मलाला युसुफझाईवरील हल्ल्यानंतर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानवर टीका करण्यासाठी कवी हबीब जालिब यांनी ‘’डरते हैं बंदुकों वाले एक निहत्ती लड़की से’’ अशा शब्दांचा वापर केला होता. खरंतर ही बाब बलुचिस्तानच्या स्पष्ट, उग्र आणि अविचल डॉ. महरंग बलोच यांच्यासाठी अगदी चपखल लागू पडते. गांधीवादी मार्गाने पाकिस्तान सरकारविरुद्ध, त्यांच्या सैन्याविरुद्ध लढणारी महरंग बलोच म्हणतात, मी प्रियजनांचे अनेक मृतदेह पाहिले, आता मृत्यू मला घाबरवत नाही.’’
अलीकडच्या काळात बलुचिस्तानमध्ये उल्लेखनीय घटना घडत आहेत. खरेतर हा प्रांत मीडिया आणि माहितीच्या ब्लॅकहोलमध्ये असल्यामुळे याबाबत कोणताही अहवाल प्रसिद्ध झालेला नाही किंवा त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. याचे एक कारण म्हणजे या संघर्षात लोकशाही, मानवी हक्क, कायद्याचे राज्य आणि अशा तत्वांचा दावा करणाऱ्या देशांच्या दृष्टीने कधीही प्राधान्य नसलेल्या लोकांचा समावेश आहे.
26 ऑगस्ट रोजी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या जवानांनी 23 पंजाबींना गोळ्या घालून ठार केले. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बलुचिस्तान प्रांतात प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर 23 जणांना गोळ्या घातल्या. एका बाजूला बीएलए हिंसाचाराची वृत्ती, तर दुसरीकडे डॉ. महरंग बलोच.
त्या बलुचिस्तानच्या लोकांसाठी एक दशकापासून गांधीवादी मार्गाने लढत आहेत. त्या बलुच लोकांना एकत्र आणत असून महिलांनाही रस्त्यावर उतरण्यासाठी प्रोत्साहित करताहेत. त्या लष्कर व सरकारलाही आव्हान देत आहेत.
प्रदीर्घ काळ दडपलेले व पिचलेले बलुच राष्ट्र आता जागृत होत आहे. एक अतिशय पारंपारिक, पुराणमतवादी, सनातनी आणि आदिवासी समाज आणि संस्कृती जपणारा हा समुदाय सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही आहेच व त्यासोबत त्याच्या मूलभूत राजकीय आणि मानवी हक्कांसाठी उभे राहण्यासाठी तरुण स्त्रिया पुढाकार घेत आहेत. दीर्घ काळानंतर अशाप्रकारची एक विभक्त राजकीय व्यवस्था, कदाचित पहिल्यांदाच एका छत्राखाली एकत्र येत आहे. बलुचिस्तानमधील या जनआंदोलनाला कसे हाताळायचे यावर बलाढ्य पाकिस्तानी लष्कर आणि त्यांचे सहकारी विचारमंथन करत आहेत.

भावाच्या अपहरणाने मेहरंगचे आयुष्य बदललं…
महरंग बलोच (31) या व्यवसायाने डॉक्टर आहेत. बलुचिस्तानमध्ये पाक लष्कर व सरकारच्या दडपशाहीविरोधात त्या आवाज उठवत आहेत. 30 वर्षांपूर्वी त्यांचे वडील (राजकीय कार्यकर्ते) बेपत्ता झाले होते. 2011 मध्ये त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. पण 2017 मध्ये त्यांचा भाऊ बेपत्ता झाल्याने त्यांना मोहीम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. 2018 मध्ये त्यांचा भाऊ परत आला असला तरी धमक्या आणि विरोधाचा सामना करूनही महरंगने बेपत्ता झालेल्या सर्वांसाठी न्याय मिळवण्यासाठी मोहीम सुरूच ठेवली. 2019 मध्ये त्यांनी बलुच यकजेहती समिती (बीवायसी) स्थापन केली. धमक्या मिळाल्या तरीही मेहरंग कधीच मागे हटली नाही.
मेहरंग म्हणतात- आता मी मृत्यूलाही घाबरत नाही
मेहरंग सांगतात, ‘लहानपणी मला मृत्यूची भीती वाटत होती. त्यामुळे अंत्यसंस्काराचीही भीती वाटायची. शवागारात माझ्या वडिलांचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह ओळखण्यासाठी मी पहिल्यांदा मृतदेह पाहिला. आता गेल्या दीड दशकात जवळच्या माणसांचे अनेक मृतदेह पाहिलेत; आता मृत्यू मला घाबरवत नाही. गेल्या दोन दशकांत 50 हजारांहून अधिक बलुचांचे अपहरण झाले असून 25 हजार लोकांची हत्या झाली आहे.
ही संख्या जास्तही असू शकते. कारण आता डेटा गोळा करणेही धोक्याचे आहे.’ महरंग सांगतात, ‘आम्ही शाळांमध्ये जनआंदोलन सुरू केले आणि तरुणांना जागरूक करण्यासाठी घरोघरी गेलो. आमच्या निषेधाचा सर्वात पुरोगामी पैलू म्हणजे हजारो स्त्रिया, त्यांच्या आई आणि काकूंपासून आजी, पणजींपर्यंत या चळवळीत सामील झाल्या आहेत. गेल्या महिन्यात बीवायसीने बलुच लोकांच्या अत्याचाराबाबत बोलण्यासाठी ग्वादरमध्ये बलुच लोकांचा राष्ट्रीय मेळावा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. महरंग सांगतात, ‘बलोच दडपशाहीविरोधात दोन लाख लोकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्याची ही पहिलीच वेळ होती.’

काय आहे बलुच इतिहास?
भारतातून इंग्रज निघून जात असताना देशाची फाळणी झाली. त्यावेळी बलुचिस्तान प्रांतातील मकरान, लास बेला, खारान आणि कलात या चार मुख्य प्रदेशांमध्ये तेथील मूलवासी राजांची सत्ता होती. या प्रमुखांची निष्ठा ब्रिटनच्या गादीला वाहिली गेली होती. यातील कलातचे सरदार सर्वात ताकदवान होते व अन्य प्रदेश त्यांचे मंडलिक असल्याप्रमाणे होते. स्वातंत्र्यावेळी कलातचे अखेरचे ‘खान’ अहमद यार खान यांनी स्वतंत्र बलोच राष्ट्राची जाहीरपणे मागणी केली.
पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आपली ही मागणी मान्य होईल, याची खान यांना खात्री होती व ती एका अर्थी मान्यही झाली होती. कारण 11 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालिन पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानबरोबर ‘मैत्रीचा करार’ केला होता. याचा अर्थ बलुचिस्तानचे स्वतंत्र अस्तित्व पाकिस्तानने मान्य केले होते. मात्र रशियाचा प्रभाव वाढण्याच्या भीतीने ब्रिटनचा स्वतंत्र बलुचिस्तानला विरोध होता. त्यातच कलातला बाजूला सारून अन्य तीन प्रदेशांच्या सुल्तानांनी पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला.
त्यामुळे कलातच्या चारही बाजूंना पाकिस्तान असा नकाशा तयार झाला असता. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा सूर बदलला व बलुचिस्तानच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातच खान यांना भारतात विलीन व्हायचे असल्याची अफवा ऑल इंडिया रेडियोच्या हवाल्याने पसरविली गेली. परिणामी 26 मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये सैन्य घुसवले व दुसऱ्या दिवशी त्या प्रांताचे पाकिस्तानात विलिनीकरण करण्यात आले.
विलिनीकरणाच्या कराराची शाई वाळण्यापूर्वीच बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधी वारे वाहू लागले. जुलै 1948 मध्ये खान यांचा भाऊ, राजपुत्र अब्दुल करीम यांनी कराराविरोधात बंड पुकारले. त्यानंतर 1958-59, 1962-63 व 1973 ते 1977 या कालखंडात वेगवेगळ्या स्वातंत्रलढाया झाल्या. 2003 पासून सुरू झालेला सशस्त्र विरोध आजतागायत सुरू आहे. याकाळात पाकिस्तानी सैन्याने अत्यंत क्रूर पद्धतीने बंड दडपण्याचा अनेकदा प्रयत्न केला. अनन्वित अत्याचार, मनमानी अटकसत्रे, छळ, खटले न चालवताच फाशी देणे अशा बातम्या येऊ लागल्या.
2011 साली अम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या अहवालानुसार येथे पाकिस्तानचे ‘किल अँड डंप’ धोरण आहे. यात अनेकदा गणवेशधारी सैनिक केवळ संशयावरून कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील यांना ताब्यात घेतात. त्यांचा छळ केला जातो व नंतर गोळ्या घालून मृतदेह फेकून दिले जातात. मुळातच पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली, तरी तेथील विविध मुस्लिम पंथांचे एकमेकांशी वाकडे आहे. बलोच हे सिंधी किंवा पंजाबी मुस्लिमांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीनेही संपन्न आहे. सिंधी-पंजाबी राज्यकर्ते आपल्या प्रांताचे केवळ शोषण करतात, अशी बलोच नागरिकांची भावना अवास्तव नाही. कारण पाकिस्तानातील सर्वात गरीब आणि तुरळक वस्त्या असलेला प्रांतही हाच आहे.

या प्रांतात जवळपास दीड कोटी नागरिक राहतात. खनिज तेल, कोळसा, सोने, तांबे, नैसर्गिक वायू आदींनी हा प्रदेश समृद्ध आहे. परंतु प्रांताचे सकल उत्पादन आणि दरडोई सकल उत्पन्न पाकिस्तानच्या सरासरीच्या कितीतरी खाली आहे. गेल्या दशकापासून या ठिकाणी चिनी प्रकल्पांची आखणी केली जात आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ अंतर्गत मार्गिका या प्रांतातून जाते.
ग्वादार हे बंदर विकसित करण्याची मोठी योजना आहे, तेही बलुचिस्तान प्रांतातच आहे. बलुच ही स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असलेली जमात. पाकिस्तान आणि इराण अशा दोन देशांमध्ये विभागलेली आहे. दोन्हीकडील प्रांतांना बलुचिस्तान असे संबोधले जाते. दोन्ही देशांच्या सरकारांकडून बलुचींचे अस्तित्व नाकारले जाते. यातून संघर्ष हा ठरलेला.
या सांस्कृतिक संघर्षाला पाकिस्तानी बलुचिस्तानमध्ये आर्थिक, राजकीय संघर्षाची जोड मिळाली. इस्लामाबादमधील पंजाबी वर्चस्ववादी मानसिकतेची सरकारे आणि चिन्यांचे बलुचिस्तानातील प्रकल्प यांच्या संगमात आपल्या पदरात काहीच पडत नाही, याची जाण प्रबळ झाल्यामुळेच चिनी आणि पंजाबी अशा दोन्हींना हल्ली लक्ष्य केले जाते. पाकिस्तानच्या पश्चिम आणि वायव्य सीमेवरील अनुक्रमे बलुचिस्तान आणि खैबर-पख्तुनख्वा हे दोन्ही प्रांत अशांत आहेत. पण त्यातही अलीकडे बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तपात होत आहे.
कारण या प्रांतातील नागरिकांच्या मूळ प्रश्नाची उकल सोडवण्याची इच्छाशक्ती आणि संवेदनशीलता पाकिस्तानी सरकारांनी कधीही दाखवलेली नाही. या अशांत परिस्थितीमागे भारत, इराण, अफगाणिस्तान अशा परकीय शक्तींचा हात असल्याचे जाहीर केले की आपली जबाबदारी संपते हे इस्लामाबादमधील सत्ताधीशांचे सूत्र ठरलेले आहे. या अनास्थेचे दुष्परिणाम वेळोवेळी आणि जागोजागी दिसू लागले आहेत. पाकिस्तानचे बलुचिस्तान धोरण कसे वर्षानुवर्षे फसलेले आहे, हे रक्तलांछित वास्तव या हल्ल्यांनी अखोरेखितच होते.






