- किरण गिते
प्रचंड गाजलेल्या ‘जोगवा’ चित्रपटात तायप्पाची एक कथा आहे…त्याच्या लघवीतून रक्त पडतं आणि तो देवीचा कौल असल्याचा निष्कर्ष त्याचा बाप काढतो. मग काय अंधश्रद्धेत गुरफटून गेलेला हा समाज तायप्पाच्या अंगावर लुगडं चढवतं. तायप्पा हिजडा नाही, तो ज्याला अभिजनांच्या शहरी भाषेत ‘समलैंगिक’ म्हणतात तायप्पा तसाही नाही, मात्र तरीही त्याला जबरदस्तीने जोगत्या बनवलं जातं.
त्याच्या नाकात नथ घातली जाते, केसांना चोपलेल्या तेलाच्या ओघळलेल्या तेलकट चेहर्यावरच्या केसांत मधोमध भांग पाडला जातो. तायप्पाच्या पुरुषपणावर बाईपणाचं ओझं लादलं जातं…
रुढी परंपरेच्या भेसूर अंधारल्या जात्यात तायप्पाचं कलेवर हळूहळू भरडत जाणं पडद्यावर अनुभवत असताना या जात्याची घरघर काळजाला चर पाडून जाण्याचा अनुभव जोगवाचा असतो. या जात्यात फक्त चित्रपटातच नाही तर आजही अनेक तायप्पाच भरडले जातात.
याचे अगदी ताजे उदाहरण गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी परिसरात नुकतचं घडलं… अगदी ‘जोगवा’ चित्रपटातील तायप्पासारखं… गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी परिसरातील एका दलित वसाहतीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या युवकाला त्याच्या आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून विधिवत यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा नियोजित आणि अत्यंत हिडीस प्रकार घडला. 
महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाला जोगता बनवण्याचा प्रयत्न
नेसरी परिसरातील दलित वसाहती मधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण काही महिन्यांपासून मान दुखी व अन्य काही शारीरिक व्याधीने ग्रस्त होता. या व्याधीपासून त्याला मुक्तता मिळावी म्हणून काही डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. पण दुखणे काही कमी झाले नाही परिणामी तो तरुण व त्याचे कुटुंबीय खूप त्रस्त झाले, खचू लागले याच दरम्यानच्या काळात या कुटुंबीयांना काही देवरसपण करणारे, गंडेदोरे देणारे, अंगारे धुपारेच्या माऱ्याने व्याधीमुक्त करतो असं सांगून भिती घालणारे काही भोंदू बाया ,बापे भेटले.
त्यांनी हा व्याधीग्रस्त युवक म्हणजे यल्लामा देवीचे झाड आहे. देवीला ते आवडलेले आहे त्यामुळे त्याला देवीच्या सेवेसाठी, जोगता म्हणून सोडायला पाहिजे अशी भीती घातली आणि घाबरलेल्या या दलित कुटुंबाने त्या भोंदू देवरसपण करणाऱ्यांचे विचार ग्राह्य मानून आपल्या या तरुण मुलाला जोगता म्हणून सोडायची तयारी केली.
याची माहिती अंनिस कार्यकर्त्यांना मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडहिंग्लज शहर व नेसरी शाखेच्या जागरूक कार्यकर्त्यांनी, नेसरी येथील पोलिसांच्या सहकार्याने हाणून पाडला. त्या युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल याची जाणीवही त्या कुटुंबाला झाली नाही. केवळ अंधश्रद्धेतून त्या युवकाच्या आयुष्याची माती झाली असती; पण त्यांचे प्रबोधन अंनिसच्या जागरूक कार्यकर्त्यांनी केले आणि त्या युवकाला आणि कुटुंबाला या अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढले. यासाठी नेसरी पोलिसांचे बहुमोल सहकार्य लाभले.
वास्तविक या देशात देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे. मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केले आहे. महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम 2005 नुसार देवाला, देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणे किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तरीही या घटनेमुळे पुरोगामी महाराष्ट्रात देवदासी, जोगता-जोगतिणीसारख्या घटना अधूनमधून डोकं वर काढतचं असतात.
देवदासी, जोगता, जोगतीण, नायकीण या सगळ्या प्रथा आजही आपल्या आजूबाजूला घडत आहेत. देवाची सेवा करण्यासाठी सोडलेल्यांंना देण्यात आलेल्या या सगळ्या उपमा. पूर्वी मुलींना देवदासी आणि जोगतिणी बनवण्याचं प्रमाण अधिक होतं. पण, अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार, आजकाल मुलांना जोगता म्हणून देवाच्या सेवेसाठी सोडल्या जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.
जोगता-जोगतीण म्हणजे काय?
दरवर्षी यल्लम्मा देवीच्या यात्रेत अनेक मुला, मुलींचं लग्न देवाशी लावलं जातं. 15 दिवसांच्या यात्रेत पहिल्या तीन दिवसांमध्ये हे लग्नाचे विधी केले जातात. यात यल्लम्मा देवीची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो. नंतर मुला,मुलींचं लग्न देवीशी लावलं जातं. अशा मुलांना जोगता आणि मुलींना जोगतीण म्हंटल जातं. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या प्रथेमुळे जोगता किंवा जोगतीण आयुष्यभर कोणाशीच लग्न करू शकत नाहीत.
संसार थाटण्याचा त्यांना अधिकार नसतो. जोगता-जोगतिणींचं आयुष्य हे कायम दुसऱ्यांच्या सेवेत जातं. मुलींना जोगतीण बनवताना गळ्यात लग्न लावतेवेळी पोवळ्यांची माळ आणि हिरवा चुडा भरला जातो. गजरे लावले जातात त्यालाच झुलवा म्हणून ओळखलं जातं. यानंतर हे इथेच न थांबता अनेक प्रथा पार पाडल्या जातात.
विशेषत: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात हे प्रकार अधिक घडतात. सांगलीपासून ९० किलोमीटरवर असलेल्या जतमध्ये ‘यल्लमा’ देवीची जत्रा भरते. देवदासी प्रतिबंधक कायदा असूनही, सामाजिक संस्थांनी वारंवार आवाज उठवूनही पोलिसांच्या डोळ्यांसमोर आजही लहानग्यांना जोगते बनवले जाणे क्लेशदायक आहे. स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे.
मुलींचं लग्न होत नाही, घरात साडे साती सुरू आहे, कुटुंबातील एखादा व्यक्त दीर्घाजाराने त्रस्त आहे, केसांत जट झाली, नवऱ्याने टाकलं, वयात येऊनही मुलीला पाळी आली नाही, अंगावर फोड आले या सगळ्या अडचणींवर उपाय काढण्यासाठी घरातील मुलगा किंवा मुलगी देवाला सोडण्याचा उपाय सुचवला जातो. घरात कोणतीच गोष्टी योग्य होत नसेल तर इतर जोगत्यांकडून देव कोपेल आणि सगळं वाटोळं होईल अशी भिती घातली जाते.
कुष्ठरोग होईल आणि जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल अशी भिती घातली जाते. अशा विपरित घटना टाळण्यासाठी देवीला मुलगा किंवा मुलीला सेवेसाठी दान करा, त्यांना जोगता किंवा जोगतीण करा असं सांगितलं जातं. भितीपोटी लोक काहीही विचार न करता लेकरांना देवदासी करतात.
ही परंपरा जवळजवळ 300 वर्षांपासून सुरू आहे. एकदा का एखाद्या मुलीचे देवाशी लग्न झाले की ती इतर कोणाशीही लग्न करू शकत नाही मग तिला आयुष्यभर देवाची सेवा करत फिरावे लागते. नाव देवाचे असले तरीही प्रत्यक्षात या मुलींच्या नशिबी इतरांचीच ‘सेवा’ करणे येते. काही मुली वेश्या व्यवसाय स्वीकारतात. सांगलीत देहविक्रय करणाऱ्यांपैकी अनेक मुली, महिला देवदासी आहेत. या जत्रेत जेव्हा लहान मुलींना जोगतीण बनविण्यासाठी आणले जाते तेव्हा त्यांच्या गळ्यात लग्न लावतेवेळी पोवळ्याची माळ आणि हातात हिरव्या बांगड्याचा चुडा भरलेला असतो.
केसात फुलांच्या माळा बांधल्या जातात त्याला ‘झुलवा’ म्हणतात. जत, चिंचली किंवा सौंदत्ती, ताकारीसारख्या जत्रेच्या ठिकाणी दरवर्षी 5 जोगतिणी किंवा जोगते होतात. ज्यावेळी ‘किच’ हा विधी होतो त्या नंतर हातातल्या बांगड्या फोडल्या जातात व ह्या मुली विधवा होतात, असे मानले जाते. दीड महिन्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे जाऊन पुन्हा नव्याने त्यांना बांगड्या भरतात. अशी प्रथा आजही सुरू आहे.
कायद्यातील शिक्षेची तरतूद खूप कमकुवत
राज्यात देवदासी प्रतिबंधक कायदा असूनही असे प्रकार का घडतात यावर ‘बाईमाणूस’ने एड. महेश भोसले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. भोसले म्हणतात की, महाराष्ट्र राज्यात देवदासी प्रथा नाहीशी करण्यासाठी अधिनियम काढला गेला आहे. हिंदू देवदेवता, मूर्ती, पूजा करायच्या प्रतिमा, देवळे आणि धार्मिक संस्था यांना देवदासी म्हणून स्त्रिया अर्पण करण्याची प्रथा नाहीशी करणे व स्त्रीचे शोषण रोखणे हा त्यामागचा हेतू होता. अशा प्रथा स्त्री शोषण करणारी आणि त्यांच्या प्रतिमेस कमीपणा आणणारी आहे, असे कायदा मानतो.
अशा देवाला सोडलेल्या स्त्रियांना प्रतिष्ठेने जगता यावे आणि सन्मान मिळावा म्हणून या प्रथेस जबाबदार असणाऱ्या आणि त्यात सहभागी व्यक्तीना शिक्षा देण्याचं काम हा कायदा करतो. तसेच अशा देवदासी सोबत केलेला विवाह हा ती देवदासी आहे म्हणून विधी अग्राह्य असणार नाही आणि अशा विवाहातून जन्मणारे आपत्य अनौरस असणार नाही असे कायदा सांगतो.
असे असले तरीही या कायद्यातील शिक्षेची तरतूद खूप कमकुवत आहे. या कायद्यानुसार दोषीला केवळ 2 वर्षाची शिक्षा आहे. अर्नेश कुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते, 3 वर्षाखालील शिक्षा असलेल्या गुन्ह्यात अटक करणे गरजेचे नाही.
त्यामुळे या कायद्यात अटक होणे खूप दुरापस्त आहे. उल्लंघन करणाऱ्यास या कायद्याची भीती नाही. या कायद्यात सुधारणा करून शिक्षेची तरतूद ही 7 वर्षापर्यंत नेल्यास आणि या कायद्याची अंमलबजावणी कठोर केल्यास याचा उपयोग होईल.
सध्या मुलींपेक्षा मुलांना जोगता म्हणून देवाला देण्याचं प्रमाण अधिक
वेश्या आणि देवदासींच्या आयुष्यावर सातत्याने लिखाण करणारे ब्लॉगर समीर गायकवाड या सगळ्या प्रश्नांकडे सामाजिक मुद्द्याने बघतात. ते सांगतात की, आजही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागांमध्ये अशा घटना घडत असतात. कुटुंबातील संपत्तीचा वाटा करताना एखादी व्यक्ती जर नको असेल तर त्या व्यक्तीला जोगता किंवा जोगतीण केलं जातं.
जेणेकरून ती व्यक्ती संपत्तीच्या वाट्यातून नाहीशी होते. हा प्रकार खूप चालाखीने केला जातो. स्वप्नात देवी आली आणि तिने सांगितलं किंवा तांत्रिकाकडून भिती घालून असे क्रुर प्रकार आजही आपल्या समाजात केले जातात.
एखाद्या व्यक्तीला जोगता किंवा जोगतीण करण्यासाठी कुठेच काही लिहिलेलं नाहीये. जो तो आपापल्या हिशोबाने अर्थ लावतो आणि मुलांना देवासाठी सोडतो. माणूसकीला आणि मानवी मुल्यांना किळंकृत करणारी ही कठोर अंधश्रद्धा आहे.
या प्रथेसाठी ज्या स्त्रियांना देवासाठी सोडलं जातं त्यांना कधीच घरात परत घेतलं जात नाही. त्या सगळ्या स्त्रियांच्या अब्रुची लक्तरं होतात. यल्लम्मा देवीच्या जोगतिणीचे जे काही नियम आहेत त्यात बसणाऱ्या जोगतिणी फार कमी बघायला मिळतात. बाकीच्या स्त्रियांना बाजारात बसवलं जातं. त्यांच्या शारिरीकव्यवहार केला जातो. या सगळ्या गोष्टींना फक्त समाज कारणीभूत आहे. त्यांच्या शरिराचा बाजार होताना आपण पाहतो आणि त्यावर काहीच करत नाही.
देवस्थानातील पुजारी, गूरव त्यांच्याकडे येणारे लोक त्यांचा फायदा घेतात. अशा स्त्रियांना कधीच घरात घेतलं जात नाही. यामुळे त्यांना समाज आपलसं करत नाही. जोगतिणींना स्वतंत्र आयुष्य जगावं लागतं. सर्व जोगतिणी एकत्र येत जगतात मात्र आयुष्यभर त्यांना संघर्ष करावा लागतो. जोगता-जोगतीण प्रथेवर कायदेशीर बंदी असली तरी चैत्र पोर्णिमेच्या दिवशी सर्रास असले प्रकार केले जातात.
समीर गायकवाड यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणतात की, पूर्वी महिलांना जोगतीण म्हणून सोडण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र आता मुलांना जोगता म्हणून देवाला देण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. यात खोटे जोगती देखील पाहायला मिळतात. खऱ्या जोगता-जोगतिणींच्या पोटावर पाय देऊन पैसे कमवण्यासाठी सोंग घेऊन फिरणारे जोगती हमखास पाहायला मिळतात. जसे बनावट किन्नर आहेत तसे बनावट जोगती पण आहेत.
बनावटी जोगत्यांमुळे जे खरे आहेत त्यांच्यावर बट्टा लागला जातो. हे वाईट असतात, लुबाडतात असा लोक आता त्यांच्याबद्दल विचार करतात. आपण पाहिलं तर राज्याच्या सीमावर्ती भागात जसं की सोलापूर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये जोगतीणींचं प्रमाण जास्त आहे. जवळपास सगळ्याच जोगतीणींची आर्थिक बाजू भयंकर असते. आपल्याकडे जोगता जोगतीण प्रथेला आळा घालण्यासाठी कडक कायदे करण्यात आले, पण त्यावर काम केलं जात नाही ही शोकांतिका आहे.”
हे साऱ्या समाजाचेच अपयश
सांगलीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही प्रथा बंद करण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘देवदासी हा प्रकार अंधश्रद्धेतून केला जातो. ज्या मुलीला देवदासी करायची आहे अशी गोरगरीब घरातील मुलगी हेरली जाते व तिच्या मनावर बिंबवले जाते की तू आता देवाची सेवा कर. तुझा जन्म देवासाठीच झाला आहे. 1956 साली देवदासी व मुरळी बनवण्यावर बंधन आणणारा कायदा करण्यात आला आहे.
तरीही ही प्रथा थांबलेली नाही, हे साऱ्या समाजाचेच अपयश म्हटले पाहिजे. या प्रथांमुळे आजही कित्येक कोवळ्या मुला-मुलींचे आयुष्यच करपत आहे. देवदासी प्रथा कायद्याच्या विरोधात असूनही पोलिस संरक्षणात जतची यात्रा पार पडते. या भागातील राजकीय नेतेही या प्रथेला पाठिंबाच देतात. या जत्रेसाठी जवळजवळ तीन-चारशे कॉन्स्टेबल आणि अधिकारी दिवस-रात्र झटत असतात.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, ही प्रथा थांबविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले; परंतु स्थानिक नागरिकांनी ते हाणून पाडले. उलट या प्रथेसंदर्भात कोणी तक्रार केल्यास कारवाई करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जातो. परिमाणी, पोलिस प्रशासनही हतबल आहे. सुरक्षा पुरविण्यापलीकडे पोलिस काहीही करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.






