शेतकरी वीर सिंह (44) दाण्यांनी भरलेली टोपली घेऊन कुट-कुट असा आवाज देतात. आवाज ऐकून कित्येक डझन काळे कोंबडे त्यांच्याकडे धावत येतात. झाबुआ जिल्ह्यातील छोटागुडा गावात आता ही पहाटेची वेळ आहे. या वेळी सिंह या कोंबड्यांना उघड्यावर फिरण्यासाठी आणि दाणे खाण्यासाठी बोलवत आहेत.
“कोंबडे उघड्यावर फिरले तर अधिक निरोगी आणि आनंदी राहतात आणि त्यांच्या पंखांवर एक वेगळी चमकही येते,” सिंह सांगतात. ते मागील 12 वर्षांपासून कोंबडे पाळत आहेत. या नेहमीच्या पांढऱ्या रंगाच्या कोंबड्या नसून काळ्या रंगाच्या आहेत. झाबुआतील या प्रसिद्ध कोंबड्या कडकनाथ नावानं ओळखल्या जातात.
“कडकनाथ कोंबड्यांचे पंख, कातडी, नखं, पाय आणि आतले अवयवही काळेच असतात. यांचं रक्तही काळंच असतं,” वीर सिंह कडकनाथची वैशिष्ट्ये. कडकनाथच्या उत्पत्तीविषयी सिंह सांगतात, “आमचे आजोबा सांगायचे की जंगलात एक काळा कोंबडा मिळासांगतातयचा. त्याला कालामासी म्हणायचे. मी लहानपणी कोणाला कोंबडे पाळताना पाहिलं नाही. पण नंतर कृषि केंद्राच्या वैज्ञानिकांच्या मदतीनं पाळायला लागलो.”
कडकनाथ कोंबडा आधी झाबुआ आणि अलिराजपूरच्या जंगलांमध्ये मिळायचा. भील आणि भिलाला आदिवासींनी त्याला जंगलातून पकडून पाळायला सुरूवात केली. त्यांच्या कर्मकांडांत याला महत्त्वाचं स्थान आहे. सरकारी नोंदीनुसार कडकनाथ कोंबडा भारतीय वंशाचाच आहे. याच्या जेट ब्लॅक, गोल्डन आणि पेंसिल्ड अशा तीन जाती आहेत. कडकनाथच्या मांसाला 2012 मध्ये झाबुआ कडकनाथ ब्लॅक चिकन मीट या नावाने जियोग्राफीकल इंडिकेशन टॅग मिळाला.

जंगलापासून पोल्ट्री फार्मपर्यंत…
पशूवैद्य ए. एस. दिवाकर सरकारी कडकनाथ फार्मवर काम करतात. त्यांना रोग होऊ नये म्हणून ते औषधी जुळवत आहेत. मध्य प्रदेश शासनानं झाबुआमध्ये हा फार्म सुरू केला आहे. ते सांगतात, “आधी अलिराजपूर जिल्हा देखील झाबुआचाच भाग होता. तिथं कठ्ठीवाडा जंगलातील आदिवासी काळे कोंबडे घेऊन यायचे. त्यांच्या पारंपरिक सणांमध्ये आणि उत्सवांत यांचा मोठा उपयोग असतो.
ऐंशीच्या दशकात सरकारला याची माहिती मिळाली. शासकीय प्रयत्नांमुळे जंगलातून काळे कोंबडे-कोंबड्या पकडून आणण्यात आल्या आणि 1985 मध्ये एका फार्मवर त्यांचं प्रजनन सुरू झालं. पण केंद्र सुरू झाल्यानंतर सरकारसमोर मोठी अडचण आली. समजलं की या कोंबड्या आपल्या अंड्यांवर बसत नाही त्यामुळे पिल्लं जन्माला येत नव्हती. त्यावर उपाय म्हणून शासनानं हॅचरीची मशीन आणली. त्यानंतर कोंबड्यांची संख्या वाढू लागली.”
चार दशकांनंतर आता झाबुआ व्यतिरिक्त मध्य प्रदेश आणि देशातील अनेक राज्यांत कडकनाथ पाळला जातो. झाबुआतील कडकनाथची पिल्लं आणि अंडी देशातील कानाकोपऱ्यात जातात. सरकारी केंद्रांशिवाय खासगी पोल्ट्री फार्ममध्येही कडकनाथचं प्रजनन सुरू आहे.
कडकनाथला बाजारात नेण्यासाठी मध्य प्रदेश शासनाच्या प्रयत्नांसोबतच झाबुआत राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालय, ग्वाल्हेर द्वारा संचालित कृषि विज्ञान केंद्राचे प्रयत्नही मोलाचे आहेत. त्याचे प्रमुख जगदीश मौर्य यांनी मोंगाबे-हिंदीला सांगितलं की कडकनाथ विषयी 2009 पासून काम सुरू करण्यात आलं. “आम्ही 500 कोंबड्यांपासून याची सुरूवात केली. शेतकऱ्यांना पिल्लं वाटली. आता गुजराथ, ओडिशा, महाराष्ट्र, तमीळनाडू, असम, हिमाचल प्रदेश इथं आम्ही पिल्लं आणि अंडी पुरवत असतो.”
कडकनाथ हवामान बदलाचे परिणाम सोसू शकतो
कृषि केंद्रानं कडकनाथ मांसाची गुणवत्ता मापण्यासाठी काही नमुने राष्ट्रीय पोषण संस्थानकडे पाठवले. अहवालातून समजलं की कडकनाथच्या मांसात चरबी आणि कोलेस्ट्रॉल कमी असतो. पण प्रथिनं आणि लोहाची मात्रा जास्त असते. कडकनाथच्या शंभर ग्रॅम मांसामध्ये 24 टक्के प्रथिनं असतात. ब्रॉयलर चिकनमध्ये याचं प्रमाण 18-20 टक्के असतं.

कडकनाथमध्ये 1.94 ते 2.6 टक्के चरबी असते तर ब्रॉयलरमध्ये 13 ते 25 टक्के चरबी असते. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कडकनाथमध्ये 60 एमजी असतं तर ब्रॉयलरमध्ये 218 एमजी पर्यंत असतं. कडकनाथ देशी वाण असल्यामुळे इथल्या हवामानात टिकून राहतं. मौर्य सांगतात, “झाबुआचं हवामान उष्ण आहे, पण भीषण गरमीतही कडकनाथ जगू शकतो.” झाबुआत सरासरी 855.5 मीमी पाऊस पडतो आणि गरमीत दिवसाचं तापमान 40 अंशापर्यंत जातं.
मध्य प्रदेश शासनाच्या एप्को संस्थेच्या अहवालानुसार झाबुआत हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येणार आहेत. अशात कडकनाथ पालन हा इथल्या लोकांसाठी एक चांगला रोजगार ठरू शकतो. कृषि केंद्राचेच वैज्ञानिक चंदन कुमार सांगतात, “कडकनाथ हवामान बदलाचे परिणाम सोसू शकतो. देशी वाण असल्यामुळे या हवामानाला तो अनुकूल ठरतो. कोणताही देशी पक्षीवंश वाढत्या गरमीशी संतुलन साधून जगू शकतो.”
कडकनाथ प्रजातीचा वाढीचा दर ब्रॉयलरच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे वाढत्या गरमीतही या कोंबड्या जगू शकतात असं दिवाकर सांगतात. ब्रॉयलरसाठी मात्र 35 अंशानंतर थंड वातावरणाची गरज लागते. पण दिवाकर असंही सांगतात की झाबुआत आता 45 अंशापर्यंत तापमान जाऊ लागलं आहे त्यामुळे कडकनाथला वाचवण्यासाठी थंड वातावरणाची गरज भासणार आहे.
कडकनाथचं हे वैशिष्ट्य पाहूनच झाबुआ कृषि केंद्रानं इथल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना हवामान बदलात रोजगार मिळावा म्हणून कडकनाथची पिल्लं वाटली. राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवोत्पादन कार्यक्रमाचे अनिल शर्मा सांगतात, “कडकनाथ गरमी सहन करू शकतो. त्याची पिल्लं मरण्याचा दर कमी असतो. या कोंबड्यांना चांगली किंमतही मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढत आहे.”
कडकनाथ लडाखसारख्या उंच ठिकाणीही पाळला जाऊ शकतो
कुमार सांगतात की, हवामान अनुकूल असल्यामुळे मध्यप्रदेशासोबतच देशातील 13 राज्यांमध्ये कडकनाथ पाळला जात आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटन (डीआरडीओ) यांच्या संरक्षण उच्च उन्नतांश संशोधन संस्थानच्या 2022 च्या अहवालात म्हटलंय की कडकनाथ लडाखसारख्या उंच ठिकाणीही पाळला जाऊ शकतो. इथं बाकी वाण पाळले जाऊ शकत नाहीत पण कडकनाथ कमी वेगानं वाढत असल्यामुळे कमी उर्जेतही त्याचं काम भागतं.
त्यामुळेच त्यांचा मृत्यूदर इथं कमी आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आता कडकनाथ पाळण्याचा सल्ला दिला जातोय. कडकनाथ कोंबड्यांमध्ये अनेक गुण आहेत पण मांसासाठी त्या पाळायच्या म्हटल्या तर पाच-सहा महिने वाट बघावी लागते. ब्रॉयलर कोंबड्या मांसासाठीच तयार केल्या गेल्या आहेत. त्या दीड महिन्यात विक्रीसाठी तयार होतात, कुमार सांगतात.
कडकनाथ समोर आव्हान क्रॉस ब्रीडचे…
कडकनाथ लवकर तयार व्हावी म्हणून अनेक प्रयोग केले जात आहेत. दुसऱ्या जातींसोबत यांचा संकर घडवून नवीन प्रजाती तयार करण्यात येत आहे. केंद्रीय पक्षी संशोधन केंद्राने कडकनाथ आणि कार्ल रेड यांच्यापासून श्यामा नावाची प्रजाती तयार केली आहे.
नानाजी देशमुख पशू वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, जबलपूर यांनी कडकनाथ आणि जबलपूर कलर यांच्यापासून नर्मदा निधी नावाची जाती तयार केली आहे. पण अनेक वैज्ञानिक अशा प्रयोगांच्या विरोधात आहेत. कडकनाथच्या अधिकृत जातीसाठी ते घातक मानलं जातंय. “अशा संकरातून तयार झालेली जाती भलेही कडकनाथसारखी दिसेल पण त्याची गुणवत्ता कडकनाथसारखी असत नाही.
अस्सल कडकनाथ कोंबडा एक ते दीड किलो वजनाचा असतो तर संकरीत कडकनाथ तीन किलोपर्यंत वाढतो. बाजारात हे संकरीत वाणच अस्सल म्हणून विकलं जातं हे चुकीचं आहे,” कुमार म्हणतात. वाणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याविषयी दिवाकर सांगतात की, ते जंगलातून कडकनाथ कोंबडे घेऊन येतात आणि त्यांचं प्रजनन करून त्यांचं वाण अधिक चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतात.
वीर सिंह कोंबड्या पाळण्यात खुश आहेत. ते सांगतात, “तीन महिन्यांपूर्वी गुजराथच्या एका व्यापाराला मी 27 हजार रुपयांचे कोंबडे विकले. यात खर्च 30 टक्के आहे तर लाभ 70 टक्के आहे. पाच-सहा महिने या कोंबड्यांना चांगलं खाऊपिऊ घातलं की त्या विक्रीसाठी तयार होतात.” पोषणमुल्ये चांगली असल्यामुळे कडकनाथला बाजारात चांगली किंमत मिळते.
शेतकरी याला 800 ते 1000 रुपये प्रती किलो आणि अंडी 20-35 रुपये डझनाने विकतात. 2022 च्या एका शोध अहवालात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ येथील कडकनाथच्या विक्री साखळीचं विश्लेषण करण्यात आलं होतं.

शेतकरी आपल्या 38 टक्के कोंबड्या व्यापाऱ्यांना विकतात. 30 टक्के कोंबड्या थेट ग्राहकांना विकतात. व्यापारी त्यांनी विकत घेतलेल्या कोंबड्यांपैकी 39 टक्के कोंबड्या अन्य जिल्ह्यांत वितरीत करतात. 31 टक्के ढाब्यावर विकल्या जातात आणि 22 टक्के सामान्य ग्राहकांना विकल्या जातात.
वीर सिंह यांच्याप्रमाणेच झाबुआच्या अंतरवेलिया गावच्या पुष्पा दोहरे यांनीही कृषि केंद्रातून प्रशिक्षण घेऊन कडकनाथ कोंबड्या पाळणं सुरू केलं. 2021 मध्ये त्यांनी 500 कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू केला होता. आता त्यांच्याकडे 2000 कोंबड्या आहेत आणि 10 हजार क्षमतेची हॅचरी यंत्रणा आहे.
सिंह आणि दोहरे यांच्यासारख्या कडकनाथ उत्पादकांना मदत करण्यासाठी, झाबुआ जिल्हा प्रशासनाने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत कडकनाथ कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘झाबुआ कडकनाथ’ नावाचं संकेतस्थळ तयार केलं आहे. यावर येऊन अनेक व्यापारी, उत्पादक कडकनाथ कोंबड्यांचा, अंड्यांचा व्यापार करीत आहेत.
आता सूर्य वर येऊ लागला आहे. जूनचं उन्हं कडकनाथ कोंबड्यांना नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे सिंह आता कोंबड्यांच्या खुराड्यात जाऊन कुट-कुट करू लागले आणि तो ऐकून सारे कडकनाथ खुराड्याकडे धावत येऊ लागले.
सौजन्य - mongabay.com
अनुवाद - प्रतिक पुरी






