"मला शाळेत असताना वाटायचं आपला यू-कट असावा. शाळेत असताना माझ्या मैत्रिणीला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे तिचे टक्कल केलं होत. ती नेहमी डोक्याला कापड बांधून यायची. काही दिवसातच तिचे छोटे छोटे केस भुरभुर उडू लागले. मला अगोदरच छोटे केस असावे असं वाटायचं माझ्या मैत्रिणीचं बघून ती इच्छा खूपच तीव्र झाली.
मला न्यूमोनिया झाला आहे आणि आपलं टक्कल केलं आहे. अशी स्वप्न पडू लागले होते. पण वास्तवात तसं होणं शक्य नव्हतं. आमच्या पूर्ण गावात कुठल्याही मुलीचे छोटे केस नव्हते. माझ्या घरात देखील एक केसही वेणीबाहेर आला तर आई त्याला वेणीत घालायची. अकरावीत प्रवेश घेण्यासाठी काढलेला फोटोही दोन वेण्या रिबिनीने वर बांधलेला होता.
तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आल्यावर काही मुलींचे छोटे केस पाहून केस कमी करण्याची इच्छा व्हायची. पण ‘साधी राहणी आणि उच्च विचारसारणी’ त छोटे केस बसत नसल्याचे ऐकल्याने केस कापू शकले नाही. माझ्या अवतीभोवतीच्या वातावरणात लांब केसाला फार महत्व होतं. माझ्या गावात एखाद्या विवाहित बाईने मधल्या भांगाच्या ऐवजी थोडा तिरका भांग पाडला तर नवऱ्याला तिच्या ‘चारित्र्याबद्दल’ संशय यायचा. अजूनही फारशी परिस्थिती बदलेली नाही"
(लक्ष्मी यादव)
पुढे लक्ष्मी यादव सांगतात,
"पुण्यात शिकायला गेल्यावर तेच अनुभव आले. शहरात आल्यावर काही बंधन नसेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. पण मी केसाला क्लिप लावून मोकळे केस सोडायला लागले तेव्हा वेगळाच अनुभव आला. चक्क माझ्या क्लासमधल्या मुलाने उपदेश द्यायला सुरु केलं, 'तू गावातून आली आहेस, तू केस मोकळे सोडून संस्कृती भ्रष्ट करत आहेस. ही काय चांगल्या मुलीची लक्षणे नाहीत.' याच दरम्यान मला जोडीदार मिळाला.
'मी आहे तशीच राहीन ,तू ही तुला पाहिजे तसं रहा' या अटीवर प्रेम फुललं आणि लग्न ही झालं. आम्ही दोघंही एकमेकांना आधार देत आमचे सहजीवन सुरू आहे. मुंबईत एक लोकल ट्रेनचा तर वेगळाच अनुभव होता. मी शर्ट पँट घातलं होतं. हातात- गळ्यात काहीच घातलं नव्हतं आणि बॉयकट होता. बायकांनी पुरुष म्हणून मला ट्रेनमधून खाली ढकललं होत. आयुष्यभर खांद्यावरून पदर पडू न देणाऱ्या माझ्या आईने खूप परिश्रम घेऊन माझे केस लांबलचक केले होते. आणि बॉयकट केला होता.
त्यामुळे आईला दुःख झालं होतं. आई म्हणाली, 'बाईचं सौदर्य छातीत आणि लांबलचक केसात असत.' हे पुरुषकेंद्री मिथक आणखी किती वर्ष विकले जाणार आणि आम्ही बाया त्या विकत घेणार कोण जाणे. केस कापणं ही साधी बाब आहे, पण ती पुरुषांसाठी आहे. बायकांना मात्र त्यासाठी फेमिनिस्ट असं तिरस्कारयुक्त लेबल लावून घेतलं जात”
लांबलचक केस, कपाळाला टिकली, अंगभरून पेहराव या सगळ्या रूपात असणारी महिला आदर्श महिला अशी प्रतिमा तयार करून ठेवली आहे. पुण्यातील प्राध्यापिका समीना पठाण यांचा 'मुस्लिम महिला आणि धार्मिक प्रथा' असा संशोधनाचा विषय होता. संशोधन करत असताना त्यांनीदेखील मुस्लिम महिला तसेच इतर धर्मातील महिला यांच्या कडून हिजाब, डोक्यावरील पदर, घुंगट आणि महिलांचे केस याविषयी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी आणि त्यांच्या संशोधनामध्ये काही ठळक निरीक्षणे नोंदवण्यासाठी जाणीवपूर्वक टक्कल केले होते.

(समीना पठाण)
पुढे समीना पठाण सांगतात,
"सौंदर्याची व्याख्या काय आहे? आणि ती कोणी ठरवली आहे? मी शाळेत इयत्ता पाचवीला असताना माझ्या वर्गातील एका मुलीच्या डोक्यात खूप उवा झाल्या होत्या, तेव्हा तिच्या पालकांनी तिचे टक्कल केले होते आणि ती रोज टोपी घालून शाळेत येत होती. तेव्हा त्या मैत्रिणीवर शाळेतील सर्व मुले मुली हसत असायची.
आपल्या समाजामध्ये पुरुषांनी केलेले टक्कल हे सहजपणे स्वीकारले जाते, परंतु महिलांच्या केसांना सौंदर्याचे प्रतीक समजले जाते. सौंदर्याच्या परिभाषेत महिलांच्या केसांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. केसांवरून जेंडरची ओळख ठरवली जाते. केस कापणे किंवा वाढवणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये समाजाने किंवा धर्माने लुडबुड करण्याची गरज नसते.
तसेच केसांच्या लांबीचे निकष हे लिंगाधारीत देखील असायला नको. मी टक्कल केल्यानंतर अनेकांचे प्रश्न, शंका, उपदेश आणि विरोध याविषयीचा अनुभव घेतला. माझ्या मते, फक्त टक्कल करणे हे महत्त्वाचे नसून, ते उघडपणे मिरवता देखील आले पाहिजे. टक्कल करायचे आणि ते ओढणी, हिजाब, स्कार्फ किंवा टोपी यांचा वापर करून झाकायचे, तर याला अर्थ नाही.
धर्माने वेगवेगळ्या प्रथा, रुढी - परंपरा आणि चालीरीती यांच्यामार्फत स्त्रीवर अनेक बंधने लादलेली दिसून येतात. महिलांच्या केसांवरून तिचे संस्कार किंवा नैतिकता ठरत नसते. विधवा स्त्रीचे केशवपण केले किंवा बालाजीला गेल्यावर महिलांनी केस अर्पण केले तर त्याला सामाजिक मान्यता असते. स्त्री म्हणून वेगळेपण दाखवण्याचे प्रतीक नाकारण्याचे बंड मी केले आहे. असेच धाडस समाजातील इतर महिला आणि मुलींनी केले तर महिलांचे टक्कल ही गोष्ट सामान्य व्हायला वेळ लागणार नाही.
एक बाई म्हणून वावरताना किती जणांनाच सामना करावा लागतो. हे सांगता येत नाही. समाजातील अशाच अनेक गोष्टींचा सामना करणाऱ्या पुण्यातील भवानीपेठ या वस्तीमध्ये राहणाऱ्या रुपाली जाधव सांगतात,
"मला लहानपणापासूनच अनेक प्रश्न पडायचे. आई मलाच भांडी, झाडू मारायला का लावते. भावाला का लावत नाही.मासिक पाळीचे वेळी बाजूला बसायला लागत होतं. तुळशीला हात लावायचा नाही. जीन्स घालायला परवानगी नसायची, बाहेर उशिरा फिरायला परवानगी नसायची. त्या त्या वेळी या गोष्टींसाठी विरोध करत होते पण एवढा तीव्र नसायचा.
शिकायला सुद्धा संघर्ष करावा लागला. वडील तर म्हणायचे, 'तुला कशाला शिकायला पाहिजे. तू तर मुलगी आहेस. तुला तर लग्न करून पोरंच सांभाळायची आहेत.' पण माझ्यात एक गोष्ट होती ज्या गोष्टीला नकार दिला ती गोष्ट मी करायचीच. मी धुणीभांडीचे काम करून शिक्षण घेतलं. नोकरी करताना ही मला असमानता दिसून आली. कॉल सेंटरमध्ये कामाला गेले तर वेगळीच परीक्षा. तुम्ही कॅटवॉक करा, चांगले कपडे घालावे लागतील. केस मोठे असावेत. या गोष्टी मला खटकल्या.
मी त्यांना स्पष्ट सांगितलं, 'माझ्या स्किलनुसार माझं काम बघा. माझ्या शरीरावरुन जज करू नका. शरीर महत्त्वाचं आहे पण ते कोणाला खुश करण्यासाठी नाही. तिथे काय मी जॉब केला नाही. दोन तीन ठिकाणी अशाच प्रश्नाचा भडिमार करण्यात आला. मला खटकत असणाऱ्या गोष्टीसाठी कोणाला समजवत बसले नाही. माझ्या कामातून, कृतीतून दाखवून दिलं. एखाद्या बाईने छोटे केस केले किंवा टक्कल केलं की तिला एकत्र कॅन्सर झाला असेल, डिप्रेशनमध्ये गेली असेल अशा प्रकारचं बोललं जात.

(रुपाली जाधव)
पुरुष तर सर्रास करत असतात. त्याच्याकडे कोणी त्या दृष्टीने बघत नाही. केस हे बाईचं सौदर्य समजलं जात. मी त्यालाच छेद दिला. मी एकदा नाही वारंवार टक्कल केलं. माझ्यामुळे इतर मुलींनीही टक्कल केलं आहे. समाजातील कोणीतरी अशा गोष्टी केली की बळ मिळतं. सगळे प्रयोग मी स्वतःवर केले. मासिक पाळीच्या वेळी वेगळी दुसरीकडे कुठे बसली नाही, तुळशीला हात लावून तुळस जळली नाही म्हणून सांगत होते."
सध्या कोलकत्तासारख्या घडलेल्या घटना बघितलं तर त्यात ही मुलींनाच दोष दिला जातो. तिने कपडे व्यवस्थित घातले नसतील,कशाला एवढ्या उशिरा बाहेर जायचं. अशा अनेक प्रश्नाचा भडिमार केला जातो. आज कोणत्या बाईवर अत्याचार झाला नाही ? लहान मुलीचा ही होतो, म्हाताऱ्या बाईचा सुद्धा होतो. यामध्ये कपड्याचं, वयाचं,सुंदर दिसण्याचा काहीच संबंध नसतो. याला कारणीभूत ठरते ती पुरुषसत्ताक मानसिकता.
अंगभर कपडे घातली तरी लोकांच्या डोक्यात हीच मानसिकता असेल तर त्या गोष्टी टाळता येणार का ? आपल्या शिक्षण व्यवस्थेत सेक्स एज्युकेशनचा अभाव आहे. हे विषय शिक्षण व्यवस्थेत घेतले पाहिजेत. स्त्री-पुरुष समानता,महिलांना येणारी मासिक पाळी, पुरुषामध्ये होणारे बदल, हे शिकवलं गेलं पाहिजे.
सध्याच्या परिस्थितीत ज्या घटना घडतं आहे त्या ही तिच्या प्रतिमेशी जोडल्या जात आहेत. एक माणूस म्हणून त्याकडे बघितलं जात आहे. महिलांना किती काळ त्या पुरुषसत्ताक मानसिकतेने वागवणार. पण आता महिलांनी ही ठरवलं आहे. आम्हाला जे योग्य वाटेल तसं आम्ही राहू. आम्ही स्वतंत्र आहोत. 'नजर खराब आपकी परदा और परदा करे हम' म्हणत महिलांनी स्त्री प्रतिमेला छेद देण्याचं काम केलं आहे.






