमी ही अपौष्टिक जेवणामुळे होते आणि स्त्री-पुरुष यांच्या भूमिकांविषयी ज्या समजूती आहेत आपल्या समाजात त्याचा हा परिणाम आहे.
विशेषतः गावांमध्ये बहुतांश घरांत बायका आपल्या खासगी गोष्टींपेक्षा कौटुंबिक गोष्टींना जास्त महत्त्व देतात. त्या सर्वांच्या शेवटी जेवतात त्यामुळे पौष्टिक अन्न हे इतरांच्या वाट्याला जातं. यांना कमी किंवा अपौष्टिक जेवण मिळतं. स्वार्थत्यागाची ही भावना भारतीय बायकांमध्ये लहानपणापासूनच रुजवली जाते. पण याचे दीर्घकालीन परिणाम त्यांनाच नाही तर कुटुंबालाही भोगावे लागतात. त्यामुळे पुढच्या पिढ्यांनाही रक्तक्षयाचा त्रास होतो.
सामाजिक समजुतींसोबतच महागाई हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी अशा अनेक बायकांना भेटली आहे की त्यांच्या पूर्ण प्रयत्नानंतरही त्या पौष्टिक जेवण आणि आरोग्यसेवांपासून दूरच राहतात. लोहयुक्त मांस, मासे, पालेभाज्या, फळं, यांच्या वाढत्या किंमतीमुळे त्या गोष्टी त्यांच्यापासून दूरच राहतात. त्या उपलब्ध असल्या तरीही माहिती नसल्यामुळे त्यांचा योग्य प्रमाणात उपयोग केला जात नाही. अभ्यासातून हे दिसलंय की अनेक बायकांना पौष्टिक जेवणाविषयी प्राथमिक गोष्टीही माहिती नसतात.
संतुलित आहारात कशाचा समावेश होतो हेही त्यांना माहिती नसतं. शरीरात रक्ताचं कमी असणं हे कुपोषण आणि अनारोग्याचं कारण आणि लक्षण दोन्ही असतात. प्रश्न फक्त पुरेसा आहार घेण्याचा नाहीये तर योग्य पोषक आहार घेण्याचा आहे. भारतीय आहार पारंपरिक दृष्ट्या संतुलित आणि पौष्टिक असतो. पण खाण्यापिण्याच्या समोर ज्या रिती-रूढी आल्या त्यामुळे आपण संतुलित आहारापासून दूर जात, ‘प्रोसेस्ड फूड’च्या जवळ येत गेलो. समज आणि जाण नसल्यामुळे या बदलाने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
स्त्रियांच्या गरजांना इतर गरजांपेक्षा कमी ठरवलं जातं
तज्ञांचं म्हणणं आहे की खाण्यापिण्याच्या सवयी शेवटपर्यंत बदलत राहतात. त्यामुळे पोषणमूल्यांत वाढ होते आणि रक्तक्षयाशी लढण्याची ताकद वाढते. चुकीच्या सवयी बदलणं कठीण असलं तरी त्या बदलता येऊ शकतात आणि त्यांची गरजही आहे. त्यासाठी सांस्कृतिक बदलांचीही गरज आहे जिथे स्त्रियांच्या आरोग्याला, कुटुंब, समाज आणि देशाच्या कल्याणासाठी केंद्रीय महत्व देण्याची गरज आहे.

आम्हाला या स्त्रियांना सजग करून सशक्त करायचं आहे जेणेकरून त्या आपल्या खाण्यापिण्याविषयी स्वतः विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतील. भारतीय स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि पौष्टिक स्वयंपाक तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांना संतुलित आहार, पौष्टिकतेची माहिती, आरोग्यपूर्ण स्वयंपाक इत्यादींची माहिती देऊन त्यातून बदल घडवून आणता येऊ शकतो.
सध्या जे कार्यक्रम सुरू आहेत त्यात आरोग्यसंबंधी माहितीचाही समावेश झाला पाहिजे आणि स्त्रियांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात यायला हवं. पोषण आणि आरोग्य यांच्यातील संबंध आणि जेवणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या रोखण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठीचं ज्ञान याविषयी सजगता निर्माण करणं याचा भाग असेल. मदतीचं जाळं आणि आधारगट तयार करणंही महत्त्वाचं होऊ शकतं. ज्यामुळे बायका आपलं ज्ञान इतरांशी वाटून घेवू शकतील आणि एकमेकींना आरोग्यपूर्ण जेवण घेण्याविषयी प्रेरीत करू शकतील.
आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासोबतच आम्हाला असं वातावरणही तयार करावं लागेल ज्यामुळे बायकांना आपल्या गरजेची आहारसामुग्री मिळू शकेल. महिलांचं आरोग्य आपल्या देशाच्या आरोग्याचा आधार असतो. आम्हाला अशा सामाजिक समजुतींना मोडावं लागेल ज्यात स्त्रियांच्या गरजांना इतर गरजांपेक्षा कमी ठरवलं जातं. अशी मानसिकता वाढवावी लागेल ज्यामुळे त्यांच्या कल्याणाचा जास्त विचार होईल. प्रश्न फक्त जेवणाचा नाही तर समानता आणि सन्मानाचाही आहे.
स्त्रिया आपल्या आहाराची व्यवस्था स्वतः करू शकतील असं ज्ञान आणि क्षमता देऊन त्यांना आपण सशक्त करू शकलो तर त्यामुळे रक्तक्षयाशीच लढता येणार नाही तर, आपण अशा एका भविष्याची निर्मिती करू शकू ज्यात पुढे जाण्यासाठी त्या आरोग्यवान आणि शक्तीसंपन्न असतील.






