अवयवदान करण्याचे अनेकदा आवाहन केले जाते. त्यासाठी जनजागृतीही होत असते. पण भारतात अवयव दान मोठ्या प्रमाणात होत नसले तरीही यामध्ये महिलाच पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे एका अभ्यासातून दिसत आहे. कारण, भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला असल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय कारणामुळे कुटुंबातील सदस्याचे अवयव निकामी झाल्यानंतर बहुतांशवेळा घरातील महिला सदस्य अवयवदान करण्यासाठी पुढे आल्याचे दिसून येत आहे. त्यात आई, बहीण, आजी, बायको, मावशी, आत्या यांचा समावेश असतो. कुटुंबातील सदस्यांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी प्रामुख्याने पुढे येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
राज्यात अवयव प्रत्यारोपणाचे नियमन स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (सोटो) संस्थेमार्फत केले जाते. मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर व नागपूर या चार विभागीय अवयव प्रत्यारोपण संस्था या प्रक्रियेचे काम पाहतात. जिवंतपणी अवयवदानात किडनी आणि यकृताचा भाग (लिव्हर) यांचा समावेश होतो. हे अवयव निकामी झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यामध्ये जवळच्या नात्यातील (कायद्यात नात्याची व्याख्या सांगितली आहे) व्यक्तीने अवयव द्यावा किंवा विभागीय अवयव प्रत्यारोपण संस्थेच्या प्रतीक्षा यादीवर नोंदणी केली जाते.
भारतात दर पाच अवयवदात्यांपैकी चार महिला
'सोटो'च्या माहितीनुसार, 2022 ते 24 या तीन वर्षात जिवंतपणी अवयवदान केलेल्यांमध्ये पुरुषांनी 770, तर महिलांनी 2,389 किडनीदान केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत पुरुषांनी 380, तर महिलांनी 782 लिव्हर दान केले आहे.
हे फक्त राज्यातले चित्र नसून जगभरात अवयवदान करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होत चालल्याचं दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की पुरुषांच्या तुलनेत अवयवदान करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. विरोधाभास असा की या अवयवाची गरज पुरुषांनाच जास्त पडते. म्हणजे आज जास्त पुरुषांना किडनीची गरज पडते, पण त्यांना हे अवयव बहुतेकवेळा महिलांकडून मिळतात. यामुळे महिलांवर अवयवदानाचा भार अधिक पडत आहे. महिला आपल्या प्रियजनांसाठी आपल्या अवयवांचं दान करण्यास सहज तयार होतात, हे आजवरच्या वैद्यकीय इतिहासात पाहण्यात आलं आहे. किडनी ट्रान्सप्लांटसंदर्भात तर ही आजच्या काळात सामान्य बाब मानली जात आहे.
महिला अधिक कुटुंबवत्सल
आपल्या देशात मानवी अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार अवयव प्रत्यारोपण केले जाते. या कायद्यात 2014 मध्ये काही बदल करण्यात आले. जिवंतपणी अवयवदानात मुख्यत्वे किडनी आणि यकृताचा भाग (लिव्हर) या दोन अवयवांचा समावेश होतो. अनेकवेळा हे दोन अवयव निकामी झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून अवयवाचे प्रत्यारोपण करणे, हा एकमेव मार्ग असतो.
प्रतीक्षा यादीवर नाव नोंदवून अवयव मिळण्यासाठी किती काळ जाईल, हे सांगणे कठीण असते. जवळच्या नातेवाइकाने अवयव दिल्यास रुग्णाचा अवयव मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. मग घरात त्या रुग्णाला अवयव देणार कोण? यावर चर्चा सुरू होते त्यावेळी घरातील महिला अवयव देण्यास प्रथम पुढे येत असल्याचे चित्र संबंध देशात दिसून येते.
फार कमी वेळा वडील, भाऊ, मुलगा, आजोबा अवयवदान करण्याकरिता पुढे आल्याचे दिसून आहे. या मागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही बघितली, तर पुरुषी मानसिकता यामध्ये दिसून येते. कर्ता पुरुष आणि महिलांचे आपल्या जवळील असणाऱ्या व्यक्तीवरचे प्रेम, घरातील आदरयुक्त दरारा तसेच महिलांची त्यागाची भावना ही पुरुषांपेक्षा अधिक असते.
यासंदर्भात बॉम्बे हॉस्पिटलचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. श्रीरंग बिच्चू सांगतात की, रुग्णाची आई कशाचाही विचार न करता सर्वप्रथम पुढे येते. त्यानंतर बहीण, बायको, आजी, मावशी, आत्या पुढे येतात. किडनीदानात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या तिपटीने अधिक आहे.
मॅक्स नानावटी हॉस्पिटलच्या लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणतात,’’ महिला अधिक कुटुंबवत्सल असतात. नात्यातील ओलावा त्या अधिक प्रमाणात जपतात. माझ्या गेल्या 10 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी हेच बघितले आहे की घरात अवयवदान करण्याची वेळ येते तेव्हा महिला पुढे असतात.
महिला जास्त भावनिक
पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त अवयवदान का करतात, याची अनेक कारणे आहेत. 
- महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त भावनिक असतात. त्यांना आपल्या आप्तस्वकियांबाबत जास्त प्रेम असतं.
- पुरषांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाणही जास्त आहे.
- गेल्या तीन वर्षांत राज्यात पुरुषांनी 770, तर महिलांनी 2,389 किडनीदान केल्या आहेत.
- केवळ जीवनसाथीच नव्हे तर महिला आपली मुले, भाऊ-बहीण किंवा इतर नातेवाईकांनाही अवयवदान करतात.
- याचं एक मोठं कारण आर्थिकही आहे. कोणताही देश असो, घर चालवण्याची जबाबदारी ही सहसा पुरुषांवरचच जास्त असते.
- अवयवदान केल्यानंतर दात्याला तसंच रुग्णाला किमान दोन महिने तरी घरी बसावं लागतं. याचे दोन बाजूंनी आर्थिक नुकसान असतात.
- महिलांना असं वाटतं की अवयवदान करून त्या घरचं आर्थिक नुकसान कमी करू शकतात.
अवयवदानाबाबत हे आहेत गैरसमज…
अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे पण अजूनही या दिशेने बरेच काम करायचे आहे. देशात जिवंत आणि मृत व्यक्तींच्या अवयवदानाची प्रक्रिया कायद्याने नियंत्रित केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश असूनही आपल्या देशातील केवळ 0.1% लोकांनी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे, जी देशातील अवयव दानाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अपुरी आहे.
महिलांचे अवयव पुरूषांत ट्रान्सप्लांट होत नाहीत
हे खरे नाही. महिला आणि पुरुषांचे लिव्हर आणि किडनी सारखेच असून त्यांचे सुरक्षितपणे प्रत्यारोपण करता येते. त्यामुळे ही अफवा आहे.
माझ्या धर्मात अंगदान करत नाहीत
जीव वाचवण्यापेक्षा परोपकारी दुसरे काहीही नाही आणि जगातील प्रत्येक धर्म त्याचे समर्थन करतो. विविध धार्मिक गटांनी आयोजित केलेल्या अनेक चर्चासत्रांमध्ये हे सर्वानुमते घोषित करण्यात आले आहे की, कोणताही धर्म जिवंत असताना किंवा मृत्यूनंतर अवयवदान करण्यास मनाई करत नाही.
मृत्यूनंतरच अवयवदान केले जाऊ शकते
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर जेव्हा त्याचे हृदय कार्य करणे थांबवते तेव्हा त्याच्या शरीराचे सर्वच अवयव निरुपयोगी होतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या शरीरातील अवयव हे फक्त मेंदू निकामी झाल्यानंतरच म्हणजेच ब्रेन डेथनंतरच काढून टाकले जाऊ शकतात, म्हणजे मेंदू मृत असतो परंतु हृदय चालू असते, जी स्थिती सामान्यत: हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील (ICU) मृत्यूनंतर उद्भवते.
मृत्यूनंतर अवयवदानासाठी फक्त कॉर्निया घेता येतो, तोही मृत्यूच्या 6 तासांच्या आतमध्येच. अवयवदानासाठी शरीरातील इतर सर्व अवयव काढून घेता येतात जोपर्यंत व्यक्ती ब्रेन डेड झाली आहे पण त्याचे हृदय काम करत आहे. म्हणूनच ब्रेन डेड झाल्यावर अवयव लवकरात लवकर काढता यावेत यासाठी जीवंत असतानाच अवयव दान करण्याचा निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
ब्रेन डेथनंतर अववयांची चिरफाड होते
ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरातील अवयव एका तज्ज्ञामार्फत ऑपरेशन थिएटरमध्ये काढले जातात आणि आवश्यक असतील त्या ठिकाणी काही चीरा देऊन त्या ठिकाणाहून अवयव काढून टाकल्यानंतर ती जागा काळजीपूर्वक टाक्यांनी शिवली जाते ज्यामुळे शरीर कुठेही कापलेले किंवा चिरफाड केलेले दिसत नाही.
मी ऑर्गन्स खरेदी करू शकतो
आपल्या देशात अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते, ज्या अंतर्गत अवयवांची खरेदी आणि विक्री प्रतिबंधित आहे. या कायद्यानुसार रुग्णाचे जवळचे नातेवाईकच अवयवदान करू शकतात. मानवी अवयवांच्या खरेदी-विक्रीला सक्त मनाई आहे आणि तसे करणे दंडनीय गुन्हा आहे.
अवयवदानामुळे अपंगत्व किंवा कमजोरीचा धोका
आतापर्यंत 200,000 पेक्षा जास्त जिवंत दात्यांनी अवयव दान केल्यानंतर ते नेहमीप्रमाणे निरोगी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. प्रत्यारोपणापूर्वी सर्व आवश्यक चाचण्या केल्या गेल्या असतील तर दान केल्यानंतर किडनी किंवा लिव्हर डोनरला रोग होण्याची शक्यता नसते. काही किडनी डोनर्सना नंतर उच्च रक्तदाब किंवा प्रोटिन लिकेजची समस्या होऊ शकते.
अवयवदानामुळे आई-बाबा होऊ शकत नाही
किडनी दान केल्यानंतरही कोणतीही स्त्री किंवा पुरुष भविष्यात मुलाला जन्म देण्यास सक्षम असतो. या प्रकरणात, महिलांना दानानंतर एक वर्ष गर्भधारणा न करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून त्यांचे शरीर पूर्णपणे बरे होईल.






