कैवल्याचा पुतळा । प्रगटला भूतळा ।
चैतन्याचा जिव्हाळा । ज्ञानोबा माझा ।।
संत एकनाथांनी वर्णिलेले ज्ञानोबा माऊलींचे कैवल्यरूप, चैतन्यरूप अनुभवण्यासाठी ; 'विठोबाचा प्राणसखा ' असलेल्या माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मराठी जनांची पाऊले अलंकापुरीकडे वळतात. नाथांच्याच रचनेत आलेले वर्णन म्हणजे, 'शिवपीठ हे जुनाट | ज्ञानाबाई तेथे मुगुट ||' ही पुण्यभूमी पवित्र अशी अलंकापुरी ज्ञानोबा माऊलींच्या आधी एक तीर्थक्षेत्र म्हणून अस्तित्वात होती. माऊलींची गुरूपरंपरा पाहिली तर ही परंपरा नाथसंप्रदायातील आहे. अलंकापुरी देखील सिध्देश्वराचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती. त्यामुळेच संत साहित्यातील या पुण्य भूमीचे उल्लेख, शिवपीठ, सिद्धबेट, सिद्धक्षेत्र, अलंकापुरी व आज प्रचलित असलेला उल्लेख म्हणजे आळंदी असे दिसतात.
या आळंदीच्या रस्त्यांवरून फिरताना टाळ मृदंगाच्या गजरासोबतच आणखी काही आवाज आपल्या कानांवर पडतात. वर्षभर बरीचशी लगबग सुरू असल्याची पाहायला मिळते. पुण्यभूमीच्या साक्षीने, इंद्रायणी काठी, देवाच्या आळंदीत आपली देखील मनोकामना पूर्ण व्हावी असे अनेकांना वाटते. आता प्रश्न पडू शकतो की, कोणती मनोकामना? कसली लगबग? अन् टाळ मृदंगाच्या गजरासोबतच आणखी कोणता गजर इथे ऐकायला मिळतो? या प्रश्नांची उत्तरे पुढे मिळत जातीलच पण त्याआधी 9 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी, ठीक सकाळी 11 वाजता, आळंदीच्या एका ऑफिसवजा खोलीत जिथे एक टेबल,पाच सहा खुर्च्या आणि काही लोकांची गर्दी आहे तिथं नेमकं काय सुरू होतं ते पाहू.

(विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर | ते या भूमीवर अलंकापूर || संत एकनाथांनी वर्णिलेली आळंदी)
*देवाची आळंदी आता लग्नकार्याची आळंदी*
शुभ्र पांढरा शर्ट, काळी पँट अशा पेहरावात असलेला एक तरूण सुगंधित अत्तराचा भपका यावा इतके अत्तर मारून टेबल समोरच्या दोन खुर्च्यांपैकी एका खुर्चीत बसला होता. शेजारच्या खुर्चीत पोरसवदा दिसणारी नुकतीच वयात आलेली तरूणी हिरवा शालू परिधान करून बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जाणवत होता. अगदी बिनधास्तपणे ती बसली होती. टेबलाच्या अलीकडे त्या ऑफिसचे सर्वेसर्वा बसले होते.या तिघांच्या बाजूने असलेल्या बाकी खुर्च्यांवर तरूणाचे चार मित्र बसून होते.
त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहता मोठी लढाई जिंकल्याचा किंवा एखादा गड सर केल्याचा त्यांचा आविर्भाव होता. त्या ऑफिसच्या सर्वेसर्वा असलेल्या इसमाने, सही, अंगठा, कागदपत्रे अशी औपचारिकता असलेली कामे पूर्ण केली व मोबाईल काढून त्या दोघांचा व्हिडिओ शूट करू लागला. तो इसम जे म्हणायचा त्याचा पाठोपाठ हे दोघेही तसेच म्हणू लागले. या तिघांनी सगळा मिळून पुढील मजकूर बोलला.तो मजकूर असा की,
"हे प्रतिज्ञापत्र मी दिलेल्या माहितीनुसार,माझ्या सांगण्यावरून बनवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्र वाचून सही व अंगठा केला आहे.त्याबाबत कोणतीही तक्रार नाही."
हा व्हिडिओ शूट करून आनंदी मुद्रेने त्याने पुढच्या विधीसाठी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या हॉलकडे जाण्याचा इशारा केला. आता आणखी आढेवेढे न घेता आपणास कळविण्यात येते की, शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी 11 वा 30 मि.या मुहूर्तावर संबंधित दोघांचा शुभविवाह इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत त्यालाच आळंदीत, मंगल कार्यालय असेही म्हणतात, या ठिकाणी यांचा विवाह पार पडला. त्या वराच्या सोबत आलेले विजयी मुद्रेने पाहणारे त्याचे मित्र साक्षीदार म्हणून सोबतीला आले होते.
(सौभाग्य मंगल कार्यालयाचे मालक राजेंद्र घायाळ त्यांच्या कार्यालयातून नेहमीचे कामकाज पाहतात.)
सुरूवातीला उपस्थित केलेले प्रश्न म्हणजे आळंदीत आणखी कोणता गजर ऐकायला मिळतो? कोणती लगबग सुरू असते? अन् कोणती मनोकामना पूर्ण करण्यासाठी लोक येतात? तर तो गजर असतो मंगलाष्टकांचा, लगबग असते विवाहासाठीच्या खरेदीची आणि दररोज शेकडो वर व वधू त्यांच्या विवाहाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी संत नामदेवांनी वर्णिलेल्या अष्टोत्तरशे तीर्थें सारी | ओघे आली अलंकापुरी || अशा आळंदीत येतात. आळंदीच्या माऊलींच्या समाधी स्थानासोबतच या क्षेत्राची ओळख आता विवाह करण्याचे क्षेत्र म्हणून झाली आहे. आळंदीच्या अर्थकारणाचा अन्य स्रोतांच्याप्रमाणेच प्रमुख स्त्रोत म्हणजे, हजारोंच्या संख्येने असलेली मंगल कार्यालयं. त्यामुळे देवाची आळंदी आता लग्नकार्याची आळंदी म्हणूनही ओळखली जाते.
आळंदीच कशासाठी?
याच लग्नकर्याच्या अनुषंगाने असणारे व्यवसाय मग त्यात भटजी बुवांपासून, केटरर्स, हार-फुल विक्रेते, सोनार, कापड व्यावसायिक, चप्पल विक्रेते यांच्यासोबतच वकील मंडळींच्या अर्थकारणाला देखील चालना मिळते. वारकरी संप्रदायात आळंदी तशी माऊलींच्या समाधी स्थळासोबतच हजारो कीर्तनकार घडवणारी नगरी म्हणूनही ओळखली जाते.
आळंदीतील या कीर्तनकार निर्मितीची सुरूवात सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेपासून झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आणखी काही वारकरी शिक्षण संस्था निर्माण झाल्या. हजारो कीर्तनकार व समाज प्रबोधनकार घडवणाऱ्या आळंदीत इंद्रायणीकाठी पौरोहित्य करणाऱ्या लोकांनी विधीपूर्वक, विवाह लावण्यास सुरूवात केली. साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी याची सुरूवात झाल्याचे स्थानिक सांगतात. याचेच रूपांतर आज आळंदीच्या विवाह संबंधित बाजारपेठेत झाल्याचे पाहायला मिळते.
पळून जाऊन लग्न करणाऱ्यांसाठी...
विवाह हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक. तसेच अन्य धर्मियांत देखील विवाह संबंधी काहीएक विधी, परंपरा व रूढी आहेत. अत्यंत कमी खर्चात सर्व सोयींनीयुक्त विवाह पार पाडले जातात म्हणून आर्थिक परिस्थिती चांगली नसलेली वर वधू आळंदीच्या पुण्य भूमीत त्यांचा विवाह करण्यास पसंती देतात. याशिवाय आळंदीतील होणारे बहुतांश विवाह हे रजिस्टर पद्धतीने म्हणजेच नोंदणीकृत पद्धतीने होतात किंबहुना याच कारणासाठी आळंदीला जोडप्यांची पसंती असते. 'पळून जाऊन विवाह करणे.' या प्रकाराला आळंदीत योग्य त्या संधी उपलब्ध होतात.
पालकांकडून होणारा विरोध, सततची मानसिक कुचंबना, हेटाळणी याला त्रासून प्रेमी युगुल, 'उधळून देतात तुफान सारं मनामध्ये साचलेलं ' आणि वाट धरतात प्रेमनगरी आळंदीची. हजारात असलेल्या मंगल कार्यालयांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून मंगल कार्यालयांना संपर्क करतात व विवाहासाठी सज्ज होतात. इथे आधीच संपूर्ण व्यवस्था करून ठेवलेली असते. वराचे व वधूचे आधारकार्ड, शाळा सोडल्याचे दाखले व तीन साक्षीदार असले की काम झालं समजा.

(इंद्रायणी काठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची ||)
या लग्न कार्यासंबंधी बाईमाणूसच्या टीमने आळंदीतील सौभाग्य मंगल कार्यालयाचे मालक राजेंद्र घायाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या सगळ्या प्रक्रियेबद्दल माहिती देताना सांगितले की," आमच्या मंगल कार्यालयात दरवर्षी एक हजार पेक्षा जास्त लग्न पार पडतात. यासाठी आम्ही पहिल्यांदा मुलाचे वय 21 व मुलीचे 18 पूर्ण झाले आहे का याची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करतो. आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला याआधारे वय पूर्ण आहेत की नाही याची खातरजमा होते.
दोघांची राजीखुशी असल्याचे किंवा इथे तुम्हाला कोणी धाकाने, जबरदस्तीने, फूस लावून आणले नसल्याचे व स्वखुशीने आल्याचे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून घेतले जाते. त्यानंतर हिंदू विवाह पद्धतीने लग्न लावले जाते. त्यानंतर आम्ही लग्न लावल्याचे प्रमाणपत्र जोडप्यांना देतो. हे प्रमाणपत्र त्यांनी त्यांच्या रहिवासी असलेल्या ठिकाणच्या विवाह नोंदणी कार्यालयात दाखवले की त्यांना विवाहविषयक प्रमाणपत्र मिळते."
सगळं काही कायदेशीर असले तरीही...
या विवाहाच्या कायदेशीर बाबींवर आम्ही आळंदी शहराचे रहिवासी असलेल्या ॲड. प्रियेश सोनवणे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, "आळंदीतील पळून आलेल्या जोडप्यांची लग्न कायदेशीर आहेत असं मी म्हणणार नाही पण कायद्याला अनुसरून आहेत. हिंदू विवाह कायदा नुसार, सप्तपदी सहित अन्य बाबींची पूर्तता याठिकाणी मंगल कार्यालयांकडून होते त्यामुळे हे विवाह ग्राह्य मानले जातील.
आळंदीत होणाऱ्या विवाहांच्या संदर्भात आणखी एक मुद्दा म्हणजे, महाराष्ट्रातील जातिव्यवस्थेला मूठमाती देण्याचे काम या ठिकाणी होते. याचे कारण म्हणजे आळंदीत होणाऱ्या विवाहांपैकी बहुसंख्य विवाह हे आंतरजातीय असतात. राज्य सरकार अशा विवाहांना प्रोत्साहन देत आहे. ठराविक रक्कम अशा जोडप्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. शहरातील अर्थकारणाला देखील याने चालना मिळते आहे."

(आळंदीतील अशा लहानशा खोलीवजा मंगल कार्यालयांतून दरवर्षी हजारो लग्नं होतात.)
या संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून मंगल कार्यालयांचे मालक व पोलीस यांच्यात समन्वय साधण्यासाठी व्हॉटसॲप ग्रुप असल्याचे राजेंद्र घायाळ सांगतात.ते सांगतात की,
"आसपासच्या जिल्ह्यांत कुठेही मिसिंग कंप्लेंट दाखल झाली की आमच्या ग्रुपवर संबंधित तक्रारीची माहिती येते. या तक्रारीत उल्लेख असलेलं कोणी आमच्याकडे लग्नासाठी आलं की लगेच आम्ही पोलिसांशी संपर्क करतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आळंदीत जोडपी येतात. अगदी गडचिरोली मधील लोकांची देखील लग्नं आम्ही लावली आहेत."
आळंदी शहरातील अर्थकारण तेजीत राहण्यासाठी, मंगल कार्यालयं कशी महत्वाची आहेत हे स्थानिक व्यापाऱ्यांशी व विक्रेत्यांशी संवाद साधल्यावर समजते. येथील एका फुलविक्रेत्याने सांगितल्यानुसार वधू व वराला लागणारे दिवसाला सरासरी पन्नास ते साठ हार त्यांच्याकडून जातात. "महिन्याकाठी पंचवीस ते तीस हजार व लगीन सराईच्या काळात त्यापेक्षा जास्त पैशे मिळत्यात." असं हारविक्रेते सांगतात.
हे सगळं वाचून आळंदीत एकूणच 'आनंदी आनंद गडे आळंदीत चोहीकडे ' अशी परिस्थिती आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. असे असले तरीही, मागच्या वर्षीच्या ' नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ' अहवालात सर्वाधिक मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे आळंदीत येणाऱ्या जोडप्यांच्या गरजेचा फायदा उचलला जाऊन त्यांची फसवणूक होऊ शकते. शहरात एजंटचा जास्त सुळसुळाट झाल्याचे स्थानिक सांगतात. पैशांसाठी बऱ्याचदा अठरा वर्षांच्या खालील मुलींची लग्नं लावून दिली जाण्याची शक्यता आहे.
त्यासाठी बरेच पैसे उकळले जातील. साक्षीदार उपलब्ध नसतील तर साक्षीदार दिले जातील. थोडक्यात काय तर पैसे दिले की साक्षीदारापासून ते कागदपत्रांपर्यंत सगळंच उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कागदपत्रांची शहानिशा करण्याची व्यवस्था नसल्यास, योग्य रीतीने त्यांची छाननी झाली नाही तर व्यवस्थेची फसवणूक होऊ शकते. प्रेमाच्या भावनेत जोडप्यांना देखील याचा विसर पडू शकतो.
(आळंदीतील फुलविक्रेते व अन्य व्यावसायिक यांना विवाह कार्यालयांच्या माध्यमातून रोजगार मिळतो.)
या सगळ्या शक्यता व फसवणुकीच्या बातम्यांमधून येणाऱ्या चर्चा यावर व कायदेशीर बाबी यासंबंधी ॲड.महेश भोसले म्हणतात की,"अशा मंगल कार्यालयांत होणारी लग्नं ही लग्न नोंदणीसाठी उपयुक्त आहेत मात्र लग्नासंबंधी नोंदणी ही लग्न नोंदणी कार्यालयांतच होते. कागदपत्रांची खातरजमा विवाह नोंदणी कार्यालयातच होणार असते त्यामुळे हिंदू विवाह कायद्यानुसार सप्तपदी नंतर लग्न कायदेशीर मानले जाते.
मुलाचे वय 21 व मुलीचे 18 असल्याची कागदपत्रे व त्या कागदपत्रांची शहानिशा करणे गरजेचे आहे. ही सगळी पूर्तता असल्यास, सप्तपदी कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा मंदिरात घेतली व त्याचा फोटो किंवा व्हिडीओ पुरावा म्हणून सादर केल्यास अशा लग्नाची नोंद विवाह नोंदणी कार्यालयात होण्यास काहीच अडचण नाही."
तर असा आहे हा गंधर्व विवाहाचा आळंदी पॅटर्न.
(सर्व छायचित्रे : ऋषिकेश मोरे)






