- सागरिका किस्सू
व्हॉट्सऐपवर एक मेसेज येतो आणि हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील लोचब गावात धुक्यातल्या रस्त्यावर सरपंच मुकेश यांच्या नेतृत्त्वात डझनभर लाठीधारी तरुण एकत्र येतात. एका संशयिताला घेरण्यात येतं आणि तपासणी करण्यात येते. तपास चिट्टा, चरस किंवा लाल परीचा सुरू आहे. लोचबमध्ये स्थानिकांनी ड्रग्सविरोधात युद्ध पुकारलं आहे.
गावात येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते. आधार कार्डची विचारणा केली जाते. प्रत्येक रात्री सरपंच मुकेश आणि त्यांचे लोक एका ध्येयानं प्रेरीत होऊन रस्त्यांवर पहारा देतात. ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांना पकडून त्यांना लोकांसमोर लज्जीत करण्यासाठी.
मुकेश सांगतात की, सरकार काही करायला तयार नाही त्यामुळे आम्हालाच पुढाकार घ्यावा लागत आहे. हरियाणावर ड्रग्सचं संकट घोंघावत आहे आणि लोचब सारखी अनेक गावं त्यातून सुटलेली नाहीत. त्यामुळे लोकच स्वतःहून सावध होऊन यासाठी काम करत आहेत. यात स्थानिक गट, समित्या आणि ‘नशा रोको’ पंचायतींचा समावेश आहे. एकीकडे राज्य प्रगतीचा दावा करत आहे दुसरीकडे नशाखोरी वाढत आहे.
हरियाणातील 40 टक्के गावांना नशामुक्त घोषित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शपथ घेतली आहे. हरियाणात नशा सहन केला जाणार नाही म्हणून. हरियाणा राज्य नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान ड्रग्स तस्करांविरोधात 3,051 प्रकरणांत गुन्हे दाखल केले त्यातून 1652 लोकांना अटक झाली. 
ड्रग्सच्या धंद्यातही जातीयता…
पण गावांची समस्या संपलेली नाही. इथेही जातीय रंग देण्यात येत आहे. जातीच्या आधारावर ड्रग्स व्यापाराकडे पाहिलं जातंय. पूर्वग्रहानुसार अनेकदा हे मानलं जातं की कोणाला दुकानदार आणि कोणाला ग्राहक समजलं जावं. यातच अनेक लोक ड्रग्सकडून दारूकडे वळत आहेत. हरियाणात ड्रग्स येण्याला पंजाब सीमेवरील कुरुक्षेत्र, कैथल, अंबाला आणि सिरसा जिल्हे कारणीभूत समजले जातात. इथं काम करणारे नशोविरोधी सामाजिक संस्थांचं म्हणणं आहे की, ट्रान्सपोर्टर्स पंजाबमधून हरियाणात ड्रग्स आणतात.
इथं स्थानिक ड्रग्स डिलर गावांमध्ये ते घेऊन जातात. पंजाबमध्ये प्रीगॅबलिनचा दुरूपयोग केला जातोय तर हरियाणात चिट्टा म्हणजे हेरॉईनची समस्या आहे. जिथे बेकारी जास्त तिथे नशाखोरी जास्त आहे. विदेश जाण्याच्या भानगडीत अनेकांनी आपला सारा पैसा गमावला आहे. ते लोक आता या ड्रग्स व्यापारात शिरले आहेत पैसे कमावण्यासाठी किंवा नशा करण्यासाठी. गावातील उच्च जातीच्या लोकांना यातून वाचवलं जातं पण दलितांना मात्र सार्वजनिकरित्या दोषी ठरवलं जातं, लज्जीत केलं जातं.
अशरफगढच्या सरपंचाच्या घरी भगत सिंह युवा समुहाचे सदस्य नशाखोरीपासून गावाला कसं वाचवावं यावर घमासान चर्चा करतात. त्यांचं म्हणणं आहे की 80 टक्के ड्रग्स व्यापार संपवण्यात गावानं यश मिळवलं आहे. पण त्यांना भिती आहे की दुर्लक्ष झालं तर समस्या पुन्हा उफाळून येईल आणि गाव बर्बाद होईल. त्यासाठी ते खालच्या जातीच्या लोकांना दोषी ठरवतात.
समुहाची सदस्य आणि सरपंचाची पत्नी म्हणते की जोवर हे खालच्या जातीचे लोक गावात आहेत तोवर नशाखोरी संपणार नाही. बाकीचे लोक त्यावर सहमती दर्शवतात. सत्यवान यादव म्हणतात की ही फक्त बेकारीची समस्या नाही. ते ज्या जातीतून येतात त्याचाही हा परिणाम आहे. 
‘तथाकथित’ उच्च जातीच्या ड्रग्स डिलर्सना मोकळीक
नोव्हेंबर 2023 मध्ये गावात समुहाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा गावात उघडपणे लोक नशा करत फिरायचे. गल्लीबोळात कोणीतरी तरुण नशेत धुत सापडायचाच. गावानं मग ठरवलं की आता खूप झालं. त्यांनी गावात 28 सीसीटीव्ही कॅमरे लावले. त्याचं फुटेज समुहाच्या सदस्यांच्या फोनवर येईल याची व्यवस्था केली आणि रात्री पहारा देणं सुरू केलं. पंचायत बसवून निवाडे देण्यात आले.
ड्रग्स विकले तर 51 हजार रुपये आणि नशा केल्यावर 5100 रुपये दंड ठोठावण्यात आला. यातून अनुसूचित जातीच्या सांसी समुदायाला वगळण्यात आलं. त्यांना धमकावण्यात आलं की त्यांचा एक माणूसही ड्रग्स घेताना किंवा विकताना आढळला तर त्याच्या कुटुंबासहीत त्याला गावातून हाकलण्यात येईल. समुहाचे एक सदस्य ओमप्रकाश बेनीवाल म्हणतात की पूर्वी लोक गांजा घ्यायचे. पण हे खालच्या जातीचे लोक हेरॉईन घेऊन आले. आम्ही उच्च जातीचे लोक अशा गोष्टी करत नाही.
हा आरोप फक्त अशरफगढमध्येच नाहीतर पूर्ण हरियाणात केला जातो. दलितांवरच ड्रग्सच्या प्रसारासाठी दोष ठेवला जातो. कर्नाल मध्ये जागरूकता अभियान चालवणारे कार्यकर्ता राहुल कुमार सांगतात की, आर्थिक विभाजन यामागचं कारण आहे. यात उच्च जातीच्या ड्रग्स डिलर्सना क्लिन चिट दिली जाते आणि परिघावरील लोकांना दोषी ठरवलं जातं.
कुमार लोकांना ड्रग्सपासून जात वेगळी ठेवण्यासाठी समजावत असतात. पण हे सोपं काम नाही असं ते म्हणतात. “मोठ्या जमिनी असणारे उच्च जातीचे लोक आरामात पैसा कमावण्यासाठी या धंद्यात उतरले आहेत. त्यांना गावाचं समर्थनही मिळतं. खालच्या जातीचे लोक मजूरी करतात. त्यांच्याकडे नोकऱ्याही नाहीत. ते नशा करतात आणि गाव त्यांना बदनाम करतं.”
जेव्हा मनोहरपूर गावात लोकांनी रात्री उशीरा गावातल्या कोरड्या तलावाजवळ लग्झरी कार्स पाहिल्या तर त्यांना लक्षात आलं की काहीतरी भानगड आहे. कारमधली माणसं गावातल्या विक्रेत्यांकडून चिट्टा आणि गांजा विकत घेण्यासाठी आले होते. तेव्हाच्या सरपंच प्रिती यांना याविषयी कळताच त्यांनी पंचायतची बैठक बोलावली आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी दल बनवले. जिंद जिल्ह्यातील हा पहिला असा एंटी-ड्रग समुह होता. स्थानिक पोलिसांनाही यात जोडून घेण्यात आलं.
‘एक दो, एक दो, नशे की लत को फेक दो’ सारख्या घोषणा रस्त्यांवर गर्जू लागल्या. प्रिती सांगतात की आम्ही नशाखोरीविरोधात प्रचार करण्यासाठी प्रत्येक घरी गेलो. गावातील प्रत्येक रस्त्यावर गस्त घातली. नशाखोरांना नशा मुक्ति केंद्रात पाठवण्यात आलं. विक्रेत्यांना सार्वजनिकरित्या लज्जीत करण्यात आलं. त्यांचे फोटो काढण्यात आले आणि वाँटेड ड्रग पेडलर म्हणून व्हॉट्सऐपवर ते पाठवण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मागील दोन वर्षांत समुहाने 48 तरुणांना नशाखोरीतून वाचवण्याचा दावा केला आहे. 
नशामुक्त गाव करण्यासाठी…
मनोहरपूरच्या मॉडेलवर शेजारच्या गावांनीही काम सुरू केलं. पण यात एक अडचण होती की अनेक पेडलर्स अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुटून मोकळे व्हायचे. लोचबचे सरपंच मुकेश म्हणतात, “लहान ड्रग विक्रेत्यांना फार दिवस तुरूंगात ठेवता येत नाही.
5-6 ग्रॅम चिट्टा किंवा गांजा विकला म्हणून पोलिस त्यांना फारतर इशारा देतात किंवा रात्रभर लॉकअपमध्ये ठेवून सकाळी सोडून देतात. त्यामुळेच हे लोक मोठ्या प्रमाणात स्वतःकडे ड्रग्स ठेवत नाहीत.” हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं मान्य केलं की लहान गुन्हेगारांवर खटला चालवणं कठीण जातं.
चिट्टा लहान पॅकेटमध्ये विकला जातो ज्याची हँडलिंग आणि सँपलिंग करणं कठीण जातं. कायद्यानुसार दोन सँपल घ्यायचे असतात. एक फॉरेंसिक लॅबला पाठवला जातो आणि दुसरा न्यायालयाने मागणी केल्यास राखीव ठेवला जातो. पण इतक्या कमी प्रमाणात असं करण कठीण होतं. हे लोक मोठ्या प्रमाणात कुठेच ड्रग साठवून ठेवत नाहीत. पोलिसांप्रमाणेच गुन्हेगारही गस्त घालत असतात आणि पोलिस जिथे जातात त्या जागेपासून दुसरीकडे ते ड्रग विकायला जातात.
हरियाणात अंमली पदार्थांच्या जप्तीच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यात 411 प्रकरणांत केस दाखल झाल्या. 2023 साली 295 प्रकरणांत केस दाखल झाल्या होत्या. अंबाला, सिरसा, कुरुक्षेत्र, गुरूग्राम आणि फरिदाबाद इथून मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात घेण्यात आलं. 2024 मध्ये 3114 गावांना नशामुक्त घोषित करण्यात आलं ज्याचं श्रेय पोलिस आणि सरकार आपल्या जागरुकता अभियांनाना देत आहेत.
यात नमक-लोटा अभियान आहे ज्यात गावातले ड्रग डिलर्स आणि नशाखोर गावातील लोकांसमोर नशेपासून दूर जाण्याची शपथ घेतात. याशिवाय नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटेंस (एनडीपीएस) अधिनियमा अंतर्गत प्रतिबंधक अटकेचाही उपयोग करण्यात येतो. एक पोलिस अधिकारी याविषयी सांगतात की, याच्या माध्यमातून आम्ही कोणालाही वर्षभर अटेकत ठेवू शकतो. त्याची चौकशी करून तो कोणासोबत काम करतो याचा तपास आम्ही करतो. पुरावे मिळाले तर केस करणं सोपं जातं. 
ड्रग्स सोडण्यासाठी दारू पिण्याची सवय
मनोहरपूरच्या 28 वर्षीय मनीषला तिथल्या सरपंच प्रिती यांनी नशा मुक्ति केंद्रात पाठवलं होतं. पण त्याचा फायदा झाला नाही. तो पुन्हा पुन्हा नशेच्या आहारी जात राहिला. तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याला ड्रग्सऐवजी दारूचं व्यसन लावलं. त्यांनी त्याला घरातच दारू प्यायला सांगितलं. त्यामुळे दोनेक महिन्यातच त्याचं ड्रग्सवरील लक्ष उडालं. मजूरी करणारा त्याचा मोठा भाऊ आशिष म्हणतो की आम्हाला त्याची ड्रग्सची आदत सोडवायची होती कारण तो फारच अशक्त झाला होता. म्हणून त्याला दारू प्यायला परवानगी दिली.
ती ड्रग्सपेक्षा निदान कमी धोकादायक आहे. ड्रग्सऐवजी दारू पिण्याची सवय हरियाणात जुनीच आहे. अनेक नशाखोर आपली लत भागवण्यासाठी दारू पितात. पण जिंदचे मनोविश्लेषक संकल्पकुमार म्हणतात की यातून फक्त एका नशेऐवजी दुसरी नशा सुरू होते. जिथे नशाखोर खर्चिक उपचार करू शकत नाही तिथे हे उपाय केले जातात. पण वैज्ञानिकदृष्ट्या हे चुकीचं आहे. कुमार म्हणतात की दारू पिणं हा गुन्हा नाही अशी भावना नशाखोरांमध्ये निर्माण होते.
दारू हा सरकारी उपचार आहे तर कोरडे ड्रग्स महागडे असतात. पण दारू पिणं सुरू राहिलं तर लिव्हर, किडनी खराब होतेच. त्यामुळे हा केवळ मूर्खपणा आहे. पण मनोहरपूरच्याच अमितसाठी दारूचाच इलाज कारगर ठरला. तो पूर्वी घरातूनही बाहेर पडत नसे. आता तो बाहेर जातो आणि लोकांना नशा न करण्याविषयी सांगतो. पण त्याचा स्वतःवर फार विश्वास नाही. तो खोकत म्हणतो, “हे योग्य आहे की नाही मला माहिती नाही. पण आमच्याकडे नोकरी नाही की संधी नाही. नशेत असलो की सारं काही ठिक असल्याचा निदान आभास तरी होतो.” त्याचा मोठा भाऊ यावर हसत त्याची पाठ थोपटत राहतो.
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






