पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे दिला जाणारा लाडली मीडिया पुरस्कार बाईमाणूसच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी वर्षा कोडापे यांना जाहीर झाला. ठाणे येथील पुरस्कार सोहळ्यात रेणुका शहाणे यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लिंगानुभाव संवेदनशील पत्रकारितेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार वर्षा कोडापे यांना शोध पत्रकारिता या विभागांतर्गत मिळाला.
आदिवासी गौड समाजातून येणाऱ्या वर्षा या बाईमाणूसच्या लाडली मीडिया पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या दुसऱ्या प्रतिनिधी ठरल्या आहेत. बाईमाणूस या माध्यम समूहाला सलग दुसऱ्या वर्षी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील वर्षी सुमित्रा वसावे या बाईमाणूसच्या नंदुरबार जिल्ह्याच्या प्रतिनिधीला हा पुरस्कार मिळाला होता.
भारतातील एकूण 74 पत्रकारांना लाडली मीडिया पुरस्काराने गौरविण्यात आले. चंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणामुळे व हवामान बदलामुळे पुरूषांमधील वांझपणात वाढ झाल्यासंबंधीचा विशेष ग्राउंड रिपोर्ट वर्षा कोडापे यांनी केला. यासाठीच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना वर्षा म्हणतात की,
"हा रिपोर्ट करताना पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं.माझा उद्देश एवढाच होता की सामान्य माणसाची समस्या मांडायची व त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा.हा पुरस्कार मिळाल्याने सामान्यांचे प्रश्न मांडायला आणखी हुरूप आला आहे.पर्यावरण विषयक पत्रकारितेला जास्तीत जास्त प्राधान्य देणे गरजेचे आहे."

वर्षा कोडपे यांच्या रिपोर्टमधील महत्वाच्या बाबी.
चंद्रपुरातील विविध घटकांतील महिला, पुरूष ,सामाजिक कार्यकर्ते,डॉक्टर यांच्याशी संवाद साधून हवामान बदलाचा व औष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होत आहे यासंबंधीच्या प्रतिक्रिया या रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद करून त्यामागच्या कारणांचा शोध घेतला. मूल होत नसल्याने एका पुरूषाने तिच्या पत्नीला मारून टाकल्याच्या,चंद्रपुरातील घटनेचा त्यात उल्लेख आहे.
अगदी कमी वयात मुलींना येणाऱ्या पाळीची समस्या, प्रदूषणकारी घटकांमुळे पुरूषांच्या जननक्षमतेवर होणारा परिणाम यासंबंधीचा विस्तृत आढावा या रिपोर्ट मधून घेण्यात आला आहे.याचीच दखल घेत, यावर्षीचा लाडली मीडिया पुरस्कार त्यांना मिळाला.
लाडली मीडिया पुरस्काराविषयी
पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे 2007 सालापासून हा पुरस्कार दिला जातो.पॉप्युलेशन फर्स्ट ही एक स्वयंसेवी संस्था आहे. लिंगानुभाव संवेदनशीलता संबंधी असणाऱ्या 'प्रिंट व डिजिटल मीडिया' तसेच रेडिओ वरील वार्तांकन यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यासाठी 'युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड' द्वारे देखील या पुरस्कारासाठी साहाय्य केले जाते.






